21 October 2020

News Flash

निसर्ग संवर्धनाचे धडे

गेली दोन दशके निसर्गाच्या संवर्धनासाठी, पर्यावरणपूरक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ती झटते आहे. माया संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या आणि मायमातीच्या संरक्षण-संवर्धनासाठी

| August 16, 2014 01:01 am

गेली दोन दशके निसर्गाच्या संवर्धनासाठी, पर्यावरणपूरक शिक्षणात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ती झटते आहे. माया संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या आणि मायमातीच्या संरक्षण-संवर्धनासाठी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षांपासून योजना आखणाऱ्या मेक्सिकोच्या मरिट्झा मोरॅलेस कॅसानोव्हाची वाटचाल, संथ असली तरी तिच्या ध्येयाच्या दिशेने होते आहे. पर्यावरण प्रशिक्षण देणारे अनोखे उद्यान उभारून तिने नव्या पिढीला निसर्ग संवर्धनाचे धडे देण्यासाठी अभिनव पाऊल उचलले आहे.

यु काटान द्वीपकल्प मेक्सिको देशात आग्नेय दिशेला स्थित आहे. इथलं स्फटिकासारखं स्वच्छ, निर्मळ पाणी चुनखडीच्या दगडधोंडय़ांच्या टणक पृष्ठभागावरून झुळझुळ वाहात असतं. त्या पाण्यामुळे भूपृष्ठावर आणि भूपृष्ठाखालीसुद्धा प्राण्यांच्या विशेष प्रकारच्या विविध प्रजातींचं पोषण होत असतं. परंतु या रम्य निसर्गावर प्रदूषण, अतिवापर आणि जमिनीवरचं अतिक्रमण या गोष्टींचा प्रचंड आघात होऊ लागला आहे.
‘‘युकाटान द्वीपकल्पात जन्माला आलेल्या प्रत्येक  देहात माया संस्कृतीच्या रक्ताचा निदान एक थेंब तरी असायलाच हवा! हा थेंबच आपल्याला आपल्या मायमातीचं संरक्षण आणि संवर्धन करायला स्फूर्ती देणार आहे. कधीकधी माया संस्कृतीनं भारलेला रक्ताचा थेंब मुलांच्या देहात निद्रावस्थेत असतो आणि त्याला जागं करणं हे आपलं कर्तव्य आहे!’’  हे विचार आहेत माया संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या आणि मायमातीच्या संरक्षण-संवर्धनासाठी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षांपासून योजना आखणाऱ्या मरिट्झा मोरॅलेस कॅसानोव्हाचे! तिचा ठाम विश्वास आहे, की पुढील पिढय़ांसाठी सातत्यानं विकास घडवायचा असेल, तर बालवयापासूनच मुलांना पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करायला उद्युक्त करण्यावाचून अन्य पर्याय नाही! अशा प्रकारे पर्यावरण संवर्धनात त्यांना बालवयापासून सहभागी करून घ्यायचं असेल, तर आपण त्यांना विविध धोरणं आणि पर्याय आखायची संधी देऊन ती धोरणं कार्यान्वित करायची मोकळीक द्यायला हवी.
