अर्चना जगदीश

नागरी युद्धे, शिकारीचा सामना करत ‘एलिफन्ट व्हॉइसेस’ संस्था चालवणारी पंचावन्नवर्षीय जॉईस पूल. नवऱ्याबरोबर आफ्रिकी हत्तीच्या माद्यांमध्ये सुळे असण्याचे प्रमाण कमी झाले आहे का, यावर संशोधन करत आहे. दुसरी ‘आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण निधी’ची वरिष्ठ उपाध्यक्ष फायी कुवास. केनियात हत्तींच्या चोरटय़ा शिकारींमध्ये गुंतलेल्या माफियांना पकडणारी आणि तस्करांवर कारवाई करणारी. याशिवाय म्यानमारचा ‘टिंबर एलिफन्ट प्रकल्प’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या प्रो. व्हिरपी लुमा या संशोधक. तसेच तुझारा ट्विन, अदजानी कोस्टा आदींच्या  प्रयत्नांनी जगभरातील हत्तीचं अस्तित्व टिकलेलं आहे.  ‘आकाशींगा’ म्हणजे ‘सगळ्यात शूर’ असणाऱ्या या धाडसी स्त्रियांविषयी.

हत्तींबद्दल लिहिण्यासारखं, सांगण्यासारखं खूप काही आहे. बदलत्या जगात हत्तींची वसतिस्थाने, मग ते आफ्रिकेतले गवताळ प्रदेश असोत की, भारत, श्रीलंका आणि दक्षिण आशियातली जंगलं असोत, वेगाने आक्रसत चालली आहेत. दक्षिण आशियात हत्तीचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व वादातीत आहे. आफ्रिकेतही अनेक जमाती हत्तीला पवित्र मानतात आणि त्याभोवती लोककथा परंपरेने गुंफल्या आहेत. पण तरीही कोटय़वधी वर्षे पृथ्वीवर सहज वावरणाऱ्या या भव्य, बुद्धिमान प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. म्हणूनच हत्ती संशोधन आणि त्यांना जास्त समजून घेण्याबरोबरच हत्ती संरक्षणासाठी कृती कार्यक्रम राबवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

केनियातलं ‘आंबोसेली राष्ट्रीय उद्यान’ गेली चाळीस वर्ष हत्ती संशोधनाचं केंद्र आहे. जॉईस पूल ही जर्मन स्त्री केनियात वाढली. जॉईसनं वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच सिंथिया मॉस आणि कॅथी पायनेच्या पावलावर पाऊल टाकत हत्तीचं सामाजिक जीवन आणि संवाद कौशल्यावर काम सुरू केलं. अर्थातच, या काळात म्हणजे ऐंशीच्या दशकात आफ्रिकेतली अनेक नागरी युद्धे आणि त्यांचा वन्यप्राणी आणि त्यांच्या अधिवासांवर होणारा परिणाम तिने जवळून पहिला. हत्तींची अपरिमित शिकारही याच काळातली. म्हणूनच तिने पुढच्या काळात, विशेषत: गेली दहा-पंधरा वर्षे, हत्तीच्या प्रत्यक्ष संरक्षणावर लक्ष केंद्रित केलं आहे.

जॉईस ‘एलिफन्ट व्हॉइसेस’ ही  संस्था चालवते आणि जगभरातल्या हत्तीप्रेमींना हत्ती संरक्षणात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करते. मोबाइल अ‍ॅपच्या साहाय्याने, जगभरातील स्थानिक लोकांच्या मदतीने, हत्तीच्या नोंदी करणं, पर्यटकांबरोबर याच माध्यमातून हत्तीच्या हालचालींचा मागोवा घेणं, त्यांचे नकाशे तयार करणं आणि त्यातून चोरटी शिकार आणि इतर धोक्यांपासून हत्तींना वाचवणं, हे काम ती करते. मोझाम्बिकमधल्या गोरोंगोसा पार्कमधल्या सहाशेपेक्षा जास्त हत्तींची नोंद ठेवत, तिने अनेक हत्तींसाठी तात्काळ मदत पुरवली आहे. यात पर्यटक एखाद्या संरक्षित प्रदेशातला हत्ती दत्तक घेऊन त्याला नाव देतात. प्रत्यक्ष भेटीला आल्यावर त्या हत्तीला पाहतात आणि त्याची जबाबदारी घेतात. हे सगळं काम त्यांनी दिलेल्या निधीतून स्थानिक हत्ती संरक्षक तयार करून, त्यांना प्रशिक्षण देऊन केलं जातं. यामुळे स्थानिक तरुण-तरुणींना काम मिळतं आणि ते शिकाऱ्यांऐवजी संरक्षणाला मदत करतात.

