सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
खेळातला प्रत्येक डाव प्रत्येक खेळाडू जिंकण्याच्या ईर्षेनेच खेळतात, पण हारदेखील ते हसत हसत स्वीकारतात. कारण जिंकणे म्हणजेच सर्वस्व नसून खेळाचा आनंद घेणे हेच माझे उद्दिष्ट आहे हे ज्याला कळते तो जिंकताना तसेच हरतानादेखील सारखाच आनंदी होतो. किंबहुना हरण्यामधून झालेल्या चुकांचा अभ्यास करून जिंकण्याबद्दल त्याला नवीन विचार सुचू लागतात. हाच निकष प्रत्येक स्पर्धेला लावला पाहिजे.
मा गच्या पिढीपेक्षा पुढच्या पिढीला अधिक स्पर्धेला तोंड द्यावे लागते. सरकारी नोकऱ्या, पब्लिक सेक्टर असे सरकारी सुरक्षा असणारे रोजगार नव्या अर्थव्यवस्थेच्या रेटय़ामुळे वेगाने नष्ट व्हायला लागले आहेत. त्यामुळे आयुष्यभर पुरणारी सुरक्षित नोकरी व त्यानंतरच्या आयुष्यात मिळणारे निवृत्तिवेतन या सुखसोयी पुढच्या पिढीला मिळणार नाहीत. उलट असलेली नोकरी टिकवण्यासाठी, त्यात बढती मिळवण्यासाठी त्यांना सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आयुष्यभर जेव्हा असुरक्षिततेची टांगती तलवार समोर असेल तेव्हा प्रत्येक क्षणी स्वत:ला सिद्ध करावे लागेल आणि हे जेव्हा सगळेच करतील तेव्हा स्पर्धा अटळ आहे.
अशा रीतीने प्रत्येक क्षणाला स्वत:ला सिद्ध करून दाखविणे आणि इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ कसे आहोत, यासाठी सतत धडपडणे यातून प्रचंड मानसिक तणाव निर्माण होतो. त्यातून जर पराभूत मनोवृत्तीने जन्म घेतला तर विपरित घटनादेखील घडू शकतात. तेव्हा या जगात जेव्हा भावी पिढीला आपण मुक्त विहार करायला पाठवू, तेव्हा त्यांच्या पंखात पुरेसे बळ आहे की नाही हे पाहणे आणि नसेल तर ते त्यांना प्राप्त होण्यासाठी उद्युक्त करणे, त्याच्या भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी आत्यंतिक महत्त्वाचे आहे. स्पर्धा जर अटळच असेल तर तिचा मुकाबला करण्यासाठी योग्य मनोभूमिका असायला हवी. स्पर्धेला तोंड देताना आधी माणसांच्या भावनांचा व नंतर बुद्धय़ांकाचा कस लागतो. मी मागे लिहिल्याप्रमाणे, भावनांक हे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांवर व त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांवर आपण किती नियंत्रण ठेवू शकतो त्याचे परिमाण असते. जोपर्यंत आपल्या भावनिक विश्वावर आपण राज्य करू शकत नाही, तोपर्यंत कितीही उच्च बुद्धय़ांकजरी असला तरी त्याचा उपयोग शून्यच!
स्पर्धा जाचक असते, माणसामाणसांमध्ये द्वेष, हेवेदावे निर्माण करते आणि मानसिक खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरते. असा स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो व बऱ्याचशा मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून या प्रकारचा प्रचारही केला जातो. याउलट स्पर्धा मानवी जीवनाच्या प्रगतीला आवश्यक असून स्पर्धेमुळे आपल्यात जे काही उत्कृष्ट आहे त्याची कस लागल्यामुळे ते दृग्गोचर होते आणि त्यामुळे स्पर्धाही आत्मोन्नतीची अद्वितीय अशी संधी आहे, असादेखील दृष्टिकोन असू शकतो. यापैकी कुठला दृष्टिकोन खरा किंवा खोटा हा प्रश्न महत्त्वाचा नसून, जर स्पर्धा अपरिहार्यच असेल तर कुठला दृष्टिकोन आपल्याला उपयुक्त ठरेल हे ठरविणे आणि त्याचा अंगीकार करायला हवा हे आपली बुद्धी आपल्याला सांगते.
