21 October 2020

News Flash

संवादाचा पूल

अभिव्यक्तीसाठी असमर्थ असलेल्या व्यक्तींच्या दृष्टीनं, ‘शब्दविण संवादु’ साधण्यासाठी मिळालेली मदत, हे दैवी वरदानच ठरतं.

| June 14, 2014 01:01 am

अभिव्यक्तीसाठी असमर्थ असलेल्या व्यक्तींच्या दृष्टीनं, ‘शब्दविण संवादु’ साधण्यासाठी मिळालेली मदत, हे दैवी वरदानच ठरतं. या दृष्टीनं एर्ना अॅलंट हिने आफ्रिकेतील एकमेव पूरक आणि पर्यायी संवाद-संपर्क साहाय्य पुरवणारं कें द्र स्थापन करून अनेक वाचाशक्तीत त्रुटी असलेल्यांना आनंदी आयुष्य दिलं. या कार्यासाठी ती रोलेक्स पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. तिच्याविषयी..
आपल्या मनीचं गूज इतरांना सांगणं ही मानवाची सहजप्रवृत्ती असते. ज्या दुर्दैवी व्यक्तींना जन्मत:च वाचाशक्ती लाभलेली नसते किंवा दुर्दैवाने त्यांना ती गमवावी लागते, अशांची किती घुसमट होत असेल! वेगवेगळ्या देशात केलेल्या सर्वेक्षणांनुसार, वाचिकदृष्टय़ा अक्षम किंवा कमी सक्षम असलेल्यांची संख्या साधारणत: लोकसंख्येच्या एकदशांश टक्क्य़ापासून ते दीड टक्क्य़ांपर्यंत आहे. त्यापैकी पाच शतांश टक्के मुलांना संवाद साधण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाच्या साधनांची आवश्यकता असते. अभिव्यक्तीसाठी असमर्थ असलेल्या व्यक्तींच्या दृष्टीनं, ‘शब्दविण संवादु’ साधण्यासाठी मिळालेली मदत, हे दैवी वरदानच ठरतं. या दृष्टीनं अत्यंत मोलाची कामगिरी बजावणारी दक्षिण आफ्रिकेतील एर्ना अॅलंट तिच्या कार्यासाठी रोलेक्स पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. तिनं स्थापन केलेली ‘सेंटर फॉर ऑगमेंटेटिव्ह अँड अल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन (पूरक आणि पर्यायी संवाद-संपर्क सहाय्य पुरवणारं केंद्र)’ ही संस्था वाचाशक्तीत त्रुटी असलेल्या अनेकांसाठी एक वरदान ठरली आहे.
१९९० साली संस्थापित झालेलं हे केंद्र, अशा प्रकारचं संपर्क-सहाय्य करणारं आफ्रिकेतील एकमेव केंद्र आहे. अशा वाचिक-त्रुटीची कारणं विविध असतात. जन्मत:च सेरेब्रल-पाल्सीसारखी व्याधी असणं; ऑटिझम, अॅमिओ ट्रॉपिक लॅटरल स्क्लेरॉसिस किंवा पार्किन्सन यांसारखी एखादी व्याधी उद्भवणं; अपघातात मेंदूला इजा पोहचणे यांपैकी कोणत्याही कारणानं माणसाची वाचिक क्षमता कमी होते किंवा नष्ट होते. अशा प्रकारे वाचाशक्ती गमावलेल्या मुलांना आणि मोठय़ांना संवाद साधायचे पर्यायी मार्ग शिकवून त्यांच्या आयुष्याची प्रत उंचावण्याचं काम अॅलंटनं संस्थापित केलेलं केंद्र अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडतंय.
संवाद साधायला दोन प्रकारे शिकवलं जातं. पहिल्या प्रकारात खाणाखुणा, मूकनाटय़ किंवा देहबोली आणि विशिष्ट प्रतीकात्मक गोष्टींच्या माध्यमातून व्यक्त होण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. यात अन्य साधनांचा वापर केला जात नाही. दुसऱ्या प्रकारात चित्रं, तक्ते, आकडे यांसारख्या साध्या गोष्टींपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं बनवलेली अनेक साधनं वापरायला शिकवली जातात. अशी साधनं इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक यांच्या विकासानंतरच अस्तित्वात आलेली