12 December 2019

News Flash

 बहिष्कृत जमात?

ही मंडळी स्वत:ची ओळख आदिवासी चितोडिया अशी सांगत असले तरी ते कोणत्याच राज्याच्या आदिवासींच्या जमातींच्या यादीत या जमातीचे नाव नाही.

| April 11, 2015 01:01 am

timukt1ही मंडळी स्वत:ची ओळख आदिवासी चितोडिया अशी सांगत असले तरी ते कोणत्याच राज्याच्या आदिवासींच्या जमातींच्या यादीत या जमातीचे नाव नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात भटक्या जमातीचेसुद्धा प्रमाणपत्र मिळत नाही. या जमातीचा लाखोंचा समुदाय सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक सुधारणांपासून बहिष्कृत आहे.
‘‘केवळ आमच्या वस्तीतल्याच नाही तर देशातल्या, आमच्या संपूर्ण जातीतल्या महिला घर सोडून बाहेर कोणत्याच कामाला जात नाहीत. आमच्यात मुलींना शाळेत पाठवीत नाहीत. म्हणून आमच्यातली एकही बाई किंवा मुलगी शाळा शिकलेली नाही.’’ नातवंडांने भरलेल्या घरातील आजीबाई सुन्हेरीबाई जवाहारासिंघ चितोडिया आम्हाला सांगत होत्या. आम्ही बसलो होतो औरंगाबादच्या, बीड बायपास रोडवरील, सातारा परिसरातील चितोडिया जमातीच्या पाल वस्तीत.
इथे हे गेल्या पंधरा वर्षांपासून राहत असले तरी गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ औरंगाबाद परिसरातच त्यांचे वास्तव्य आहे. सारी वस्ती पालधारकांचीच. आठवण झाली भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची. ते म्हणाले होते, देशातल्या किंवा समुदायातल्या महिलांच्या प्रगतीवरून त्या देशाची किंवा त्या समुदायाची प्रगती ओळखली जाते. या त्यांच्या म्हणण्याला अनुसरून प्रश्न पडतो की, स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांत या चितोडिया जमातीची प्रगती झाली म्हणायची की अधोगती?
चितोडिया जमातीचा इतिहास निश्चित आधारासह सांगता येत नसला तरी ते स्वत:ला राजा राणा प्रतापसिंहाचे आदिवासी मित्र समजतात. मूळ राहणार चितोड-मेवाड प्रांतातल्या जंगली भागातले. राणा प्रतापसिंहाच्या बाजूने मोगलांविरोधात लढताना राणा प्रतापसिंह जखमी झाले. त्यांना सांभाळण्यात आणि वारंवार होणाऱ्या मोगलांच्या हल्ल्यात तारांबळ उडाल्यामुळे ते परांगदा झाले. गरजेप्रमाणे देशभर विखुरले. जंगलातल्या वनस्पतींची चांगली ओळख असल्याने राज्यवैद्यांना आणि लोकांना हव्या त्या औषधी वनस्पती पुरविणे हा व्यवसाय बनला. पुढे पुढे नाडीपरीक्षा करून रोग निदान करण्याचे कौशल्यही मिळविले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबियांसह भटकंती स्वीकारली गेली. राजपूत राज घराण्याच्या प्रभावाखाली, महिलांना गोषात ठेवणे आणि त्यांचे पावित्र्य जपणे याबाबत सुरू झालेल्या रूढी परंपरा महिलांसाठी आणखी कडक झाल्या. जातपंचायतीची शासन व्यवस्था तर प्राचीन काळापासून आहेच.
