सरिता आवाड sarita.awad1@gmail.com

घटस्फोट किं वा जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर, मुलंही मोठी होऊन नोकऱ्यांत, संसारात गुरफटलेली असताना एकटय़ा पडलेल्या ‘तिला’  किंवा ‘त्याला’ सोबत हवीशी वाटणं साहजिकच. अशा वेळी आपल्याला ज्या कामाची मनापासून आवड आहे, तेच काम करणारं, आपली मदत हवीशी असलेलं कु णी अनुरूप भेटलं तर?.. साधनाताई आणि नितीन सावगावे यांच्या गोष्टीत काहीसं असंच घडलं. परंतु स्वत:च्या मनाला पटलेली गोष्ट करताना अर्थातच साधना यांना समाजमनाच्या विरोधाचा सामना करावा लागला. उभयतांच्या गोष्टीला ‘करोना’ टाळेबंदीमुळे एक अनपेक्षित परिमाण मिळालं आणि आपला निर्णय तपासून पाहाण्याची एक चांगली संधीही!

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

‘कोविड १९’ची उदासी सगळीकडे पसरली असताना एक  व्यक्ती मात्र अशी भेटली की जिनं टाळेबंदीचं मनापासून स्वागत केलं, सरकारचे त्यासाठी भरभरून आभार मानले. अगदी खरेखुरे. ती व्यक्ती म्हणजे प्रा. डॉ. नितीन सावगावे. कारणही तसंच होतं. ते आपण समजून घेणारच आहोत, पण त्याआधी ते आहेत तरी कोण हे जाणून घेऊ या.

प्रा. सावगावे सांगलीचे अभियंता आहेत. सांगलीच्या ‘वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मध्ये ते २६ वर्ष  इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग शिकवत होते. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. वालचंद कॉलेजमधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर सांगलीच्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. या शैक्षणिक अंगाबरोबरच त्यांचा राजकारणातही सक्रिय सहभाग आहे. सांगलीचे ते दोनदा नगरसेवक होते आणि एकदा महापौरही होते. असा विस्तृत शैक्षणिक आणि राजकीय अनुभव घेतलेल्या सावगावे यांना निवृत्तीच्या उंबरठय़ावर असताना वृद्धांसाठी काहीतरी भरीव काम करण्याची इच्छा झाली. अशी इच्छा होण्याचं एक वैयक्तिक कारण म्हणजे ते स्वत: त्यांच्या आजोबांचे लाडके नातू होते आणि आयुष्यभर करिअरच्या मागे धावपळ करताना त्यांना आजोबांकडे म्हणावं तसं लक्ष देता आलं नाही याची त्यांना रुखरुख वाटत होती.

वृद्धांसाठी काही करायचं असं ठरल्यावर त्यांनी या प्रश्नाचा अभ्यास करायला सुरुवात केली. वैद्यकीय प्रगतीमुळे वाढलेली आयुर्मर्यादा, त्यामुळे वृद्धांची वाढती लोकसंख्या हे वास्तव स्पष्टच  होतं. त्याचबरोबर या वृद्धांची मुलं त्यांच्या कामानिमित्त दूर राहात होती, परदेशातही होती.

या मुलांना आई वडिलांसाठी पैसे देणं शक्य होतं, पण वेळ देता येत नव्हता. काही वृद्ध परदेशी राहूनही आले, पण परदेशात रमले नाहीत. या वृद्धांना मनुष्यबळाची गरज होती. जिथे त्यांना सुरक्षित राहाता येईल, त्यांचं मन रमेल, वैद्यकीय उपचार मिळतील अशा निर्भर निरामय निवासाची आवश्यकता होती.

