डॉ. आशीष देशपांडे – wdr.deshpande.ashish@gmail.com

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आणि पुढे झालेल्या विकासात माणूस रोजचं जगणं सोपं करण्यासाठी एकेक पाऊल पुढे टाकत होता. त्याच वेळी अनेक प्रकारची अनिश्चितता त्याला वेढून टाकत होती. स्थैर्य प्राप्त करण्याची गरज वारंवार जाणवत होती. मूलभूत गरजांच्या पुढे जाऊन माणूस अनेक गोष्टींचे अर्थ लावू लागला, त्यांचे परस्परसंबंध समजून घेऊ लागला. मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी स्वत:च काही उपाय योजू लागला. या प्रवासाचे पुरावे जगभर इतिहासाच्या स्वरूपात सापडतात. आज आपल्या मनाला अनिश्चिततेनं ग्रासलेलं असताना या इतिहासाच्या पाऊलखुणांमधून मानवजातीचा मेंदू घडत जाण्याचे हे रंजक टप्पे..

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

मागच्या लेखात (२ जानेवारी) आपण पाहिलं, की अठरा लाख वर्षांपूर्वी उत्तर टांझानियाच्या ओल्डुवाई गॉर्ज दरीत दगडी छिन्नी सापडली. त्यानंतर २ लाख वर्षांनी तिथे सापडलेल्या दगडी कुऱ्हाडीसारख्या कुऱ्हाडी उत्तर आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये ६ लाख वर्षांनी सापडल्या. या तत्कालीन ‘स्विसनाइफ’चा वापर करत असताना माणसाच्या मेंदूत भाषेची जागा प्रगत होत गेली.

जन्म, आजार, मृत्यू, भूक या चतु:पदीपलीकडे परस्परसंबंध माणसाच्या अस्वस्थतेत हिस्सा मागू लागले. नैसर्गिक संकटं, इतर श्वापदांपासून संरक्षण नि समूहातील इतरांपासून बचाव अशा खिंडीत तो अडकला. समाजभानाव्यतिरिक्त साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून समूहात लोकांच्या ‘मनावर’ राज्य करण्याची गरज निर्माण झाली. ज्ञान, कला, शारीरिक सामथ्र्य यांचा वापर करून सत्ताकारणाची सुरुवात झाली. राजदरबारी योद्धे, ज्ञानी आणि कलाकार असण्याची सुरुवात झाली. मान, सन्मान, समूहमान्यता यातून वाढत्या वस्त्यांमध्ये समूहगट तयार झाले नि त्या समूहगटांत स्पर्धा! समूहजीवनातील भरभराटीसाठी माणसाचा आत्मशोध विविध मार्गानी सुरू झाला. त्या शोधात अपेक्षाभंगाचं दु:ख नि अपेक्षापूर्तीचा आनंदही आला. शरीरसुखाच्या आणि सुरक्षेच्या पलीकडे जाऊन माणूस मानसिक सुखांच्या शोधात फिरू लागला. मागील लेखात दगडाच्या अवजारांच्या सहाय्यानं नवीन प्रदेश गाठण्याचा माणसानं केलेला प्रयत्न आणि बोधचिन्हांचा वापर करून समूहजीवनाचे नियम बनवण्याचा त्यानं घातलेला घाट आपण पाहिला.

११००० वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी दाही दिशा भटकून अन्न गोळा करण्यापलीकडे मानवी वसाहत वाटचाल करत होती. शेती करून अन्न जमवताना माणसानं निसर्गाशी त्याचं असलेलं नातंच बदलून टाकलं. तो निसर्ग घडवू लागला! त्याच्या जगण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यानं गहू आणि जव/ सातूचं पीक काढायला सुरुवात केली, त्याचं पीठ करायला सुरुवात केली. कडधान्यं, फळं आणि मांसासाठी हरीणं आताच्या पश्चिम आशियात मुबलक होती. भटकंती सोडून माणसाला वसाहत करावीशी वाटणं साहजिकच असणार. कळपांतलं अस्थिर जीवन सोडून स्थैर्य येताच नर माणसाकडे भरपूर वेळ आला. त्या वेळाचा वापर अन्न, भूक आणि सत्ता; संभोगइच्छा आणि प्रेम अशा मूर्त-अमूर्त संकल्पना समजून घेण्यात जायला लागला. ९००० वर्षांपूर्वी आत्ताच्या बेथलेहेमजवळ (पॅलेस्टाईन) वाडी खारटौन इथं सापडलेलं