स्पर्धा या शब्दांचा वापर मुख्यत: खेळांमध्ये होता. कुठल्याही खेळामध्ये स्पर्धा नसेल तर तो खेळ रंगत नाही. किंबहुना कुठल्याही खेळाचे स्वरूप आपण बघितले तर त्यात दोन किंवा अधिक लोकांचा समूह एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातले काही जिंकतात व बरेचसे हरतात, पण जिंकणारे किंवा हरणारे हे दोघेही खेळाचा आनंद समप्रमाणात घेतात व परत नव्या जोमाने नव्या खेळाची सुरुवात करतात. खेळांमधील हार कोणी मनाला लावून घेत नाही. खेळातला प्रत्येक डाव प्रत्येक खेळाडू जिंकण्याच्या ईर्षेनेच खेळतात, पण हारदेखील ते हसत हसत स्वीकारतात, कारण जिंकणे म्हणजेच सर्वस्व नसून खेळाचा आनंद घेणे हेच माझे उद्दिष्ट आहे हे ज्याला कळते तो जिंकताना, हरतानादेखील सारखाच आनंदी होतो. किंबहुना हरण्यामधून झालेल्या चुकांचा अभ्यास करून जिंकण्याबद्दल त्याला नवीन विचार सुचू लागतात.
नेमकी हीच खिलाडूवृत्ती जर जगातल्या खऱ्याखुऱ्या स्पर्धकास लावली तर एका निकोप मनोवृत्तीतून स्पर्धा परीक्षेकडे पाहता येते. मी विद्यार्थ्यांना नेहमी एक प्रश्न विचारतो, ‘तुम्ही, ही आयआयटीची परीक्षा का देत आहात?’ यावर त्यांची उत्तरे असतात-आयआयटी उत्तीर्ण होणे ही प्रेस्टीजियस परीक्षा आहे. मी गुणवत्तेत इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध होते किंवा माझ्या आईवडिलांची ती इच्छा आहे किंवा मला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे, त्यासाठी मी ही परीक्षा देत आहे वगैरे वगैरे.
वर उल्लेख केलेल्या तीनही कारणांकडे विचारपूर्वक बघितले तर एक गोष्ट लक्षात येते. यातील प्रत्येकाचे लक्ष परीक्षेच्या बाहेर केंद्रित आहे. पहिली व्यक्ती परीक्षा देत आहे, पण त्याचे लक्ष मिळणाऱ्या प्रतिष्ठेकडे आहे. दुसऱ्याचे लक्ष आई-वडिलांना मिळणाऱ्या समाधानाकडे आहे आणि तिसऱ्याचे लक्ष मिळणाऱ्या पैशांकडे आहे आणि या सगळय़ा वेगवेगळय़ा गोष्टी मिळवण्याचे साधन किंवा एक अडथळा म्हणून ते या परीक्षांकडे बघतात.

गंमत म्हणजे ज्यांना या तीन गोष्टी साध्य करायच्या आहेत, म्हणजे पैसा, प्रतिष्ठा किंवा सन्मान त्यासाठी या परीक्षांना बसले असलेच पाहिजे असे नाही. भारतातल्या बऱ्याचशा श्रीमंत प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्तींकडे बघून तुम्हाला हे सहज कळेल.
त्यामुळे अशा उद्दिष्टांमधून त्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या घटकांची परिपूर्ती होत नाही. एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला यश मिळवायचे असेल तर त्याचे कारणदेखील अंतर्गत असले पाहिजे. उदा. एका विद्यार्थ्यांला जागतिक पातळीवर प्रसिद्ध होण्यासाठी ‘मॅथ्स इंटरनॅशनल ऑलिम्पियाड’साठी बसवले आणि दुसरा विद्यार्थी केवळ गणित आवडते आणि गणिताचे कूटप्रश्न सोडविण्याची प्रचंड आवड म्हणून परीक्षेला बसत असेल तर दुसऱ्या विद्यार्थ्यांचे यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. एखाद्याला जर माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करायचे असेल आणि तो सतत त्या शिखराकडे बघत बघत चढू लागला तर ते आत्मघातकी ठरेल. एकदा शिखर पादाक्रांत करायचे ठरवले की नजर उद्दिष्टाकडे न ठेवता पुढील मार्गक्रमणाकडे केंद्रित करावी लागते.
