अध्यापनाच्या तळमळीतून तिने आयटी कंपनीतली पाच आकडी पगाराची नोकरी सोडली. बेंगळुरूच्या रोशनी मुखर्जी हिने सोप्या भाषेतले, मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारे व्हिडीओ बनवले व ‘यू टय़ूब’मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत मोफत पोचवण्याचा मार्ग शोधला. गेल्या चार वर्षांत, दिल्लीपासून बेंगळुरूपर्यंतच्या तब्बल ६९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना तिच्या ऑनलाइन क्लासरूमचा फायदा होतो आहे.

‘यू टय़ूब’ चा वापर शैक्षणिक उपक्रमांसाठी होण्याचे प्रमाण गेल्या दोनेक वर्षांत आश्चर्यकारकरीत्या वाढले आहे. अनेक विद्यार्थी ‘यू टय़ूब’मार्फत आपली ज्ञानाची गरज भागवू पाहत आहेत, तर शिकवण्याची कला असणारे अनेक जण या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य पार पाडत आहेत. अशाच एका उपक्रमाची सुरुवात केली रोशनी मुखर्जी या बेंगळुरूस्थित तरुणीने! ‘एक्झाम फिअर डॉट कॉम’ ((examfear.com) या नावाने आपले शैक्षणिक ‘यू टय़ूब चॅनेल’ चालवणारी रोशनी आज अनेक विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत बनली आहे.
रोशनी ही पूर्वाश्रमीची रोशनी अगरवाल! झारखंड राज्यातील धनबाद येथे एका कंपनीत तिचे वडील इंजिनीयर होते. रोशनीचा जन्म तिकडचाच आणि बारावीपर्यंतचे शिक्षणही धनबाद इथेच झाले. शाळेत असतानाच तिला विज्ञानात विशेष गती होती, तिला विज्ञानाची एक शिष्यवृत्तीही मिळाली. पुढे उच्च शिक्षणासाठी तिने दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. भौतिकशास्त्रात एम. एस्सी. करायचे, पीएच.डी. करून प्राध्यापक व्हायचे असे तिचे स्वप्न होते. पण इतक्या सहजासहजी तिचे हे स्वप्न पूर्ण होणे नियतीला मंजूर नव्हते.
रोशनीला शिकवण्याची प्रचंड आवड. आठवीत असणाऱ्या तिच्या भाचीला रोशनी आवडीने गणित आणि विज्ञान शिकवत असे. कॉलेजमध्येही तिचा शिकवण्यातला इंटरेस्ट सगळ्या मित्र-मैत्रीणींना माहीत होता, म्हणूनच अभ्यासात कुणालाही कुठलीही अडचण आली की सगळे रोशनीकडे धाव घ्यायचे. त्यामुळे परीक्षेच्या आसपासच्या काळात रोशनीच्या अवती-भोवती सतत मित्र-मैत्रिणींचा गराडा असे. तीही न कंटाळता प्रत्येकाची शंका दूर करत असे.
पण दुर्दैवानं करियर नक्की करायच्या महत्त्वाच्या टप्प्यावर तिच्या वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. एम. एस्सी. होताहोताच झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तिची बेंगळुरूच्या विप्रो कंपनीत निवड झाली. पीएच.डी.साठी आणखी काही वर्षे देणे तिला शक्य नव्हते म्हणून तिने थेट बेंगळुरू गाठले. काही वर्षे ‘विप्रो’मध्ये काम केल्यानंतर ‘एचपी’ या आयटी कंपनीत तिला क्वॉलिटी अ‍ॅनालिस्ट म्हणून तिला संधी मिळाली. पाच आकडी पगार हाती येऊ लागला. इथेच सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या एका तरुणाशी सूर जुळले आणि रोशनी विवाहबद्ध झाली.
मात्र शिकवण्याची तळमळ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. एकीकडे वैवाहिक आयुष्याची घडी बसत होती, तर दुसरीकडे ही अस्वस्थता तिला बैचेन करत होती. अखेर तिने नवऱ्याकडे हा विषय काढला. तिच्या जोडीदारानेही तिला पाठिंबा दिला. दोघांना ‘ऑनलाइन क्लासरूम’ची कल्पना सुचली आणि २०११ साली ‘एक्झाम फिअर डॉट कॉम’ या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. विद्यार्थ्यांच्या करियरची पायाभरणी आठवी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात दडलेली असते, हे जाणून त्यांच्यासाठी रोशनीने आधी तयारी सुरू केली. आठवी ते बारावी या इयत्तांच्या विज्ञान व गणित विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारे, सोप्या इंग्रजी भाषेतले व्हिडीओ तिने बनवले. ते अपलोड करताच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी व्हिडीओ पाहून त्याच्या खाली सकारात्मक प्रतिसाद दिले होते. ‘कमेंट्स’च्या जागी काही विद्यार्थ्यांनी शंका विचारल्या होत्या. तिला हुरूप आला. आपण घेत असलेले कष्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याची पावती मिळत होती.
सुरुवातीला, सुट्टीच्या दिवसातले काही तास ती हे व्हिडीओ तयार करत असे. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून तिने प्रामुख्याने व्हिडीओ बनवले आहेत. आवश्यक तिथे आकृत्या, अ‍ॅनिमेशनचा वापर, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स यामुळे हे टय़ुटोरिअल्स समजण्यास सोपे आहेत. विशेष म्हणजे हे सर्व ती फक्त शिकवण्याच्या तळमळीने करते, त्यासाठी कुठलेही मूल्य न आकारता! गुगलकडून जाहिरातींमार्फत जे काही अगदी क्षुल्लक उत्पन्न तिला मिळते तेवढेच! आतापर्यंत या साइटवर तिने ४९०० हून अधिक व्हिडीओ टाकले आहेत आणि थोडेथोडके नाही तर ६९ हजारांहून अधिक विद्यार्थी तिच्या या कोचिंगचा लाभ घेत आहेत.
