अर्चना जगदीश

१९७०च्या सुमारास दुर्गाबाई भागवत यांनी ‘वनदा’ आणि ‘प्राणिगाथा’ असे दोन संशोधन प्रकल्प हाती घेतले. त्यातूनच ‘कदंब’ आणि ‘अस्वल’ ही त्यांची फारशी परिचित नसलेली पुस्तकं पुढे प्रकाशित झाली. त्यातला निसर्गाबद्दलचा नम्रभाव कळायला हवा. स्वत:ला, त्यापेक्षाही सगळ्या मानव जातीला निसर्गाशी जोडून घेणं महत्त्वाचं आहे हे त्या सांगत राहतात. दुर्गाबाईंचं काम अपूर्ण राहिलं आणि ते कुणी तरी पुढे न्यायला हवं. अन्यथा आपण ते झाडांबद्दल-परिसराबद्दलसुद्धा विसरत चाललो आहोत. आणखी काही वर्षांनी पुढच्या पिढय़ा ते पूर्ण विसरून जातील.

Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

गेला महिभर मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतली सुमारे दोन हजारहून अधिक झाडे तोडली जाणार म्हणून वृक्षप्रेमी हळहळत आहेत. ही झाडे तोडली जाऊ नयेत म्हणून आंदोलन आणि कारशेड तिथे झालीच पाहिजे म्हणूनही आंदोलन. पण दोन्ही बाजूंपैकी अनेकांना ही कुठली झाडे आहेत याबद्दल फारशी माहिती नाही. तसेच  तोडायच्या यादीतील सगळी झाडे पुनरेपण करण्यासाठी योग्य आहेत का याचीही कल्पना सर्वसामान्यांना, दोन्ही बाजूंच्या आंदोलकांना नाही. मुंबई शहरासारख्या महाकाय सिमेंटच्या जंगलात प्रत्येक वृक्ष महत्त्वाचा आहे आणि तेवढय़ा माहितीवर त्याला विरोध व्हावा हे साहजिकच आहे. पण कोणती झाडे तुटणार आहेत? ती तिथली मूळ झाडे आहेत का? की ती नंतर वृक्षारोपणाच्या मोहिमांमार्फत लावलेली परदेशी झाडे आहेत, या सगळ्याबद्दल बोलताना-सांगताना कुणीच दिसत नाही. राज्यातल्या निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न म्हणजे राजकारण करण्याची मोठी संधी, हे सांगायला कोण्या तज्ज्ञाची गरज नाही. मात्र पर्यावरणाबद्दल भांडताना दुर्दैवाने खरा विचार होताना दिसत नाही आणि संधीसाधू राजकारण होत राहते. तसेच या वृक्षतोडीला विरोध करताना किती जण आपल्या आजुबाजूच्या शहरी भागात तसेच कोकणासारख्या असंरक्षित भागात होणाऱ्या अव्याहत जंगलतोडीचा विचार करताना  दिसतात? रोपलागवडीत सहभागी होतात, फोटो काढून छापतात, पण पुढे खरंच आपण लावलेल्या रोपाची काळजी घ्यायला, ते रोप वाढतं आहे का, हे बघायला किती जण जातात?

महत्त्वाचे म्हणजे वृक्षांबद्दल आपल्या मनातली अनास्था. एखादा प्राणी म्हणजे वाघ-हत्ती असेल तर उत्तमच, पण छोटे-मोठे प्राणी आणि त्यांच्यावरचं संशोधन-संवर्धनाचं कामसुद्धा एखाद्या ठिकाणचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपयोगी पडतं, असं पर्यावरणतज्ज्ञांनी आपल्या मनावर बिंबवले आहे. कारण ‘प्राणी हालचाल करतात, एका जागेतून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, दिनचर किंवा निशाचर असतात आणि त्यांचा मागोवा घेणं अवघड असतं. मात्र झाडांचा अभ्यास ती स्थिर असल्याने कधीही करता येईल, मग काळजीचं कारण नाही’ असं वाटून नेहमीच वनसंपत्ती आणि वृक्षांकडे दुर्लक्ष होतं. मात्र वृक्षांबद्दल मुळात माहिती नाही आणि कोटय़वधी वृक्षलागवड अशा सारख्या योजनांमधून ‘सगळीच झाडं पुन्हा लावता येतात’ असा अनेक पर्यावरणप्रेमींचादेखील गोड गरसमज असतो. या मातीतले, इथेच खऱ्या अर्थाने रुजलेले, वड, पिंपळ, उंबर, आंबा, मुचकुंद, सीतेचा अशोक, कदंब, असे अनेक वृक्ष अतिशय सावकाश वाढतात. वृक्ष म्हटल्यानंतर मोठय़ा फांद्यांची छत्री, उंच खोड, त्यात हक्काने घरटी बांधणारे, बागडणारे पक्षी, सावलीला बसणारा एखादा व्यावसायिक किंवा पारावरचा मित्रांचा अड्डा हे सगळं म्हणजे त्या वृक्षाची ओळख. तर जंगल म्हणजे अशा अनेकविध झाडांची गर्दी आणि प्राणी-पक्ष्यांचं वसतिस्थान.

