27 October 2020

News Flash

आपलेपण.. घरानं दिलेलं

घरामध्ये एकटीच होते. निदान एक तास तरी आणखी कोणीही यायची शक्यता नव्हती. या तासभर मी अगदी निवांत, फक्त ‘माझ्याबरोबर मी’ च अशी ही वेळ होती.

| August 16, 2014 01:01 am

घरामध्ये एकटीच होते. निदान एक तास तरी आणखी कोणीही यायची शक्यता नव्हती. या तासभर मी अगदी निवांत, फक्त ‘माझ्याबरोबर मी’ च अशी ही वेळ होती.  अर्थात् असा प्रसंग काही पहिल्यांदाच आला होता अशातला भाग नाही. पण आज जशा काही जाणिवा मनात उमलत होत्या तशी जाणीव आतापर्यंत मनात उमलली नव्हती..

आ जपर्यंत  एकांतात मी कितीतरी वेगवेगळय़ा गोष्टी  केल्या आहेत. कधी एखादा नवीन पदार्थच कर, कधी घरातील आवराआवर कर. कधी छोटंसं भरतकाम, कधी टी.व्ही. बघणं आणि वाचन करणं तर नेहमीचंच! कधी कधी तर निवांत पडून रहाणंसुद्धा मला खूप आवडतं. पण आज मला यातलं काहीच करावंसं वाटत नव्हतं. कधी-कधी असं एकटं राहिलं की मला उदाससुद्धा वाटतं. नेहमी माणसांच्या गजबजाटाची एवढी सवय झाली आहे की इथे तळेगावला आलं आणि घरी एकटं रहायची वेळ आली की मला एक प्रकारची खिन्नता येत असे. साऱ्या जगापासून, ‘जीवना’पासून आपण तुटलो आहोत असं कधी-कधी वाटत असे. मुंबईमध्ये आमच्या घरी पूर्ण शांतता कधी जाणवतच नाही. आमच्या बिल्डींगच्या अगदी लगत प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून सतत माणसांची वर्दळ आणि वाहनांची ये-जा असते. कधी-कधी या सततच्या आवाजांचा उबग येतो पण त्यामुळेच एकटेपण जाणवतही नाही, हेही खरं!
 खरं म्हणजे कधीतरी एकटं राहणंसुद्धा मला आवडतं. आपल्याच आतमध्ये डोकावून पहाण्याची ती एक संधी आहे. असं मला वाटतं. पण का कोण जाणे, तळेगावला नव्या घरात थोडय़ा काळासाठी राहायला आलं आणि जर घरात एकटं राहायची वेळ आली तर तो एकांत अंगावर येत असे. हळूहळू अनेक वेळा आल्यानंतर, घराची, परिसराची ओळख लाभणारं एकटेपण सुसह्य़ व्हायला लागलं. ठीक आहे. हा वेळ कामांचा बॅकलॉग भरून काढायला वापरू या असं मनानं ठरवून टाकलं आणि लक्षात यायला लागलं की ‘सेकंड होम’मध्ये सुद्धा कधी न संपणारी कामे असू शकतात. पण आजचा दिवस तसा नव्हता. आजही घरात मी एकटीच होते. पण आजचं एकटेपण जरा निराळंच होतं. घरात दुसरं कोणीच ‘सजीव’ सोबत नसतानासुद्धा असं वाटत होतं की तशी मी ‘एकटी’नाहीय. ‘‘मग कोण आहे आपल्याबरोबर?’’ माझा मलाच मी हा प्रश्न केला, आणि माझ्या लक्षात आलं की अरेच्चा! हे आपलं घरच आहे. आपल्या सोबतीला. हे घर आपणच आपल्या कष्टातून घेतल्यामुळे या घराबद्दलच्या ‘स्वामित्वाची’ भावना आजपर्यंत कुठेतरी आपल्या मनात दडून होती. पण आज त्याची जागा ‘मित्रत्वाच्या’ भावनेने घेतली होती. खरंच असं वाटलं, या घराने मैत्रीचा हात माझ्यापुढे केला आहे. त्याने मला आता मैत्रीण म्हणून स्वीकारलं