आहेत. मोटर न्यूरॉन व्याधी जडल्यानंतर, सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स, संगणकीय साधनांच्या माध्यमातूनच संवाद साधू शकत होता. SGD (स्पीच जनरेटिंग डिव्हायसीस आणि VOCA (व्हॉइस आउटपुट कम्युनिकेशन एड) ही सध्याची प्रगत साधनं आहेत. खुणा दाबून किंवा आकडे दाबून शब्द उमटवणारी यंत्रसुद्धा विकसित करण्यात आलेली आहेत. आता हे शास्त्र खूपच प्रगत झालं आहे. परंतु अशा प्रकारची मदत पुरवणाऱ्या AAC ऊर्फ ऑगमेंटेटिव्ह अँड आॉल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन याला स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून मान्यता मिळू लागली १९८०च्या दशकानंतरच. या अत्यंत गरजेच्या ज्ञानशाखेची आद्यप्रवर्तक या नात्यानं एर्ना अॅलंटची कामगिरी अत्यंत मोलाची ठरते.
एर्ना अॅलंट म्हणते की, त्यांच्या केंद्राद्वारे राबवला जाणारा उपक्रम अत्यंत यशस्वी झालेला आहे. त्याचं ठळक उदाहरण म्हणून ती चौदा वर्षांच्या मारियसची कहाणी उद्धृत करते. या मुलाला जन्मापासूनच बोलता येत नव्हतं. संवाद साधणं अश्यक्य झाल्यामुळे त्याच्या शिक्षणात अडथळा आलेला होता. परंतु चित्रांच्या तक्त्यांपासून प्रारंभ करून, हळूहळू डिजिटल स्पीकर्सचा वापर करायला त्याला शिकवण्यात आलं आणि आता तो बोलू-लिहू शकतो आहे.
अॅलंटनं संस्थापित केलेलं हे केंद्र अशा मुलांच्या शिक्षकांना आणि आईवडिलांना विशेष प्रशिक्षण देऊन, मुलांना अभिव्यक्तीसाठी कशा प्रकारे मदत करावी, हे शिकवत आहे. अशा प्रशिक्षित मंडळींद्वारा केवळ शहरांमध्येच नव्हे, तर थेट ग्रामीण भागांपर्यंत अशा प्रकारची मदत पुरवणं शक्य झालेलं आहे. अॅलंटनं संस्थापित केलेलं हे केंद्र दर वर्षी सहाशे लोकांना अशा प्रकारे प्रशिक्षित करत आहे. आणि हे लोक, वाचिकदृष्टय़ा अक्षम असलेल्या ५००० मुलांना मदत पूरवू शकत आहेत.
जरी हे केंद्र प्रामुख्यानं दक्षिण-आफ्रिकेतील जनतेला मदत पुरवत असलं, तरी आफ्रिका खंडातील अन्य देशांचं लक्षसुद्धा संवाद-त्रुटीच्या समस्येकडे वेधलं जाऊ लागलंय आणि संवाद-वंचितांना विशेष मदत पुरवण्यासाठीची मानसिकता तयार होऊ लागलीय. अशा प्रकारच्या मदतीची उपलब्धी आर्थिकदृष्टय़ा निम्नस्तरातील लोकांनासुद्धा मिळावी यासाठी ISAAC ‘इमर्जिग कंट्रीज कमिटी’चं सह-अध्यक्षपद तिनं स्वीकारलं आहे आणि गोरगरिबांपर्यंत मदत पुरवणारी यंत्रणा संस्थापित केली आहे. ‘गरिबी आणि वाचिकदृष्टय़ा अक्षम असलेल्यांना पूरक किंवा पर्यायी मदत पुरवणारी यंत्रणा’ यावरील तिच्या संशोधनाचा अहवाल तिनं पुस्तकरूपात जगापुढे ठेवला आहे. तिच्या पुस्तकाचं नाव आहे ‘ऑगमेंटेटिव्ह अँड ऑल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन अँड सिव्हिअर डिस्अॅबिलिटी: बियाँड पॉव्हर्टी.’
एर्ना अॅलंटच्या या कार्यासाठी तिला रोलेक्स पारितोषिकानं गौरवण्यात आल्यामुळे, या कार्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोचायला मदत होऊन, या ज्वलंत प्रश्नाकडे सर्वाचं लक्ष वेधलं गेलं आहे. त्यामुळे तिचं हे केंद्र आता प्रेटोरिया-विश्वविद्यालयाचा एक स्वायत्त भाग म्हणून कार्य करू शकतंय.
