तो निळा रंग आमच्यातलं सगळं काही सामावतो आहे. आमचं शरीर, त्यातले सुंदर उतार-चढाव, फुल-पाकळ्या, त्या पाकळ्यांमधलं काही सामावलेलं, जसं आहे तसं. त्या रंगात भरजरी नऊवारीचा जरतारी आब आहे, तसंच एका सुंदर देहाविषयी वाटणारं निस्सीम शारीर आकर्षण पण आहे. ते तुमच्यात-माझ्यात- सगळ्यांच्यात आहे. ते उघडय़ा डोळ्यांनी ‘पाहिलं’ की मगच सांभाळता येतं. हवं तिथेच नेताही येतं. शांतावणारा अवीट आनंद देऊ शकतं. पण तेच ‘दाबलं’ आतल्या आत की कुकरच्या शिट्टीसारखं वेडंवाकडं बाहेर पडायला मागतं..
हे पत्र..
प्रचंड जनसमुदायाचा पाठिंबा असल्यांने
‘ज्येष्ठ’ ठरलेल्या माझ्या आसपासच्या काही विशिष्ट ज्येष्ठांसाठी-
स. न. वि. वि.
माफीपासूनच सुरुवात करते. कारण कसं आहे, की खूपच तफावत आहे अहो तुमच्या-माझ्या म्हणण्यात. म्हणजे तसे माझे प्रयत्न मनापासून चालू आहेत; खरंच सांगते, तुमच्या साच्यात मला कोंबायचे अथक प्रयत्न चालू आहेत. केवढा मोठा जनसमुदाय आहे तुमच्या मागे. खूप आदर वाटतो. म्हणजे खरं सांगायचं तर एक आजारच आहे मला सगळ्यांचा आदर करण्याचा. म्हणजे कसं होतं- घरातल्या, दारातल्या, समाजातल्या, जगातल्या सर्वानाच आपण आवडावं, आपण पाहावं असं वाटतं. त्यामुळे मग काय होतं, आपल्याला स्वत:ला काय वाटतं ते गेलं खड्डय़ात, सगळ्यांना काय आवडतं त्या साच्यात कितीही कुचंबणा झाली तरी स्वत:ला कोंबून बसवावंसं वाटतं. म्हणूनच तुम्हाला आवडणाऱ्या साच्यात स्वत:ला बसवण्यासाठी खूप धडपडून झालं आहे. पण खरंच सांगते, खूप तफावत होते आहे हो, म्हणजे नाहीच जमणार असं वाटतं आहे.. कसं करू या हो?
म्हणजे आता बघा ना, एक फार प्रसिद्ध निर्माते होते बरं का. तर एकदा, मी पूर्ण कपडय़ात असताना बरं का- तुमचं म्हणणं असतं ना, की तोकडय़ा कपडय़ांमुळे भावना उचंबळतात पुरुषांच्या, म्हणून सांगते बरं का. तर, त्यांच्यासमोर पूर्ण घोटय़ापर्यंतची जीन्स आणि लांब हातांचा पूर्ण शर्ट घालून मी उभी होते, म्हणजे..माझी त्यांच्याकडे पाठ होती. मी समोर कुणाशी तरी  बोलत असताना दोन्ही हातांनी माझे मोकळे केस वर बुचडय़ात बांधत होते. कारण मेकअपला बसायची वेळ झाली होती. दोन्ही हात वर असल्याने माझा शर्ट थोडा वर गेला होता- अगदी थोडाच, तर तिथे मला अचानक एक पुरुषी हात जाणवला. मी दचकून वळले तर हे निर्माते आजोबा समोर उभे. मी त्यांना विचारलं, ‘‘काय करताय?’’ ते म्हणाले, ‘‘कुठे काय?’’ खांदे झटकून काहीच न झाल्यासारखे ते उभे राहिले असता मी त्यांना ते आजोबा आहेत हे विसरून खूप झाडलं. हे नंतर माझ्या एका मित्राला सांगताना तो पण अगदी तुमच्यासारखंच म्हणाला, ‘‘जीन्स आणि शर्ट घालावाच कशाला?’’ पण अहो, मला आवडते जीन्स आणि शर्ट. तर मग त्या आवडण्याची शिक्षा भोगायलाच पाहिजे का? खरं तर मी सांगितलेल्या प्रसंगात माझ्याकडूनही तुमच्या मते काही चुका झाल्यात – केस मोकळे सोडणे, अंगभर असले तरी उत्तान कपडे घालणे, केस बांधून उत्तान हालचाली करणे इत्यादी. खरं सांगू का, साडी नेसायला पण आवडते मला, सलवार कमीज पण आवडतो घालायला, पण जीन्सही आवडते. अहो, माफी मागते- कसं करू या हो – काय करायचं? – खरं सांगू का- मन तरी का मारायचं असं वाटतं हो, एकच तर आयुष्य मिळालं आहे; त्यात नऊवारी, सहावारीबरोबर मिनी स्कर्टस् आवडले तर चुकतं आहे का हो इतकं?