लोकांच्या छोटय़ा छोटय़ा ऑनलाइन देणग्यांमधून जगभरातले अक्षरश: शेकडो लोक हत्ती आणि अधिवास संरक्षणाशी सहज जोडले गेलेत. तंत्रज्ञानाधारित काम, सामान्य शहरी निसर्गप्रेमींना यात सहभागी करून घेण्याच्या या कार्यक्रमासाठी ‘नॅशनल जिओग्राफिक’ने तिचा सन्मान केलाय. नागरी युद्धे, शिकारीचा सामना करत पंचावन्नवर्षीय जॉईसचं काम आजही सुरूच आहे. या सर्व कामात तिला साथ देणाऱ्या तिच्या नवऱ्याबरोबर ती आफ्रिकी हत्तीच्या माद्यांमध्ये सुळे असण्याचे प्रमाण कमी झाले आहे, का यावर मूलभूत संशोधन करत आहे. मात्र एक संशोधक म्हणून काम करताना संशोधन निबंध लिहिता येतात, व्यक्तिगत आनंद आणि प्रसिद्धी मिळते. दूरगामी परिणाम म्हणून जमिनीवर काम करणं मात्र खूप अवघड असतं आणि ध्यास घेऊन त्यात पडलं तरच काहीतरी बदल घडतो, असं तिनं स्पष्ट सांगितले आहे. फेसबुकवरून अधिवास किंवा प्रजाती वाचवणाऱ्यांनी, किंवा एखाद्या फोटोवरून स्वत:चाच उदोउदो करून घेणाऱ्यांनी, यावर विचार जरूर करावा. सवंग लोकप्रियता हा बाजारप्रणीत व्यवस्थेचा गाभा आहे पण त्याने खऱ्या अर्थाने वन्यप्राणी अथवा जंगल संरक्षण मात्र होत नाही.

व्यक्तिगत संशोधनाने सुरवात करून पुढे प्रत्यक्ष काम करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे, यासाठी पुढाकार घेऊन मोठय़ा प्रमाणावर परिणाम घडवण्यासाठी प्रयत्न करणं. आणखी महत्वाचं म्हणजे सातत्य आणि नवा विचार. फायी कुवास ही ‘आंतरराष्ट्रीय प्राणी कल्याण निधी’ (इंटरनॅशनल अ‍ॅनिमल वेल्फेअर)ची वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. अमेरिकेच्या अतिरेकीविरोधी आर्मीत कर्नल म्हणून तिची सुरुवात झाली, ती केनियात हत्तींच्या चोरटय़ा शिकारींमध्ये गुंतलेल्या माफियांना पकडण्याच्या आणि तस्करांवर कारवाई करण्याच्या कामाने. तिथून तिने हत्ती संरक्षणाचा वसा घेतला तो कायमचाच! तिच्या प्रयत्नांनी नुकतीच वल्गुलुलुई वन्यप्राणी क्षेत्रातल्या वनरक्षक म्हणून धाडसी मसाई तरुणींची नेमणूक झाली आहे. हे पथक केनिया आणि टांझानियाच्या सीमेवर चोरटय़ा शिकाऱ्यांपासून हत्तींचं संरक्षण करतं. या सगळ्या तरुण मसाई मुली स्वत:ला ‘आकाशींगा’ म्हणजे ‘सगळ्यात शूर’ असं अभिमानाने म्हणतात. चोरटय़ा शिकारी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि आफ्रिकन तस्करांशी सामना करायचा म्हणजे शौर्य आणि धर्य हवंच. आफ्रिकेतच बोट्स्वाना परिसरातील ओकावांगो नदीच्या त्रिभुज प्रदेशात हत्तीचं आतापर्यंत माहीत नसलेलं वसतिस्थान उजेडात आलं आहे आणि या परिसरात एक लाखाहून अधिक हत्ती माणसाच्या हस्तक्षेपापासून दूर सुखाने राहत आहेत, असा अंदाज आहे. ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या मदतीने या भागात कामाला सुरुवात झाली आहे आणि याचं नेतृत्वदेखील अदजानी कोस्टा ही  स्थानिक स्त्री करते आहे. स्त्रिया, मुली संवेदनशील असतात आणि मन लावून काम करतात. आफ्रिका खंडात अनेक ठिकाणी तर वन्यप्राणी पर्यटनावरच लोकांची उपजीविका अवलंबून आहे. म्हणूनच अधिकाधिक स्त्रिया या कामासाठी पुढे येताना दिसतात.

