महापुरुषांना विरोधकांशी, शत्रूंशी संघर्ष करावा लागला, पण इतिहासात अजरामर झाले ते त्यांचेच नाव. मागे राहिले ते त्यांचेच अनेक पिढय़ांना उपकारक ठरेल असे काम ! त्यांच्या विरोधकांचे आणि शत्रूंचे नामोनिशाणही राहिले नाही.
या जगात अजातशत्रू माणूस सापडणे फारच विरळा. दोन प्रकारच्या शत्रूंशी लढत प्रत्येक माणसाला आपली जीवनवाट चोखाळावी लागते. पहिल्या प्रकारात मोडणारे शत्रू माणसाच्या अंतरंगात आणि मनातच असतात. काम, क्रोध, मद, लोभ, मोह आणि मत्सर हे विकार शत्रूंचीच भूमिका बजावत असतात. हे शत्रू प्रभावी झाले की माणसाचे जीवन एका वेगळ्या वळणावर येऊन उभे रहाते. आपल्यातला विवेक जागता ठेवून मार्गक्रमण करीत राहणे हाच या शत्रूंना नामोहरम करण्याचा एकमेव मार्ग असतो.
दुसऱ्या प्रकारात मोडणारे शत्रू माणसाच्या बाह्य़जीवनात त्याच्यासमोर आव्हाने उभी करीत असतात. या प्रकारात मोडणारे शत्रू अनेक कारणांमुळे निर्माण होत असतात.
*  समोरच्या व्यक्तीची पात्रता, गुणवत्ता आणि उत्कर्ष सहन न झाल्यामुळे निर्माण होणारे शत्रू.
*  वैयक्तिक आकसापोटी निर्माण होणारे शत्रू.
*  गरसमजामुळे निर्माण होणारे शत्रू.
*  हितसंबंध दुखावल्यामुळे निर्माण होणारे शत्रू.       
*  अकारण शत्रुत्व घेण्याची मानसिकता असल्यामुळे निर्माण होणारे शत्रू.
*  हितशत्रू.
या पाचही प्रकारांत पहिल्या प्रकारच्या शत्रूंची संख्या अधिक असते. या प्रकारचे गुप्त शत्रू ज्यांच्या वाटय़ाला येतात त्यांनी अजिबात निराश होऊ नये किंवा शत्रूंच्या कारवायांनी खचून जाऊ नये. कारण आपण मोठे होत असल्याची ती खूण असते. आपण योग्य मार्गाने जात आहोत याचा तो संकेत असतो. या प्रकारचे शत्रू मित्रत्वाने वागत असतात. पण त्यांच्या अंतरंगात द्वेषाचा आणि मत्सराचा अग्नी प्रज्वलित झालेला असतो. माणसामाणसातल्या स्पध्रेतून या प्रकारचे शत्रू जन्माला येत असतात. दुसऱ्यांच्या चांगल्या गुणांचे मुक्तकंठाने कौतुक करण्याची किंवा व्यक्तीच्या ठायी असणाऱ्या गुणवत्तेचा सन्मान करण्याची ज्यांची मानसिकता नसते अशी कोत्या मनोवृत्तीची माणसे अकारण गुणी आणि यशस्वी माणसांचा द्वेष करीत असतात. चांगले काम करणाऱ्या माणसांना ते करता येऊ नये यासाठी आव्हानांच्या आणि संकटांच्या मालिका त्यांच्या मार्गात उभ्या करीत असतात. पूर्वीच्या काळी म्हटले जात असे – ‘जो दु:खात सहभागी होतो तोच खरा मित्र’ ही व्याख्या बदलून ‘जो तुमच्या यशात आणि आनंदात सहभागी होतो तोच खरा मित्र’ अशी व्याख्या आज करावी लागते की काय ? इतकी परिस्थिती या स्पध्रेच्या युगात बदलली आहे.