पण तरीही झाडांना एखाद्या प्राण्याच्या प्रजातीएवढा मान आणि प्राधान्य मिळत नाही हेच खरं. आजच्या, प्रजातीभोवती फिरणाऱ्या संशोधनाच्या काळातसुद्धा वाघ-हत्ती, रानम्हशी, पांडा, खवलेमांजर अशा अनेक लुप्तप्राय किंवा दुर्मीळ प्राण्यांवरच संशोधकांचा भर असतो आणि हे प्राणी वाचले, की त्यांचा अधिवास वाचतोच असा भाबडा विश्वास. म्हणूनच झाड-वृक्ष केंद्रस्थानी मानून त्यावर संवेदनशीलतेने अभ्यास आणि संशोधन होताना दिसत नाही, भारतातच नाही तर परदेशातही. वृक्ष हे आपल्या निसर्गपूजेवर आधारलेल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आपल्या वेद-वाङ्मयामध्ये तसेच रामायण महाभारतासारख्या पुराणामध्ये ते भवभूती आणि कालिदासाच्या साहित्यातदेखील वृक्ष, कथानकाचा एक भागच असल्यासारखे पदोपदी दिसतात. पण पुढे मात्र फक्त वृक्षांना अशी व्यक्तिमत्वे कळत-नकळत प्रदान करावीत, हा भाव हळूहळू नाहीसा झाला. आपण आजच्या अनास्थेपर्यंत पोहोचलो आणि ‘झाडं तर सहज लावता येतात’ अशी गर्वाची बाधाही माणसाला झाली. शिवाय असे प्राचीन ग्रंथ वाचून झाडांबद्दल समजून घ्यावं हेसुद्धा मुळातच हरवत चाललेल्या वाचन संस्कृतीमुळे लोप पावत चालले आहे. म्हणूनच वृक्ष ओळखणं हे कुणाला महत्त्वाचं वाटत नाही.

काही वेळा शहरी निसर्गप्रेमींमधले थोडे उत्साही लोक झाडांची लॅटिन नावं लक्षात ठेवून वेगळेपण सिद्ध करायचा प्रयत्न करतात. अर्थात, फक्त शहरातच झाडांची आणि वनस्पतींची ओळख मनामनातून हरवत चालली आहे असं नाही तर आता कोकणातल्या गावांमध्येही आंबा, काजू, फणस, ऐन, किंजळ असे वृक्ष सोडले तर बाकीचे कोकणाचे वैभव असणारे बेहेडे, सावर, कदंब, मुचकुंद, बकुळ अशी झाडं फार कुणाला माहीत नाहीत. त्यातही चाळिशीच्या आतल्यांना तर साधे वृक्षदेखील ओळखता येत नाहीत.