आशियाई हत्तींबद्दल डॉ. रामन सुकुमार यांच्यासारखे अपवाद सोडल्यास भारतात मूलभूत, दीर्घकालीन संशोधन  फारसं झालेलं नाही. वर्षांनुवर्षे एकाच भागात स्त्रियांनी एखाद्या प्रजातीवर असं काम केल्याची उदाहरणंही भारतात जास्त नाहीत. मात्र दक्षिण आशियाई देशात वेगळ्या पद्धतीने हत्ती संशोधन आणि संरक्षणाचं दीर्घकालीन काम सुरू आहे. म्यानमारचा ‘टिंबर एलिफन्ट प्रकल्प’ हा असाच जवळजवळ स्त्रियांनीच चालविलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. धोकादायक यादीत गेलेला आशियाई हत्ती अनेक दक्षिण आशियाई देशात, विशेषत:, म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेशात, लाकूड उद्योगात, ओंडक्यांची वाहतूक आणि संबंधित कामांसाठी वापरले जातात. फिनलँडचे तुर्कू विद्यापीठ, म्यानमारचे वन खाते, स्थानिक विद्यापीठे आणि लाकूड व्यावसायिक यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा प्रकल्प गेली दहा-बारा वर्षे सुरू आहे. याचं नेतृत्व करते आहे प्रो. व्हिरपी लुमा ही संशोधक. व्हिरपीने फिनलँडमध्ये मानववंश, उत्क्रांती आणि त्याचे ऐतिहासिक संदर्भ यावर केलेल्या कामातून माणूस आणि प्राणी यांचे प्रागतिहासिक काळापासूनचे संबंध आणि त्याचा परिणाम यावर प्रकाश टाकला आहे. आज तो संबंध कसा आहे, हत्तींची बदलती परिस्थिती, बदलतं पर्यावरण आणि माणसाची प्रगती यानुसार त्यावर काय परिणाम होत आहेत हे तपासून पाहणं तिला महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच म्यानमार प्रकल्प सुरू झाला. यात लाकूड उद्योगातली हत्तींची सद्य परिस्थिती, त्यांचे आरोग्य आणि घटत जाणारी प्रजननक्षमता यांचा सखोल अभ्यास गेली दहा वर्ष व्हिरपीच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या कामगार हत्तीचे गुणधर्म टिकून राहण्यासाठी, प्रजननक्षमता राखण्यासाठी या टिम्बर कॅम्पसच्या सभोवताली जंगली हत्तींची पुरेशी संख्या महत्त्वाची आहे. म्हणूनच हा प्रकल्प पाळीव कामगार हत्तींचा असला तरी वन्य हत्तींच्या संरक्षणासाठी फार महत्त्वाचा आहे. शिवाय माणसाळलेल्या हत्तींची वागणूक आणि वन्य हत्तींची वागणूक यातला फरक, हत्तीच्या वयस्कर होण्याची प्रक्रिया, या सगळ्या अभ्यासातून हत्ती संवर्धनासाठी काही पथदर्शक निकष निघतील अशी व्हिरपी आणि तिच्या गटातल्या संशोधकांची खात्री आहे. या कार्यक्रमात डॉ. खिन ताम विन ही म्यानमारची वनाधिकारी, मुमु थेन आणि तुझारा ट्विन या तरुण संशोधक महत्त्वाची जबाबदारी पार पाडताहेत. या प्रकल्पात हत्तीच्या आरोग्यावर काम करण्यासाठी अनेक स्त्री-पशुतज्ज्ञदेखील सहभागी झालेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे दीर्घकालीन संशोधनातून या सगळ्या स्त्रियांचे या कामगार हत्तींसोबत भावबंध तयार झाले आहेत.

