News Flash

‘डिंक’ स्वीकारताना..

डिंक अर्थात डबल इन्कम नो किड्स, ही संकल्पना अस्तित्वात आली त्याला ४० वर्षे झाली.

आपल्याला मूल असावं की नाही, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असायला हवा. परंतु बहुतेक वेळा तो सामाजिकच जास्त असतो.

वृषाली मगदूम – vamagdum@gmail.com

डिंक अर्थात डबल इन्कम नो किड्स, ही संकल्पना अस्तित्वात आली त्याला ४० वर्षे झाली. जगभरातल्या अनेक जोडप्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला. आपल्याला मूल असावं की नाही, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असायला हवा. परंतु बहुतेक वेळा तो सामाजिकच जास्त असतो. भारतातही अनेकांनी ही जीवनपद्धती स्वीकारली, मात्र काळानुसार त्यातील कारणांमध्ये बदल होत गेला. व्यक्तिगत, आर्थिक,  मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक, पर्यावरणीय अशा अनेक गोष्टींमुळे जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला गेला. त्यांची कारणे सगळ्यांना पटावीत असा त्यांचा आग्रह नाही, परंतु त्यांनी स्वत:साठी जगण्याची एक पद्धत निवडली आहे. काय आहेत त्यांचे अनुभव?  कुटुंबपद्धती बदलते आहे, असे म्हटले जाते हा त्यातलाच एक भाग आहे का?

परिणीता इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करते. खूप धावपळ आणि धकाधकीचे आयुष्य आहे. संघर्षही खूप करते. ट्रेकिंग आणि इतर अनेक गोष्टी चालू असतात. मित्रपरिवार प्रचंड. या मित्रांमधील एकाशी तिने लग्न केले. लग्न झाल्यावर तिच्या वेगाला खीळ बसेल असे मला वाटायचे, पण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर हिचे कार्यक्रम पाहून, वाचून हिला वेळ कसा पुरतो असे वाटायचे. परिणीताच्या लग्नाला १२ वर्षे झाल्यावर मात्र तिच्या बाबतीतल्या चर्चाना जास्त पेव फुटले, ‘काही समस्या असेल का? मिळकत या क्षेत्रात कमीच असते. परवडत नसेल का? करिअरसाठी ती बाळाचा विचार पुढे ढकलतेय का?’ असे अनेक प्रश्न लोकांना पडू लागले. पण ती या गोष्टींना महत्त्व देणारी नाही हे मला माहीत होतं. तरुण पिढीचे विचार तरी काय, या उत्सुकतेपोटी त्यांच्या आयुष्यात डोकवायची आणि बिनधास्त चौकशा करायची माझी सवय साऱ्यांना माहीतच होती. त्यानुसार एके दिवशी मी तिला विचारलेच, तर म्हणाली, ‘‘मावशी, अगं आम्ही ‘डिंक’ समुदायातील आहोत!’’

अन् ‘डिंक’ समुदायाचा कानोसा घेण्याचा छंदच लागला. मग आजूबाजूला अनेक जण आढळू लागले. ‘डिंक’ म्हणजे ‘डबल इन्कम नो किड्स’ कुटुंब पद्धती. आम्ही दोघे आमच्यासाठी कमवू आणि आमच्यावरच खर्च करू, या विचारांनी जगणारी अनेक जोडपी जगभरात दिसू लागली. ३ जुलै १९७२ ला ‘चाईल्ड फ्री’ ही संज्ञा उदयास आली असली तरी १९८० मध्ये ‘डिंक’ ही संकल्पना अस्तित्वात आली.  १९९० नंतर त्यात काही बदल होत गेले. ऑस्ट्रेलियात ‘ऑस्ट्रेलियन चाईल्ड फ्री पार्टी’ (एसीएफपी) तयार झाली. ब्रिटनमध्ये ‘किडिंग असाईड’ अशी या संदर्भातली पहिली संस्था उदयास आली.