म्हणूनच कदंबासारख्या फक्त एका वृक्षाबद्दल समग्र लिहिणाऱ्या, त्याबद्दल खोलवर दीर्घकाळ संशोधन करून सगळं काही आपल्यासमोर मांडणाऱ्या विदुषी दुर्गाबाई भागवतांची मला नेहमी आठवण होते. दुर्गाबाई समाजशास्त्रज्ञ, आदिवासींच्या जगण्याच्या अभ्यासक, बौद्ध धर्माच्या जाणकार आणि उत्कृष्ट ललित लेखक म्हणून आपल्या सर्वाना माहीत आहेत. एखाद्या समस्येवरचा, विषयावरचा, खोलवर विचार, पूर्वसुरींनी त्यावर केलेल्या अभ्यासाबरोबर आपले निष्कर्ष सतत तपासून बघणं आणि त्यातून तावून-सुलाखून निघालेले विचार नेमकेपणाने आपल्या काहीशा धारदार लेखणीतून व्यक्त करणाऱ्या दुर्गाबाईंची विद्वत्ता निर्भीड होती. त्यांचे विचार तेव्हा आणि आताही सगळ्यांना कदाचित पटणार नाहीत. पण अनेकविध विषयांत त्यांनी आपल्या संशोधन आणि लिखाणातून अत्यंत मोलाची भर घातलेली आहे.

मुळापर्यंत जाऊन विचार करणाऱ्या तडफदार दुर्गाबाईंमध्ये निसर्गाकडे बघण्याची हळुवार दृष्टी होती. त्या वेळी एखादी प्रजाती घेऊन त्यावर लिहिणं, आदी गोष्टी आपल्याकडे अस्तित्वातच नव्हत्या. त्या वेळी, म्हणजे १९७०च्या सुमारास दुर्गाबाईंनी ‘वनदा’ आणि ‘प्राणिगाथा’ असे दोन संशोधन प्रकल्प हाती घेतले. त्यात त्यांनी फारशा परिचित नसलेल्या प्राणी आणि वनस्पतींचा संशोधन करून मागोवा घ्यायचा प्रयत्न केला. झाडं आणि प्राणी आपल्या संस्कृतीशी, समाजाशी आणि भाषेशी कसे जोडले गेलेले आहेत याबद्दल त्यांनी जवळजवळ पंचवीस-तीस वर्षे काम केलं. त्यातूनच ‘कदंब’ आणि ‘अस्वल’ ही त्यांची फारशी परिचित नसलेली पुस्तकं पुढे प्रकाशित झाली. ही दोन्ही पुस्तके म्हणजे अथक परिश्रम करून केलेलं एखाद्या प्रजातीवरचं संशोधन कसं असावं याचे उत्तम नमुने आहेत. यात प्राचीन वाङ्मय ते अर्वाचीन समाज इथपर्यंत प्रत्येक संबंधित  गोष्टीचा त्यांनी मागोवा घेतला आहे. हे सगळं सांगता-सांगता त्यांनी सतत झाडांकडे बघण्याची एक जाणिवेची दृष्टी आपल्याला दिली आहे.

‘कदंब’मध्ये दुर्गाबाई सांगतात, ‘पृथ्वीचे सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे प्राणी आणि वनस्पती तसेच पाणी. वृक्ष वनस्पतींचे आणि प्राण्यांचे जीवन समृद्ध असेल तर माणसांचेही जीवन समृद्ध आणि सुखी बनते हे विज्ञानानेदेखील सिद्ध केले आहे.’ त्यांनी कदंबाबद्दल माहिती गोळा करताना प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृत, पाली वाङ्मय आणि लोककथांचा अभ्यास तर केलाच पण ब्रिटिश राजवटीत इथल्या वृक्षसंपदेबद्दल लिहिलेले अनेक ग्रंथ वाचले. कदंबाच्या विविध नावांचा मागोवा घेताना एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकातले लेख आणि त्यातल्या नावांचा अर्थ शोधला. डायमॉक या इंग्रज शास्त्रज्ञाच्या १८९२ मधल्या निबंधावरून त्यांना कदंबाची हलिप्रिय आणि शिशुपाल ही नावे कळली आणि कदंब यादवांना विशेषत: बलराम आणि श्रीकृष्णाला प्रिय का होता याचा आणखी एक अन्वयार्थ सापडला.