आहे. बोलतंय हे घर माझ्याशी. सुखद भावनेची एक साय माझ्या मनावर दाटून आली आणि इतकं बरं वाटलं की शब्दात नाही वर्णन करता येणार. आज मला वेळ घालवण्यासाठी कोणत्याही बाह्य़कामाची, करमणुकीची गरज नव्हती. माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने बोलणारं, माझ्या पाठीवरून मायेचा अदृश्य हात फिरवणारं कोणीतरी आता सतत माझ्यासोबत असणार होतं ही जाणीव मला झाली. हे माझं घरच माझं सहृद बनलं होतं. आता ते नुसतं माझं निवाऱ्याचं ठिकाण नव्हतं, त्यापेक्षाही बरंच अधिक असं काहीतरी होतं.
खूप आनंदी मनस्थितीत मी घराच्या चारही खोल्यातून परत परत फिरले. खरं म्हणजे या घरात अगदी गरजेच्या वस्तूंव्यतिरिक्त फारसं काही सामान आम्ही जाणूनबुजून ठेवलेलं नाहीय. घराचं फारसं काही सुशोभनही केलेलं नाही. अगदी साधसुधं असंच हे घर आहे. पण तरीही घरातून फिरताना मला एक वेगळीच अनुभूती जाणवत होती. अचानक माझ्या मनात घराबद्दल एक वेगळीच भावना दाटून आली. ही भावना होती निखळ प्रेमाची! मायेची! एक आंतरिक ओढ मला जाणवली. असं वाटलं, या घराने मला मिठीत घेतलं आहे. ही मिठी खूप आश्वासक आहे. हे घर माझं आहे. जगातली सगळय़ात सुंदर वास्तू आहे ही. मी काय याला सुंदर बनवणार? हे स्वयंभू सुंदरच आहे. हे माझं घर आहे आणि मी त्या घराची आहे. घर माझ्याशी बोलत होतं-मूकपणे! ‘शब्देविण संवादु’चा फार दुर्मिळ अनुभव मला मिळत होता.
आता काही दिवसांनी मला माझ्या मुंबईच्या घरी परत जायचं होतं. तशी आम्ही अनेक वेळा मुंबईहून इथे आणि इथून परत मुंबईला ये-जा केली आहे. पण, यावेळचं जाणं निराळं असणार आहे. आता इथून मी या दगड मातीच्या सिमेंटच्या वास्तूला कुलूप लावून जाणार नाहीय. मी माझ्या सुहृदाचा निरोप घेणार आहे. पुन्हा लवकरच येण्यासाठी. आज आयुष्याच्या उत्तरार्धात ज्या मुंबईत मी एवढी वर्ष काढली, जी मुंबई मला अतिप्रिय आहे, मुंबईबाहेर काही काळ राहिल्यानंतर मुंबईला परत जाण्याची जी एक ओढ लागते ती ओढ माझ्या मनात आहेच, पण त्याचबरोबर या माझ्या सुहृदाला, मित्राला सोडून जायचं म्हणून एक हुरहूरही दाटली आहे मनात.
आता मुंबईला परत जाताना घराची जी व्यवस्था, झाकपाक मी करते ती करताना माझ्या हातांमध्ये हळुवारपणा येणार आहे. घर बंद करताना करायचं ते एक ‘काम’ असणार नाहीय. तर एखाद्या तान्हुल्याला थंडी-वारा लागू नये म्हणून ज्या हलक्या हाताने आपण पांघरूणात गुरफटतो तसं माझ्या या मित्राला धुळीचा, कृमी-कीटकांचा त्रास होऊ नये म्हणून हलक्या हाताने पांघरूण घालून, जोजवून मी जाणार आहे. पुन्हा येण्यासाठी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2014 1:01 am

Web Title: emotional connection with your home
Next Stories
1 निसर्ग संवर्धनाचे धडे
2 ‘चांदणं गोंदणी’ वाचनीय
3 दरवळ मोगऱ्याचा !
Just Now!
X