23 September 2020

News Flash

वेध भवतालाचा : पर्यावरण राजदूत

जागतिक पर्यावरणाची राजदूत बनलेल्या जेनच्या अखंड जीवनप्रवासाचा हा वेध.

(संग्रहित छायाचित्र)

 

अर्चना जगदीश

जेन गुडाल सुप्रसिद्ध आहे, ते तिने साठच्या दशकात आफ्रिकेत राहून केलेल्या चिम्पान्झींच्या अभ्यासासह जगासमोर आणलेल्या या कपींच्या वागणुकीच्या आश्चर्यकारक माहितीसाठी. आज वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा ती जगाला जंगल आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणा देते आहे. वेगवेगळी सरकारं, विद्यार्थी, संस्था, स्थानिक लोक, अशा सगळ्यांना प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी अथक प्रयत्न करते आहे.. जागतिक पर्यावरणाची राजदूत बनलेल्या जेनच्या अखंड जीवनप्रवासाचा हा वेध.

‘आपल्या पृथ्वीचं वातावरण, पर्यावरण खूप बिघडलं आहे आणि आता मानवजातीचा विनाश ठरलेला आहे,’ असं अनेक पर्यावरण अभ्यासक निराशेने म्हणत असले तरी जेन गुडाल मात्र अजूनही आशावादी आहे. जेन म्हणते, ‘‘आपल्याला या सगळ्या विनाशाच्या खाईतून वाचण्यासाठी, संपूर्ण विनाशापासून स्वत:ला आणि इतरही सर्व प्रजातींना रोखण्यासाठी एक छोटासा झरोका आजही उपलब्ध आहे. मात्र त्यातून पार व्हायचं असेल तर प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, खरे प्रयत्न आणि सातत्याने प्रयत्न.’’ हा आशावादी दृष्टिकोन घेऊन प्राणी आणि पर्यावरण संरक्षणासाठी ती गेली सहा दशके अथक प्रयत्न करते आहे.

जेन गुडालबद्दल खरंतर खूप लिहिलं गेलं आहे. आज वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीसुद्धा ती जगाला जंगल आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणा देते आहे. वेगवेगळे सरकार, कंपन्या, विद्यार्थी, संस्था, स्थानिक लोक, अशा सगळ्यांना प्रत्यक्ष कृती कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी अथक प्रयत्न करते आहे. म्हणूनच तिच्याबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. जेन गुडाल सुप्रसिद्ध आहे, ते तिने साठच्या दशकात आफ्रिकेत राहून केलेल्या चिम्पान्झीच्या अभ्यासासाठी आणि तिने जगासमोर आणलेल्या या कपींच्या वागणुकीच्या आश्चर्यकारक माहितीसाठी. जेनने पन्नास वर्षे पूर्व आफ्रिकेत आधी संशोधन, नंतर धोरणबदल आणि प्रत्यक्ष संरक्षण यावर काम केलं. पण तिने फक्त संशोधनात गुंतून न राहता पुढे प्रत्यक्ष जंगल-अधिवास संरक्षणासाठी कितीतरी काम जगभर केलं आणि ‘जेन गुडाल इन्स्टिटय़ूट’च्या माध्यमातून बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले.

इंग्लंडमध्ये राहणारी जेन लहानपणापासूनच आफ्रिकेच्या प्रेमात पडली होती. तिने जेव्हा अकराव्या वर्षी पहिल्यांदा एडगर राइस बरोज यांनी लिहिलेलं ‘टारझन’ वाचलं तेव्हा तिला तो कादंबरीतला नायक आवडलाच, पण त्याने जेन या खुळचट, फक्त सुंदर बाहुली वाटणाऱ्या बाईशी लग्न केलं म्हणून रागही आला होता. कदाचित नावाच्या साधम्र्यामुळे असेल. पण ‘मी मोठी होऊन आफ्रिकेत जाणार आणि प्राण्यांवर काम करून त्यावर पुस्तकं लिहिणार.’ असं तिने तेव्हाच मनोमन ठरवून टाकलं होतं. तिला पहिल्यांदा आफ्रिकेला जायची संधी मिळाली, तेव्हा तिच्या आईने तिला सांगितलं होतं, की तुला खरंच हे काम करायचं असेल तर संपूर्ण मन लावून कर आणि अडचणी आल्या तरी मागे फिरू नकोस.

