19 February 2020

News Flash

सगुण ते निर्गुण

आमच्या लहानपणी ऊठसूठ कोणीही घरी गणपती आणत नव्हते. श्री गणेशाचे सोवळे खूप कडक असे.

|| सुमेधा वैद्य

गणपतीचे चित्र म्हणजे चार हात, दोन मोठ्ठे हत्तीचे कान, वळणदार सोंड, गोलाकार पोट आणि शेला-पितांबर हे सगुण रूप मनात पक्के बसलेले, पण या सगुणाचा निर्गुणाकडे जो प्रवास सुरू झाला तो अथर्वशीर्ष कानावर पडल्यावरच! त्याच्या शब्दोच्चारातील उच्चार-लहरींनी मनाला वेड लावले, आणि जसा जसा त्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजत गेला तसे श्री गणेशाचे एक एक अमूर्त चित्र डोळ्यांसमोर उभे राहात गेले. निर्गुण निराकार रूप कळू लागले. प्रत्येक बिंदूमध्ये, रेषेरेषेत, प्रत्येक आकारात, रंगात, अवकाशात, पाण्यात, अग्नीत, भूतलावर, भूगर्भात, लयीत, अंतरात, सूर्यताऱ्यांत, चंद्रात आणि कणाकणांत श्री गणेशाचे दर्शन घडू लागले आणि अष्ट दिशांतून आकाश-पाताळातून त्याचे अमूर्त रूप आकार घेऊ लागले..

आमच्या लहानपणी ऊठसूठ कोणीही घरी गणपती आणत नव्हते. श्री गणेशाचे सोवळे खूप कडक असे. एकदा पडलेला पायंडा कोणी मोडायला धाजावत नसे. म्हणूनच की काय, दीडशे वर्षांच्या परंपरेने आमच्या नेरळच्या घरीच शाडूमाती आणून गणपती बनवला जाई. प्रत्येक पिढीत एक शिल्पकार निर्माण होई. अगदी वय वर्षे पाच असल्यापासून मातीच्या गोळ्यामधून हळूहळू प्रकट होणारे गणपतीचे रूप तासन्तास गावच्या घरी पायरीवर बसून न्याहाळलेले अजून स्मरणात आहे. श्री गणेशाच्या निर्मितीची पहिली ओळख तिथे झाली. त्यानंतर एकदा प्राथमिक शाळेत चित्रकलेच्या तासाला चित्रकलेच्या सरांनी फळ्यावर चितारलेले श्री गणेशाचे स्वरूप पाहून ते वहीत हुबेहूब उतरवून घेतले. तो अविस्मरणीय आनंदाचा क्षण गणरायासोबतचे नाते अधिकच घट्ट करून गेला.

नंतरच्या काळात श्री गणेशाच्या श्लोक, स्तोत्रे आणि आरत्यांमधून सहज शब्दांत वर्णिलेले रूप कानावर पडत गेले. लंबोदर, वक्रतुंड, गणाधीश, गौरीपुत्र, एकदंत, विघ्नराजेंद्र, गजानन आणि अशी अनेक रूपे मनात आकार घेत गेली. ही सारी रूपे मानवनिर्मित प्रतिमेत समोर येत राहिली. गणपतीच्या सुट्टीत गावी जाऊन रोज २१ घरांतल्या गणपतींचे दर्शन घेतल्याशिवाय मनाला चन पडत नसे. तिथल्या गणपतीचे विसर्जन झाले की, मुंबईला परत येऊन मुंबईतल्या मोठय़ा गणपतीचे दर्शन असा शिरस्ता असे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यामुळे श्री गणेशाच्या नवनव्या रूपांची निर्मिती करणाऱ्या असंख्य कलाकारांचा जन्म झाला. फक्त शिल्पकलेनेच नाही तर सर्वच कलांनी खूप मोठी उंची गाठली.

