News Flash

सायक्रोस्कोप : निरोप घेताना

‘सायक्रोस्कोप’ म्हणजे आपले विचार, भावना आणि वर्तन यांची सूक्ष्मातून पाहणी करणारा अदृश्य सूक्ष्मदर्शक.

आज हे सदर संपताना ‘सायक्रोस्कोप’च्याच एका लेखात वर्णन केलेली ‘निरोगी विलगता’ प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.

डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

‘सायक्रोस्कोप’ म्हणजे आपले विचार, भावना आणि वर्तन यांची सूक्ष्मातून पाहणी करणारा अदृश्य सूक्ष्मदर्शक. अशी पाहणी करण्याची सवय जडवून घेतली तर आपल्या अनेक मानसिक घडामोडी आपण बारकाव्यानिशी पाहू शकतो. ‘सायक्रोस्कोप’च्या अनेक वाचकांनी हे अमलात आणल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसत होतं. अनेक लोक त्यांच्या रोजच्या जगण्यात हे टप्पे पडताळून पाहात होते. त्यांच्यात झालेला बदल कळवतही होते. आज हे सदर संपताना ‘सायक्रोस्कोप’च्याच एका लेखात वर्णन केलेली ‘निरोगी विलगता’ प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.

प्रिय वाचकहो,

गेले वर्षभर चालू असलेल्या ‘सायक्रोस्कोप’ या सदराचा निरोप घेण्याची वेळ आज आली आहे. वर्षभराच्या या प्रवासात तुमच्यात आणि माझ्यात एक अदृश्य नातं निर्माण झालं आहे. प्रत्येक लेख प्रकाशित झाल्यावर तुम्ही माझ्याशी आवर्जून संवाद साधत होतात. हा संवाद माझ्यासाठी किती बहुमोल होता हे आज मला आपल्याला सांगायचं आहे. आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये तुम्ही काय करावं हे मी मांडत होते. आज मात्र तुम्ही मला ‘सायक्रोस्कोप’मधून काय दिलं हे मांडावंसं वाटतंय.

या लेखमालेला सुरुवात केली तेव्हा काही निश्चित उद्दिष्टं माझ्यासमोर होती. दैनंदिन जीवनात आपल्या सगळ्यांनाच अशा काही प्रश्नांशी सामना करावा लागतो की जेव्हा मानसिक आरोग्याची कसोटी लागते. हे प्रश्न सक्षमतेनं हाताळण्यासाठी मानसशास्त्राची कशी मदत होऊ शकते हे दाखवून देणं हे प्रमुख उद्दिष्ट ही लेखमाला लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर होतं. ही मदत केवळ सद्धांतिक स्वरूपाची नसून उपयोजित असली पाहिजे असंही तीव्रतेनं वाटत होतं. म्हणजेच फक्त प्रश्न न मांडता ते कसे सोडवावेत याचे काही मार्ग किंवा अंतर्दृष्टी आपल्याला मिळाली तर त्याचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करता येईल, असा दृष्टिकोन यामागे होता. थोडक्यात, आपण मानसिक स्वावलंबन शिकलो तर सुयोग्य आत्मव्यवस्थापन करू शकतो. त्यास हातभार लावण्याचा उद्देश या लेखमालेमागे होता.

‘सायक्रोस्कोप’ हे सदराचं नाव याच उद्देशानं निवडलं होतं. ‘सायक्रोस्कोप’ म्हणजे आपले विचार, भावना आणि वर्तन यांची सूक्ष्मातून पाहणी करणारा मनाचा अदृश्य सूक्ष्मदर्शक. त्यातून पाहणी करण्याची सवय जडवून घेतली तर आपल्या अनेक मानसिक घडामोडी आपण बारकाव्यानिशी पाहू शकतो. अंतर्मुख होऊन विचारप्रवृत्त होऊ शकतो. विकासाच्या वाटेवर वाटचाल करू शकतो. ही वाटचाल सुकर करणं हाही व्यापक उद्देश जोडीला होता.