औषधी वनस्पती निवडणे, स्वच्छ करणे आणि त्यावर आवश्यक प्रक्रिया करून ते द्रवरूप किंवा पावडरीच्या रूपात औषध म्हणून तयार करण्याचे काम महिला घरबसल्या आधी करत असत. इतर वनस्पतींबरोबर शिलाजीत, इश्कमे अंबर, सालम निरारी, सरावर, कस्तुरी ही बहुगुणी पण दुर्मीळ औषधे हमखास उपलब्ध करून देण्यात ही मंडळी तज्ज्ञ समजली जायची. परंतु वन संवर्धन, जैवविविधता, आणि वन्य जीव संरक्षक कायदे यामुळे पूर्वीसारखे जंगलातून औषधी वनस्पती मुक्तपणे घेणे आता गुन्हा ठरला आहे. शिवाय शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण व परवाना याशिवाय हा व्यवसाय करणे गुन्हा आहे. त्यामुळे त्यांचा हा परंपरागत व्यवसाय संपुष्टात आला आहे. एका अर्थाने स्वराज्यात यांची जगण्याची परंपरागत साधने कायद्याने हिरावून घेतली आहेत, पण पर्याय देण्यात आलेला नाही. पुरुषांचा व्यवसाय संपला आणि महिलांना घराबाहेर पडायचं नाही अशा दुहेरी पेचात आज हा समाज सापडलेला आहे.
‘जडीबुट्टी’ विकणे हा त्यांचा ‘खानदानी धंदा’ आहे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र प्रांतांतील जंगले नष्ट झाल्यामुळे प्रभावी वनौषधींसाठी हरिद्वार, ऋषीकेश, अलमोडा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इ. प्रदेशात जाऊन औषधी वनस्पती जमा करावी लागत होती. आता तेही बंद झाले. महिलांनासुद्धा जडीबुट्टीची माहिती असते, पण त्या व्यवसायाबाबत परपुरुषाशी बोलत नाहीत. शिवाय इतर महिलांप्रमाणे घराबाहेर जात नाहीत.
वय वर्षे पाच ते आठच्या दरम्यान मुलींचा साखरपुडा केला जातो. लग्नाआधी मुलीला मुलाकडून किमान एक ते दीड तोळा सोनं दिलं जातं. मंडप आणि जेवणाचा खर्च मुलीकडून केला जात असला तरी त्यासाठीही मुलाकडून पैसे दिले जातात. मुलीकडून हुंडा देण्याची पद्धत नाही. मुलीला हळदीचा टिळा लाऊन, मुलाकडून मुलीला चांदीचा एक रुपया दिला जातो. यानंतर मुला-मुलीच्या दोघांच्या हातात हळदीचा दोरा बांधला जातो. एकदा हा हळदीचा दोरा बांधला गेला की पती-पत्नीचे नाते लग्नाएवढेच पक्के समजले जाते. मात्र लग्नाशिवाय संसार सुरू करता येत नाही. मुलीचे वय वर्षे १२ ते १५ च्या दरम्यान लग्न करण्याची पद्धत आहे. लग्नात मुला-मुलीला सात दिवस हळद लावली जाते. म्हणजे हळद-तेल रोज सकाळ-संध्याकाळ अंगाला चोळून आंघोळ घातली जाते. सात दिवस इतर नातेवाइकात मेहंदी नाच-गाणे वगैरे आनंदाचे कार्यक्रम चालू असतात. साधारणपणे नवरा-नवरीचे कपडे मुलाकडूनच केले जातात. आई-वडिलांना मुलगी ओझं वाटत नाही. मुलापेक्षा मुलीला प्रतिष्ठा दिली जाते. ती प्रतिष्ठा, ते पावित्र्य जपण्याची कडक बंधने मात्र महिलांवर पडली आहेत. आंतरजातीय विवाह समाजात मान्य नाहीत. जातीतसुद्धा सगोत्र लग्न होत नाहीत. या जमातीत पुढील प्रमाणे एकूण बारा गोत्र आहेत. १) दुल्हाडिया २) गुंगालीया ३) मेवालीया ४) भट्खानिया ५) डुंगरम् परिया ६) जेपारीया ७) असोडिया ८) पारवा ९) दिल्वालीया १०) तारीवाला ११) खाकरीया १२) वाघरीवाला.
