23 September 2020

News Flash

वेध भवतालाचा : शैक्षणिक क्षेत्रातली शोधयात्री

वैश्विक वातावरण बदल आता आपल्या दाराशी येऊन ठेपलाय. उपाय करता येईल का याबद्दलचा आशावादही मावळत चालला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अर्चना जगदीश

कविता गुप्ता गेली दोन दशकं कॅलिफोर्नियातील शाळेत पर्यावरण शिक्षणासाठी काम करते आहे. या कामासाठी ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ने तिचा ‘ग्रासेनहॉवर टीचर्स फेलो’ देऊन सन्मान केला असून त्याअंतर्गत तिने गलापोगोस बेटांवर जाऊन मुलांना जीवशास्त्र, उत्क्रांती या विषयांमध्ये अधिक रस कसा निर्माण होईल आणि आज तिथं किंवा तशाच इतर अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थी कसं शिकतील याचा विशेष अभ्यास केलाय. म्हणूनच ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’नेही शैक्षणिक क्षेत्रातली शोधयात्री म्हणून  त्यांचा खास सन्मान केला आहे. त्या कविता यांच्याविषयी.

पुन्हा २००५ च्या प्रलयाची आठवण करून देणारा गेल्या आठवडय़ातला मुंबईतला पाऊस, आधी जवळपास कोरडा गेलेला जून महिना, बदलणारं मान्सूनचं चक्र या गोष्टी आता नेहमीच्याच होणार की काय, अशी भीती सगळ्यांना भेडसावते आहे.

वैश्विक वातावरण बदल आता आपल्या दाराशी येऊन ठेपलाय. उपाय करता येईल का याबद्दलचा आशावादही मावळत चालला आहे. त्याच वेळी पर्यावरण आणि वातावरण बदल याबद्दल अधिकाधिक माहिती करून घेण्याची धडपडही हळूहळू वाढते आहे. माहिती महाजालामुळे याही विषयांवरच्या उलटसुलट माहितीचा महापूर आजूबाजूला दिसतो आहे. पर्यावरण जाणीवजागृतीसाठी अनेक संस्था आणि व्यक्ती यांनी कंबर कसली आहे. मात्र फक्त माहिती पुरवून व वेगवेगळ्या लहान-मोठय़ा अभ्यासक्रमातून खरोखर पर्यावरण शिक्षण होतं का आणि अचानक सामोऱ्या येणाऱ्या वातावरण संकटाला तोंड द्यायला आपण तयार होतो का हा खरं तर कळीचा मुद्दा आहे. शिवाय पर्यावरण या विषयाचा आवाका अतिशय मोठा आहे. सर्व विज्ञान शाखा आणि इतर विषयही त्याच्याशी जोडलेले आहेत. म्हणजे जीवशास्त्र, वन्यजीव विज्ञान, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र हे विषय जितके महत्त्वाचे तितकेच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल-भूशास्त्र हे विषयही पृथ्वीचं पर्यावरण आणि त्याचा माणसावर किंवा इतरही प्रजातींवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणखी एक गंमत म्हणजे हे पर्यावरणशास्त्र या सगळ्या विषयांच्या दृष्टिकोनातून मांडलं गेलं तर ते अधिक रोचक वाटतं आणि वाचणाऱ्याला-शिकणाऱ्याला त्यात रस तयार होतो. मात्र याचा एक तोटाही आहे, तो म्हणजे पर्यावरणशास्त्रात झटपट तज्ज्ञ तयार होतात. ‘आपल्याला समजलं आहे तेच महत्त्वाचं आणि अंतिम सत्य’ असं मानणाऱ्यांचा गट तयार होतो. आणखी एक म्हणजे हे सगळं आपल्याला सहज समजतं, असा गैरसमजही निर्माण होतो. जाणीवजागृतीमधून दीर्घकाळ परिणाम घडविणारा कृती कार्यक्रम तयार करणं तर त्याहून महाकठीण काम.

आपण नेहमी ‘झाडं लावा- झाडं जगवा’पासून ते ‘चला पृथ्वी वाचवू या,’ अशी  घोषवाक्यं बघत-वाचत असतो. पण खोलवर विचार केला तर कुठं लावायची झाडं, कुणी लावायची, कशी लावायची, ती वाढवायची कशी? अशा अनेक महत्त्वाच्या उपप्रश्नांना उत्तरं नसतात. घोषवाक्यं प्रतीकात्मक असली आणि ती जनमानसावर परिणाम करत असली तरी आता सगळ्यांनीच पर्यावरण बदलाला तोंड देण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली आहे. फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांमुळे तर फक्त संगणक किंवा स्मार्टफोनच्या पडद्यावर घडणारी पर्यावरण आंदोलनं आणि समस्यांवरचे सहज उपाय सर्वसामान्यांची दिशाभूल करतात. म्हणूनच पर्यावरण शिक्षण आणि जाणीवजागृतीकडे वेगळ्या पद्धतीने आणि गंभीरपणे बघायची वेळ आली आहे.