हे उद्देश कितपत साध्य होत आहेत हे कळण्याचा मार्ग म्हणजे तुमचा प्रतिसाद. ‘सायक्रोस्कोप’च्या पहिल्या लेखापासूनच तुम्ही या सदराला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमच्यापकी अनेकजण या लेखांचा तुमच्या प्रत्यक्ष जीवनात कसा उपयोग होत आहे हे मला कळवत होते. त्यामुळे लेखांचं उपयोजन पडताळून पाहण्याची संधी तुम्ही मला उपलब्ध करून देत होतात. मी मांडत असलेले प्रश्न कालसुसंगत किंवा प्रातिनिधिक आहेत का, याचंही अवलोकन त्यामुळे मला करता येत होतं. आपल्यापकी काही जणांनी अशीही विनंती केली की आमचे अमुक अमुक प्रश्न आहेत, तेही तुम्ही लेखांतून मांडा. एकटय़ा राहाणाऱ्या स्त्रियांच्या मानसिकतेपासून ते स्वामित्वभावनेच्या मानसशास्त्रापर्यंत अनेक विषय तुम्ही सुचवलेत. अर्थात लेखमालेतील लेखांना शब्दसंख्येचं बंधन असल्यामुळे आपण सुचवलेल्या सर्व विषयांना मला सामावून घेता आलं नाही. तरीही बऱ्याच जणांना जवळचे वाटू शकतील असे प्रातिनिधिक विषय निवडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.

समाधानाची एक बाब म्हणजे आपल्यापकी काहीजण नुसताच लेख चांगला आहे किंवा आवडला अशा प्रतिक्रियांवर न थांबता त्याबाबत ठोस कृती करत होते. पाच मिनिटांचं तंत्र किंवा लाल फुलीचं तंत्र अशी लेखांमधली काही तंत्रं प्रत्यक्ष जीवनात अवलंबात आणून स्वत:त झालेला बदल मला कळवत होते. एका वाचकांनी ‘कृतज्ञतेची रोजनिशी’ वाचून अशी रोजनिशी लिहून त्यावरचं पुस्तक प्रसिद्ध केलं. हे सदर लिहिताना जो व्यापक उद्देश मनात होता तो साध्य होत असल्याचं साफल्य मला तुमच्या अशा प्रतिक्रियांमुळे मिळालं.

तुम्ही लेखातल्या विषयाची सखोल चिकित्सा करत होतात. त्यावर वैचारिक मंथन करत होतात. तुमच्या अनेक प्रतिक्रियांतून ते माझ्यापर्यंत पोहोचत होतं. परिपूर्णतेच्या हट्टाचे दूरगामी परिणाम तपासणारी प्रतिक्रिया तुम्ही मला पाठवलीत, ‘निरोगी विलगते’च्या वैयक्तिक आणि सामाजिक पलूंवर विचारमंथन करून तुमची मतं मला कळवलीत, सुखनिवासाचा सांस्कृतिक परिणाम अभ्यासून तुम्ही तो माझ्यापर्यंत पोहोचवलात. तुमच्या अशा प्रतिक्रियांमुळे मी मांडलेल्या विषयांची व्यापक परिमाणं माझ्यासमोर उलगडली जात होती.

तुम्ही मला अनेक प्रश्नही विचारत होतात. त्यातील काही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी होते, काही मी लेखात मांडलेल्या तंत्रांच्या अंमलबजावणीसंबंधी होते, तर काही शंकानिरसनासाठी होते. त्या प्रश्नांतून मला कळत होतं की तुम्ही लेख वाचून सोडून देत नाही तर त्यावर अंतर्मुख होऊन विचार करत आहात. त्यावर चिंतन-मनन करत आहात. तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ई-मेलवरून देता येणं मला शक्य झालं नाही तरी त्यांची मी दखल घेतली हे निश्चित. तुमच्या प्रतिक्रियांमुळे मला तुमच्या मनात डोकावण्याची आणि त्यावर चिंतन करण्याची संधी मिळाली. अशा स्वरूपाची वैचारिक देवाणघेवाणही लेखकाला समृद्ध करत असते. ही समृद्धी मला तुमच्यामुळे अनुभवायला मिळाली.

