अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटी. सगळीकडे तरुणाईचा जोश, उल्हास. शिकायचं ना तुम्हाला, तर मग सगळ्या सोयी आहेत तुमच्यासाठी.. हे आश्वासक वातावरण.. खरोखर ज्ञानार्जन, ज्ञान मिळवणे हा अतिशय आनंदाचाच विषय आहे. याची खात्री देणारं!
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी शेवटी कधी तुम्ही मुंबईच्या विमानतळावर गेला आहात? एक वेगळंच दृश्य दिसतं. आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्नं डोळ्यांत असलेली तरुण मुलं-मुली उच्चशिक्षणासाठी परदेशात निघालेली असतात. काहीशी उत्सुक, काहीशी कावरीबावरी, काहीशी आनंदित अशा संमिश्र भावना घेऊन तरीही तारुण्यसुलभ आत्मविश्वासाने वावरत असतात तर त्यांचे नातलग.. आपल्या पाल्याबद्दल अभिमान, त्याच वेळी ‘सगळं नीट होईल ना’, या काळजीत स्वत:लाच धीर देत असतात. त्यांची आई मात्र प्रयत्नपूर्वक अश्रूंचे बांध थोपवून असते. अखेर मुलांच्या ‘चेक-इन’ ची वेळ होते, मुलं जायला निघतात, तेव्हा मात्र मनाचा बांध फुटतो. मग एकमेकांचे डोळे पुसणं सुरू होतं. रुद्ध स्वरांत निरोप दिला जातो आणि पंख पसरून आपली पाखरं, काळजाचे तुकडे नवीन क्षितिज शोधायला निघून जातात.. एक पोकळी आईवडिलांच्या आयुष्यात आणि एक नवीन स्वप्न पाल्यांच्या डोळ्यांत..
मीही तो अनुभव घेतलेला आहे. माझा लेक, उपेंद्र टेक्सासला निघाला तेव्हा माझीही तीच अवस्था होती. अलीकडेच तिथे जाण्याचा योग आला आणि त्याच्या विद्यापीठातल्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाला हजर राहायला मिळालं. तो अनुभव विलक्षण होता. एके दिवशी उपेंद्रने जाहीर केलं, ‘रात्री आपल्याला ‘गॉन टू टेक्सास’ कार्यक्रमाला जायचंय.’ ‘गॉन टू टेक्सास?’ हा कसला कार्यक्रम?’ आश्चर्यच वाटलं. नंतर कळलं, टेक्सास ऑस्टिन युनिव्हर्सिटीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणारा हा कार्यक्रम असतो. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत हलाखीची परिस्थिती होती, तेव्हा बरेच लोक पोटापाण्यासाठी टेक्सासला जायचे. जाताना आपल्या मोकळ्या घरावर किंवा कुंपणावर ‘गॉन टू टेक्सास, जीटीटी’ असं लिहून ठेवायचे. नशीब अजमावण्यासाठी नवीन सुरुवात.. अलीकडे येथील सरकारने लोकांना उद्योगधंद्यासाठी म्हणून टेक्सासकडे आकर्षित होण्यासाठी या वाक्प्रचाराचा उपयोग केला आहे. तुमच्या उद्योगधंद्यासाठी टेक्सास खुलं आहे, असं सांगायला!
आम्ही गेलो युनिव्हर्सिटीत. अबब! केवढे मोठे आवार! सव्वाचारशे एकराचा मुख्य कॅम्पस..! युनिव्हर्सिटीत १६ महाविद्यालये आहेत. वेगवेगळ्या देशांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. अतिशय प्रेक्षणीय आहे. युनिव्हर्सिटीत ७ संग्रहालयं आणि १७ ग्रंथालयं आहेत. कार्यक्रम मुख्य आवारात होता. मुख्य आवारात एक उंच टॉवर आहे. ३०७ फूट उंच! त्या टॉवरला भरपूर खिडक्या आहेत. नेहमी संध्याकाळी तो पांढऱ्या रंगात प्रकाशित असतो, पण काही विशेष वेळी म्हणजे पदवीदान समारंभ, गॉन टू टेक्सास कार्यक्रम तसंच अ‍ॅथलेटिक्समध्ये युनिव्हर्सिटी जिंकली तर हा टॉवर बन्र्ट ऑरेंज आणि पांढऱ्या रंगात प्रकाशमान होतो. अतिशय उत्साहाचं वातावरण असतं. जोश, उल्हास, तरुणाई..