भारतात पर्यावरण शिक्षण शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग अगदी सुरुवातीपासून आहे आणि त्यात विषयांची समग्र माहिती पुरविली जाते. पण बऱ्याचदा ती विद्यार्थ्यांना विचारप्रवण करण्यासाठी पुरेशी नसते. पुढे पुढे अधिक गुण मिळवण्यासाठीचा सोपा विषय म्हणूनही  पर्यावरण शिक्षणाकडे बघितलं जातं. ग्रामीण स्तरावर स्थानिक लोकांना पर्यावरण या विषयाची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या विकास कार्यक्रमांचा एक भाग म्हणून पर्यावरण शिक्षण आणि जाणीवजागृतीचा आवर्जून समावेश केलेला दिसतो. पण पुन्हा व्यक्तिगत किंवा समूह म्हणून दीर्घकालीन कृती कार्यक्रम तयार होताना दिसत नाहीत. म्हणूनच पर्यावरण शिक्षण आणि वातावरण बदलाचे दुष्परिणाम समजावत, आपण त्याच्याशी कसे जोडले गेले आहोत याचा खोलवर विचार करायला लावणारं पर्यावरण शिक्षण महत्त्वाचं आहे.

हे लक्षात घेऊन कविता गुप्ता कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीमधल्या कुपर्टनिो इथं सरकारी शाळेत, गेली दोन दशकं वेगळ्या पद्धतीने पर्यावरण शिक्षणासाठी काम करते आहे. ती खरं तर माध्यमिक शाळेत रसायनशास्त्र शिकवते. पण तो विषय आणि पर्यावरणशास्त्र यांचा संबंध सांगत आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यासंबंधीच्या कृती कार्यक्रमाकडे वळवणाऱ्या अनेक नावीन्यपूर्ण पद्धती तिने तयार केल्या आहेत आणि तिच्या मते जर मुलांनी समस्या समजून विचार केला तरच  पुढे पर्यावरण संरक्षण आणि वैश्विक वातावरण बदलाला तोंड देण्यासाठीच्या कार्यक्रमाचं ते समर्थपणे नेतृत्व करू शकतील. मुलांनी स्वत: विचार करायला शिकलं पाहिजे, त्यांना पर्यावरण हा विषय शिकण्यासाठी विज्ञान विषयाचं पुस्तकी शिक्षण महत्त्वाचं नाही तर रोजच्या जीवनात त्याचा काय उपयोग होतो आणि भवताल बदलत असताना कशी निरीक्षणं केली पाहिजेत हे समजण्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्याला काय आणि कसं शिकायचं आहे हे विद्यार्थ्यांनी ठरवावं आणि त्यासाठी संपूर्ण वेगळा अभ्यासक्रम (खरं तर शिक्षकांसाठी) तिने तयार केला आहे. कारण शिक्षकाची भूमिका दिशादर्शक असावी, पण सुकाणू मात्र विद्यार्थ्यांच्याच हातात असले पाहिजे. ‘विद्यार्थ्यांनी गुणांसाठी किंवा प्रतवारीसाठी शिकण्याऐवजी भविष्यात येणाऱ्या सार्वत्रिक संकटाशी सामना करण्यासाठी तयार व्हावं म्हणून शिकलं पाहिजे’, यावर कविता अधिक भर देते. आपण सगळे आणि अर्थात आपल्या पुढच्या पिढय़ाही निसर्गापासून अधिकाधिक दूर  होत चालल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जगाचा अनुभव घेण्यासाठी आजच्या  विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणं हेही महत्त्वाचं आहे. शिवाय असं जगाशी आणि निसर्गाशी जोडणंही सहज असलं पाहिजे. कारण तरच विद्यार्थी खऱ्या जगाशी जोडले जातील. आणखी महत्त्वाचं म्हणजे शिकताना विद्यार्थ्यांना मजा आली पाहिजे आणि कोणताही विषय नावडता होणार नाही याची काळजी शिक्षकांनी सतत घेतली पाहिजे.

शिकताना पर्यावरणाची समस्या समजून घेणं महत्त्वाचं नाही तर रसायनशास्त्राच्या माध्यमातून त्याचा अनुभव प्रयोगशाळेत घेणं, बाहेरच्या जगातल्या प्रत्यक्ष समस्यांचा विद्यार्थ्यांबरोबर वेध घेणं आणि उपाय करण्यासाठी त्यांच्या कल्पनांना बहरू देणं हे सगळं करण्याचा ती असोशीने प्रयत्न करते. शाळेत मुलं शिकत असतात ती प्रत्येक गोष्ट किंवा खरं तर ते करत असलेली कोणतीही गोष्ट ते का आणि कशासाठी करतात यावर विचार करण्यासाठी वाव देणं हे शिक्षकांचं मूलभूत काम आहे, असं कविताला वाटतं.