एकदा का स्पर्धेला किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला खेळाचा दर्जा दिला, की तुमच्या लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे या खेळाचे नियम आपण आपल्या मर्जीप्रमाणे ठरवू शकत नाही. फुटबॉल खेळताना ग्राऊंडची साइज, गोल पोस्टची साइज तुम्हाला आवडत नसली तरी बदलता येत नाही. जर त्यात सोय किंवा गैरसोय असेलच तर ती सर्व खेळाडूंना समप्रमाणात असते, तेव्हा नियम ठरले की त्याबद्दल कुठलीही तक्रार खेळाडू करत नाही.
एक उदाहरण म्हणून आपण एखादी कठीण स्पर्धा परीक्षा घेऊया. उदा. आयआयटी, आयईई घेऊया. आपण जर या परीक्षेकडे खेळ या दृष्टिकोनातून बघितले तर त्याचे नियम काय आहेत? गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्राचे इयत्ता बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. नुसते ज्ञान म्हणजे माहिती नव्हे. आपण कधीही पूर्वायुष्यात न पाहिलेला, न सोडविलेला प्रॉब्लेम फक्त दोन मिनिटांत सोडविण्याचे कसब आपल्याला प्राप्त असेल तरच हा खेळ जिंकता येतो. हे नियम एकदा मान्य केले की तुम्हाला हे तीन विषय आवडतात की नाही, तुमच्या मते या तीन विषयांत तुम्हाला गती आहे किंवा नाही ही व्यक्तिगत प्राधान्ये सोडून द्यावी लागतात, कारण पुढील आयुष्यात ज्या आव्हानांना आपल्याला तोंड द्यावे लागेल त्या गोष्टी आपल्या आवडीनिवडीवर अवलंबून नसणार. तेव्हा पहिला धडा हा मनात गिरवायला हवा की माझ्या आवडीनिवडी कुरवाळत बसण्यात काही अर्थ नाही. जिंकायचे असेल तर या तीनही विषयांत पारंगतता समप्रमाणात प्राप्त केलीच पाहिजे. असे होण्यासाठी आपल्या भावनांना दूर ठेवून प्रसंगी स्वत:शी अत्यंत कठोर अशा शिस्तीने वागून त्या विषयांत प्रावीण्य मिळविलेच पाहिजे. मला जर या खेळात जिंकायचे असेल तर माझ्या आवडीनिवडी दूर ठेवून व येणाऱ्या सर्व अडचणी पार पाडून मी यशस्वी व्हायलाच हवे. कदाचित यश मिळवण्यासाठी मला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल. माझ्या क्षमतेविषयी माझ्या स्वत:च्या मताकडे दुर्लक्ष करावे लागेल. बऱ्याच वेळा क्षणिक अपयशाच्या आहारी जाऊन पराभूत मनोवृत्ती निर्माण होत असेल तर त्यावर मात करण्यासाठी भावनांवर नियंत्रण ठेवून सतत पुढे जाण्याची कला आत्मसात करावी लागेल. त्यात अनेक वेळा अपेक्षित यश मिळत नसले तरीही खचून न जाता चुकांपासून योग्य तो बोध घेऊन पुढे गेलेच पाहिजे. हे सगळे करताना एक ओझे म्हणून नव्हे तर त्या खेळाचा आनंददेखील घेतला पाहिजे. आपण कदाचित या खेळात जिंकणार नाही, याचा बाऊ न करता निरलसपणे या सगळय़ा अनुभवाचा आनंद घेण्याची वृत्ती बाणवली पाहिजे. मला माहीत आहे की हे सगळे करणे वाटते तेवढे सोपे नाही, पण पालकांना मात्र या सगळय़ा गोष्टींची कल्पना असणे आणि त्या दृष्टीने आपल्या पाल्याची मानसिकता घडविणे शक्य आहे.