समाज देशभर विखुरलेला असल्यामुळे बऱ्याच वेळा योग्य जोडा मिळणे कठीण होते. अशा वेळी सजातीय प्रेमविवाह झाला तरीही तो जमातीला मान्य नसतो. जात पंचायतीचा निर्णय किंवा मंजुरी मिळेपर्यंत अशा मुलींना आईबापाच्या किंवा सासरच्या घरात प्रवेश मिळत नाही. साखरपुडा किंवा लग्न तोडण्यासाठी एकच पद्धत आहे आणि ती म्हणजे जातपंचायतीची मंजुरी. कोणत्याही वाद-विवादावर किंवा अडचणीवर जात पंचायत केव्हाही बोलावता येते; परंतु ठिकठिकाणी विखुरलेल्या पंचांच्या जाण्यायेण्याचा प्रवासखर्च आणि पंचायत बसलेल्या काळातील जमलेल्या लोकांचा रोजचा जेवणाचा खर्च संबंधित दोन्ही कुटुंबांना करावा लागतो त्यामुळे काही गरीब कुटुंबे खासकरून त्यातील महिला यात्रा किंवा देव धर्माचे कार्यक्रम किंवा इतरांचे लग्न कार्यक्रम ज्यामध्ये पंच लोक येण्याची शक्यता असते अशा कार्यक्रमांची वाट पाहतात. तिथे गरिबांच्या पंचायती प्रवास व खाण्या पिण्याचे खर्च न घेता केल्या जातात.
पळून जाणे किंवा प्रेम विवाह करणे अशा प्रकरणात मुलीलाच जास्त जबाबदार धरले जाते. यामुळे सदरच्या वस्तीतील अजय सिंघ चितोडिया यांची पंधरा-सोळा वर्षांची मुलगी हेमा हिने स्वमर्जीने जातीतल्याच मुलाशी लग्न केल्याने गेली आठ महिने ती त्याच वस्तीत उघडय़ावर पालाबाहेर राहते. आई-वडील तिला आपल्या पालात येऊ देत नाहीत जोपर्यंत या प्रकरणात पंचांचा निर्णय होऊन तिला पवित्र केले जाणार नाही, तोपर्यंत ती अशीच राहिली पाहिजे, असे बापाचे मत आहे. मुलीचा त्रास बघवत नसला तरी गरिबीमुळे अजय सिंघ जात पंचायत बोलवू शकत नाही म्हणून ते यात्रा किंवा देवा-धर्माच्या कार्यक्रमाची वाट बघत आहेत.
जातीतल्या सर्व महिलांच्या मासिक पाळीच्या काळात एकूण सात दिवस विटाळ पाळला जातो. या काळात ती महिला पूर्ण वेळ पालाच्या बाहेर असते. तिला जेवणपाणी उचलून दिले जाते. तिच्या कपडय़ावरून हवासुद्धा येऊ नये म्हणून तिला हवेच्या विरुद्ध दिशेला ठेवले जाते. बहुतेक महिलांची बाळंतपणं पालातच होतात. काही अडचणीच्या प्रसंगी शहराजवळचे लोक दवाखान्यात जाऊ लागले आहेत. केसरबाई चितोडिया म्हणाल्या की बाळांतपणानंतर तेथील लोक एक वर्ष विटाळ पाळतात. म्हणजे या काळात त्या स्त्रीच्या हातचा स्वयंपाक-पाणी चालतच नाही. परंतु तिच्या अंथरुण पांघरुणाचासुद्धा स्पर्श होता कामा नये. लहान मुलांच्या देवाण-घेवाणही नागडय़ा अवस्थेत जमिनीवर ठेवून होते. अमरावती येथील सोनुबाई चितोडिया म्हणाल्या की, त्यांच्याकडे बाळांतपणाचा विटाळ केवळ पंचेचाळीस दिवस पाळला जातो.
घरातील प्रौढ महिला, जिला घरवाली म्हटले जाते तिचे महत्त्वाचे काम म्हणजे बिछाना सांभाळण्याचे होय. लहान मुला-बाळाकडून किंवा इतर कोणत्याही कारणाने बिछान्याखाली कोणतीही वस्तू येता कामा नये, चुकून जी वस्तू बिछान्याखाली येईल ती विटाळली असे समजून फेकून दिली जाते. यातून सुटका केवळ सोने आणि चांदीच्या दागिन्याची होते. नाणे, नोटा, कपडे इत्यादी वस्तू फेकल्या जातात.