बाकी सगळ्यांनी मात्र अतिशय मागासलेल्या आफ्रिका खंडात जाऊन एक बाई काम करणार, तेही संशोधन, म्हटल्यावर तिला वेडय़ातच काढलं होतं. त्यावेळी आफ्रिका खंड म्हणजे पाश्चिमात्य जगाला अजिबात माहीत नसलेले प्राणी आणि नरभक्षक टोळ्यांचा अनवट प्रदेश, असाच त्याकाळी सर्वाचा समज होता. तिचा निश्चय मात्र पक्का होता. त्याकाळच्या इंग्लिश समाजमनाला मात्र तिने असं एकटीनेच आफ्रिकेत जाऊन काम करावं हे मान्य नव्हतं. म्हणून मग ‘गोम्ब्ये’च्या दीर्घकालीन प्रकल्पासाठी प्रथम जाताना तिला आईला बरोबर घेऊन जावं लागलं होतं.

आपल्या सगळ्यांना वाटतं, की ती आफ्रिकेत १९५७ मध्ये पहिल्यांदा गेली तेव्हापासूनच तिने चिम्पान्झींवर संशोधन करायला सुरवात केली. पण खरं तर जेन गुडाल सुरुवातीला सुप्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि आदिमानव शोधकत्रे

प्रा. लुई लिकी यांच्या ‘ओलडुव्हाये’ या घळीत आदिमानवाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठीच्या प्रकल्पावर मदतनीस म्हणून आली होती. दिवसभर मातीत काम केल्यानंतर ती आफ्रिकेतल्या गवताळ प्रदेशात संध्याकाळी फिरायला जायची. तेव्हाच तिने जिराफ-गेंडे असे विस्मयकारक प्राणी बघितले. आपल्याला इथेच यायचं आहे हे ठरवून टाकलं. तिचं काम आणि आत्मीयता बघून लुई लिकींनी तिची निवड चिम्पान्झींबद्दलच्या टांझानियामधल्या संशोधन प्रकल्पासाठी केली.

कपी म्हणजे मानवसदृश वानरांवर संशोधन करण्याची चिकाटी स्त्रियांकडे अधिक आहे असं लिकींना वाटत असे. म्हणून त्यांनी आधी जेन आणि नंतर गोरिलांवर काम करण्यासाठी डायन फॉसी तर ओरँगउटानवर काम करण्यासाठी बिरुटे गालडिकाज या तरुण मुलींची निवड केली होती. या दोघी जेनकडून अनेकदा बरंच काही शिकत, असं मोठय़ा प्रेमाने त्या दोघींनी आपापल्या पुस्तकांमध्ये लिहिलं आहे. जेनने पहिल्या साताठ वर्षांच्या ‘गोम्ब्ये राष्ट्रीय उद्याना’तल्या कामातूनच स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले होते. काही नव्या गोष्टी म्हणजे चिम्पान्झी माणसासारखीच कार्यक्षमता वाढवण्यासाठी हत्यारे वापरतात.

