11 July 2020

News Flash

निरामय घरटं : निवांत रमणं

शिशू वयापासून अंक, आकार, रंग अशा विविध संकल्पनांची एकेक करून मुलांच्या समजेमध्ये भर पडत जाते

(संग्रहित छायाचित्र)

उमा बापट

umaajitbapat@gmail.com

मुलांनी अस्थिर नसावं, अशी अपेक्षा बहुतांश पालक, शिक्षकांची असते. मुलांनी विचलित न होता एकाग्रतेने अभ्यास करावा हे विद्यार्थिदशेतील प्राथमिक कौशल्य हवं. मग अडचण कुठे आहे? याचा शोध घेतला तर मुलांच्या आजूबाजूच्या परिस्थितीतील अस्थिरतेत एक कारण सापडायला लागतं. घरी स्वयंपाक करतानाची पालकांची तल्लीनता मुलांना आज किती बघायला मिळते? गोष्ट वाचत असताना त्यांचे पालक मध्येच मोबाइल वाजला की गोष्ट  सोडून त्यात डोके घालतात हे मुलांच्या नजरेतून सुटेल का? अंतर्मुख होऊन विचार केला तर जाणवेल की आज किती वेळ आपण स्वत: कष्टाने कमावलेल्या घरात ‘निवांत रमतो’?

‘‘चला, रियाला टाटा कर, आपली घरी जायची वेळ झाली.’’

‘‘अगं पण आम्ही आत्ताच तर ‘नॉट अ‍ॅट होम’ सुरू केलं. थांब ना जरा.’’ अनेकदा परतीची वेळ होते तेव्हा मुलांचा खेळ रंगात आलेला असतो, पण ते रंगात येणं दरवेळी घडाळ्याच्या काटय़ाला मानवणारं नसतं. कधी मात्र मुद्दा व्यावहारिक तडजोडीच्या पलीकडे सवयींचा होऊन जातो. वेळ असला तरी मनाने धावण्याची इतकी सवय जडलेली असते की गरज नसतानाही या घाईचे आपण गुलाम झालो आहोत हे जाणवतही नाही.

दर सेकंदाला बटण दाबण्यावर हार-जीत अवलंबून असलेले आणि एकटय़ानेच खेळायचे मोबाइल, व्हिडीओ गेम  एकीकडे, तर दुसरीकडे चार-आठ जणांनाही सामावून घेणारे आणि तास न् तास रंगणारे पत्त्यांचे काही निवडक खेळ. जसे की स्मरणाला चालना देणारा, ‘नॉट अ‍ॅट होम’. स्थिर बठकीला दुजोरा मिळेल अशीच त्या खेळाची रचना. एकही पत्ता हातात उरलेला नसला तरी केवळ चित्ताची स्थिरता आणि अवधान असेल, खेळात एखादा जरी रममाण असेल तर सर्व पत्ते आपल्याकडे खेचून आणण्याची आणि डाव जिंकण्याची संधी खेळण्याच्या पद्धतीतच गुंफलेला हा खेळ. जिथे, समरसता या वृत्तीला महत्त्व आहे असे खेळ मुले आणि मोठी माणसे एकत्र खेळले तर स्थिरता आणायला सहज उपाय होईल. ‘निखळ जगणं’ (१ फेब्रुवारी) या लेखात आपण पाहिलं की निखळ जगण्यासाठी जीवनशैली तशी असणं गरजेचं आहे. शुद्ध अनुभव घ्यायला सवड असेल तर हे शक्य होईल. सध्याच्या वेगवान आणि तितक्याच धकाधकीच्या काळात ‘निवांतपणा’ आपल्या दिनक्रमात दिसेनासा झाला आहे. निवांतपणाला रास्त स्थान देऊ करणं ही अस्थिरतेला तोंड देतानाची पहिली पायरी.