हत्तीला भारताचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारा प्राणी म्हणून मान्यता मिळायला २०१० वर्ष उजाडलं. भारतात १९९२ मध्ये व्याघ्र प्रकल्पच्या धर्तीवर ‘हत्ती प्रकल्प’ सुरू झाला होता. यात १७ राज्यांमधल्या हत्तींच्या विस्तृत अधिवासांना संरक्षण आणि चोरटय़ा शिकारींना निर्बंध घालण्यासाठी हत्ती अभयारण्ये तयार करावीत असा मुख्य उद्देश होता. त्यानुसार झारखंडमधील सिंगभूम इथे पहिल्या ‘हत्ती अभयारण्या’ची स्थापना झाली. मात्र या सगळ्या अभ्यास प्रकल्पाला व्याघ्र प्रकल्पाइतका प्रतिसाद आणि प्रसिद्धी मिळाली नाही. कदाचित हत्ती नेहमी दिसतो; खरा किंवा प्रतीकांच्या स्वरूपात, म्हणून जनमानसाला तो दुर्मीळ आहे, असं वाटत नसावं. त्यामुळेच व्याघ्र प्रकल्पाइतका ‘हत्ती प्रकल्प’ यशस्वी झाला नसावा. रोजच्या जीवनातल्या श्रद्धेचा भाग असणारा आणि म्हणूनच कदाचित अतिपरिचयात अवज्ञा झालेला आशियाई हत्ती विरोधाभासाचं उत्तम उदाहरण आहे. विकास आणि माणसांच्या हव्यासापोटी निसर्गाचा सतत आणि वेगाने होणारा ऱ्हास आशियाई हत्ती मूकपणे बघतो आहे. अस्तित्वाची लढाई हत्ती हरणार नाही हे पाहणं प्रत्येक संस्कृतीप्रेमी आणि निसर्गप्रेमी व्यक्तीचं कर्तव्य आहे.

लक्ष्मीला सुवर्णमुद्रांनी अघ्र्य देणारा हत्ती, गणपतीच्या रूपात प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी समोर येणारा हत्ती, तर कधी शेतात धुडगूस घालून शेतकऱ्यांना त्रास देणारे जंगली हत्ती.. असा हत्ती खरं तर सतत आपल्या आजूबाजूला असतो, आपल्या विचारातही कळत-नकळत असतो. तो फक्त प्रतीक म्हणून उरणार नाही याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. फक्त संशोधक आणि फक्त स्त्रियांचीच नाही तर संस्कृती, प्राणी आणि पृथ्वी याबद्दल प्रेम असणाऱ्या किंवा नसणाऱ्यांचीसुद्धा ही जबाबदारी आहे.

साहित्यातील हत्ती

आसामच्या आहोम राजांच्या काळात म्हणजे अठराव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिल्या गेलेल्या ‘हस्तिविद्यार्णव’ या आसामी भाषेतील हस्तलिखित ग्रंथात हत्तींबद्दलच्या कल्पनाविलासाबरोबरच हत्तीच्या सवयी आणि वागणूक यांचेही अचूक वर्णन आहे. शिवाय सुकुमार बरखात लिखित या ग्रंथात हत्तीची १७१ रंगीत चित्रंही आहेत. प्राचीनकाळी पालकाप्य ऋषी हा हत्तींच्या कळपाबरोबर अनेक वर्ष राहात होता आणि त्यानंतर त्याने ‘पालकाप्यम’ हा ग्रंथ लिहिला आणि त्यात हत्तीचे वंश, गुण, रोग आदी गोष्टींचं सविस्तर वर्णन केलं आहे.  अनेक भारतीय भाषांमधील कथांमध्येदेखील हत्ती आहेच. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या ‘कृष्णेगौडाची हत्तीण’ या कथेत हत्ती, त्यांचं जंगल, माणसं आणि जंगलांचा संबंध आणि माणसाने जनावरांचा वापर करताना कसं भान सोडलं आहे, याचं अप्रतिम चित्रण केलंय. तर जॉर्ज ऑर्वेलच्या ‘हत्तीचा मृत्यू’ या कथेत साहेबाने शिकार केलेल्या हत्तीची वाटणी कशी झाली आणि त्यामागच्या आसाममधल्या सामाजिक प्रथा आणि शिकारीतला स्थानिक लोकांचा सहभाग यावर आपल्या समर्थ लेखणीने प्रकाश टाकलाय. मार्क शँडचं ‘माय ट्रॅव्हल्स ऑन एलिफन्ट’ हे भारतातील हत्तीवरून केलेल्या सफरीचं वर्णन अक्षरश: हृदयाला हात घालणारं आहे. मार्क शँड आपल्या कौटुंबिक ट्रस्टतर्फे आशियाई हत्तीच्या संवर्धनाला साहाय्य करतात.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com