२००८ ला ‘डिंक’ जीवनपद्धती जगभरात स्वीकारली जाऊ लागली. दक्षिण कोरियामध्ये या कल्पनेनं जोर धरला. २०१६ मध्ये दक्षिण कोरियात ३६.३ टक्के जोडप्यांनी ‘डिंक’चा स्वीकार केल्याचे आकडेवारी सांगते. चीनमध्ये २००३ च्या जनगणनेनुसार ६ लाख जोडप्यांनी ‘मूल नको’ या जीवनपद्धतीचा अवलंब केला आहे. मार्च २०२० मध्ये बेल्जियममध्ये २५ ते ३० वयोगटातील १० टक्के स्त्रिया आणि १६ टक्के पुरुषांनी अपत्यहीन राहाण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील २००६ च्या आकडेवारीनुसार ३५ ते ४४ वयोगटातील ५ टक्के स्त्रियांनी ‘चाईल्ड फ्री’ जीवन जगायचे ठरवले. मात्र तरीही २००८ नंतर खऱ्या अर्थाने त्याची  जगभर लाट पसरली आणि अनेक जोडप्यांनी आपल्या जीवनात ही जीवन वा कु टुंबपद्धती  विचारपूर्वक स्वीकारली. ‘डिंक’ शब्दाची अशी वर्गवारी केली जाते- ‘सिंक’- ‘सिंगल इन्कम, नो किडस्’. ‘गिंक’- ‘ग्रीन इन्क्लिनेशन्स, नो किडस्’ किं वा ‘ग्रीन एनव्हायरमेंट नो किडस्’, ‘डिंकर’- ‘डबल इन्कम, नो किडस, अर्ली रिटायरमेंट’ वगैरे.

मुले नकोत या संकल्पनेमागे जगभरातील लोकांची कारणे वैयक्तिक, सामाजिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक, पर्यावरणीय, वैद्यकीय अशी विभिन्न आहेत. त्याचबरोबर स्त्रीवाद, वाढती लोकसंख्या, व्यक्तीगणिक वाढता कर हीदेखील आहेत. आयटी कंपन्या, पोलीस खाते, माध्यमे, रिअल इस्टेट व्यवसाय, बँकिंग , सरकारी उच्चपदस्थ नोकऱ्या, मनोरंजन क्षेत्र अशा ठिकाणी काम करताना वेळेचे बंधन राहात नाही. कामावर जाण्याची आणि येण्याची वेळ निश्चित नसते. नोकरीच्या प्रचंड जबाबदाऱ्या आणि त्यातून येणारा ताणही खूप असतो. आपल्याकडे ज्यांनी या कु टुंबपद्धतीचा स्वीकार के ला, त्यातल्या काही जोडप्यांशी गप्पा मारल्या. त्यांनी हा निर्णय अत्यंत जाणीवपूर्वक घेतल्याचे जाणवले.

३५ वर्षीय तनुजा काबरे आर्मीतून कॅप्टन या पदावरून निवृत्त झाली आणि परत मुंबईत आली.  आल्यानंतर लगेच तिने स्वत:ची ‘फौजी की पाठशाळा’ ही व्यावसायिक कंपनी सुरू के ली. सैन्यात जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण देणारी ही कं पनी आहे. ती तिला तातडीने सुरू करायची होती. मुलांसाठी या करिअरमध्ये ब्रेक घेणे तिला मान्य नव्हते. कारण हा सेकंड करिअर ऑप्शन होता. उमेदीची वर्षे मुलांच्या वाढीत घालवणे तिला जोखमीचे वाटत होते. कारण त्यांना वाढवणे हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे, असे तिचे मानणे आहे. मुलांच्या संगोपनासाठी पहिली पाच वर्षे तरी देणे, त्यांच्याबरोबर राहणे गरजेचे होते. तिच्या करिअरसाठी हीच वर्षे महत्त्वाची होती. आर्मीत स्वतंत्रपणे आणि एकटीने राहाण्याची सवय लागली होती. ती जीवनपद्धती आवडतही होती. त्यामुळेही अधिक जबाबदारी नको होती. याविषयी तिने जोडीदार समीर (अधिकारी) बरोबर चर्चा केली, तर तोही मुले असण्याविषयी फार उत्सुक नव्हता. त्यामुळे तिचा निर्णय सहज आणि सोपा झाला. सिव्हिल इंजिनीअर असणारा समीर आज पूर्णत: शेतकरी झाला आहे.  इंजिनीअरिंग आणि एमबीए के ल्यानंतर त्याने नोकरीही के ली आणि व्यवसायही के ला. दरम्यान, त्याला पर्यावरणाविषयी आस्था वाटू लागली. पर्यावरण आणि पर्यटन यांची मोट बांधत तो आता शेतकरी झाला असून एक वेगळंच शांत आयुष्य त्याला खुणावत आहे. त्यांच्या लग्नाला आता १० वर्षे झाली असल्याने साहजिकच तनुजाची आई नातवंडासाठी मागे लागायची, तर सासरे गमतीत नातवंडाविषयी बोलायचे. समीर आणि तनुजाने या दोघांनाही निर्णय सांगितला. पण विशेष म्हणजे कु णीही त्यांच्यावर भावनिक दडपण आणले नाही. भविष्यात निर्णय बदलाचा विचार होईल असे तनुजाला वाटत नाही.