शिशू वयापासून अंक, आकार, रंग अशा विविध संकल्पनांची एकेक करून मुलांच्या समजेमध्ये भर पडत जाते. वैकासिक मानसशास्त्रानुसार ठरावीक संकल्पना तयार व्हायला ठरावीक क्षमतांची एकप्रकारची पूर्वतयारी लागते. त्याला ‘रेडीनेस’ अशी संज्ञा वापरली जाते. ‘वेळ’ ही संकल्पना एक-दीड वर्षांच्या मुलांमध्ये विकसित झालेली नसते. वेळेची संकल्पना तयार व्हायलाही काही काळ लागणारच. पालक जीव तोडून लहान मुलांना समजावत, कधी ओरडतही असतात, ‘लवकर आवर उशीर होईल’. ज्याला कानडी येत नाही त्याच्याशी कानडीत बोलल्यासारखे असतं हे. ‘आईचे शेपूट’ या आमच्या शिबिराला जेव्हा पालक मुलांना घेऊन येतात तेव्हा मी त्यांना पहिली ही विनंती करते की कोणीही मुलांना घाई-घाई करून इथे आणू नका. ती मुले इथे रमायला हवी असतील तर ती स्वस्थतेनेच इथे यायला हवीत. फरफट करून आणलेली नको. या एका विनंतीचा अर्थ ज्यांना पूर्ण पचवता येतो ते पालक हे जणू पथ्य असावं तसं पाळतात. उगीचच चिडचिड, त्रागा असं अनारोग्य त्यांच्याजवळ फिरकत नाही. मुलांना स्वत:ला त्यांच्या ऊर्मीप्रमाणे कधी कधी मोकळेपणाने आजमवायचं असतं. ते समाधान मिळालं की मुलं वखवखल्यासारखं वागत नाहीत. कधी कधी एकच गोष्ट त्यांना परत परत वाचायची असते. त्यांना त्यात निवांत रमायचं असतं. मोठय़ा मंडळींना मात्र हा तोच तो प्रकार पाहून लगेच कंटाळा, वैताग वगैरे येतो. पालक-मुलाच्या नात्यात ताणसुद्धा येतो. मुलांच्या निवांत रमण्यात मोठे व्यत्यय उभा करून ठेवतात. जेव्हा मोठय़ांना मात्र एकच गोष्ट मुलाने परत परत केली तर तो ‘मोठा’  कसा होणार ही काळजी लागून राहिलेली असते. निवांत रमू शकणं यात विविध छटा सामावलेल्या आहेत. एका अर्थाने एकाच गोष्टीत तल्लीन होता येणं हे त्या गोष्टीचा ध्यास घेण्याच्या, खोलात जाण्याच्या जवळ जातं. हे ‘मोठे’ होण्याचे मर्म आहे हे काही मोठेच विसरतात.. एकेका विषयात, एकेका कारणासाठी आयुष्यभर रममाण झाल्याशिवाय मोठे काम घडत नाही, असे अनेक मोठय़ांची चरित्र सांगतात. मुले मोठी होतील तसं ती कोणत्या गोष्टीत रमतील हे बदलत जाऊ शकते. पण जेव्हा मुलामंध्ये ही रममाण होण्याची वृत्ती असते तेव्हा ती जपली जाणं महत्त्वाचं.

मुलांच्या चिडचिडीवर काय करावं सुचत नाही, अशी तक्रार घेऊन काही पालक आले होते. त्या पालकांचा आणि मुलांचा दिनक्रम विचारला. मुलांचं वय आठ वर्षांखालचं, पण त्याच्या छंद वर्गाची संख्या त्यांच्या वयाच्या जवळपास! आई आणि बाबा फक्त मुलांना इकडून तिकडे ने-आण करत होते. ना मुलांना कशात रमायला अवधी ना पालकांना मुलांबरोबर निवांतपणा. मुलांना पुरेसा वेळ, सवड आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टीत रमायची स्वस्थता मिळेल, असे बदल दिनक्रमात सुचवले. ते पालक काही दिवसांनी परत भेटायला आले तेव्हा या दिनक्रमातील बदलानंतर त्यांना वाटणाऱ्या मुलांविषयीच्या किती तरी तक्रारी कमी झाल्या होत्या. ती आजी-आजोबांना बुद्धिबळ शिकवायला लागली होती. त्यांच्याशी गप्पा मारायला वेळ मिळाला की ती खुशीत असतात, असं सांगत पालक निवांत वाटत होते. पालकांचा ताण हलका झाला आणि मुलांचे अडकलेपण बाजूला झालं होतं. हे फक्त छोटय़ा मुलांबाबत घडतं असं नाही. तर सध्या काही जणांची बारावीनंतरच्या अभ्यासक्रमाची तयारी आठवीपासून सुरू होते. जी मुले नाटक, चित्रकला, हस्तकला, पोहणं अशा विविध कलांमध्ये अधिक रमतात त्यांना कलेमध्ये निवांतपणा तर सोडा दिवसाकाठी कलेचा आस्वाद घ्यायला थोडा वेळ मिळणंही मुश्कील बनतं. शाळा, गृहपाठ आणि पुढच्या पुढच्या स्पर्धा परीक्षांची तयारी या काहीशा दुष्टचक्रात ती नकळत गोवली जातात. त्यांचं मनस्वास्थ्य टिकवायचं असेल तर मुलं ज्या कलेत रमतात त्यापासून हिरावली जाणार नाहीत याची अक्षरश: खबरदारी घ्यायची वेळ आता आली आहे. माध्यमिक शाळेत नववी-दहावीच्या मुलांसाठी समुपदेशनाचे काम करताना प्रामुख्याने ज्या समस्या आढळून येत आहेत त्यापैकी ही एक.