या जगात जी माणसे मोठी झाली, यशस्वी झाली, लोकमान्यतेच्या शिखरावर पोहोचली त्यांना या प्रकारच्या शत्रूंचा खूप त्रास झाला. पण या शत्रूंमुळेच त्यांचे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व झळाळून निघाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, येशू ख्रिस्त यांच्यासारख्या संत महात्म्यांनाही शत्रूंनी सोडले नाही. पण या शत्रूंमुळेच त्यांचे ‘संतपण’ अधिक उजळले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात उभे ठाकलेल्या लोकांपकी परकीयांबरोबर अनेकजण त्यांच्या जवळचे होते, आप्त होते. महाराजांचा पराक्रम आणि मोठेपण त्यांना सहन होणारे नव्हते. महाराज त्यांना पुरून उरले. या सर्व शत्रूंना नेस्तनाबूत करीत त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. पराक्रमी माणसांची मोठी शक्ती शत्रूंच्या विरोधात लढण्यास जात असली तरी त्यांच्याच कार्याची नाममुद्रा कालपटलावर उमटते. यशस्वी माणसांची आणि महापुरुषांची लोकप्रियता आणि मोठेपण अनेक संकटांनी आणि दु:खांनी व्यापलेले असते. महापुरुषांचे चारित्र्यहनन, बदनामी आणि अपमान हा शत्रूच्या रूपातील दुर्जनांचा आवडता खेळ असतो. लोकमान्य टिळकही यातून सुटले नाहीत. अनेक तापदायक प्रकरणे त्यांची सत्त्वपरीक्षा घेऊन काळाच्या पडद्याआड गेली. सुधारकांचे अग्रणी असलेल्या गोपाळ गणेश आगरकरांच्या हयातीत त्यांचीच अंत्ययात्रा निघाल्याचे त्यांना त्यांच्या डोळ्यांनी पहावे लागले. निर्भय सत्यशोधक असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांचा मार्गही निष्कंटक नव्हता. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांवर शाळेत जाताना चिखलफेक करणारी आणि त्यांची िनदानालस्ती करणारी मंडळी काही संख्येने कमी नव्हती. विद्य्ोविषयी अपार आणि अव्यभिचारी जीवननिष्ठा असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास तर खाचखळग्यांनीच भरलेला होता. दलिताचा मुलगा म्हणून केस कापण्यास नकार देणारा नाभिक, भाडय़ाची गाडी नाकारणारा आणि गाडीचा विटाळ होईल म्हणून पायी चालणारा निरक्षर गाडीवान त्यांनी पाहिला होता. सुटणारे गणित फळ्यावर सोडविण्यासाठी निघालेल्या आंबेडकरांच्या मुलामुळे फळ्यामागचे आपले डबे विटाळतील या कल्पनेने विद्यार्थ्यांनी केलेला कल्लोळ त्यांनी पाहिला होता. उच्चविद्याविभूषित असतानाही बडोद्याला नोकरी करीत असताना नाउमेद करणाऱ्या घटनांनी अनेकदा त्यांचे काळीज करपून टाकले होते. मातृत्वाचा गौरव करण्याचा व्यापक धर्म शिकविणाऱ्या धोंडो केशव कव्र्याना धर्ममार्तण्डांनी दिलेला त्रासही भयावह होता.
दुरितांच्या तिमिरात दडलेली खळांची व्यंकटी ज्ञानदेवांच्या पसायदानाने तरी लोप पावली का? या सगळ्या महापुरुषांना विरोधकांशी, शत्रूंशी संघर्ष करावा लागला. पण इतिहासात अजरामर झाले ते त्यांचेच नाव. मागे राहिले ते त्यांचेच अनेक पिढय़ांना उपकारक ठरेल असे काम! त्यांच्या विरोधकांचे आणि शत्रूंचे नामोनिशाणही राहिले नाही. या थोर माणसांना विरोधकांकडून झालेला त्रास, त्यांनी पचविलेले अपमान पाहिल्यानंतर आपल्या छोटय़ाशा जीवनातील छोटय़ा शत्रूंकडून झालेल्या त्रासाला आपण किती कुरवाळत बसतो हे जाणवते. त्यांनी केलेल्या अपमानाला, बदनामीला अकारण किती महत्त्व देतो हे पटते. शेवटी ‘आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात’ हे संस्कृतीने सांगितलेले त्रिकालाबाधित सत्य आहे. ते स्वीकारले की शांत मनाने यशाकडे वाटचाल करता येते.
वैयक्तिक आकसापोटी निर्माण झालेल्या शत्रुत्वामागे अनेकदा स्वभावभिन्नता हेही कारण असते. स्वभावभिन्नतेमुळे विचार आणि कार्यशैलीत फरक पडतो. त्यामुळे एकाच ठिकाणी बरोबर काम करणारी माणसे एकमेकांचे शत्रू होतात. अनेकदा हे शत्रुत्व इतक्या टोकाला जाते की त्यामुळे आपण संस्थेचे आणि कामाचे नुकसान करीत आहोत याचे भान उभयतांनाही राहत नाही. स्वार्थ आणि अहंकार बाजूला ठेवल्यास या प्रकारचे शत्रुत्व टाळता येते.
