|| रेणू दांडेकर

‘शिक्षांतर’मध्ये वर्ग नाहीत, पुस्तकं नाहीत, परीक्षा नाहीत, शिक्षक नाहीत. काही, काही नाही. प्रचलित व्यवस्थेतील प्रचंड गोंधळ, पोकळपणा, रितेपणाची घृणा वाटून निर्माण झालेली ‘शिक्षांतर’ म्हणजे पर्यायी रचना आहे. समजून घेणं अवघड होतं, पण आवश्यक वाटलं. कारण ही मंडळी विशिष्ट विचारांनी जवळजवळ वीस वर्षे काम करतायत. राजस्थानमधील फतेहपूर येथील ‘शिक्षांतर’ या अनोख्या अभ्यासाच्या प्रयोगाविषयी..

विख्यात कलाशिक्षक आणि विचारवंत फ्रँक सीझेकच्या मते, ‘‘मूल ज्या सर्जनशील कृती करते त्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे मुलाकडून होणाऱ्या चुका. या चुका मुलांइतक्याच निरागस असतात. एकदा एका मुलाच्या हातून काचेचं भांडं पडलं, फुटलं. वडिलांनी विचारलं, ‘‘असं कसं झालं?’’ मूल म्हणालं, ‘‘असं झालं.’’ आणि ते दाखवण्यासाठी त्यानं जवळचं दुसरं भांडं खाली टाकलं. वडिलांच्या दृष्टीनं काचेचं भांडं फुटणं हा गुन्हा, चूक. मुलाची कृती निरागस! मुलाला जेवढं स्वातंत्र्य मिळेल तेवढं काही निर्माण करताना तो शिकत जाईल. शिक्षण या सगळ्याला थांबवण्याची सुरुवात करते नि मुलाच्या कृती संपतात, प्रभावहीन होतात. मूल आपली ओळखच विसरते. राजस्थानमधील फतेहपूर येथील ‘शिक्षांतर’ या शाळावजा शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या संचालिका विधी जैन यांच्या मते, आजचं शिक्षण मुलांना कंझ्युमर वा ग्राहक बनवतं. प्रत्येक माणसाच्या जीवनाचा हेतू वेगळा असतो. प्रत्येकाचा आत्मिक आणि एक तत्त्वज्ञानात्मक प्रवास सुरू असतो.

‘शिक्षांतर’ एक प्रकारे पर्यायी व्यवस्था-रचना निर्माण करते आहे. आम्ही आमचाच अभ्यासक्रम तयार करतो. प्रत्येक जण ठरवतो मला काय करायचंय, कसं करायचंय, कोणाशी बोलावं लागेल. शाळा-महाविद्यालयात किती तरी वेळ वाया जातो. प्रत्येक शाळेच्या बाहेर लिहावं आणि तशी संधी द्यावी की, ‘तुमची मुलं जे करू इच्छितात ते त्यांना करायला परवानगी द्या.’ खरं तर खरं शिकणं शाळेच्या बाहेरच होतं. भारतात आज दहा हजारांपेक्षा अधिक कुटुंबं या ‘फॅक्टरी मेकिंग’ शिक्षणप्रवाहाला मानत नाहीत. ते आपल्या मुलांना शाळेत न पाठवता ‘होम स्कूलिंग’ करतात. आपली शिक्षणपद्धती ही तुटीवर, (डेफिसिट)वर उभी आहे. केवळ मुलंच सर्जनशील असून चालणार नाही तर आपणही निर्मितीक्षम असायला हवं. माझ्यात किती नि काय-काय लपलंय याचा शोध प्रत्येक मुलाला लागायला हवा. हा शोध लागण्यासाठी मूल जेवढं निसर्गात वाढेल, रमेल, अनुकूल वातावरण त्याला मिळेल, तसं ते खूप शिकतं.

‘शिक्षांतर’ म्हणजे ‘ट्रान्सफर्मेशन ऑफ लर्निग’. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘शिक्षांतर’ हे ‘अनलर्निग प्रोसेस’वर भर देते. म्हणजे काय? तर आपल्यात अनेक गैरसमज असतात, अनेक गोष्टींबद्दल चुकीच्या धारणा, पूर्वग्रह असतात. हे जेव्हा काढून टाकलं जाईल तेव्हा वेगळं, नवं, क्रियात्मक शिकायला मन मोकळं होईल. कारण गैरसमजातून भीतीचा जन्म होतो. जग बदलतंय. त्याच्या गरजा बदलताहेत. ‘शिक्षांतर’ यावर काम करतंय. भीतीच्या मॉडेलवर विकासाचे मॉडेल उभे आहे. अशा वेळी ‘शिक्षांतर’ची स्वराज युनिव्हर्सिटी असं काम करते, जिथं येणाऱ्याला ‘खोजी’ असं म्हटलं जातं (खोज म्हणजे शोध. खोजी म्हणजे शोधक). कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं हे जो-तो ठरवतो.

विधी जैन यांना ‘शाळां’चा खूप राग दिसत होता. तिथे घडणाऱ्या गोष्टींबद्दल चीड होती आणि होणाऱ्या नुकसानातून बाहेर पडण्याची कळकळ दिसत होती. मला प्रश्नच विचारायची वेळ आली नाही आणि खरं तर मी काय विचारणार? माझे सगळेच प्रश्न व्यावहारिक होते. हे प्रश्न ‘शिक्षांतर’चा शेवट होता आणि तिथून पुढे ‘शिक्षांतर’ काम करते. एकसुरी, एकसारखे विद्यार्थी निर्माण करणं ही प्रक्रिया कारखान्यांप्रमाणे केवळ ‘प्रॉडक्ट’ तयार करणं हे शाळांचं काम. विधीजी म्हणतात, ‘‘शाळा ही एक ‘इनसेन्टिव्ह सेंटर’ आहे. कुणी तरी मित्राला मारत असलं तर इतर सर्व जण नुसतं बघत असतात. कुणाचा तरी राग मुलांवर निघतो, शिव्या दिल्या जातात नि मुलं फक्त ऐकतात. याला असंवेदनक्षम नाही तर काय म्हणायचं?  ‘शिक्षांतर’ अशी जागा आहे जिथं मुलं शिकायला येतात. त्यांना जे शिकायचं असतं ते शिकायला येतात, शिकतात.’’