हे लक्षात आल्यावर महाराष्ट्रातल्या वृद्धांसाठी असलेल्या निवासी प्रकल्पांचा त्यांनी अभ्यास सुरू केला. या प्रकल्पांमधले चांगले गुण लक्षात घेऊन आणि त्रुटी टाळून त्यांनी स्वत:चा असा वृद्धांच्या निवासी प्रकल्पाचा आराखडा तयार केला. हा आराखडा म्हणजे त्यांच्या मते सामाजिक अभियांत्रिकी होती. या प्रकल्पाचं ‘मिशन स्टेटमेंट’ ठरलं. ज्येष्ठ नागरिकांना स्वाभिमानानं, सन्मानानं आणि आनंदानं आयुष्यातलं अखेरचं पर्व जगता यावं हे ते मिशन. त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणून शिरवळजवळ त्यांनी अंदाजे ७ एकर जमीन खरेदी केली. आता पुढचं पाऊल म्हणजे प्रकल्प राबवणं. त्यासाठी त्यांना त्यांच्या बरोबरीनं काम करणारी, व्यवहारज्ञान असलेली आणि समाजकार्याची आवड असलेली व्यक्ती हवी होती.

याला एक वैयक्तिक पदर होता. नितीन यांचा पत्नीशी तीव्र मतभेद झाल्यामुळे घटस्फोट झाला होता. त्यांना एक मुलगा आहे. पण त्याचं संगोपन त्याच्या आईनं केलं होतं. घटस्फोट घेऊनही बरीच वर्ष उलटून गेली होती. निवृत्तीनंतर सोबत हवी असं वाटत होतं, त्याचबरोबर आपल्या सहचर व्यक्तीनं आपल्या प्रकल्पात आपल्याबरोबर कामही  करावं अशी अपेक्षा होती. स्त्रीनं घरात बंदिस्त न राहाता आपल्या सहचराच्या कामातसुद्धा भाग घ्यावा, तिच्या क्षमतांचा घराच्या चार भिंतींच्या बाहेरही उपयोग व्हायला हवा, अशी त्यांची धारणा होती. प्रकल्प तर मनात होता, आयुष्यात सोबतही हवीहवीशी होती. पण हे सगळं जमून कसं येणार याची हुरहुर वाटत होती. त्या वेळी एका ‘माइंड पॉवर’ कार्यशाळेची त्यांनी जाहिरात वाचली आणि या कार्यशाळेत ते सहभागी झाले. ही कार्यशाळा घेणाऱ्या डॉ. दत्ता कोहींकर यांचा सावगावे यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यांच्या सल्ल्यानं  पुण्यातील ‘हॅपी सिनियर्स’ या संस्थेशी त्यांनी संपर्क साधला. तिथे त्यांचं स्वागत केलं ते साधनाताईंनी.