‘मूल नको’ हा वैयक्तिक निर्णय असला, तरी त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतोय असे वाटते का? तीव्र इच्छा किंवा जैविक भावनेतून मातृत्व हवे असे स्त्रियांना वाटते यात तथ्य आहे का? कुटुंब आणि समाज यांचा दबाव किती असतो. पारंपरिक विचारातून हा निर्णय घेतला जातो, की बुद्धीचा निकष लावला जातो? हे प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतात. ‘डिंक’ संकल्पना स्वीकारलेल्या जोडप्यांशी बोलताना त्यातले अनेक विचार मांडले गेले. एक तर‘डिंक’ जीवनपद्धती स्वीकारण्याचा निर्णय जसा करिअरसाठी घेतला जातो, तसाच वैयक्तिक आरामासाठी, चैनीसाठीही घेतला जातो.  शिल्लक पैशांत गुंतवणूक करता येते, पैसे भटकंतीसाठी, ऐषारामासाठी वापरता येतात. ‘मूल नको’च्या निर्णयाने मानसिक, शारीरिक, आर्थिक दडपण दूर होते.  करिअरची सुरुवातीची वर्षेच महत्त्वाची असतात आणि ती मुलांच्या संगोपनासाठी द्यावी लागतात. त्यामुळे नवीन करिअरची आव्हाने नाकारावी लागतात. मुलांचे आजारपण मनाला थकवून जाते. शारीरिक दमछाकही होते. आर्थिक नियोजन कोसळते. मुलांच्या वाढीत सामाजिक दडपणही खूप असते. त्यांचा अभ्यास, त्यांच्यावर केले जाणारे संस्कार, त्याचे खाणे-पिणे, खेळणं, इतर उपक्रमांची आखणी, हे सारे करायला आजूबाजूची परिस्थिती  भाग पाडते. मूल वाढवताना आपणाला वाढावे लागते, शिकावे लागते. ‘अभ्यास घ्यायला आवडत नाही,’ म्हणण्याचा पर्याय नसतो.  त्यांची परीक्षा, त्यांच्या स्पर्धा, त्यांचा अभ्यास, त्यांचे चिंता वाढवणारे उशिरा येणे, त्यांना रागावून शिस्त लावणे, सारेच थकवणारे, चिडचिड करायला लावणारे असू शकते. स्त्रियांना याबरोबरच नोकरीच्या जबाबदारीतून मुलांना न्याय देता येत नाही, ही अपराधी भावना असते. त्यातून ‘मूल नकोच’ ही धारणा वाढू शकते. माध्यमांतील स्त्रीला आपले वजन, अंगयष्टी, सौंदर्य राखणे ही भीती असते. तर उच्चपदावरील स्त्रीला कामाच्या ताणामुळे मूल निरोगी जन्माला येईल का, याची काळजी वाटू शकते. ‘डिंक’ समुदायात शिरले की ही कोणतीच बंधने नाहीत. ऑफिसमधून लवकर गेले पाहिजे, निम्मे लक्ष घरात, निम्मे कामात, ही परिस्थिती ओढवत नाही. ऑफिसमधील ट्रेिनगसाठी पुरुषासारखे कितीही दिवस बाहेर जाता येते. वेळेमध्ये लवचीकता आणता येते. हवी तेव्हा मनसोक्त विश्रांती घेता येते. मुले, त्यांच्या वस्तू, शिक्षण, यांवर प्रचंड पैसा खर्च होतो, तोच पैसा निवृत्तीनंतरचं आयुष्य या गोष्टींसाठी वापरता येतो. अशी एक भावना दिसली. अर्थात मूल होऊ द्यायचं की नाही हा सर्वस्वी त्यांचा व्यक्तिगत निर्णय असतो. त्यासाठीची त्यांची त्यांची कारणे असतात. इतरांना पटावीत असा त्यांचा आग्रह नसतो. पण त्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो.