एकदा एखादा मुलगा दहावीला आला तो त्याला त्याचे आईवडील, मोठे भाऊ-बहीण, नातेवाईक आणि अनेक हितचिंतक त्याला सल्ले देऊ लागतात. ‘हे बघ, काहीही करून तुला ना त्या तिथे पोहोचले पाहिजे. बिचारा विद्यार्थी त्या दिशेने जेव्हा बघतो तर त्याला मोठाच धक्का बसतो. सगळे जण एका उंच पर्वताच्या शिखराकडे बोट दाखवत असतात आणि हा डोंगर इतका उंच असतो की त्याचे टोक धुक्यात हरवलेले असते. हातात दुर्बीण घेऊन तो मुलगा त्या पर्वताकडे जेव्हा बघतो तेव्हा त्याला दुसरा धक्का बसतो. हा पर्वत दगड, माती आणि झाडांचा बनलेला नसून माणसांचा बनलेला असतो. हजारो विद्यार्थी एकमेकांवर चढून वर जाण्याचा यत्न करीत असतात. थोडय़ा निरीक्षणानंतर त्याच्या लक्षात येते, त्या चढणाऱ्या मुलाचे तीन वर्गात विभाजन होते. पहिल्या वर्गातली मुले क्षणाचीही उसंत न घेता वर चढत असतात. आपल्याबरोबर किती मुले वर चढताहेत याची त्यांना पर्वाच नसते. ते स्वत:चा अनुभव सांगतात. काही मुले दुसऱ्या वर्गातलीही असतात. या वर्गातल्या मुलांना पूर्णपणे माहीत असते की ते वर चढूच शकणार नाहीत. त्यांच्यात ती क्षमताच नाही. काय करणार? खाली जाऊ शकत नाहीत, कारण खाली पालक उभे असतात. दोन वर्षे त्यांना पर्वत चढण्याचे नाटक करणे भाग आहे. ही मुले बाकी मुले करतात त्या सगळय़ा गोष्टी करतात, क्लास जॉइन करतात, कॉलेजला जातात, पुस्तके विकत घेतात, परीक्षा घेतात, या सगळय़ातून त्यांना त्यांनी किती प्रयत्न केला याचा फक्त पुरावा गोळा करायचा असतो. त्यांना नक्की माहीत असते की दोन वर्षांनंतर आपण कुठल्या कारणामुळे अपयशी होतो फक्त सांगायचे आहे. या जगात दोन तऱ्हेची माणसे असतात. एक रिझल्ट निर्माण करणारे आणि दुसरे रिझन्स निर्माण करणारे. यासह मुलांमध्ये तिसराही एक वर्ग असतो. त्यांना पर्वतारोहणाची मनापासून आवड असते. वर पोहोचू तर छानच, पण जरी नाही पोहोचलो तरी त्यांना पर्वतारोहणाचा आनंद मात्र सोडायचा नसतो. ही मुले पर्वताचा नकाशा प्राप्त करून घेतात. त्याचा मनापासून अभ्यास करून, कुठल्या भागात आपली सगळय़ात जास्त कसोटी लागणार आहे, कुठे वनराई अतिशय सुंदर आहे, कुठले देखावे मनापासून पाहायचे आहेत याची तयारी करून ठेवतात. पर्वतारोहणाच्या सगळय़ा आधुनिक तंत्राचा शास्त्रशुद्ध अभ्यासदेखील ते करून ठेवतात. या तिन्ही वर्गातल्या मुलांपैकी कुठली मुले वर पोहोचण्याची शक्यता आहे हे तुम्हीच ठरवा आणि आपली मुले कुठल्याही वर्गात असली तरी ते तिसऱ्या वर्गात असतील हे पाहा, म्हणजे यश हे साहस न बनता एक बोनस ठरेल.

Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’