वाचक जितके चोखंदळ तेवढा लेखक समृद्ध होतो, याची प्रचीती मला ‘सायक्रोस्कोप’नं दिली. मी इंग्रजी वृत्तमाध्यमांतही लिहिलं आहे. पण तिथं फार क्वचितच मला वाचकांच्या चोखंदळ प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. चोखंदळ वाचक हा मराठी वाचकांचा, विशेषत: ‘चतुरंग’च्या वाचकांचा विशेष असावा असं मला वाटतं. मी अमुक एक वाक्य का लिहिलं आहे, त्याचा काही वेगळा अर्थ होईल का, मी विशिष्ट वाक्यरचना का केली, इथपासून ते एखादा विशिष्ट शब्द योजण्यामागचं तुमचं प्रयोजन काय आहे, असे प्रश्न विचारणाऱ्या प्रतिक्रिया तुम्ही पाठवत होतात. उदाहरणार्थ ‘एम्पथी’ला ‘समानुभूती’ हा शब्द असताना मी ‘सह-अनुभूती’ हा शब्द का वापरला आहे, अशीही विचारणा झाली. समानुभूती म्हणजे समान अनुभव. पण सहअनुभूती म्हणजे तो अनुभव बरोबरीनं किंवा समवेत घेणं. हा अर्थ मूळ अर्थाच्या जास्त जवळ जाणारा आहे असं वाटल्यामुळं मी तो वापरला आहे, हे स्पष्टीकरण मी दिलं. पण तुम्ही विचारत असलेल्या प्रत्येक प्रश्नामुळे माझी जबाबदारी वाढत होती. तुम्ही लेख बारकाईनं वाचत आहात याची जाणीव होत होती. लिहिलेल्या वाक्यांचे किंवा शब्दांचे काय काय अर्थ होऊ शकतात, याचा विचार करण्याची आणि प्रत्येक वाक्यरचना पारखून वापरण्याची सवय तुम्ही मला लावलीत.

‘सुखनिवास’ या शब्दाविषयीही अनेक प्रतिक्रिया तुम्ही मला पाठवल्यात. काही प्रतिशब्दही सुचवलेत. आपल्या या प्रतिक्रिया मला सुखावणाऱ्या होत्या. कारण मला लक्षात आलं, की आपल्यामध्ये एक समान दुवा आहे. तो म्हणजे मराठी भाषेवरचं प्रेम. तुमच्या प्रतिक्रिया याच प्रेमापोटी निपजलेल्या होत्या. आपण भाषेचं शब्दभांडार जेवढं वाढवू तेवढी भाषा समृद्ध होते असं मी मानते. त्यामुळे अवजड नसणारे पण नवीन मराठी प्रतिशब्द जर इंग्रजी शब्दांना वापरले तर परक्या भाषेवरचं अवलंबित्व कमी होतं असं मला वाटतं. मी लेखांत वापरलेले अनेक प्रतिशब्द या विचारातून प्रसवले होते. अर्थात मी भाषातज्ज्ञ नाही. मी वापरलेले शब्द अचूक आहेत असाही माझा दावा नाही. पण त्या निमित्तानं शब्दांचे अनेक कंगोरे मला तुमच्याकडून कळले आणि माझ्या आणि तुमच्यातला भाषाप्रेमाचा दुवा अधिक घट्ट झाला.

‘सायक्रोस्कोप’मधल्या बहुतेक लेखांच्या सुरुवातीला एक किंवा दोन पात्रं घेऊन त्यांच्या मानसिकतेद्वारे मी विषयाला सूतोवाच करत होते. या पात्रांच्या वागण्यासंबंधीही तुम्ही मला बऱ्याच प्रतिक्रिया पाठवल्यात. ‘तुम्ही माझंच तंतोतंत वर्णन केलं आहे’ इथपासून ते ‘अमुक एक पात्र असं का वागलं?’ किंवा त्यांनी ‘कसं वागायला पाहिजे होतं’ अशा कळकळीच्या सूचनाही पाठवल्यात. मी लेखात वर्णन केलेली पात्रं ही काल्पनिक आहेत. प्रत्यक्षातल्या कुठल्याही  व्यक्तीवरून ती उचललेली नाहीत. माझ्या निरीक्षणातून, अनुभवातून, मननातून निर्माण झालेली ती पात्रं आहेत. पण तुमचं त्या पात्रांमधलं गुंतणं पाहून मला कार्ल रॉजर्स या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाच्या उक्तीची प्रचीती आली. ती म्हणजे, ‘जे आपल्याला फक्त आपलं खासगी आहे असं वाटत असतं नेमकं तेच सार्वत्रिक असतं.’ आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा कुठला ना कुठला भाग इतर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वातही डोकावत असतो, फक्त तो शोधता आला पाहिजे. तो शोधायला ‘सायक्रोस्कोप’नं मदत केली.