कार्यक्रम चालू असताना मनात राहून राहून येत होतं, उपेंद्र इकडे आला, या कार्यक्रमात पहिल्यांदा सामील झाला, तेव्हा त्याच्या मनात काय भावना असतील? ‘ममाज बॉय..!’ जो कधीही आईवडिलांपासून चार दिवसही लांब राहिला नव्हता, तो एकदम अमेरिकेत शिकायला गेला. त्याचं इंजिनीअर झाल्यावर एम.एस. करायला अमेरिकेला जायचं निश्चित झाल्यापासून मन सैरभैर झालं होतं, कारण माझ्या डोळ्यासमोरच त्याच्या एका मित्राच्या आईचं उदाहरण होतं. नवराबायको.. दोघांनीही डॉक्टरेट घेतलेली.. अमेरिकेत राहिलेली.. त्यांच्या मुलाचा जन्म तिथला. त्यामुळे आपोआप त्याला अमेरिकन सिटिझनशिप मिळाली. ते जोडपं भारतात आलं. एकुलता एक मुलगा. त्याची सर्वागीण प्रगती व्हावी, अभ्यासात वरचा नंबर असावा म्हणून आई प्रयत्नशील. त्यासाठी स्वत:ची नोकरीही सोडली.
१२ वीनंतर शिकायला मुलाला पुन्हा अमेरिकेत पाठवल्यावर आईनं स्वत:ला कोशात बंद करून घेतलं. कुणाशी बोलणं नाही की येणं जाणं नाही. माझं कसं होईल ही चिंता तिचं हे उदाहरण पाहून माझ्या मनात यायची.
इंटरनेटवरून माहिती घेऊन लेकाने त्या युनिव्हर्सिटीत जाणाऱ्या मराठी मुलांना फोन केला. एकाचा भाऊ तिथेच राहणारा, त्यामुळे त्यांची राहण्याची सोय झाली. भांडीकुंडी विभागून न्यायची ठरली. म्हणजे तिथे एकत्र राहणार तर प्रत्येकाने थोडी भांडी न्यायची. एका विद्यार्थिनीला तिच्या इथल्या (अमेरिकेतल्या) ओळखीच्या स्त्रीनं सांगितलं, ‘अमेरिकेत तूरडाळ महाग आहे. ती येताना घेऊन ये.’ बिचारी १ किलो तूरडाळ घेऊन आली. इथं भारताच्या तुलनेत सगळंच महाग. तूरडाळ जरा जास्त, पण असा काय फरक पडणार होता? पण सगळेच भांबावलेले..! उपेंद्रचं इकडे शिकायला यायचं ठरलं खरं.. पण पैशांची व्यवस्था? मग कर्ज काढलं. त्याचा व्हिसा काढायचा. प्रत्येक जण वेगवेगळे सल्ले देत होता. आम्हीही भांबावलेले. कोणी सांगितलं, बँकेत कमीत कमी १५ लाख रुपये आपल्या नावाने असलेले दाखवावे लागतात. बापरे! पण तीही सोय केली, पण त्याची गरज पडली नाही. त्याला इंजिनीअरिंगला असताना ‘टाटा’ची स्कॉलरशिप मिळत होतीच.  एज्युकेशनल लोन मिळालं, पण अमेरिकेत जाताना रुपयांचे डॉलर करून पाहिजे असतात. प्रत्येक दिवशी डॉलरची किंमत वेगळी असते. त्याकडे लक्ष ठेवून योग्य दिवशी रुपयांचे डॉलरमध्ये रूपांतर करणे फायदेशीर असते. त्यासाठी एजंटही असतात, पण हे माहिती होतं कुणाला? हे तर पुण्यात. मग मी आणि उपेंद्र जाऊन रुपयांचे डॉलर्स करून आलो होतो.
मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. उत्साहात सुरू झालेला तो कार्यक्रम आता संपला होता. उपेंद्र आम्हाला त्याचं ऑफिस दाखवायला घेऊन गेला. त्याची पीएच.डी. चालू होती. त्याचं ऑफिस पाहिलं, मन अभिमानानं भरून आलं.. उपेंद्र उत्साहाने त्याची युनिव्हर्सिटी दाखवत होता. तिथं असलेल्यांशी उत्साहानं बोलत होता. काही अमेरिकी, काही चीनी, काही आणि कुठल्या देशातले. कशी मजा असते ना, नवी मुंबईत राहिलो.  तिथे कोल्हापूरवासीय, नागपूरकर, सांगलीकर, सातारकर अशी मंडळे आहेत. तिथे हे गाववाले एकमेकांना धरून राहतात. परप्रांतात मराठी लोक एकमेकांना धरून आणि तर परदेशात भारतीय एकमेकांना धरून. आपल्या शत्रू-मित्रत्वाच्या कल्पना बदलत जातात. लंडनमध्ये असणाऱ्या माझ्या मुलीची मैत्रीण पाकिस्तानी. ऐकून मी दचकलेच. तर म्हणाली, ‘अगं आई, भारतात असताना पाकिस्तानी आपल्याला शत्रू वाटतात, पण इकडे पाकिस्तानी लोक जवळचे वाटतात. आपल्या खाण्यापिण्याचे पदार्थ, मसाले सारखे. सिनेमे तेच आवडतात. भाषाही एकच. त्यामुळे अगदीच कुठल्या तरी देशातल्या लोकांपेक्षा यांच्याशी वेव्हलेंग्थ पटकन जुळते.’
ऑफिस दाखवून झाल्यावर आम्ही जेवायला एका थाई रेस्टॉरंटमध्ये गेलो. जेवण झाल्यावर उपेंद्रने त्याला चांगली टीपही दिली. नंतर त्याने सांगितलं, ‘तो वेटर म्हणजे कॉलेज स्टुडंट होता.’ इकडे मुलगा आपला शिकतोय, वडील फी भरत बसलेत, असं कधी नसतं. उच्चशिक्षण घ्यायचं, तर आपल्या जबाबदारीवर घ्यायचं असतं. त्यासाठी मुलं वेगवेगळ्या ठिकाणी सव्‍‌र्हिस करतात. बहुतेक अमेरिकन मुलांनी मॅकडोनाल्डमध्ये थोडे दिवस का होईना काम केलेलंच असतं.
मी परत भूतकाळात गेले. उपेंद्र ऑस्टिनला आल्यावर त्याला रिसर्च असिस्टंटशिप मिळेपर्यंत म्हणजे एक महिना ‘पिझा हट’मध्ये काम करावं लागलं. माझा उपेंद्र.. जो कधी अंडंही खात नव्हता त्याला नॉनव्हेज पिझ्झा हाताळावे लागायचे. पिझ्झा ओव्हनमध्ये घालणं हे त्याचं काम.
इथं खूप भारतीय विद्यार्थिनीसुद्धा भारतातून आल्यावर काही दिवस असे काम करतात, पण त्यांना कोणी हसत नाही, नावं ठेवत नाही. मागे एकदा भारतात एक स्नेही आले होते. ते त्यांच्या बॉसबद्दल उपहासाने बोलत होते, ‘मोठा गर्व करतात, मुलाला शिकायला परदेशात पाठवलं, पण तिथे या एवढय़ा मोठय़ा साहेबाचा मुलगा काय काय करतो? तर हॉटेलात कपबशा विसळतो..!’ आपल्या भारतीयांची ही मानसिकता! त्यांना काय कळणार अमेरिकेत शिकायला आलेल्या मुलांना कुठल्या परिस्थितींशी सामना करायला लागतो..!
उपेंद्रच्या फ्लॅटमध्ये आलो. आम्ही येणार म्हणून तो मोठय़ा घरात एकटा राहात होता. नाही तर रूममेट्सबरोबर राहायचा. आळीपाळीनं प्रत्येकानं स्वयंपाक करायचा, टॉयलेट साफ करायचे. नवीन असताना त्याचा एक रूममेट स्वयंपाकाची त्याची टर्न आल्यावर मॅगी करायचा, कारण त्याला तेवढंच यायचं!
दुसऱ्या दिवशी उपेंद्र त्याच्या युनिव्हर्सिटीत घेऊन गेला. इथे किती सोयी आहेत विद्यार्थ्यांसाठी. त्यांना आणणाऱ्या, घरी सोडणाऱ्या बसेस असतात आणि बस प्रवास फुकट. तिथं जागोजागी टेलिफोन्सची सोय असते. विद्यार्थ्यांना लोकल कॉल्स फुकट! विद्यापीठात इतकी वाचनालयं. आपल्यासारखं एका वेळेला एक किंवा दोन पुस्तकं फक्त असं इथे नाही. तुम्हाला पाहिजे तेवढी पुस्तकं अभ्यास करायला घेऊन जा. परत करण्याचीही वेगळी सोय आहे.
