जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्धय़ांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं. आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर ती नक्कीच वाढवता येते. ज्यावेळेस पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या भावना ओळखता येतील त्यावेळेस आपण मुलांच्याही भावना ओळखू शकू. एवढंच नाही तर त्यांना भविष्यात भावनाप्रज्ञ करू शकू.
‘क सली भीती? त्यात काय आहे घाबरण्यासारखं?’
‘शिव्या द्यायला शिकलाय आजकाल? चिडतो किती? चार रट्टे मारा म्हणजे येईल सरळ. ’
‘रडते कसली गं सारखी? काही झालं की रडायचं, रडायचं. बास कर आता ते.’
  मुलं घाबरत असली, चिडली किंवा रडली की त्यांना सर्वसाधारणपणे या अशा प्रतिक्रिया दिल्या जातात. यातून नकळतपणे आपण त्यांच्या भावना दडपत असतो. त्यांना भावना दडपायला शिकवत असतो. मात्र भावना दडपण्याऐवजी त्यांना ओळखलं पाहिजे. अशा वागण्यामागचं मूळ कारण शोधलं पाहिजे. भावना व्यक्त करायच्या असतातच, त्या नाही केल्या, दडपवल्या तर त्याचा मनावरच नाही तर शरीरावरही वाईट परिणाम होतो. म्हणून भावना योग्य पद्धतीने मोकळ्या करणंही तितकंच आवश्यक!
मुलांच्या भावनांना हात घालण्याआधी आपल्याला स्वत:त डोकावून बघता आलं पाहिजे. आपण स्वत:ला कितपत ओळखतो? आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारलं आहे का? आपल्या  भावना आपल्याला ओळखता येतात का? त्या योग्य पद्धतीने व्यक्त करता येतात का? एखादी चमत्कारिक किंवा अनपेक्षित परिस्थिती उभी राहिली तर आपण गडबडून, गोंधळून जातो की त्यातून शांतपणाने वाट काढतो? आपली स्वत:ची -मग ती छोटी असोत किंवा मोठी – ध्येयं ठरवलेली आहेत का? आपल्याला राग आला म्हणून आपण तो व्यक्त करतो, पण त्याचे परिणाम काय होतील याचा जरासा विचार आपण करतो का?
वर दिलेले प्रश्न आपल्याला स्वत:मध्ये डोकवायला लावताहेत. आपण असे प्रश्न स्वगतासारखे मनाशी बोलत असतो. पण स्वत:पुरता सोयीस्कर अर्थ लावून कधी मोकळेही होतो. ‘मी चांगली व्यक्ती आहे, माझा चांगलंच वागण्याचा प्रयत्न असतो. समोरची व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने वागत नाही,’ असं आपण मनाशीच ठरवतो आणि विषय सोडून देतो, पण हे विषय सोडून न देता त्याच्या नीट पाठीमागे लागलो, यांची प्रामाणिक उत्तरं शोधू शकलो, तर ती भावनाप्रज्ञ होण्यातली पहिली पायरी असेल.
आपल्या भावना योग्य पद्धतीने १) जाणणारा आणि २) योग्य पद्धतीने व्यक्त करणारा माणूस हा भावनाप्रज्ञ असू शकतो, असं आपण म्हणू.
भावनाप्रज्ञ नसलेली व्यक्ती नेहमीच काय उद्गार काढत असेल.
– मला तसं म्हणायचं नव्हतं.
– मला जरा जास्तच बोलायची सवय आहे.
– मला काय बोलायचं असतं हेच मला कधी कधी कळत नाही.
हे आणि असं बरंच काही! आपण भावनिकदृष्टय़ा समर्थ आहोत की नाहीत, हे यावरून समजतं. भावनांच्या संदर्भात आपल्याकडे बरंच काही सांगितलं गेलंय, लिहून आलेलं आहे. त्यातलं नेहमी आठवणारं आणि सहज सोपं वाटणारं विनोबांचं वाक्य म्हणजे -प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झडोनिया। प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे।
यातून खरं म्हणजे सुखी- समाधानी जीवनाचं सारच सांगितलं आहे. एकुणात माणसाचा संबंध जिथे येतो, तिथे भावना पोचतात आणि त्यांचा विचारही करावा लागतो.
नव्या संशोधनाने यावर बराच प्रकाश टाकला आहे. या संदर्भात मेंदूच्या कार्यपद्धतीचा विचार केला तर असं दिसतं, की मेंदूत आपल्या भावनांना एक वेगळी जागा दिलेली आहे. ही जागा म्हणजेच िलबिक सिस्टीम. आनंद, भीती, दु:ख, प्रेम अशा वेगवेगळ्या छटा इथे निर्माण होतात. बाहेरची परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल झाली की त्यानुसार आपोआप भावना निर्माण होतात. कधी मनातूनही भाव निर्माण होत असतात. भावना निर्माण झाल्या की त्या व्यक्त करण्यासाठी या सिस्टीमकडे शरीर रक्तपुरवठा करतं. म्हणजे समजा, अचानक आपली आवडती मत्रीण दिसली की, आपण हसतो, हात हातात घेतो. आपल्याला आनंद होतो. अशा क्रिया करण्यासाठी रक्तपुरवठा त्या अवयवाकडेच असावा लागतो.
या उलट आपल्याला दु:ख झालं की आपल्या डोळ्यात पाणी येतं. निराशा दाटून येते. जिथे आहोत तिथून दूर निघून जाण्याचा आपण प्रयत्न करतो. यासाठी सुद्धा रक्तपुरवठा िलबिक सिस्टीमकडेच असावा लागतो.