मानव आणि त्यांच्यातील फरक त्यामानाने फार कमी आहे. या गोष्टी तिनेच प्रथम जगासमोर मांडल्या, त्याचे पुरावे दिले. पुढे जनुकशास्त्रातील संशोधनाने हेच नक्की केले. ‘नॅशनल जिओग्राफिक’च्या वाशिंग्टन इथल्या मुख्यालयात सुरुवातीला असलेल्या कायमस्वरूपी प्रदर्शनात आजही जेन आणि चिम्पान्झीचा पहिला हस्तस्पर्श – मत्री आणि तिचं सुरुवातीपासूनचं काम याबद्दलची चित्रफीत सुरू असते आणि लोक ती आवर्जून, थांबून पुन्हा-पुन्हा बघतात. जेनवर पहिला लघुपट ‘मिस गुडाल आणि वन्य चिम्पान्झी’ हा ‘नॅशनल जिओग्राफिक’ने १९६५ मध्ये तयार केला होता. तिच्या कामासंबंधी छायाचित्रण करायला आलेल्या बेरोन ह्य़ुगो वान लॉविक या डच छायाचित्रकाराच्या ती प्रेमात पडली आणि त्यांनी १९६५ मध्ये लग्न केलं. पुढे त्यांचा १९७४ मध्ये घटस्फोट झाला.

नंतर जेनने डेरेक ब्रायसेसोन या टांझानियाच्या माजी मंत्री आणि राष्ट्रीय उद्यानाचा संचालक असलेल्या माणसाशी लग्न केलं. आपल्या या लग्नाचा तिने धोरण-बदलांसाठी खूप उपयोग करून घेतला. परिणामी, टांझानियामधल्या संरक्षित प्रदेशांची संख्या वाढली. हे लग्नही अल्पजीवी ठरले, कारण डेकचा १९८० मध्ये मृत्यू झाला.  प्राणी संरक्षणाच्या कामात सर्वस्व देऊन टाकण्याचा निर्णय घेतलेल्या जेनने आपले काम सुरूच ठेवले.

आजही ‘गोम्ब्ये संशोधन केंद्रा’त ‘जेन गुडाल इन्स्टिटय़ूट’च्या माध्यमातून संशोधन, तसेच शिकाऱ्यांच्या बंदुकीला बळी पडलेल्या चिम्पान्झी मातांच्या पिलांना वाचवण्याचे काम सुरूच आहे. आपल्या मूलभूत संशोधनानंतर जेनने चिम्पान्झीच्या वैद्यकशास्त्रातील उपयोग आणि छळ याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. त्यातही काही धोरणात्मक बदल घडवून हा वापर अत्यंत मर्यादित स्वरूपातच राहावा आणि त्यांचा छळ अथवा अंत होऊ नये यासाठी ती झटली.

वन्यप्राणी संशोधन आणि संरक्षण करत असताना विशेषत: आफ्रिकेत जेनला  जाणवलेली गोष्ट म्हणजे दारिद्रय़. गरिबी दूर केली नाही आणि स्थानिक आदिवासींना वन्यप्राणी पर्यटनाचे, संरक्षणाचे, प्रत्यक्ष फायदे मिळाले नाहीत तर काहीही उपयोग होणार नाही हे तिच्या लक्षात आले आणि तिने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. शिवाय, हा बदल फक्त बाहेरून आलेल्या पाश्चिमात्य संशोधक किंवा तरुणाईने करून फारसा उपयोग होणार नव्हता. त्यासाठी स्थानिक तरुणांना, मुलांना, तयार करणे महत्त्वाचे होते.

त्यासाठी जेनने ‘रूट्स अ‍ॅन्ड शूट्स’ ही आफ्रिकन तरुणाईची संस्था १९९८ च्या सुमारास सुरू केली. दारेसलाम इथल्या आपल्या घरात काही तरुण आफ्रिकन आदिवासी मुला-मुलींशी बोलत असताना तिला ही कल्पना सुचली. त्या मुलांना चोरटय़ा शिकारी, प्रदूषण, प्राणी आणि त्यांच्या अवयवांचा व्यापार, आणि गरिबीमुळे त्यात अडकणारे स्थानिक आदिवासी, या सगळ्या समस्या दिसत होत्या. ‘आपण काहीच करू शकत नाही.’ अशी भावना मनात आल्यामुळे मुलांच्या पदरी निराशा येत होती. मग हळूहळू काम सुरू झालं. जेनच्या मार्गदर्शनाखाली या मुलांच्या छोटय़ा छोटय़ा गटांनी नैसर्गिक पुनरुज्जीवन, चुकल्या-माकल्या, एकटय़ा फिरणाऱ्या प्राण्यांचे रक्षण आणि रेस्क्यू, स्थानिक लोकांना लागेल ती मदत आणि चोरटय़ा शिकारीपासून रोखण्यासाठी लोकशिक्षण, असं काम सुरू केलं. आज या संस्थेतर्फे १९२ देशांमधले नव्या दमाचे विद्यार्थी आणि तरुणाई आफ्रिकेतल्या दहा-बारा देशांत वन्य प्राणी संरक्षण, पर्यावरण संशोधन आणि स्थानिक लोकांच्या गरजा यावर काम करतात.