त्यांच्या गेल्या वीस वर्षांतल्या कामासाठी ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ने  २०१७ मध्ये ‘ग्रासेनहॉवर टीचर्स फेलो’ म्हणून त्यांचा सन्मान केला आहे आणि त्याअंतर्गत त्यांनी गलापोगोस बेटांवर जाऊन मुलांना जीवशास्त्र, उत्क्रांती या विषयांमध्ये अधिक रस कसा निर्माण होईल आणि आज तिथे किंवा तशाच इतर अनेक ठिकाणी जाऊन विद्यार्थी कसे शिकतील याचा विशेष अभ्यास केलाय.

सोसायटीच्या ‘जिओ चॅलेंज’ कार्यक्रमाचं संचालनही कविता करते. अमेरिकेतील सुप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिकन रसायनशास्त्र सोसायटी आणि इंटेलसारख्या कंपन्या या सर्वानी कविताच्या कामाचा सन्मान केलाय. ‘शैक्षणिक क्षेत्रातली शोधयात्री’ म्हणूनही ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ने तिचा खास सन्मान केलाय. अमेरिकेच्या विज्ञान शिक्षक संस्थेच्या कविता अध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातून अमेरिकेतल्या जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा दृष्टिकोन पोहोचवण्याचा ती प्रयत्न करते.

कविताने विद्यार्थ्यांसाठी खास ‘वातावरण बदल शिखर संमेलन’  नोव्हेंबर २०१९ मध्ये आयोजित केलं आहे. सगळे कार्यक्रम विद्यार्थीच पार पाडतील आणि विद्यार्थी मोठय़ा कंपन्या आणि शासन यांच्या भूमिका घेऊन संबंधित अनेक विषयांवर चर्चाही करतील. पर्यावरणाच्या विविध समस्या आणि माणूस म्हणून आपली जबाबदारी यावर नुसती चर्चा होणार नाही. म्हणजे असं की, त्यात प्लास्टिकची समस्या काय आहे यावर नेहमीसारखी चर्चा न होता या समस्येचा जागतिक पातळीवरचा वेध विद्यार्थी घेतील. यानंतर आपल्या पातळीवर काही स्थानिक, तर काही जागतिक पातळीवरचे उपाय विद्यार्थ्यांनी शोधलेत त्याची प्रात्यक्षिकं होतील. गलापोगोस बेटांवरचे विद्यार्थी जैवविविधता आणि तिथल्या पर्यावरणाचा अभ्यास कसा करतात यावर विचार करतील, सादरीकरणंही करतील. हा सगळा एकत्रित पर्यावरण शिक्षणाचा प्रयोग असेल. जाणीव जागृती ही दुसऱ्या कुणी तरी करण्यापेक्षा ती स्वत: विचारपूर्वक घडवणं महत्त्वाचं आहे. अशा संमेलनांमधून ते घडेल यावर कविता हिचा  विश्वास आहे.

एकीकडे ग्रेटा थनबर्ग आणि तिच्यासारखी तरुण मुलं-मुली वातावरण बदलासाठी जनमत तयार करण्याचं, शासनसंस्थांवर दबाब आणण्याचं काम करताना दिसतात, तर कविता गुप्तासारख्या शिक्षिका शिक्षण क्षेत्रातील बदलांद्वारे पुढच्या पिढीला वातावरण बदलाच्या परिणामांना तोंड देत प्रत्यक्ष कृती करण्यासाठी तयार करताना दिसतात. या सगळ्याचा चांगला परिणाम होऊन कदाचित भविष्यात आपण पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळू अशी आशा बाळगायला हरकत नाही. मनुष्यजातीला संपूर्ण विनाशापासून वाचवण्यासाठी तरुण पिढीलाच वेगळा विचार करायला हवा.

नुसती जाणीवजागृती होऊन उपयोग नाही तर कृती कशी करायची, ती जास्त परिणामकारक कशी होईल यावर मूलभूत विचार करणारं  शिक्षणच भविष्यात, म्हणजे येत्या दोन दशकांत वातावरण बदलाचे गंभीर दुष्परिणाम दिसायला लागतील तेव्हा कामी येईल. म्हणूनच पर्यावरणशिक्षण आणि जाणीवजागृती यासारख्या वर वर साध्या-सोप्या वाटणाऱ्या विषयांकडे गंभीरपणे बघायला हवं.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 12:04 am

Web Title: educational sector researchers kavita gupta abn 97
Next Stories
1 नात्यांची उकल : भांडा सौख्य भरे..
2 आभाळमाया : वटवृक्षाच्या सावलीत!
3 ‘टक्के’टोणपे
Just Now!
X