दादरपासून गिरगावपर्यंत अनेक गणपती उत्सवातील चलतचित्रे साक्षात गणपतीचे दर्शन देऊ लागली. त्या एका दर्शनासाठी तासन् तास रांगेत उभे राहिल्यावर गणपती पावल्याचे समाधान मिळत असे. असा श्री गणेशाच्या मूर्त प्रतिमेचा मनात प्रवास सुरू झाला होता. पुढे काही काळ गणितातल्या गुणांनी सिद्धिविनायक, उद्यान गणपती यांच्या पायऱ्या झिजवायला भाग पाडले. पण गंमत अशी की, प्रत्येक वेळी आपल्या मूडनुसार त्याचे वेगळे दर्शन घडे. परीक्षेत कमी गुण मिळाले की, बाप्पा उगीचच रागावून बघतो असे वाटे तर पेढे घेऊन गेल्यावर स्वारी खुशीत आहे असे वाटे.

गणपतीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ त्याच्या डोळ्यांत दिसते आणि त्याची नजर हृदयाचा ठाव घेते. सतत त्याची आपल्यावर नजर आहे असे जाणवू लागले. घरातल्या आणि मंदिरातल्या सर्व बाप्पांचे दगडात, धातूमध्ये, कोरीव कामात, तसबिरीतल्या चित्रांमध्ये, कधी शंकर-पार्वतीसह तर कधी लक्ष्मी आणि सरस्वती देवीसह दर्शन होऊ लागले. महाराष्ट्रात गोरा गुलाबी, शेंदरी अशा उष्ण रंगसंगतींमधील गणपती तर दक्षिण भारतात काळ्याशार दगडात सुंदर कोरीव काम केलेला गणपती असे रूप समोर आले. प्राचीन काव्यात गणितज्ञ भास्कराचार्याच्या ‘लीलावती’त, ‘गणेशाय नमो नीलकमलामलकान्तये’ या शब्दात एका निळ्या कमळासारख्या निखळ गणपतीचे रूप वर्णिलेले मनाला खूप भावले. कसा दिसेल निळा गणपती हे एकदा कागदावर उतरवून पाहिले. नंतर दिवाळीच्या रांगोळीत माझा गणपती नेहमी भाव खाऊन जात असे.

संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात

श्री गणेशाच्या सगुण अवतारी रूपाचे समग्र दर्शन घडते, पण महाराष्ट्रातील स्वयंभू अष्टविनायक हे अत्यंत सरळ सुलभ व मूळ आकारात दिसतात. कदाचित अशा मुळाकारात प्रकट होऊन

श्री गणेश आपल्याला यातून सुटसुटीत सोपे आयुष्य जगण्याचा संदेश तर देत नसेल ना, असे वाटते. मध्य आणि आदिकाळात गणपतीचे वर्णन रक्तवर्णी असे केले असून ‘मिनियेचर आर्ट’मध्ये मातकट रंगात पिवळ्या पितांबरात दिसला.

श्री गणेश हाती लेखणी घेऊन विद्यादेवतेच्या रूपात तर कधी उंदरावर स्वार दिसला. केरळच्या म्युरलमध्ये गणपती सुंदर वळणदार, घाटदार शरीराच्या आकारात तर तांजोरमधले रुप लखलखत्या सोनेरी दागिन्या-उपरण्याने नटलेले दिसले. तर वारली गणपतीचे रुप केवळ पांढऱ्या रेषांनी नटलेले पाहिले.

श्री गणेशाची अगणित रूपं!