बरं, एकदा मी सलवार-कमीज घालून आणि त्यावर ओढणी घेऊन हं.. म्हणजे तुम्ही म्हणाल तो घट्ट असेल आणि त्यातून माझी फिगर दिसण्याने पुरुषांच्या भावना उचंबळतील म्हणून आधीच सांगते, ओढणी घेऊन बसने चालले होते. तर ना अहो, माझ्या मागच्या सीटवर एक माणूस बसला होता. तेव्हाच्या बसेसमध्ये सीटची पाठ आणि बसायची जागा यामध्ये एक छोटी गॅप असायची. तर माझ्या मागच्या माणसाने त्या गॅपमधून हात घालून माझ्या पाश्र्वभागाला स्पर्श केला. आधी वाटलं, चुकून झालं असेल म्हणून सोडून दिलं. तर तो फुशारला. त्याने पुन्हा त्याच ठिकाणी हात लावताच मी उठून त्याचं बकोटं धरलं. तो घाबरला. सटपटून त्यानं चालत्या बसमधून खाली उडी घेतली. बसमधल्या काही माणसांनी त्याचा पाठलाग करून त्याला हाणला. तुम्हाला सांगायचं म्हणजे तेव्हा माझ्या शरीराचा फक्त पावलं, हात आणि चेहरा एवढाच भाग उघडा होता. बाकी मी नखशिखांत झाकलेलीच होते. तो दिवस होता, बसमध्ये इतर खूप लोकं होती म्हणून हे सगळं करायची हिंमत झाली माझी. रात्र असती, एकटी असते तर काय झालं असतं? भीती वाटते हो.
 आता तुमची पण भीती वाटते आहे. तुम्हाला न आवडणारं इतकं सगळं बोलते आहे, काय होईल. पण म्हणून वारंवार माफीही मागते आहे मी. हल्ली रागवावं पण समजून उमजून रागवावं लागतं हो. माझ्या आतल्या या निस्सीम रागाची पण भीती वाटते म्हणून ही लाचार माफी.
ठीक आहे. आता माफी मागितलीच आहे तर मनाच्या अगदी आतलंही बोलून टाकते. तुम्हाला कळेल न कळेल मला माहीत माही. पण बोलावंच लागेल आता.
माझ्या, आमच्यासारख्या सगळ्यांच्या आत एक मोकळेपणाचा रंग आहे. माझ्यासाठी निळा आहे तो; मला, माझ्यासारख्या सगळ्याजणींना हवं ते करायची मोकळीक देणारा तो निळा रंग. हवे ते कपडे घालणं ठरवू देणारा. तो रंग आमच्यातलं सगळं काही सामावतो आहे. आमचं शरीर, त्यातले सुंदर उतार-चढाव. फुल-पाकळ्या, त्या पाकळ्यांमधलं काही सामावलेलं, किती काही उतू जाणारं, आमचे न दिसणारे पण असणारे वास, त्या रंगात आमचं निव्वळ असणं आहे. तोकडय़ा कपडय़ातलं असेल नाहीतर नग्न असेल. ते आमचं असणं आहे. जसं आहे तसं. त्या ‘असण्याला’ स्वत:च्या शांत मुक्त आनंदासाठी दुसऱ्याला त्रास न देणाऱ्या कुठल्याही वाटेनं जायचा हक्क देणारा तो रंग आहे. त्या रंगात भरजरी नऊवारीचा जरतारी आब आहे, तसंच एका सुंदर देहाविषयी वाटणारं निस्सीम शारीर आकर्षण पण आहे. हे आकर्षण फार सुंदर गोष्ट आहे.