दीपिका आणि असीम समर्थ या जोडीला मी त्यांच्या लग्नापासून- म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून ओळखते. दीपिका ‘फॅशन डिझायनिंग’क्षेत्रामधली, तर असीम ‘एमबीए’ होऊन एका कंपनीत रुजू झालेला. लग्नानंतर वर्षभरातच त्यांनी जीवनाची दिशा बदलली. ‘व्यान अकॅ डमी’ आणि योग के ंद्र सुरू के ले. असीमने ‘मूल नको’ हा निर्णय आध्यात्मिक क्षेत्रात काम करायला लागल्यावर तीन वर्षांतच घेतला. ‘सर्वसंगपरित्याग’ हे त्याचे या अभ्यासाचे सार आहे. त्यामुळे यापुढे संसार वाढवायचा नाही. उलट आपल्याला जे ज्ञान मिळाले आहे ते लोकांना वाटायचे. त्यांच्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करायचा. ऐषारामाच्या आयुष्यापेक्षा साधं सहज जगावे, या विचारसरणीचा दोघांनी स्वीकार के ला आहे. अर्थात  दीपिका तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान असलेल्या भावाचा आई नोकरीवर गेली की आईच्या मायेने सांभाळ करीत असे. त्यामुळे असीमचा निर्णय स्वीकारणे सुरुवातीला तिला जड गेले. पण परस्पर प्रेम, आदर, घट्ट बंध, यातून तिने मनापासून हा निर्णय स्वीकारला. तिच्या म्हणण्यानुसार, भौतिक गरजा, श्रीमंती, आरामदायी जीवनाच्या मोहातून हा निर्णय झालेला नाही. समाजाचे आणि स्वत:चे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने आत्मिक आनंदाने हा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्यावर आजही समाजाचा दबाव खूप आहे. शिक्षित लोकही त्यांचा निर्णय माहिती असूनही परत परत तेच प्रश्न विचारतात. यांच्या निर्णयावर शंका व्यक्त करतात. पण योगाचा प्रभाव असणारी दीपिका हसून सोडून देते.

‘द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री ऑफ इंडिया’ (असोचॅम) यांनी ‘डिंक’ जोडप्यांच्या आणि मुलं असणाऱ्या जोडप्यांच्या खर्चाचा आढावा घेतला असता डिंक समुदाय तीन ते चार पट जास्त खर्च करत असल्याचे आढळून आले आहे. असेही दिसून आले आहे, की  विपणन क्षेत्रातील कंपन्या ‘डिंक’ समुदायाच्या खूप मागे लागतात, कारण हे लोक गुंतवणूक करू शकतात, महागडय़ा वस्तू विकत घेतात. हे बाजारपेठेला माहिती असते.  बहुतांशी उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय

कु टुंबात याचे प्रमाण जास्त आहे. अर्थात  नवरा बायको दोघंही कमवत असले तरी त्यांचा पगार हा मर्यादित असतो. अगदी ऐषारामी आयुष्य नसले तरी चांगली जीवन पद्धती त्यांना आयुष्यभर हवी असते. त्यात मुलांना जन्माला घातल्यास त्यांच्यावरच आयुष्याची कमाई खर्च होईल या कारणानेही अनेक जणांनी मुलं होऊ न देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. मात्र आपल्यापेक्षा परदेशांत याचे प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे मुलं असणे याला सामाजिक महत्त्वही असल्याने याविषयीचा निर्णय विचारपूर्वक घेतला जातो.