‘ऐन साख्री’ युगुलाचं शिल्प हे अशाच एका प्रयत्नाचं फळ असावं. नदीकाठच्या हाताच्या मुठीच्या आकाराच्या या दगडाला माणसाच्या नात्यांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या शिल्पात एक प्रेमी युगुल संभोगावस्थेत आहे. घट्ट मिठी, डोळ्यांत डोळे यापुरतं हे मर्यादित नाही. विविध बाजूंनी ते न्याहाळलं, तर ते लिंग, योनी, स्तनासारखं दिसतं. मानवी संभोगक्रियेतली शारीरीक आणि मानसिक उत्कटता आणि माणसाच्या कल्पनाशक्तीची भरारी या शिल्पात दिसते. या शिल्पात नर कोण आणि मादी कोण हे कळत नाही. या शिल्पात शिल्पकारानं शारीरिक उत्कटतेपेक्षा मानसिक उत्कटतेला जास्त महत्त्व द्यायचा प्रयत्न तर केला नसेल? स्टॅनफर्ड विद्यापीठाचे अध्यापक इयान हॉडर याला मनाचं ‘अहिंस्रीकरण’ (डोमेस्टिके शन ऑफ माइंड) म्हणतात. संभोगाच्या शारीरिक क्रियेला मनाच्या अहिंस्रीकरणाच्या प्रक्रियेत ‘प्रेमाचं’ वलय तर आलं नसेल? दगडाची साधनं बनवताना वाक्यं नि संवाद शिकलेला माणूस इ.स. पूर्व ९००० मध्ये अहिंस्रीकरणाच्या प्रक्रियेतून प्रेम आणि त्याबरोबर येणाऱ्या असंख्य भावना शिकत होता. कदाचित तेव्हाच लैंगिक साथीदार ‘नवरा-बायकोच्या’, ‘समूहजीवनासाठी आश्वासक’ नात्याकडे वाटचाल करत होते. मानवाच्या इतिहासात प्रथमच माणूस २००-३०० माणसांची गावं वसवत होता. जंगलापासून दूर जाता जाता ‘जंगलीपणा’पासूनही दूर जात होता.

समुद्रानं वेढलेला छोटासा देश जपान. इथे मासेमारीवर माणसं जगली. शेतीसाठी जमीन नाही, शिकारीसाठी वणवण भटकणं नाही. रत्नाकराच्या लाटांनी भरभरून मासे येत राहात नि जपानी आदिमानव त्यांच्यावर ताव मारत. मासे, फळांच्या बिया आणि दाणे यांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. शेती, शिकार त्यांच्यासाठी आवश्यकच नव्हती. १० हजार वर्षांपूर्वी जपानमध्ये मातीच्या भांडय़ाला शेक देऊन, घट्ट करून, त्याच्या बाह्य़भागावर झाडावेलींच्या बारीक फांद्यांची वेलबुट्टी केलेली ‘जोमोन’ भांडी ही मासे, बिया, दाणे वाफवायला उपयुक्त ठरली आणि जगाच्या पाठीवर पहिल्यांदा अवतरली. बाकीच्या शेतीप्रधान संस्कृतीत ती जपानपेक्षा जवळजवळ १०००-२००० र्वष उशिरानं आली. जोमोन भांडय़ांमळे जपानी आदिमानव द्रवरूप अन्न गरम करून, वाफवून खाऊ लागला. गरम करू शकणारी, द्रवपदार्थ धरू शकणारी स्वयंपाकघरातील ही भांडी पाकक्रिया, पाकपद्धती, बदलायला मदत करू लागली. या जोमोन भांडय़ांमुळे सूप, स्टय़ू आणि विविध प्रकारचे वाफवलेले मासे जपानी ताटात आले.