हे सगळं ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट’ वाटत होतं. काही कळत नव्हतं. वर्ग नाहीत, पुस्तकं नाहीत, परीक्षा नाहीत, शिक्षक नाहीत. काही, काही नाही. प्रचलित व्यवस्थेतील प्रचंड गोंधळ, पोकळपणा, रितेपणाची घृणा वाटून निर्माण झालेली ‘शिक्षांतर’ म्हणजे पर्यायी रचना आहे. समजून घेणं अवघड होतं, पण आवश्यक वाटलं. कारण ही मंडळी विशिष्ट विचारांनी वीस वर्षे काम करतायत. हा रस्ता नवा, निर्माण केलेला कुठल्या तरी वेगळ्या ध्येयाकडे घेऊन जातोय याची प्रचीती आलीय म्हणून अस्तित्व टिकून आहे.

इथे ४-५ जण पगारी आहेत. प्रकाशित झालेलं साहित्य ठेवलंय, पण पुस्तकावर रक्कम छापलेली नाही. तिथे स्वेच्छामदतीचा डबा आहे. जेवणही नि:शुल्क. तिथेही ‘आवडलं तरच तुम्हाला हवी तेवढी रक्कम टाका’ असं सांगणारा डबा आहे. अनेक जण इथे राहतात. मनीष जैन उदयपूरला असतात तेव्हा इथेच असतात नि मुलांचे घोळके येऊन त्यांच्याशी बोलत असतात. संवादातून विचार नि विचारांना कृतीची जोड असं स्वरूप आहे.

‘‘हे कसं चालतं सगळं?’’ यावर विधीजी म्हणतात, ‘‘आम्ही उत्तम पैसे मिळवत होतो. अमेरिकेत होतो. विशिष्ट विचारांनी सगळं सोडून इथे आलोय. जगभर हा ‘ट्रान्स्फर्मेशन ऑफ लर्निग’चा विचार मांडण्यासाठी लोक बोलवतात. आम्ही जातो. ते पैसे देतात. आम्ही डोनेशन, कुणा सरकारकडून, उद्योगपती, कारखानदार यांच्याकडून पैसे स्वीकारत नाही. आमचा मित्र-परिवार, समविचारी यांनी दिलेले योगदान स्वीकारले आहे.’’ हिशोब -ऑडिटबद्दल काही विचारलंच नाही. कुठे फ्लेक्सचा बोर्ड दिसला नाही, कुठे सहयोगाची, आर्थिक मदतीची गरज व्यक्त केलेली पाटी दिसली नाही. रजिस्ट्रेशन वगैरे नंबर दिसला नाही. मग करमुक्त वगैरे प्रश्नच नव्हता. तरी ‘शिक्षांतर’ सुरू आहे. विधी जैन आणि मनीष जैन आणि त्यांचे सहविचारी वेगळ्या संवेदनेने काम करतायत, कारण ही एक कृतिशील विचार-चळवळ आहे. दोघांनी ‘शिक्षांतर’साठी खूप विचार केलाय आणि एका अर्थाने हे धाडसच केले आहे. कोणतेही प्रमाणपत्र मिळणार नाही तरी मुलं येतायत. नव्या पिढीच्या शिक्षणाकडून असणाऱ्या अपेक्षांचा जणू हा निदर्शक आहे.

शिक्षांतरची संकल्पना समजायला अवघड किंवा स्वीकारार्ह नाही असं म्हणून सोडून देण्यातही अर्थ नाही. त्यावर विचार नक्कीच व्हायला हवा. मनीषजी बरेच वर्षे अमेरिकेत राहिलेले असूनही त्यांचे आईवडील तिथेच राहतात. शिक्षण क्षेत्रात जगता येणारा नवा विचार मांडायचा म्हणून दोघे त्यांच्या गावात उदयपूरला येऊन स्थिरावले. मनीषजी-विधीजी यांचा प्रवासही खूप होतो.

मनीषजींना वाटते, ‘भारत निर्माण करण्याच्या प्रक्रियेत विविध योजना तयार करताना आपण सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि स्व-अभिव्यक्ती या उत्प्रेरक भावनांकडे दुर्लक्ष केलेय. वास्तविक ही आमची मूलभूत प्रकृती आहे. या गोष्टी आम्हाला मानवी बनवतात. आमच्या योजनांनी सगळ्यांना एकाच तागडय़ात टाकलं. एका वेळी एकच काम करायला लावलं. त्यामुळे विविध असणाऱ्या आमच्या देशातल्या भाषा, प्रज्ञा, स्वयंज्ञान मिळवण्याच्या पद्धतीवर ताबा मिळवत त्या नष्ट केल्या.’ हे सगळं जमेल तेवढं पुनरुज्जीवित करण्याचाच यशस्वी प्रयत्नच जणू ‘शिक्षांतर’ करते आहे.

(समाप्त)

शिक्षांतर संपर्क – शिक्षांतर २१ फतेहपुरा, उदयपूर ३१३००४, राजस्थान

shikshantar@yahoo.com

www.swaraj.org/shikshantar

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com