डॉ. नेहा शाह आणि डॉ. अरमान पांडे हे उभयता मानसोपचारतज्ज्ञ आहेत. सहा वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहिल्यानंतर चार वर्षांंपूर्वी ते विवाहबद्ध झाले. ‘डिंक’चा स्वीकार त्यांनी एका व्यापक परिप्रेक्ष्यातून के ला आहे. डॉ. नेहा म्हणाल्या, ‘‘भारतात दोन कोटी अनाथ मुले आहेत, त्यांचा विचार आपण करतच नाही, उलट  दरवर्षी आपल्याकडे दीड कोटी मुलांचा जन्म होतो. २० टक्के लोकसंख्येसाठी आपल्या देशाला केवळ दोन टक्के जमीन  वापरता येते. मनुष्यप्राणी निसर्गातील एकू ण उर्जेच्या  ५० टक्के  ऊर्जा वापरतो. त्यामुळे बाकीच्या प्रजातींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे रोज शंभरपेक्षा जास्त अन्य प्रजाती नामशेष होतात. ज्याला फक्त आपणच जबाबदार आहोत. आणि अशा प्रकारे इतर प्रजाती नाहीशा होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे लोकसंख्या कमी झाली तरच या प्रजातींना वाचणे शक्य आहे. याच उद्दिष्टाने आम्ही अपत्यमुक्त जीवनपद्धतीचा स्वीकार के ला आहे.’’ मानवेतर प्रजातीसाठी आम्हाला ही ऊर्जा वाचवावी लागेल, अशा व्यापक पर्यावरणशास्त्रीय विचारातून या निर्णयाप्रत आल्याचे ते दोघे सांगतात.

नेहा हेही सांगतात, ‘‘ही संकल्पना बाजारपेठेतून आली असून ती नकारार्थी, उथळ आणि  बेजबाबदार आणि स्वकेंद्री आहे, असे जे म्हटले जाते ते चुकीचे आहे. ‘डिंक’ ही संकल्पना स्थिर, बांधिलकी जपणारी आणि आस्था असणारी आहे. उलट ‘अपत्य हवे’ ही कल्पना लग्न टिकण्यासाठी, वारस मिळण्यासाठी, मुलांच्या प्रेमासाठी, म्हातारपणीचा आधार या विचारांची, स्वार्थी आहे.  मूल नसण्यात धोका नाही, तर अविवेकी, अनियंत्रित पालकत्व असण्यात धोका आहे. ‘मूल हवे’ असे वाटणे ही जैविक प्रेरणा नाही, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. सामाजिक शिकवणीतून व्यक्ती ही प्रेरणा घेते. माणूस हा बुद्धिवादी प्राणी असल्याने विज्ञानाच्या प्रगतीचा फायदा घेत मूल असावे की नसावे, हे ठरवण्याची निवड मानवाने आत्मसात केली आहे. सुख, दु:ख, सहन करणे, हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुलांना जन्माला घालून त्यांना आपण या जगात जगायला पाठवतो, तेव्हा त्यांना सुखच द्यावे असे कितीही वाटले तरी ते देऊ शकू याची खात्री आहे का? अपत्यमुक्त राहिले की हे दडपण राहात नाही. वृद्धत्व हे मुलांच्यामुळे सुखकारक असेलच, असे तरी खात्रीने सांगता येईल का?  पण अपत्य नसेल, तर  नागरिक ज्येष्ठ होण्याआधीपासूनच मानसिक आरोग्य आणि आर्थिक पाठबळाची व्यवस्था जाणीवपूर्वक करतात. ‘अपत्यमुक्त’ हा विचार आम्हा दोघांचाही पक्का आहे. दत्तक पालक होण्याचा विचार अद्याप मूर्त स्वरूपात आलेला नाही, पण भविष्यात विचार करू शकतो,’’ असेही डॉ. नेहा यांनी सांगितले.

‘डिंक’ जीवनपद्धतीचा वैयक्तिक विचार वाढत आहे, पण त्याचा पायंडा पडेल असे वाटत नाही. तरीही सामाजिक स्तरावर ‘जोडप्यात काहीतरी कमतरता असेल’ अशी कुजबुज न करता या विचाराचा आदर केला पाहिजे. मूल असावे की नसावे, हा विचार प्रत्येकाचा प्रत्येकाने घ्यायचा आहे आणि प्रत्येकजण असा विचार नक्कीच करणार नाही, पण जे करत आहेत तो त्यांचा विचार आहे हे स्वीकारलं तरच  ‘डिंक’ जीवनपद्धती जगणारी जोडपी खऱ्या अर्थाने या जीवनपद्धतीचा आनंद घेतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 1:58 am

Web Title: dual income no kids dink couples dd70
Next Stories
1 स्त्री राजकारण्यांसाठीचा ‘जेसिंडा पॅटर्न’!
2 जीवन विज्ञान : प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साखर
3 यत्र तत्र सर्वत्र : वैयक्तिकतेतून वैश्विकता
Just Now!
X