आपल्या मूलभूत गरजा भागवून, शहरांतील खर्चीक राहणीमान विचारात घेतले तरीही आपल्याला ईश्वराने गरजेपेक्षा थोडे अधिक दिले आहे. म्हणून या उपक्रमातून पैसे कमावणे हा उद्देश नाही, असे रोशनी प्रांजळपणे सांगते. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता, आपल्यावरील जबाबदारीची जाणीव वाढल्याने रोशनीने आठ महिन्यांपूर्वी चक्क नोकरी सोडली. आता ती पूर्णवेळ ‘एक्झाम फिअर’साठी देते आहे.
अनेक मुलांना आपल्या मनातील शंका विचारण्याचे धाडस नसते आणि शिक्षकांची भीती हाही मोठाच अडसर असतो. मात्र रोशनीच्या साइटवर मुलांना अधिक सुलभतेने सर्व शंकांचे निरसन करून घेता येते. बऱ्याच मुलांना कोचिंग क्लासची फी भरणे शक्य नसते किंवा काही खेडय़ा-पाडय़ांत किंवा लहान शहरांत कोचिंग क्लासेसचे अस्तित्वच नसते. अशा मुलांना ‘एक्झाम फिअर’सारख्या साइट वरदान ठरत आहेत.
उमंग गोयल हा बेंगळुरूच्या ‘बिशप कॉटन स्कूल’चा विद्यार्थी! विज्ञान हा विषय त्याला अतिशय अवघड जात असे. आठवीच्या सहामाही परीक्षेच्या अगदी काही दिवस आधी त्याला ‘एक्झाम फिअर’ची माहिती मिळाली. दोन-तीन रात्री त्याने सातत्याने या साइटवरचे व्हिडीओज बघितले व त्याला खूप आत्मविश्वास आला. जे शाळेत इतके दिवसांत समजले नव्हते ते इथे दहा मिनिटांत कळले. आपण अधिक चांगल्या गुणांनी पास होऊ शकतो, असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला. श्रौतिक हा देखील असाच विज्ञानाला घाबरणारा विद्यार्थी! दिल्लीच्या ‘डीएलएफ पब्लिक स्कूल’मध्ये शिकत असताना नववीमध्ये त्याला या साइटविषयी कळले. कोचिंग क्लासेस बंद करून त्याने सरळ ‘एक्झाम फिअर’लाच आपला गुरू बनवले. यंदा बारावीला ९६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या श्रौतिकला कोलकत्याच्या ‘एनआयटी’मध्ये प्रवेश मिळाला आहे. ‘आपला क्लासला जाण्या-येण्याचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचल्याने आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकलो,’ असे श्रौतिक सांगतो.
नवा विषय जाणून घेण्यासाठी मुले नेहमीच उत्सुक असतात. म्हणून एखादा विषय जेव्हा त्यांना आवडत नाही, याचा अर्थ तो त्यांना नीट शिकवला गेला नाही, असे रोशनी म्हणते. मुलांच्या मनातली विज्ञान आणि गणिताविषयीची भीतीदेखील केवळ त्या विषयातील मूलभूत संकल्पना न कळल्यामुळे असते. या संकल्पना समजून घेणे, सराव करणे, अधिकाधिक प्रश्नपत्रिका सोडवून पाहणे यामुळे विद्यार्थ्यांची भीती दूर व्हायला मदत होते, असा रोशनीचा अनुभव आहे.
आतापर्यंत केवळ इंग्रजी भाषेतून उपलब्ध असणारे तिचे ‘टय़ुटोरिअल्स’ प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध व्हावेत, यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनुभवी भाषांतरकारांची एक टीम तिने बनवली आहे. त्याचप्रमाणे इंग्रजीचा न्यूनगंड असणाऱ्यांसाठी इंग्रजीचेही ‘टय़ुटोरिअल्स’ ती आता लवकरच अपलोड करणार आहे. आठवी ते बारावीच्या विज्ञान आणि गणित विषयांसह लवकरच ती सहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही व्हिडीओ बनवणार आहे. त्याचे काम सुरूही झाले आहे.
हल्ली सगळ्यांकडे मोबाइल फोन असतोच! इंटरनेट सेवा स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध झाली तर अशा ‘ऑनलाइन क्लास रूम्स’ची व्याप्ती वाढत जाईल आणि सर्व शिक्षा अभियान खऱ्या अर्थाने राबवले जाईल, असे रोशनी म्हणते.
कोचिंग क्लासेसचे पेव सध्या सर्वत्र पसरले आहे. मात्र हजारो रुपयांची फी आकारूनही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोच असे नाही. शिवाय क्लासला जाण्या-येण्यात खर्ची पडणारा वेळ, शक्ती आणि पैसा हा सर्व हिशेब पाहता ‘एक्झाम फिअर’सारख्या उपक्रमांची गरज आणि उपयुक्तता नक्कीच स्वीकारार्ह वाटते.
आपल्या देशात शैक्षणिक गुणवत्ता हा कळीचा मुद्दा बनतो आहे. चांगले शिक्षण हे केवळ श्रीमंतांसाठी वा शहरी भागापुरते मर्यादित राहिल्याचेही दिसून येते आहे. म्हणूनच कानाकोपऱ्यातील, ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्यासाठी ‘एक्झाम फिअर’सारखे विनामूल्य उपक्रम वरदान ठरू शकतील यात शंका नाही.
शर्वरी जोशी -sharvarijoshi10@gmail.com

A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…