गैरसमज हा एक संसर्गजन्य असा साथीचा रोग आहे. त्याला आपण किती बळी पडायचे हे प्रत्येक जाणकार माणसाने ठरवायला हवे. कानावर पडेल ते ऐकण्याची, तेच सत्य मानण्याची आणि त्यावरून निष्कर्ष काढीत निर्णय घेण्याची कुपमंडूक वृत्ती सोडली तर या प्रकारचे शत्रुत्व वाटय़ाला येणार नाही.
अनेक गोष्टींमध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यात सर्वाधिक लाभ आपल्यालाच व्हावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यात थोडे इकडे तिकडे झाले तरी ते स्वीकारायला माणसे तयार नसतात. त्यामुळे संबंधांत बाधा येऊन शत्रुत्व निर्माण होते. सुसंवाद आणि समन्वय हाच या प्रकारचे शत्रुत्व नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे. काहींच्या अंगात आणि रक्तात पंगा घेण्याची, भांडण्याची खुमखुमी असते. सतत संघर्षशील राहणे हा त्यांचा स्थायिभाव असतो. अशा माणसांमध्ये अकारण शत्रुत्व घेण्याची एक मनोवृत्ती तयार होते. अशी माणसे स्वत:चे आणि इतरांचेही जीवन अशांत करून टाकत असतात. अशा लोकांनी प्रयत्नपूर्वक आपली मानसिकता बदलली तर शत्रुत्व विरून जाऊ शकते.
   शत्रू कधीही हित पाहत नाहीत तरीही त्यांना ‘हितशत्रू’ का म्हटले जाते हे एक न उलगडणारे कोडेच आहे. शत्रूंच्या कारवायांमागे आपले हित आहे असा संस्कृतीचा उदारमतवादी दृष्टिकोन असल्यामुळे कदाचित हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. अशा शत्रूंमुळे माणूस अधिक जाणतेपणाने काम करतो आणि त्यामुळे त्याचे हित होते म्हणून हा शब्दप्रयोग आला असावा.
शत्रूला सामोरे जाताना ‘सर्वानाच धटाशी आणावा धट । उद्धटासी पाहिजे उद्धट ।’ हा समर्थ विचार मानवेल असे नाही. ‘नाठाळाचे माथी हाणू काठी ।’ हा तुकोबारायांचा विचार झेपेल असे नाही. या सर्व प्रकारच्या शत्रूंशी लढण्यासाठी कोणते शस्त्र वापरायचे ? उत्तर साधे, सोपे सरळ आहे, त्यांच्याकडे ‘दुर्लक्ष करण्याचे’ शस्त्र वापरायचे ! त्यांना क्षमा करायची ‘क्षमा वीरस्य भूषणम’ ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. आपले काम अधिक गुणवत्तापूर्ण करून त्याचा धाक निर्माण करायचा. एकदा का ही मानसिकता स्वीकारली की मग संघर्षांत वेळ आणि शक्ती जात नाही. ती शक्ती आणि वेळ विधायक कामासाठी आणि नवनिर्मितीसाठी वापरता येते.
चांगलं काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी अनेकदा बहुमत नसते. अशी माणसे एकटी असतात पण एकाकी नसतात. समाजातल्या चांगल्या माणसांचं आत्मबळ त्यांच्या पाठीशी असतं. त्यातून त्यांनी स्वत:चं भावबळ वाढवायचं. गदिमांच्या ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक’ या भावगीतातल्या त्या वेडय़ा पिलाला आपण कुरूप वेडे आहोत असे सारखे वाटत असते. पण नंतर आपण राजहंस आहोत याची त्याला जाणीव होते. साक्षात्कार होतो. ज्यांना हे स्वत:तले ‘राजहंसत्व’ समजते ते शत्रूंना कधीही महत्त्व देत नाहीत. त्यांच्यापुढे शत्रू नेहमीच निष्प्रभ ठरतात. अशा माणसांचे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व जगाच्या आदराचा विषय होते. ते कालपटलावर चिरकाल टिकते.
joshi.milind23@gmail.com

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!