९००० वर्षांपूर्वी आताचं सहारा वाळवंट हिरवंगार होतं. तापमानातील बदलांनी पाण्याची कमतरता वाढली नि मानवासकट प्राण्यांना स्थलांतर करायला लागलं. स्थलांतराच्या काळात वन्यप्राण्यांपैकी गाईच पाळण्यायोग्य आणि उपयुक्त होत्या. इजिप्त म्हणताच आपल्याला फारोआ आठवतात. नाईल नदीच्या काठी चरणाऱ्या गाई माणसाच्या इतिहासाबाबत काय माहिती सांगू शकतील? जगाच्या पाठीवर माणसाच्या जगण्यावर फारोआंपेक्षा गाईंचा प्रभाव जास्त दिसतो. माणूस गाईचं दूध पितो, त्यांची मंदिरं बांधतो, काही देशांत त्यांचं मांसही खाल्लं जातं, तर दुग्धजन्य पदार्थावर काही देश चालतात. इ.स. पूर्व ३५०० च्या इजिप्तमधील अ‍ॅबिडोस नावाच्या गावात थडग्यांमध्ये चरणाऱ्या गाईगुरांची मातीची शिल्पं सापडली. थडग्यामध्ये सापडलेलं हे शिल्प इजिप्तमधील तत्कालीन प्रथेप्रमाणे मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी उपयुक्त सामुग्रीमधलं एक आहे. शाकाहारी, गवतावर जगणाऱ्या, वजन वाहू शकणाऱ्या गाई जगभर मानवी वसाहतींचा अविभाज्य घटक का बरं बनल्या असतील?

इजिप्तचे इतिहासकार फेक्री हसन यांच्या निरीक्षणात मृत गाईंच्या हाडांवरून काढलेल्या त्यांच्या मरतेवेळीच्या वयोमानाचा अंदाज असं दर्शवतो, की गाईंच्या मांसाचा वापर त्या वेळी होत नसावा. ९००० वर्षांपूर्वी इजिप्शियन मानवानं पाळलेल्या गाई आफ्रिकी उपजातीच्या होत्या. त्यांच्या शिंगांची रचना सध्याच्या आशियाई उपजातीच्या गाईंपेक्षा वेगळीच दिसते. अन्न पुरातत्त्वशास्त्रज्ञ मार्टिन जोन्स म्हणतात, ‘‘आपले पूर्वज अशा बऱ्याच गोष्टी पचवू शकत नव्हते, ज्या आपण आत्ता पचवतो.’’ गाईचं दूध हा एक असाच अन्नपदार्थ. दुसऱ्या प्रजातीचं दूध पिण्याचं उदाहरण प्राणीमात्रांत दिसत नाही. अन्नाच्या कमतरतेत केनियामधील काही भटक्या जमातींत अजूनही गाईंच्या रक्ताचा वापर प्रथिनांसाठी करतात. दूध किंवा मांसापेक्षा रक्तासाठी या आफ्रिकी गाई माणसाला जास्त उपयुक्त वाटल्या असतील का? शेतीचं नुकसान झालं की माणसाला खऱ्या अर्थानं गाईंवर विसंबून राहायला लागत असावं. म्हणूनच वाळवंटातील माणसाच्या राहाणीमानात, सामूहिक, सांस्कृतिक विश्वात आणि  कलाविश्वात गाईला वेगळंच स्थान आहे. इजिप्शियन पुराणात गायदेवता ‘बॅत’ला असलेलं महत्त्व आाणि तिथल्या राजांना दिली गेलेली ‘बुल ऑफ हिज मदर’ ही उपाधी त्या काळातल्या उपयुक्ततेला ‘देवत्व’ देण्याबद्दलच्या माणसाच्या ‘कृतज्ञते’बद्दलच काही सांगत असतील.