अभ्यासात सुद्धा रमता येतं, पण त्याचीही गोडी लागावी आणि काही प्रमाणात लावावी लागते. मुले शिकवण्यांना गेली म्हणजे अभ्यासात रमायला होते का हे सांगणे अवघड आहे. बरेचदा तसं दिसत तरी नाही. बघायला गेलं तर मुले कितीतरी काळ शाळा, शिकवणी, शाळेचा गृहपाठ, शिकवणीचा गृहपाठ हेच करताना दिसतात. पण ती त्यात रमतात का ते उरकू पाहतात? एकीकडे तर ज्या कला, खेळ किंवा इतरही अभ्यासक्रमात नसलेलं पण मुलांना रस वाटणाऱ्या विषयात ते रमू शकतात, त्याकडे बघायलाही निवांतपणा उरलेला नसतो. ज्यात ते स्वत:चे स्वत: प्रयोग करत शिकू शकतात ती मुभा गमावून बसलेले असतात. दुसरीकडे अभ्यासात तर चित्त मुरलेलं नसतं. रेटय़ामध्ये पुढे जात राहावं तसं अकरावी-बारावी चालू असते. पण मध्येच जी विद्याशाखा निवडली आहे, त्यात काही गम्य नाही, असं त्यांना वाटायला लागतं. अनेकदा या टप्प्यावर पालकही खडबडून जागे होतात. गोंधळलेल्या आणि काहीशा धास्तावलेल्या अवस्थेत मदत शोधू लागतात. तोपर्यंत स्वत: आपण कशात रमतो हे जाणून घेणं मुलंही हरवून बसलेली असतात आणि पालकांनाही आपलं मूल कोणत्या विश्वात रममाण होऊ शकतं हे उमगलेले नसतं..

या वळणावर पुन्हा एकदा मोठय़ांच्या निवांत रमण्याकडे वळावं लागेल. कुटुंब म्हणून आपण कशात रमतो हे शोधावं  लागेल. आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती कशात रमते हे ठाऊक आहे का, त्याकडे आपण आनंदानं, आदरानं  बघतो का? हे तपासून पाहावं लागेल. त्याला प्राधान्यही द्यावं  लागेल. घरातल्या प्रत्येकाचं रमणं वेगवेगळ्या प्रकारचं आणि वेगवेगळ्या विषयातलं असू शकतं. त्यात आपण एकमेकांच्या विषयात रस घेतो का? तास न् तास वाचन, बागकाम ते भटकंती असे काहीही असू शकतं. मुलांचं काल्पनिक रहस्यमय कथा-पुस्तकांचं जग यावर वैतागण्यापेक्षा त्यांचं

विश्व त्यांना आनंद देतं यात आपलाही आनंद असू शकतो. कोणाला माणसांमध्ये रमण्यात तर कोणाला स्वयंपाक करण्यामध्ये तल्लीनता वाटत असेल तर तो चेष्टेचा विषय बनू नये नाही का?

मुलांनी शाळेत तास संपल्याची घंटा वाजली म्हणून कवितेत रमणं थांबायला शिकायचं असतं. सुट्टीच्या शिबिरांमध्ये पण हस्तकलेसाठी ठरावीक वेळ असतो. नंतर कोणी तरी लगेच जादू दाखवायला येणार असतं. त्यामुळे हस्तकलेची वस्तू मनसोक्त पसाऱ्यात बुडून भान विसरून बनवण्यालाही बंधनं येतात. याला इलाज नसतो पण काही घरगुती ठिकाणी तरी निवांत रमण्याला वेळ, काळ, समाज बंधनं, चाली-रीतींसाठी आवरतं घेणं हे बाजूला सारता येईल की नाही? निदान काही बाबतीत तरी? काही वेळेला तरी? जितका ताण शंभर दगडांवर पाय ठेवण्यात घेतो, तितकंच भान निवांत क्षण वेचण्यासाठीही हवं. आळसात, कृतिहीन बसणं, यापेक्षा निवांत रमण्याची साठवण गुणात्मक वेगळ्या मोलाची असते. कधी नामवंत पर्यटनस्थळं कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त कशी पाहून होतील याचा अट्टहास बाजूला ठेवू या. मुक्कामाचं ठिकाण कधी येणार या अस्वस्थतेच्या पलीकडे प्रवासही निवांत अनुभवू या, उंच भराऱ्या घेतानाही निरामय घरटय़ात निवांत रमू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:06 am

Web Title: enjoyment niramay gharte chaturang abn 97
Next Stories
1 खंबीरता महत्त्वाची
2 व्वाऽऽ हेल्पलाइन : इतिहासाला जेव्हा जाग येते
3 यत्र तत्र सर्वत्र : राजकारणातील स्त्री
Just Now!
X