 मरिट्झाचे हे सुज्ञ विचार ती अवघी दहा वर्षांची असतानाचे आहेत. १९९५ साली तिनं ‘हुनाब’ (HUNAB) ही सेवाभावी संस्था स्थापन केली. या संस्थेचं उद्दिष्ट होतं मुलांना पर्यावरणविषयक शिक्षण देण्याचं. मुलांना आणि तरुणांना पर्यावरणाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी खास सुविधा स्थापन करावी असा तिनं जो प्रस्ताव सादर केला, त्यासाठी वयाच्या तेराव्या वर्षी ती मेक्सिकोमधील ‘नॅशनल यूथ प्राइझ’ची मानकरी झाली. गेल्या दहा वर्षांमध्ये तिनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवले आहेत. पर्यावरणासाठी काम करत असतानाच, तिनं एकीकडे गणित या विषयातील पदवी मिळवली आहे आणि त्याखेरीज सामाजिक नियोजन, नेतृत्वगुण, पर्यावरण संरक्षण धोरण आणि गोडय़ा पाण्यातील जलचर या विविध विषयात विशेष प्रशिक्षण घेतलं आहे. तिच्या पर्यावरणविषयक कामात उपयुक्त ठरेल, अशा दृष्टीनं तिनं हे विशेष ज्ञान संपादन केलं आहे. तिची ‘हुनाब’ ही सेवाभावी संस्था जोमानं काम करते आहे. तिच्या प्रकल्पात तरुणांवर जबाबदारीची कामं सोपवण्यावर तिचा विशेष भर आहे. आता ही संस्था ३० किशोरवयीन व तरुण मुलं-मुली चालवत आहेत. त्यापैकी ऐंशी टक्के मुली आहेत. ती म्हणते, ‘मी दहा वर्षांची होते, तेव्हा माझ्या मित्र-मैत्रिणी त्यांच्या स्वत:च्या पाळीव प्राण्यांना आणि बागेतील झाडांना इजा करताना मी पाहात होते. इतर मुलांच्या खोडय़ा काढतानाही मी पाहात होते. ते पाहून मला संदेश पसरवावासा वाटला की, सारे सजीव प्राणिमात्र एकमेकांसमवेत गुण्यागोविंदानं सहजपणे राहू शकतात. प्रत्येक झाड त्या प्रजातीचं शेवटचंच झाड आहे, अशा भावनेनं आपण त्या झाडाची जपणूक केली पाहिजे. तीच गोष्ट प्रत्येक प्राण्याबाबत आणि प्रत्येक मनुष्यमात्राबाबत लक्षात ठेवली पाहिजे.’’
कोणतंही प्रशिक्षण देताना शिक्षणतज्ज्ञ म्हणत असतात, ूं३ूँ ३ँीे ८४ल्लॠ! हा महत्त्वाचा शैक्षणिक सिद्धांत मरिट्झाला अवघ्या दहाव्या वर्षी आवडला. ती म्हणते, ‘‘आपण बालवयातच असतो, तेव्हा आपण निसर्गाशी अधिक तादात्म्य पावू  शकतो. त्या वयात कोणतंही काम आपण अधिक उत्साहानं आणि प्रामाणिक निष्ठेनं करत असतो. जर बालवयातच आपण समाजासाठी कार्य करायचा विडा उचलला, तर ते आपलं आयुष्यभरासाठीचं उद्दिष्ट बनतं.’’
 मरिट्झानं तिच्या संस्थेची स्थापना केली, तेव्हा सुरुवातीला तिनं तिच्या मित्रमैत्रिणींना एकत्र जमवून त्यांना रोपं लावून त्यांची निगा राखायचे आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांची नीटपणे देखभाल करायचे धडे दिले. १९९५ साली स्थापन झालेलं ‘हुनाब’ आज १८ वर्षांनी तेवढय़ाच समर्पिततेनं काम करतंय. आज ती मुलांनी मुलांसाठी चालवलेली संस्था बनली आहे. संस्थेचं उद्दिष्ट आहे आपल्या पर्यावरणाच्या वारशाबद्दल आणि त्याच्या संरक्षण-संवर्धनाबद्दल शिकणं आणि ते ज्ञान एकमेकात वाटून घेणं.
 तिच्यापुढच्या समस्या प्रचंड आहेत. युकाटान प्रांतात प्रचंड गरिबी आहे. जिवंत राहण्याची लढाईच माणसाची दमछाक करते. त्यामुळे निसर्गानं दिलेल्या वनस्पती आणि पशू-पक्षी ओरबाडून नष्ट करण्याचीच सर्वाची धडपड असते. मग पर्यावरणाचं संवर्धन ही दूरचीच गोष्ट ठरते. मेक्सिको देशातील फारच थोडय़ा शाळांत हा विषय शिकवण्याची सुविधा आढळते आणि पर्यावरणाचं संरक्षण करायला लावणाऱ्या त्याविषयक