शिकार, अन्न गोळा करणं, अन्न पिकवणं नि शिजवणं आणि पशुपालन हा माणसाचा उदरनिर्वाहाचा प्रवास चालू असतानाच तंत्रज्ञानाचा वापर, संवादक्षमता, समाजभानाची गरज, भावना आणि भावनिक नात्यांची गरज माणसाच्या मनात रुजत होती. जीवनातली अनिश्चितता कमी करण्यासाठी या सगळ्यांचा मेळ घालणं आवश्यक होतं. अफाट मेहनतीनंतरही मिळालेलं अपयश नि काहीही मेहनत न करता मिळालेलं यश, त्याला त्याच्या आयुष्यातील अनिश्चितता कमी करणाऱ्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला सांगत होत्या आणि अनिश्चितता वाढवणाऱ्या गोष्टींबद्दल भीती घालत होत्या. या दोहोंबरोबर त्याचं असं वेगळं नातं नेणिवेत बनत गेलं. इजिप्तमध्ये गाई, ग्रीक संस्कृतीत बाकस आणि सेरा, हिंदूंमध्ये अन्नपूर्णा यांना जसं एक सात्त्विक, दैवी, श्रद्धेचं स्थान दिलेलं दिसतं, तसं स्थान द्यायची पद्धत ५००० ते १०००० वर्षांपासून जगाच्या पाठीवर माणसाच्या वसाहतींत सुरू झालेली दिसते. पश्चिम आशियात गहू-सातू, चीनमध्ये बाजरी आणि तांदूळ, पापुआ न्यू गिनीत टारो, आफ्रिकेत सोरघम आणि होंडूरासमध्ये मका यांची शेती वाढायला लागली. त्याच काळात जन्माचे, पुनर्जन्माचे, मृत्यूचे, ऋतुचक्राचे आणि अन्नाचे देव आणि त्यांच्या दंतकथा निर्माण झाल्या. बदलत्या राहाणीमानातली अनिश्चितता कमी करण्यासाठी मेहनतीबरोबरच या विश्वासाची किंवा अशा विश्वासार्ह नात्याची गरज मानवाला भासायला लागली होती. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी माणूस वेगवेगळे ‘देव’ निर्माण करायला लागला होता. अजूनही असे अनोळखी ‘देव’ अदिवासी पाडय़ांत, आफ्रिकन जमातींत, नेटिव्ह अमेरिकन गावांत दिसतात.

या सगळ्या स्थित्यंतरांत माणसाच्या शरीरात फारसा फरक पडलेला दिसत नाही, पण त्याचा मेंदू मात्र यात सदोदित सहभागी होता. या वाटचालीत तो केवळ मूक पांथस्थ नव्हता. माणसाच्या निसर्गसमूहाच्या नात्यात तो घडत होता नि घडवतही होता. सर्जनशीलता, मोजका धोका पत्करण्याची निकड, नवीन शिकण्याचा खटाटोप, कलासक्ती, संवादकौशल्य आणि परस्परसंबंध यांचा मेळ घालत अनिश्चितता कमी करण्याचा प्रयत्न शिकत होता. स्वास्थ्यासाठी आहार, आसन, मुद्रा, क्रिया नि निद्रा यांचं महत्त्व तो शिकलाच, पण विचार नि विहारही तो जाणून घेत होता. अनिश्चितता कमी करण्यासाठी जीवनशैलीतील या शिस्तीची व्यक्तिगत गरज, मेंदूतील पेशींच्या रचना, त्यांचे कोश आणि त्यांची कार्यपद्धती मेंदूची जैविक गरज बनत होत्या.

जनुकांवर बेतलेली मेंदूची रचना (न्युरोनल सर्किट्स) नि कार्यप्रवणता (न्युरोनल पोटेन्शियल) बहरण्यासाठी सर्जनशीलता (क्रिएटिव्हटी), मोजका धोका पत्करण्याची निकड (रिस्क टेकिंग), नवीन शिकण्याचा खटाटोप (न्यू लर्निग), कलासक्ती (हॉबीज/ लिटरेचर/ आर्ट्स), संवादकौशल्य नि परस्परसंबंध (सोशल स्किल्स अँड इंटरपर्सनल रिलेशनशिप्स), आहार नियमन (डाएट), व्यायाम (एक्सरसाइज) आणि अनंत हस्ते देणाऱ्या निसर्गाबद्दल कृतज्ञाभाव नि श्रद्धा (नीड फॉर द ‘सेक्रे ड’ इन लाइफ) आणि या सगळ्या गोष्टींची सतत जाण राहावी, समतोल राहावा यासाठी ध्यानधारणा/ चिंतन (मेडिटेशन) अशी ती जैविक गरज घडत गेली.

जगात कशाचीच शाश्वती नाही. वुहानमधून निसटलेला एक पिटुकला प्रथिनकण अख्ख्या जगाला दीड-दोन वर्षांपर्यंत जेरबंद करेल असं कोणाला वाटलं होतं? हा ‘करोना’ किंवा अशासारखे कोणतेही आपल्या आयुष्यातले कठीण प्रसंग जी अनिश्चितता निर्माण करतात त्यानं चिंता/ काळजी/ बेचैनी वाटणं स्वाभाविकच आहे. त्यावर मात करण्यासाठी मेंदुमनाच्या गरजांची जाण राखणं आवश्यक नाही का? मग हा ‘करोना’ आपल्याला काय शिकवणार?