दुर्गाबाईंनी कदंब वृक्ष समजून घेताना विविध राज्यातले लोकसाहित्य गोळा केले, त्याचा अभ्यास केला आणि त्यांना असं आढळून आलं, की महाराष्ट्रात आपल्याला हा वृक्ष फक्त कृष्णसखा म्हणून माहीत असला तरी इतर राज्यांमध्ये देवीपूजा, शिवपूजा, इंद्रपूजा अशा पूजांशीदेखील कदंबाचे नाते तेवढेच अतूट आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माहिती आणि विश्लेषण त्यांनी मराठीतच लिहिले आहे. त्या वेळी जर वृक्षांचे अधिवासाच्या दृष्टीने महत्त्व किंवा प्रगत विज्ञानावर आधारित आणखी उपयोग याबद्दल कुठे माहिती उपलब्ध असती तर तीसुद्धा संदर्भासकट त्यांनी समाविष्ट केली असती. ‘कदंब’ मालिकेतले काही लेख सत्यकथेत येत आणि त्या वेळी त्यांनी संवेदनशील वाचकांच्या मनात अशा प्रकारच्या लेखनाबद्दल जिज्ञासा नक्कीच निर्माण केली होती. पुढे काव्यातल्या कदंबाकडे दुर्लक्ष झाले आहे असे लक्षात आल्यावर त्यांनी हिंदी आणि गुजरातीतील कदंबवर्णनाच्या कवितांचेही भाषांतर केले. रवींद्रनाथांच्या कदंबाचा उल्लेख असलेल्या एका छोटय़ा रसपूर्ण कवितेचा अनुवादही पुस्तकात समाविष्ट केला. ‘कदंब’ वाचताना दुर्गाबाईंच्या लिखाणाचं सामर्थ्य दिसतं. कदंबाचा केवळ एकच फोटो या पुस्तकात असूनही कदंब वृक्षाची शेकडो रूपं त्या आपल्या डोळ्यांपुढे उभी करतात.

दुर्दैवाने दुर्गाबाईंचे दोन्ही प्रकल्प एकेका प्रजातीपर्यंतच मर्यादित राहिले. पण तरीही कदंब आणि अस्वल समजून घ्यायला हवेत. त्यातला निसर्गाबद्दलचा नम्रभाव कळायला हवा. स्वत:ला, त्यापेक्षाही सगळ्या मानव जातीला निसर्गाशी जोडून घेणं महत्त्वाचं आहे हे त्या सांगत राहतात. आयुर्वेद संशोधक शरदिनी डहाणूकर यांनी मुंबईकरांना वृक्षांची माहिती देण्याचा वसा पुढे चालवला. लोकांना मुंबईतले अनेक दुर्मीळ वृक्ष कुठे आहेत ते त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे समजले. पण आज लोक वृक्षगान विसरले आहेत. मुंबईच्याच संस्कृतच्या प्राध्यापक नीला कोर्डे यांनीही संस्कृत वाङ्मयातले वृक्ष आणि माणसांचा त्यांच्याबरोबरचा भावनिक संबंध आपल्या ‘वृक्ष-अनुबंध’ या पुस्तकात उलगडून दाखवला आहे. त्या दुर्गाबाईंच्याच पाऊलखुणांचा मागोवा घेताना दिसतात. दुर्गाबाईंचं काम अपूर्ण राहिलं आणि ते कुणी तरी पुढे न्यायला हवं. अन्यथा आपण ते झाडांबद्दल-परिसराबद्दलसुद्धा विसरत चाललो आहोत. आणखी काही वर्षांनी पुढच्या पिढय़ा ते पूर्ण विसरून जातील. दुर्गाबाईंसारख्या विदुषींचा अभ्यास मनापासून समजून घेतला पाहिजे. कारण त्यातच आपल्याला निसर्गाशी जोडू शकेल असा दुवा आहे. शिवाय ‘कदंब’ आणि ‘अस्वल’ एका प्रजातीबद्दल आहे, पण ‘ऋतुचक्र’मध्ये तर त्यांनी ‘संपूर्ण सृष्टी आणि जगण्यासाठी गरजेचं असलेलं निसर्गाशी नातं’ हेच अंतिम असल्याचं त्यांच्या समर्थ लेखणीतून सांगितलंय.

मात्र हे सगळं आपण आस्थेनं वाचलं पाहिजे, झाडांशी स्वत:ला जोडून घेतलं पाहिजे. कदाचित त्यातूनच पुढे झाडांसाठी लढाई लढताना आपण अधिक सजग होऊ. आपलं निसर्गाशी नातं हेच त्या लढाईचं मूळ असेल आणि ते आपल्याला राजकारणापलीकडे जाऊन निसर्गाच्या बाजूने उभे करेल.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com