कायद्यांची अंमलबजावणी करायला लावणाऱ्या फारच थोडय़ा सरकारी संस्था आहेत. मरिट्झा जो संदेश देऊ पाहातेय, तो लोकांच्या गळी उतरवणं अवघड आहे, कारण पोटाची खळगी भरण्याला अग्रक्रम देण्यावाचून गरिबांपुढे दुसरा पर्याय नाही. त्याखेरीज आणखी काही पूर्वग्रहसुद्धा आडवे येत आहेत. फक्त सरकारच असे प्रकल्प राबवू शकेल, किंवा असे प्रकल्प राबवण्याचं शहाणपण आणि अनुभव फक्त ज्येष्ठांपाशीच असतो वगैरे दृष्टिकोन तिच्या मार्गातील अडथळे आहेत. प्रशासनाच्या पातळीवरही ‘फक्त आर्थिक विकासच महत्त्वाचा आहे’ या प्रकारची विचारधारा तिला धोक्याची वाटते. परंतु मरिट्झानं हातपाय गाळले नाहीत. तिनं चिकाटीनं जोमाचे प्रयत्न चालू ठेवले आणि स्थानिक कंपन्या, उद्योजक, प्रसार माध्यमं आणि काही सरकारी अधिकारी यांना आपल्या प्रयत्नांचं दीर्घकालीन महत्त्व पटवून दिलं आणि त्यांची मदत मिळवली. ती म्हणते, ‘‘प्रत्येक यशानं मला नवा जोम  दिला तर प्रत्येक अपयशानं मला लढायचं धैर्य दिलं.’’
 जुलै २०१३ मध्ये तिचं स्वप्न साकार झालं. युकाटानची राजधानी मेरिडा येथे ७६०० चौरस मीटर्स जागेवर, ‘सीईबा पेटांड्रा (माया संस्कृतीतलं हे पवित्र झाड.) एन्व्हायरन्मेंट एज्युकेशन पार्क’ (पर्यावरण- प्रशिक्षण देणारं उद्यान) सुरू करण्यात आलं. या उद्यानाच्या संस्थापनेसाठी तिनं अनेक मार्गानी पैसे उभे केले आणि २०१२ साठी तिला मिळालेल्या रोलेक्स पारितोषिकाचा निधीसुद्धा तिनं त्यासाठी सत्कारणी लावला. हा पारितोषिक निधी वापरून तिनं पाच वर्ग भरतील अशा खोल्या बांधून घेतल्या. या उद्यानासाठीची जमीन शहरानं फुकट दिली. या प्रशिक्षण केंद्राद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण-संरक्षणाचा संदेश पसरवू इच्छिते.
सीईबा पेटांड्रा उद्यानात मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची मौज लुटता येणार आहे. ती म्हणते, ‘‘मुलांना एक रोप लावायला सांगितलं, तर बी कसं रुजतं, त्यातून रोप कसं वर येतं, त्याची काळजी कशी घ्यायची हे तपशीलवार समजेल, पण या गोष्टी मुलं प्रत्यक्ष अनुभवातून, मातीत हात माखवून शिकली तर ती निसर्गावर प्रेम करू लागतील आणि त्यातूनच उद्याचे पर्यावरण संरक्षक आणि संवर्धक तयार होतील.’’
 मरिट्झाचे प्रयत्न आज युकाटानपुरते मर्यादित असले तरी तिची संकल्पना जगभरात उपयुक्त ठरेल असा तिला विश्वास वाटतोय. ती म्हणते, ‘‘निसर्गासमवेत एकोप्यानं राहण्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजेत आणि लहान वयातच मुलांना त्या दृष्टीनं माहिती देऊन त्यांना नीतिमूल्यं शिकवली पाहिजेत. लहान वयात हे विचार मनावर ठसतात. आणि त्यातूनच उद्याचं नेतृत्व उदयाला येतं!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2014 1:01 am

Web Title: environmental activist maritza morales casanova
टॅग Mexico
Next Stories
1 दरवळ मोगऱ्याचा !
2 गतिमंद मुलांची झोप
3 अहो आश्चर्यम्!
Just Now!
X