पुण्याजवळ साधनाताईंचं वास्तव्य होतं आणि त्यांचे पती उद्योजक होते, राजकारणात सक्रियही होते. एक मुलगा, एक मुलगी असं त्यांचं चौकोनी सुखी कुटुंब होतं. साधना नोकरी करत नसल्या तरी ‘गॅस एजन्सी’ चालवणं, दुकान चालवणं, अशा कामांमध्ये त्या व्यग्र होत्या. नंतर त्यांच्या पतीला कर्क रोगाची बाधा झाली आणि त्यात त्यांचं निधन झालं. साधनाताई तेव्हा जेमतेम पन्नाशीला पोहोचल्या होत्या. पण दोन्ही मुलांची लग्नं झाली होती, मुलगा स्वतंत्र व्यवसाय करीत होता. पतीनिधनामुळे साधनाताईंसमोर अचानक पोकळी निर्माण झाली. काही तरी करण्याची इच्छा होती, पण काय करावं हे सुचत नव्हतं. अशा वेळी ‘हॅपी सिनियर्स’ या संस्थेच्या माधव दामले यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयात येऊन काम करण्याची विनंती केली. चौकशीसाठी कोणी आल्यास माहिती देणं, ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’विषयीची कल्पना सांगणं, त्यासाठी कुणी अर्ज केल्यास तो स्वीकारणं, अशा प्रकारचं ते काम होतं. समाजकार्याची आवड, बोलका स्वभाव आणि चांगलं व्यक्तिमत्त्व, यामुळे हे काम त्यांना साजेसं होतं. हे काम करत असताना त्यांची आणि नितीन सावगावे यांची गाठ पडली. सावगावे कोण आहेत, त्यांची  शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक पार्श्वभूमी, पुढच्या आयुष्यात काय करायचं आहे, याचं सगळं नियोजन त्यांच्या समोर होतं. साधनाताईंना पुढच्या आयुष्यासाठी त्यांच्यात स्वत:चा जोडीदार दिसला. या जोडीदाराच्या साथीनं त्यांना समाजकार्य करण्याची संधीसुद्धा मिळणार होती. हा  विचार करून त्यांनी सावगावे यांना फोन केला आणि विचारणा केली, की तुम्ही जी जोडीदार शोधत आहात त्यासाठी माझा विचार कराल का? सावगावे यांनी साधनाताईंची माहिती घेतली. समाजकार्याची आवड, व्यवहार कुशलता, बोलका स्वभाव, चांगलं व्यक्तिमत्त्व हे सर्व हवे ते गुण साधनाताईंमध्ये त्यांना आढळले आणि आपली जोडीदार म्हणून साधनाताईंची त्यांनी निवड केली. आता मागे वळून बघता सावगावेंना वाटतं, की काम करण्याचा त्यांचा इरादा नसता, त्यासाठी काय काम करायचं याचं निश्चित नियोजन नसतं तर साधनाताईंनी सावगावे यांचा जोडीदार म्हणून विचार केला नसता. निराळ्या शब्दात सांगायचं, तर साधनाताईंनी सावगावे आणि त्यांचा वृद्धांसाठी असलेला प्रकल्प या दोघांची पुढच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली होती.

स्वत:च्या कुटुंबातून सावगावे यांना चांगला पाठिंबा होता. त्यांची धाकटी बहीण सुनीता लग्नानंतर पंढरपूरला राहात होती. तिचे पती संजय पाटील हे नावाजलेले अस्थिरोगतज्ज्ञ होते. एका दुर्धर आजारानं काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं होतं. सुनीतांनाही सावगावे यांचा प्रकल्प आवडला. सुनीता आणि नितीन यांचं जवळचं नातं असल्यानं त्यांचा सहभाग मोलाचा होता. संजय पाटील यांच्या स्मरणार्थ या प्रकल्पाच्या नावात त्यांचं नाव ठळकपणे घातलं गेलं-  ‘संजय : माय हॅपी डेस्टिनेशन- रिटायर्डस कम्युनिटी लिव्हिंग वर्ल्ड’. सुनीतांची भावाला मदत करण्यासाठी शिरवळजवळ येऊन राहाण्याची तयारी आहे. सुनीता आणि साधनाताई समवयस्क असल्यानं त्यांची आपसात चांगली मैत्री झाली. त्या दोघींनीही नव्या नात्याचा आनंदानं स्वीकार केला.

इथपर्यंत सगळं कसं छान वाटतं. पण खरी अडचण तर इथेच आली. साधनाताईंचं समाजकार्य एकवेळ त्यांच्या सासर-माहेरच्या नातेवाईकांना, विशेषत: मुलांना पटण्यासारखं होतं. वैधव्यानंतर स्त्रीनं विरक्त भावानं आयुष्य घालवावं, ही समाजमनाची उत्स्फूर्त अपेक्षा असते. एकदा विधवा झाल्यानंतर पुन्हा नव्या जोडीदाराबरोबर नव्यानं सहजीवन सुरू करायची कल्पना पटत नाही, एक वेळ पटली तरी आपल्या जवळच्यांच्या- अगदी आईच्या बाबतीत असं  घडणं अजिबात रुचत नाही. साधनाताईंच्या बाबतीत असंच घडलं. त्यांनी समाजकार्य केलं तर घरच्यांना चाललं असतं, पण आणखी कोणाचं साहचर्य स्वीकारणं सहन होणारं नव्हतं. घरच्यांची चाचपणी केल्यावर साधना यांच्या हे स्वच्छ  लक्षात आलं. स्वत:शी खूप संघर्ष करून शेवटी ‘अनुसरले मी आपुल्याच मना’असा निर्णय त्यांनी घेतला. सहजीवन आणि समाजकार्य स्वीकारण्याचं ठरवलं. पण सहजीवन कधी सुरू करायचं हे मात्र ठरत नव्हतं.