कालांतराने गणपती बाप्पाचे चरित्र वाचल्यावर त्याचा मिश्किल स्वभाव, त्याच्या खोडय़ा, ते उंदरावर स्वार झालेले रूप, हाताची घडी घालून उभा असलेला गोंडस चेहरा.. अ‍ॅनिमेशनच्या रूपात तरल रेषांतून स्टोरीबोर्डमध्ये उमटू लागले. चित्रकथा, चित्रपट, गाणी अशा साऱ्यांमुळे मनावर खोल कुठे तरी त्याचे मूर्त रूप त्याच्या चारित्र्यासह खोल उमटले. त्याच्या अस्तित्वाचा आभास सतत होऊ लागला. किती तरी वेळा बाप्पा फळाफुलांमध्ये,पानांमध्ये किंवा भोपळी मिरचीत प्रतीकात्मक रूपात नैसर्गिकरीत्या प्रकट झालेला भासला. कधी कुठे ग्राफिकच्या माध्यमातून चौकोनी, गोल, त्रिकोणी गणपती वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिकांवर सोनेरी, चंदेरी, लाल रंगात तर कधी अक्षता, हळदी-कुंकू लावून लाखो करोडोंनी विराजमान झाले आणि लग्नपत्रिकांचे अस्तित्व अजरामर करून गेले. गणपतीचे चित्र म्हणजे चार हात, दोन मोठ्ठे हत्तीचे कान, वळणदार सोंड, गोलाकार पोट आणि शेला-पितांबर हे सगुण रूप मनात पक्के बसलेले, पण या सगुणाचा निर्गुणाकडे जो खरा प्रवास सुरू झाला तो अथर्वशीर्ष कानावर पडल्यावरच! प्रथमदर्शनी ते ऐकल्यावर समजायला कठीण गेले पण त्याच्या शब्दोच्चारातील उच्चार-लहरींनी मनाला वेड लावले, मनाची पकड घेतली आणि जसा जसा त्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ समजत गेला तसे श्री गणेशाचे एक एक अमूर्त चित्र डोळ्यांसमोर उभे राहात गेले. निर्गुण निराकार रूप कळू लागले. प्रत्येक बिंदूमध्ये, रेषेरेषेत, प्रत्येक आकारात, रंगात, अवकाशात, पाण्यात, अग्नीत, भूतलावर, भूगर्भात, लयीत, अंतरात, सूर्यताऱ्यांत, चंद्रात आणि कणाकणांत श्री गणेशाचे दर्शन घडू लागले. अष्ट दिशांतून आकाश-पाताळातून त्याचे अमूर्त रूप आकार घेऊ लागले. मुलाधार चक्रात, ध्यानात सामावून गेले. मग सुरू झाली अमूर्त रूपाची निर्मिती. समुद्रावरील वाळूतल्या रेघोटय़ा असो, कागदावरील जलरंग किंवा अ‍ॅक्रिलिक रंगात अथवा तल रंगात असो, कॅनव्हासवर असो वा कागदावर.. त्याच्या निर्मितीतला आनंद अद्वितीय होता आणि नवे डिजिटल नावाचे खेळणे हाती लागले. त्यात तर विचारांच्या वेगात श्री गणेशाचे रूप उमटू लागले. विचारांना तात्काळ रंग-रूप देण्याचे सामथ्र्य आजकाल नव्या तंत्रज्ञानामध्ये दिसते. मेंदू नावाच्या अवयवावर त्या बुद्धीदेवतेच्या विराजमान होण्याचे हे संकेत आहेत. काही दिवसांनी केवळ विचार लहरीच चित्रकलेचे काम करतील असे वाटते. फक्त डोळे मिटून विचारांना वाट करून द्यायची. समोर स्क्रीनवर बाप्पाचे चित्र तयार! कॅनव्हासवर खऱ्याखुऱ्या ब्रश आणि रंगांनी चित्र काढण्यात जी मजा येते तितकीच मजा संगणकावर व्हच्र्युअल ब्रशने स्क्रीनवर चितारण्यात येते. किंबहुना एकदा हातावर आणि ‘माऊस’वर विजय मिळवला की, क्षणात समोर हवा तसा आपल्या मनातला गणपती प्रकट होतो. सोबत मी काढलेले हे काही गणपती –

१) हिरव्या-निळ्या चक्राकार लयीत स्थित स्वरूपातला गणपती

(मीडियम – अ‍ॅक्रॅलिक ऑन कॅनव्हास)

पहाटेच्या मंद प्रकाशात डोळे मिटून पाहिलेले श्री गणेशाचे रूप हे हिरव्यागार पृथ्वीला, निळ्याशार आकाशाला आणि गर्द करडय़ा पाताळाला व्यापून टाकणारे दिसते. मनात चतन्य निर्माण करणारा बिंदू  हा प्रकाशमय होतो आणि मुलाधार चक्रापलीकडे जाताना दिसतो. तिन्ही शक्ती जागृत होऊन चक्राकार लय स्थित होऊन या जगाच्या उत्पत्तीचे दर्शन होताना दिसते. शुभ्र एकदंत त्याच्या अस्तित्वाचा आभास निर्माण करतो आणि शेवटी श्री गणेशाच्या आत्मस्वरूपाचे नतमस्तक करणारे दर्शन होते. दूर दूर जाणारा बिंदू  पाहून मन भारावून जाते आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा विचार मनाची पकड घेतो. मन भावनांनी उचंबळून येते, बाप्पाच्या जाण्याच्या नुसत्या विचाराने..