उपेंद्रनं सांगितलं, त्यांच्या युनिव्हर्सिटीत काही बांधकाम चालू होतं, त्यासाठी दोन विशाल वृक्ष तोडावे लागणार होते. तेव्हा विद्यापीठाने ते वृक्ष कापले. दुसरीकडे नेऊन लावले. बांधकाम झाल्यावर परत आवारात आणून लावले. यासाठी हजारो रुपये खर्च आला, पण ते पुरातन वृक्ष परत डौलात उभे राहिले! केवढा विचार असतो त्यामागे! मला आपल्याकडच्या झाडांची आठवण आली. किती अविचाराने वृक्षतोड केली जाते. आम्ही फिरत होतो त्यांच्या युनिव्हर्सिटीत. किती स्टडी रूम्स, किती हॉल्स! स्टडी रूमच्या प्रशस्त पॅसेजमध्ये सोफ्याच्या खुच्र्या होत्या. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना झोप आली, तर सरळ झोपायचं. किती तरी मुलं-मुली हातात पुस्तक घेऊन झोपलेली होती. मजा वाटली!
अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांचं वैशिष्टय़ म्हणजे मोकळेपणा, बिनधास्तपणा. अवतीभोवती सगळी तरुण मुलं-मुली आनंदी-उत्साही.. अक्षरश: एक जणही अशक्त, काटकुळा, रोडावलेला दिसला नाही. सगळी जण टवटवीत. तब्येती एकदम मस्त. कुठेही आळस नाही, चिंता नाही! इकडे मुलं-मुली स्वत:च्या तब्येतीच्या बाबतीत एकदम जागरूक असतात. प्रत्येक जण जिमला जातो. लग्न ठरविण्याची जबाबदारी ज्याची त्याच्यावर! आपला जोडीदार आपण शोधायचा. त्यामुळे आपण तंदुरुस्त, टिपटाप, व्यवस्थित, आकर्षक राहिलं पाहिजे, ही जाणीव प्रत्येकाला असतेच.
युनिव्हर्सिटीत एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आम्ही गेलो. तिथे बोधिवृक्ष आहे. हो बोधिवृक्ष. भारतातल्या गयेच्या बोधिवृक्षाची फांदी अमेरिकेतल्या टेक्सास ऑस्टिन युनिव्हर्सिटीत आणून लावलीय. आता तो वृक्ष बऱ्यापैकी मोठा झालाय. इतकं प्रसन्न वाटत होतं.
त्याच्या युनिव्हर्सिटीत फिरताना एकेक आठवण मनात येत होती. तो इकडे आला तेव्हा सणावाराला मनात यायचं, आपण इकडे गोडधोड खायचं आणि आपला पोरगा काय खात असेल कुणास ठाऊक.. मग घास अडकायचा घशात! उपेंद्रला विमानतळावर सोडायला आलो होतो तेव्हा पाऊस नुसता कोसळत होता. टॅक्सीमध्ये त्याचा हात हातात घेऊन बसले होते. बाहेर ढगांचा गडगडाट चालला होता आणि मी मनातल्या मनात नुसती रडत होते. माझ्या काळजाचा तुकडा सातासमुद्रापार चालला होता. तेव्हा घरात इंटरनेट नव्हते. बाहेरून चॅट करायचो. रविवारी संध्याकाळी. पण तेव्हा अमेरिकेतली रविवार सकाळ असायची. मग जे बोलायचो, ते आठवडाभर आठवत बसायचो, उजळणी करत बसायचो!..
‘आई.. कुठे हरवलीस?’ उपेंद्र विचारत होता. आम्ही युनिव्हर्सिटीच्या बाहेरच्या रस्त्यावर आलो होतो.
सगळीकडे तरुणाईचा जोश, उल्हास, शिकायचं ना तुम्हाला, तर मग सगळ्या सोयी आहेत तुमच्यासाठी.. हे आश्वासक वातावरण.. खरोखर ज्ञानार्जन, ज्ञान मिळवणे हा अतिशय आनंदाचाच विषय आहे. याची खात्री देणारं वातावरण..!
shail2210@yahoo.com