ते तुमच्यात-माझ्यात-सगळ्यांच्यात आहे. ते उघडय़ा डोळ्यांनी ‘पाहिलं’ की मगच सांभाळता येतं. हवं तिथे नेताही येतं. शांतावणारा अवीट आनंद देऊ शकतं. पण तेच ‘दाबलं’ आतल्या आत की कुकरच्या शिट्टीसारखं वेडंवाकडं बाहेर पडायला मागतं. मग ते वेडंवाकडं दुर्लक्षित आकर्षण तोकडय़ा किंवा अंगभर कपडय़ातल्या, अगदी छोटुशा किंवा वयात येत असलेल्या तरुण, मतिमंद, शाळेतल्या, स्वत:च्या पोटच्या मुलगी असलेल्या, सख्खी बहीण असलेल्या अशा सगळ्यांच्या शरीराशी हिंस्र खेळायला मागायला लागतं. या सगळ्याला तुम्ही तुमच्या भाषणांमधून पाठीशी घालता, हे किती गंभीर आहे? तुमच्या या पाठीशी घालण्याचीही भीती वाटते आहे. त्यांनी काय साधणार आहे? त्या सगळ्याकडे डोळे उघडून पाहावं लागेल, अहो. त्याच्या तळाशी काय आहे? शृंगार आहे? नक्की कुणी कुणी आणि काय काय दाबून ठेवतं आहे आत, जे असं आणि इतकं ओरबडायला लावतं आहे आसपासचं? या सगळ्या आक्रस्ताळय़ाचा, हिंसेचा संबंध नक्की कशा-कशाशी आहे? घरातली बंदूक घेऊन आईवर आणि शाळेतल्या सगळ्यांवर बेछूट गोळीबार करणाऱ्या कुठल्याशा महासत्तेतल्या कुठल्याशा शाळेतल्या कुठल्याशा मनाशी आहे? त्याच्या, संगणकावरचे हिंस्र खेळ पाहात प्रेमाविना गेलेल्या एकुटवाण्या बालपणाशी आहे? याचा संबंध कुठल्याशा देशातल्या कुठल्याशा घरातल्या कुलदीपक म्हणून चुकीच्या लाडाकोडात वाढवल्या गेलेल्या आणि घरासारखीच बाहेरही सर्वावर माझीच सत्ता चालते, असं वाटणाऱ्या मनाशी आहे? याचा संबंध वयात आलेल्या कित्येक शरीरांनी, रात्रीच्या अंधारात परवानगी नसलेल्या पण तरीही एकमेकांना केलेल्या छुप्या चोरटय़ा स्पर्शाशी आहे? ज्या मुलाला रडू येतं त्याला छक्का आणि बायल्या म्हणून चिडवण्याशी आहे? छक्क्य़ांची टर उडवण्याशी आहे? समलिंगी संबंधांना हसण्याशी आहे? ‘लीव्ह इन’ म्हणजे लग्न न करता एकमेकांबरोबर ‘झोपणं’ एवढंच समजून त्या नात्यांमधल्या लोकांना दगडांनी ठेचावं असं वाटणाऱ्यांशी आहे? लहानपणी सुपरमॅन व्हायचं स्वप्नं असलेल्या आणि नंतर ‘काहीच नाही होता आलं आपल्याला’ असं वाटणाऱ्या दुखऱ्या मनाशी आहे? मुलांची ‘शू’ची जागा कशी असते असा प्रश्नसुद्धा मनात आणणं म्हणजे खूप खूप घाणेरडं पाप आहे, असं शिकवल्या गेलेल्या कुठल्याशा देशातल्या एका चिमुकल्या मुलीच्या मनाशी आहे? हे सगळंच्या सगळं न पाहाता आत दाबत दाबत जगणं म्हणजे ‘जगणं’ असं तुमच्या वाटण्याशी आहे? का स्वत: जबाबदारी न उचलता सगळ्याचं खापर तुमच्यावर फोडण्याच्या आमच्या सोयीस्कर चालढकलीशी आहे? इथे जरा थांबावं लागेल, तुमच्यावरच्या रागाच्या निमित्ताने या सगळ्यापाशी येत असताना असं जाणवतं आहे की हे सगळं तुमच्याबरोबरच आमच्यापाशीही यावं लागेल, आणावंच लागेल.
पत्राची सुरुवात तुमच्यावरच्या रागाने झाली असली, तरी शेवटापाशी येताना त्या रागापलीकडचे काही साधण्यासाठी आम्हाला ‘आमच्यापाशीही’ यावंच लागेल हेही कबूल करते.
आपल्या सगळ्यांना हे सगळं न बघता भुतांना बाटलीत बंद केल्यासारखं दाबून नाही ठेवता येणार. आपल्या सगळ्यांनाच आता याला सामोरं जावं लागेल. आधीच खूप उशीर झाला आहे. ‘‘तू ‘असं’ केलंस म्हणून मी ‘तसं’ केलं’’ असं किती दिवस चालेल? तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपापलं निगुतीनं साक्षीनं ‘पाहून’ मोठं व्हायची वेळ आली आहे.
तुमच्या माझ्यातल्या या ‘सगळ्याच्या सगळ्याकडे’ शांत पाहायला शिकवणारी समजूत, अनुकंपा तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही मिळू दे. अशा प्रार्थनेचं हे पांढऱ्या रंगाचं काहीसं भाबडं पीस मी या काळ्याशा रंगाच्या वाटणाऱ्या रात्री मोकळेपणाच्या निळय़ाशार आकाशात सोडून देते आहे. त्याची कृपया नोंद घ्यावी, माझ्यासकट आपल्या सर्वाची,
समजुताभिलाषी.