आता थोडंसं एर्ना अॅलंटबद्दल जाणून घेऊया. तिनं प्रेटोरिया विश्वविद्यालयातून ‘संवाद-भाषाविषयक रोगनिदान (स्पीच-लँग्वेज पॅथॅलॉजी)’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. १९७८ ते १९८४च्या दरम्यान तिनं दरबन आणि जोहानासबर्ग येथे शालेय उपक्रमांमध्ये सहाय्य केलं. त्यानंतर तिची नियुक्ती प्रेटोरिया-विश्वविद्यालयात, ‘कम्युकेशन पॅथॉलॉजिस्ट (संवाद-संपर्कविषयक रोगनिदानतज्ज्ञ)’ या विषयातील प्राध्यापकपदी झाली. १९९० साली तिनं तिचं पूरक/पर्यायी संवादात मदत करणारं केंद्र स्थापन केलं. १९९५ साली या केंद्रानं पुरवलेल्या भरीव सेवेसाठी नेल्सन मंडेलांनी तिचा गौरव केला. संवादाचे पूरक आणि पर्यायी मार्ग शोधण्यासाठी एर्ना अॅलंटनं गेली १८ र्वष सतत संशोधन केलं आहे. २००९ सालापासून अमेरिकेतील ब्लूमिंग्टन येथील इंडियाना युनिव्हर्सिटीत ‘स्पेशल एज्युकेशन’ विषयातील खास प्राध्यापक म्हणून ती कार्यरत असून, तिचं संशोधन जगभरातील वाचिक-वंचितांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचं तिचं व्रत सुरूच आहे.
ज्यांना बोलतालिहिता येत नाही, किंवा बोललेलं-लिहिलेलं ज्यांना समजत नाही, त्यांच्या दृष्टीनं अशी पूरक-पर्यायी साधनं/माध्यमं वापरली जायला प्रारंभ झाला १९५० सालपासून; परंतु १९५० साली अशा साधनांचा वापर प्रामुख्यानं शस्त्रक्रियेनंतर वाचाशक्ती गमावलेल्यांच्या मदतीसाठी केला जात होता. १९६० आणि १९७० च्या दशकांत पाश्चिमात्य देशांमध्ये अशी वाचिक-भाषिक त्रुटी असलेल्या व्यक्तींना मुख्य समाजप्रवाहात सामावून घेण्याचे आणि पर्यायी साधनांद्वारा त्यांना आपल्या स्वत:च्या पायांवर उभं करण्याचे जोरदार प्रयत्न केले जाऊ लागले.
१९८०च्या दशकानंतरच AAC (ऑगमेंटेटिव्ह अँड ऑल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन) ही स्वतंत्र ज्ञानशाखा समजली जाऊ लागली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मायक्रो कंप्युटर्स आणि ‘स्पीच सिंथेसिसचं’ शास्त्र विकसित झाल्यावर अभिव्यक्तीसाठी मदत पुरवणारी अनेक साधनं विकसित होऊ शकली. अशी साधनं वापरणाऱ्या ख्रिस्टी ब्राऊन आणि जीन-डॉमिनिक-बॉबी या दोघांच्या पुस्तकांवर आधारित अनुक्रमे ‘माय लेफ्ट फुट’ आणि ‘द डायव्हिंग बेल् अँड द बटरफ्लाय’ या चित्रपटांना पारितोषिकं प्राप्त झाली आहेत. आणि या चित्रपटांद्वारा अशा दुर्दैवी लोकांची आयुष्यं जनतेपुढं ठळक रूपात मांडली गेली आहेत. सोबत दिलेल्या छायाचित्रात संवादाची पर्यायी साधनं आणि ती वापरून अभिव्यक्ती साध्य झाल्यामुळे आनंदानं प्रफुल्लित होऊन हसणारी मुलगी पाहिली, की एर्ना अॅलंटच्या कार्याबद्दल मनात आदर दाटून येतो.
एका ज्वलंत प्रश्नासाठी तोडगे शोधणाऱ्या एर्नानं जगाला माणुसकीची एक नवी वाट दाखवली. या कार्याचं स्वतंत्र ज्ञानशाखेत रूपांतर करताना तिनं सेवेच्या वाटचालीत सामील करून घेण्यासाठी अनेक प्रशिक्षित स्वयंसेवक तयार केले. तिनं अनेक दुर्दैवी लोकांना ‘शब्दविण संवादु’ साधायला शिकवलं. तिच्या कार्याची महती सांगताना आज माझे शब्द तोकडे पडत आहेत. माझ्या भावना ‘शब्देविण’ वाचकांपर्यंत पोचल्या, तर मी धन्य होईन!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 1:01 am

Web Title: erna alant
Next Stories
1 कुष्ठरोग
2 एकतेसमवेत विविधता
3 फरक पडतो?
Just Now!
X