साधनाताईंसाठी हा निर्णय किती कठीण होता हे मी माझ्या अनुभवावरून समजू शकते. आपल्या महाराष्ट्राला समाजसुधारणांची खूप समृद्ध परंपरा आहे. विधवा विवाहाच्या चळवळीचा आपल्याला वारसा आहे. या प्रश्नाची फक्त चर्चाच नाही तर प्रत्यक्ष कृती करण्याचं धाडसही लोकांनी त्या काळात दाखवलेलं आहे. ‘आधी केले मग संगितले’ या न्यायानं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आधी कृती करून विधवा विवाहासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. विशेष म्हणजे हे प्रयत्न करीत असताना लोकमताविषयी कधीच बेपर्वाई दर्शवली नाही. कधी दोन पावलं मागे घेऊन का होईना, त्यांनी समाजात सुधारणा रुजवल्या. महाराष्ट्राच्या समाजाला विचारमंथन, बदलाच्या प्रत्यक्ष कृती, त्यावरच्या क्रिया-प्रतिक्रिया असा सामाजिक इतिहास आहे. त्या इतिहासाच्या खांद्यावर आपण उभे आहोत. एकेकाळी विधवा विवाहाला कट्टर विरोध असणाऱ्या आपल्या समाजात हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा स्त्रिया का होईना, वैधव्यानंतर विवाहाशिवाय ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहातात आणि ते जाहीर करण्याचं धारिष्टय़ दाखवतात त्यामागे हेही एक कारण आहे. पण अशा इतर अनेक स्त्रियांची किती घुसमट होत असेल? वेशभूषा, रोजच्या आयुष्यात संगणक, मोबाइल वगैरेंच्या रूपात आलेल्या आधुनिकतेच्या पुढे जाऊन विचारात, आचारात आधुनिकता आणू पाहाणाऱ्या साधनाताईंसारख्या स्त्रियांवर समाजमनाचा किती दबाव येत असेल याची कल्पना आपण करू शकतो. वैयक्तिक आयुष्यात हा दबाव सहन करून त्या वृद्धांसाठीच्या प्रकल्पात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत होत्या हे विशेष.

आता परत गोष्टीच्या मूळ पदावर येते. आपल्या अवतीभवतीच्या समाजमतामुळे आपल्याला पुनर्विवाह करता येणार नाही असं उभयतांच्या आधीच लक्षात आलं होतं, पण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची सुरुवात झाली नव्हती. प्रकल्पाच्या कामासाठी दोघांना एकदा बाहेरगावी जावं लागलं- तो दिवस होता १९ मार्च २०२०. नेमकी तीन दिवसांत अभूतपूर्व टाळेबंदी सुरू झाली. आता साधनाताईंना घरी जाणं अशक्य होतं. साहजिकच त्यांचं एकत्र राहाणं सुरू झालं. टाळेबंदीच्या कृपेनं नितीन आणि साधना यांना आठ-नऊ दिवस नाही, तर चांगले आठ-नऊ महिने एकमेकांच्या सहवासात राहाता आलं, एकमेकांना समजून घेता आलं. आजघडीला प्रकल्पाचं काम सुरू आहे. सहजीवन आणि सहकार्य यांचा सुंदर गोफ विणला जातोय आणि त्याच्या जोडीला घरच्यांच्या प्रतिक्रियेला तोंड देण्याची साधनाताईंच्या मनाची  पूर्ण तयारी झाली आहे. आता समजलं ना, नितीन सावगावे टाळेबंदीचं मनापासून आभार का मानतात ते!