भावना या बऱ्याचदा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात. पण त्यांचं नियमन आपल्या मनाकडे घ्यावं. यावर एक महत्त्वाचं संशोधन डॅनिअल गोलमन यांनी केलं आहे. त्यांनी अभ्यासलेल्या केसेसमधून जे हाती आलं त्यातून त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. हा विषय नीट समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात गोलमन म्हणतात की,
 – माणूस हा भावनांच्या भरात काहीही करू शकतो. बुद्धिमान समजल्या गेलेल्या माणसांच्या हातूनही भावनिक चुका होतात.
– अशा चुका यशाचं रूपांतर अपयशात करू शकतात.
– म्हणून आपल्या भावना हुशारीने, बुद्धीच्या साहाय्याने हाताळल्या पाहिजेत.
– आपल्याला हव्या त्या पद्धतीने भावनांचे नियमन करता येते. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण ते जमू शकतं.
गोलमन यांच्या मते योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्टय़ा समर्थ करता येते. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते. म्हणून ते म्हणतात, केवळ बुद्धय़ांकाला काहीच महत्त्व नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्धय़ांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं.
आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची असेल तर ती नक्कीच वाढवता येते. ज्यावेळेस पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या भावना ओळखता येतील त्यावेळेस आपण मुलांच्याही भावना ओळखू शकू. एवढंच नाही तर त्यांना भविष्यात भावनाप्रज्ञ करू शकू.
यासाठी आपल्याला आधी ‘स्वत:ला ओळखणं’ ही गोष्ट करावी लागेल. त्यासाठी स्वत:ची मुलाखत स्वत:च घ्यावी आणि ती लिहून काढावी. काय आवडतं, काय आवडत नाही, आनंदी कधी वाटते, अशा स्वरूपाचे प्रश्न त्यात असावेत. लिहून झाल्यावर चार आठ  दिवसांनी आपलीच मुलाखत वाचा. कदाचित स्वत:ला ओळखू शकू.
यानंतरची पायरी आहे –
‘ स्वत:च्या भावभावना योग्य त्या पद्धतीने नियंत्रित करता येणे.’
‘मला खूप भीती वाटली म्हणून मी नराश्यात बुडून जायचे का?’, ‘मला संताप वाटला की मी दुसऱ्याचा अजिबात विचार न करता माझ्या भावना त्याच्यावर फेकते का?’, अशा प्रश्नांची उत्तरे मिळाली तर आपल्या भावनांकडे त्रयस्थ व्यक्ती म्हणून पाहता येईल.
स्वत:ला काही अंशी तरी ओळखलंय असे वाटले तर आपण इतरांच्या भावना जाणून घेऊ शकतो. निदान तशी शक्यता तरी वाढते. म्हणूनच ‘आसपासच्या माणसांना ओळखता येणे, त्यांचे स्वभाव जाणून घेता येणं.’ ही तिसरी पायरी आहे.
तर चौथी पायरी आहे – ‘आसपासच्या माणसांशी योग्य पद्धतीने व्यवहार करता येणं.’ हे सर्वात महत्त्वाचं. हे साधण्यासाठी पहिल्या तीन पायऱ्यांमधून जाणं आवश्यक. यातली प्रत्येक पायरी म्हणूनच महत्त्वाची आहे.
   मोठय़ा माणसांच्या भावना त्यांना बऱ्याच अंशी नियंत्रित करता येतात, पण लहान मुलांचे तसे नसते. त्यांच्या भावना मोकळ्या असतात. त्यांना राग आला तर ते रागावतात. त्यांना हसू आलं तर ते हसून मोकळे होतात. आणि आनंद वाटला तर तो नाचून व्यक्त करतात. पण ताण, अस्वस्थता अशा गोष्टींचं काय करायचं हे त्यांना समजत नाही. मित्राशी किंवा मत्रिणीशी भांडून घरी आलेलं मूल नुसतच धुमसेल. पण त्यांना आपल्या भावना ओळखता येणार नाहीत. राग थोडा शांत झाल्यावर अशा पद्धतीने गप्पा मारायला हव्यात.  
– नक्की कोणाचा राग आला आहे? त्यांचा की स्वत:चा?
– भांडताना किंवा भांडून निघून येताना कोणाचा राग आला होता?
– तीच रागाची तीव्रता अजूनही आहे का?
– वर निघून येण्यामुळे खेळापासून दूर कोण राहिलंय? म्हणजे नुकसान नक्की कोणाचं झालंय?
अशा प्रश्नांच्या खोलात शिरून सोडून दिलं तर मूल कदाचित स्वत:चा विचार करून त्यातून काहीतरी शिकेल. त्याच्या सर्व भावना मान्य करणं महत्त्वाचं आहे.
लेखाच्या सुरुवातीला दिलेली आपलीच वाक्यं फिरवून या प्रकारे म्हणता येतील का?
 ‘भीती वाटते आहे? ठीक आहे. भीती वाटू शकते. त्यातून बाहेर कसं येऊ या, सांग.’
‘राग आलाय. शिव्या द्याव्याशा वाटताहेत. ठीक आहे. खोलीत बस आणि भरपूर शिव्या देऊन मोकळा हो.’
‘ताण आलाय. रडू येतंय. कुणाशी तरी बोल. मोकळेपणाने बोल.’
असं आपण बोलू तेव्हा कदाचित भावनाप्रज्ञ होण्याची त्यांची पहिली पायरी असेल.
drshrutipanse@gmail.com

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….