टांझानिया आणि आफ्रिकेत मिळून १९६०च्या दशकात सुमारे दहा ते पंधरा लाख चिम्पान्झी होते. मात्र आज आफ्रिकेतले बरेचसे भाग संरक्षित असूनही चिम्पान्झीची संख्या तीन लाखावर आलेली आहे. शिवाय त्यांचे समूह, एखादा दुसरा मोठा असला तरी, विखुरलेले आहेत. शिवाय प्रत्येक ठिकाणी त्यांचा अधिवास संपत आला आहे. म्हणूनच पर्यटनावर मर्यादा आणली पाहिजे यासाठीही ती प्रयत्नशील आहे. मात्र जेन स्वत: चोरटय़ा शिकाऱ्यांविरुद्ध लढाई करत नाही. ‘ते सरकारचं काम आहे आणि सरकारला फार तर त्यासाठी मदत करावी.’ असं ती सांगते. संशोधक आणि पर्यावरण संरक्षक म्हणून काम करणाऱ्यांच्या मर्यादा तिने एवढय़ा वर्षांत नीट ओळखल्या आहेत.

जेनचं काम विविधांगी आहे आणि नवनवे प्रयोग करून प्राणी संरक्षण हेच तिचं जीवन बनलं आहे. १९८४ मध्ये तिने ‘चिम्पान्झू’ या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पाला सुरुवात केली. त्याअंतर्गत प्राणिसंग्रहालयातील चिम्पान्झीना योग्य वागणूक मिळेल आणि शिक्षण, संशोधन आणि पर्यटन या नावाखाली त्यांना त्रास होणार नाही यावर काम केलं जातं. त्यातूनच अनेक प्राणिसंग्रहालयांनी आपापली पर्यटन आणि दर्शकांसंबंधीची धोरणं तसेच प्राणी वृद्ध झाल्यावर काय काळजी घ्यायची याची नियमावली तयार केली. १९७७ मध्ये तिने

‘जेन गुडाल इन्स्टिटय़ूट’ ही वन्यप्राणी संशोधन, पर्यावरण शिक्षण आणि संरक्षण याला वाहिलेली संस्था सुरू केली. २००२ मध्ये तिची ‘युनाइटेड नेशन्स’ची शांतीदूत म्हणून नेमणूक झाली.

जेन गुडालने उत्तमोत्तम पुस्तके लिहिली. त्यातून ती आपले वेधक अनुभव सांगत राहिली. तिचं पाहिलं पुस्तक ‘इन द श्ॉडो ऑफ मॅन’ १९७१ मध्ये प्रसिद्ध झालं. त्यात तिच्या ‘चिम्प्स’वरच्या संशोधनाचे अनुभव आहेत. तर पुढे तिने आपल्या ओघवत्या शैलीत लिहिलेल्या ‘थ्रु अ विंडो’मध्ये प्राणिसंग्रहालयातले आणि निसर्गातले चिम्पान्झी, त्यांच्या वागणुकीतले फरक आणि त्यांना असं पिंजऱ्यात ठेवावं की नाही, याबद्दलचे मूलभूत विचार मांडले आहेत. जेनला विज्ञान संशोधनासाठी ‘क्योटो पुरस्कार’, ‘नॅशनल जिऑग्राफिक’चा १९८८चा ‘सेंटिनल पुरस्कार’, असे असंख्य मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