२) करडय़ा रेषांतला शुभ्र एकदंत..

(मीडियम – डिजिटल ऑन कॅनव्हास)

सायंकाळी लक्ष्मीच्या मायेचा पडदा पृथ्वीवर ओढलेला असा अलगद वाऱ्यावर झुलताना दिसतो. त्यात श्री गणेशाचे स्वरूप झाकोळले गेल्यासारखे भासते, कारण भगवंताची लीला आहेच अशी की, कुठल्याही गोष्टीचे खरे स्वरूप या मायावी पडद्यामागे झाकले जाते. पण त्या मायेच्या पडद्याच्या लयदार नाजूक रेषांतून, शुभ्र प्रकाशातून, अलगद श्री गणेशाचे रूप उमटते. जणू काही तो या पृथ्वीवर यायला निघाला आहे, झुलत-झुलत एकदंताच्या रूपात स्वारी आसमंतातून मार्ग काढत, पांढऱ्याशुभ्र दुर्वाकुरातून हळूच या पृथ्वीतलावर उतरेल आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषात लवकरच विराजमान होईल.

३) कनक दंत रूप मनोहर..

(मीडियम – अ‍ॅकॅ्रलिक ऑन कॅनव्हास)

महासंकटांपासून मुक्ती देणारा, सर्व संकटांचा नाश करणारा आणि त्यात आपला एक दंत हरवून बसलेला पण दिमाखात एक दंत सोन्याच्या पदकासारखा मिरवणारा एकदंत मला प्रेमाच्या रंगाची झालर असलेला भासतो. करडय़ा-तपकिरी आणि लाल रंगाच्या छटांमधून, म्हणजे रज-सत्त्व-तम या गुणांच्या पलीकडून डोकावणारा महाकाय विघ्नहर्ता मनोहर मनातून कागदावर उतरतो.

४) पंचमहाभूतांत सामावलेला गं गणपती

भूमी, जल, अग्नी, वायू व आकाश या सर्वात सामावलेले श्री गणेशाचे अमूर्त स्वरूप ‘गं’ या अक्षरात दिसते. ब्रह्मा-विष्णू आणि इंद्राच्या तिन्ही लोकीसुद्धा त्याचेच अस्तित्व प्रथम जाणवते. आपल्याकडे छोटय़ा बाळाला जो नमस्कार करायला शिकवला जातो तो ‘बाप्पा मोरया’ असा. ओठांचा छोटासा चंबू करून बाळ जेव्हा ‘मोरया’ म्हणते तेव्हा त्याच्या त्या रूपातसुद्धा त्या विद्येच्या आराध्य दैवताची झलक दिसते..

५) रक्तवर्णी लंबोदराचे अमूर्त रूप

कधी अग्नीच्या ज्वालांमध्ये तर कधी जास्वंदीच्या फुलांमध्ये प्रकट होणारा रक्तवर्णी गणपतीचे त्याचे ओझरते दर्शन आपल्या नकळत देऊन जातो. आणि जिथे-तिथे, जळी-स्थळी-काष्ठी (पाषाणी) तो कसा कणाकणांत भरून राहिला आहे याची सुखद जाणीव होते.अशा या श्रीगणेशाला माझे शतश: प्रणाम.  – sumedhavaidya@rediffmail.com chaturang@expressindia.com

First Published on August 31, 2019 1:22 am

Web Title: drawing ganesha shlok atharvashirsha ganpati utsav akp 94
Next Stories
1 गणेशोत्सवासाठी खडा पहारा
2 आधी चितारू तुज मोरया.
3 म्हणा मनापासून..गणपती बाप्पा मोरया!
Just Now!
X