‘सायक्रोस्कोप’चा प्रवास हा सरळरेषीय नव्हता. त्यात अनेक वळणं आली. सगळ्यात अवघड  वळण म्हणजे मार्चपासून सुरू झालेला ‘करोना’काळ आणि त्यातून आलेली टाळेबंदी. या काळात आपल्या सगळ्यांनाच अनेक बदलांना सामोरं जावं लागलं. कितीतरी महिने वर्तमानपत्र प्रत्यक्ष उपलब्ध नव्हतं. तो काळ असा होता की उद्या काय घडेल याचा भरवसा नव्हता. आधी ठरवलेले विषय बदलून तत्कालीन परिस्थितीशी सुसंगत अशा लेखांचा समावेश ‘सायक्रोस्कोप’मध्ये करावा लागला. अर्थात तुम्ही या काळातही साथ दिलीत. ‘चतुरंग’ ऑनलाइन वाचून तुम्ही प्रतिसाद पाठवत होतात. अर्थात ‘करोना’चं सावट अजूनही गेलेलं नाही. या काळानं प्रत्यक्षातल्या अनेक गोष्टींची जागा आभासी जगातील गोष्टींनी घेण्याची सवय आपल्याला लावली आहे.  समाजमाध्यमांवरच्या झटपट प्रतिक्रियांना ऊत आला आहे. असं असतानाही वर्तमानपत्रं वाचणारे आणि त्यातील लेख गंभीरपणे घेणारे वाचकही अनेक आहेत, याची सुखद जाणीव तुम्ही मला करून दिलीत. माझ्या ‘कृतज्ञतेची रोजनिशी’ या लेखात मांडल्याप्रमाणं कृतज्ञतेच्या माझ्या यादीत आता तुमचीही भर पडली आहे.

लिखाणाची एक धुंदी असते. मग ते वैचारिक असो, नाहीतर ललित. पुस्तक असो, नाहीतर वर्तमानपत्रीय लिखाण. जे आत झिरपलेलं असतं ते अभिव्यक्त होण्यासाठी धडपडत असतं. ते मनात घोळत असतं, त्यावर चिंतन चालू असतं. ते कागदावर उतरेपर्यंत आपण त्यात डुंबत राहतो. त्यात ताण असतो, पण ते क्षण सुंदर असतात, साफल्याचे असतात. ते परत परत अनुभवावेसे वाटतात. गेलं वर्षभर या क्षणांचा नियमित आस्वाद घेण्याची सवय लागली होती. ते आता तसे अनुभवता येणार नाहीत म्हणून जड वाटतंय. निरोपाचे क्षण जवळ आल्याची जाणीव होतेय. हे क्षण नेहमीच अवघड असतात, पण विलग होणं अपरिहार्य असतं. माझ्याच एका लेखात वर्णन केलेली ‘निरोगी विलगता’ प्रत्यक्ष अमलात आणण्याची संधी आज मला मिळत आहे. उद्यापासून माझ्या भूमिकेत बदल होईल. लेखक या भूमिकेतून आपल्यासारखीच ‘चतुरंग’च्या वाचकांच्या भूमिकेत मी शिरेन. या भूमिकेचे अनेक आयाम तुम्ही उलगडून दाखवले आहेतच. ते माझ्या पुढील वाटचालीतही उपयोगी पडतील. आपल्या सर्वाचे मन:पूर्वक आभार आणि आपणास आणि आपल्या कुटुंबीयांस नववर्षांच्या शुभेच्छा.

(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 1:02 am

Web Title: emotions and behavior psychroscope dd70
Next Stories
1 चतुरंग २०२१
2 जगाचं कुतूहल असलेली मी एक माणूस
3 स्त्रीतल्या असामान्यत्वाचा कौतुक सोहळा
Just Now!
X