ती अजूनही मनापासून काम करते. अगदी गेल्याच महिन्यात सिंगापूरच्या एका परिषदेत तिने चिनी आणि दक्षिण आशियामधल्या लोकांना आणि हॉटेल व्यावसायिकांना ‘शार्क माशाचे फिन्स समारंभाच्या जेवणात असू नयेत याबद्दल गंभीरपणे विचार करायला हवा,’ असं निक्षून सांगितलं. यावर सार्वजनिक समारंभात बंदी आणणाऱ्या चिनी सरकारचं तिने अभिनंदन केलं. तिने स्पष्ट सांगितलं, की अशा तऱ्हेने शार्क माशांचे फिन्स खाणं म्हणजे मध्ययुगीन इंग्लंडमधले लोक भरचौकात दिली जाणारी फाशी मनोरंजन म्हणून बघायला जात, तसेच आहे. तिच्या मते फक्त हॉटेल मालकच नव्हे तर ग्राहकांचीही जबाबदारी आहे कारण मागणी आहे म्हणूनच पुरवठा होतो.

जेन सतत ‘फेसबुक’ नाहीतर ‘लिंक्ड इन’वर दिसत राहते. कधी एखाद्या मोठय़ा कंपनीच्या कार्यक्रमात किंवा जागतिक परिषदेत तर कधी एखाद्या छोटय़ाशा संस्थेच्या कामाचं कौतुक करताना आणि तिच्याबरोबर असणारे धन्य झालेले असतात. जेन आजही वर्षांला तीनशे दिवस प्रवास करते. ध्यास एकच, वन्य प्राणी पर्यावरण संरक्षणासाठी संबंधित प्रत्येकाला जाणीव करून द्यायची आणि पृथ्वीसाठी चांगले बदल घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं.

ऐंशी पार केलेल्या जेनचा उत्साह तरुणांना लाजवणारा आणि आशावाद कोणत्याही संकटावर मात करायचं बळ देणारा आहे. ती अजूनही हिरिरीने जगभरात वन्य प्राणी संरक्षणासाठी, अधिवास वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांना भेटणं, ‘नॅशनल जिऑग्राफिक’च्या शोध मोहिमांबरोबर देशोदेशीच्या जंगलात भटकणं, आणि छोटय़ा मोठय़ा संस्थांचं काम जाणून घेणं, यात व्यस्त असते. वेगवेगळ्या देशातल्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारी पातळीवरून जंगल, वन्य प्राणी संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाय व्हावेत, कायद्याची अंमलबजावणी व्हावी, म्हणून देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांना भेटणं, हे सगळं जेननं आपल्या कारकीर्दीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये केलं. गॅबॉन या लाकुडतोडीवरच विकासाचा डोलारा असणाऱ्या आफ्रिकी देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भेटून तिथे १३ नवीन राष्ट्रीय उद्याने तयार करण्याची किमया तिने घडवली.

आजही जगातली पर्यावरण आणि प्राणी संरक्षणाचा विचार पसरवणारी स्त्री राजदूत म्हणून ती प्रसिद्ध आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना निवृत्ती घ्यायची चन परवडत नाही. म्हणूनच वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीही जेन गुडाल जंगलात जाते, भटकते, लोकांना भेटत असते. चिम्पान्झी आणि आफ्रिकेच्या आकर्षणातून साठ वर्षांपूर्वी सुरु झालेली तिची निसर्गाबरोबरची प्रेमकहाणी अजूनही सुरू आहे.

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 12:20 am

Web Title: environmental ambassador dr jane goodall abn 97
Next Stories
1 नात्यांची उकल : दोघांत ‘तिसरी’
2 आभाळमाया : आचार्याणां शतं पिता!
3 कुटुंबातील एकटेपण
Just Now!
X