घरातील महिलांचे सर्व कपडे स्वतंत्रपणे बांधून ठेवले जातात. पुरुष त्या कपडय़ांना हात लावू शकत नाही, महिलांच्या संदर्भात पडदा पद्धती आहे, मध्यप्रदेशात झांसीच्या पुढे सोनगरी पर्वत रांगांमध्ये महाजनी व चंडी देवीचे सोन्याचे मंदिर आहे. ही त्यांची दैवते आहेत. या देवींना निळ्या किंवा लाल रंगाच्या कपडय़ांचा आहेर करतात. हे देवांचे रंग समजले जातात म्हणून निळ्या/लाल रंगाचे कपडे घरातल्या महिला वापरू शकत नाहीत. कोणी या रंगाचे कपडे वापरले तर ती देवीची बरोबरी करते असे समजले जाते. लहान मुला-मुलींना मात्र या रंगाचे कपडे वापरण्यास परवानगी आहे कारण ती देवीचीच लेकरे मानली जातात. विवाहित महिलांच्या बिछान्याखाली आलेल्या वस्तू किंवा पुरुषाने स्पर्श केलेले स्त्रियांचे कपडे फेकून देताना जर त्या वस्तू पालावरून फेकून दिल्या गेल्या तर संपूर्ण पालच बाटले असे समजून पालातील वस्तूसह संपूर्ण पालच नष्ट केले जाते, यालाही अपवाद फक्त सोन्याचांदीचे दागिने. लग्नानंतर देवीची पूजा केली जाते या पूजेला सर्व नातेवाइकांना बोलावले जाते, नवरात्रीनंतर दसऱ्याच्या दिवशी बकरे कापले जातात. यांच्यातीलच चार-पाच पुजारी उकळत्या तेलात तळलेल्या पुऱ्या आपल्या हाताने काढतात (?) आणि त्यांच्या हाताला इजा होत नाही ही दुर्गा देवीची महिमा समजली जाते. या पुजाऱ्यांच्या अंगात देवी येते ते कुटुंबाचे भाकीत सांगतात. पुजाऱ्यांनी सांगितलेल्या भाकितांचे काटेकोर पालन कुटुंबीयांकडून केले जाते.
सदरच्या वस्तीतल्या पालधारकांना आधार कार्ड मिळालेले आहेत. त्यांचे मतदार यादीत नावही आहे. परंतु त्यांना रेशनकार्ड मिळालेले नाही. जातीचा दाखला मिळत नाही, त्यांना बीपीएल कार्ड नाही, हे कार्ड काय आहे हेही त्यांना माहीत नाही. स्वत:ची ओळख सांगताना ते आदिवासी चितोडिया असे सांगतात, पण कोणत्याच राज्याच्या आदिवासींच्या यादीत त्यांचे, चितोडिया जमातीचे नाव नाही. महाराष्ट्राच्या भटक्या जमातीच्या यादीतसुद्धा त्यांची सदोष नोंद आहे. त्यांच्या जमातीचे नाव ‘चितोडिया लोहार’ असे लिहिलेले आहे. खरे तर लोहार या व्यवसायाशी किंवा लोहार जातीशी त्यांचा सुतराम संबंध आलेला नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात भटक्या जमातीचेसुद्धा प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा तऱ्हेने या जमातीचा लाखोंचा समुदाय सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक सुधारणांपासून बहिष्कृत आहे.
समता, बंधुता व न्यायाचे ढोल वाजविणाऱ्या ६७ वर्षांच्या लोकशाहीच्या देशात हे लोक आदिम आणि प्राथमिक अवस्थेत जीवन जगत आहेत. विषमतेच्या विरोधातली लढाई लढण्यासाठी आधुनिक ज्ञान व कौशल्याची हत्यारे त्यांच्या हातात मिळालेली नाहीत. संधी व साधनांची ‘समानता’ दूरच राहिली, परंतु ‘किमानता’सुद्धा त्यांच्या वाटय़ाला आलेली नाही. यांच्यातील महिला सर्व प्रकारच्या गुलामीच्या काळ्याकुट्ट गुहेत जगत आहेत. अशा घटने मागे काय कारण असावे? काही लोक या मागासलेपणाचे खापर त्यांच्या अज्ञानावर फोडतील सुद्धा. परंतु विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी त्यांना आवश्यक ओळख मिळून ज्ञानकौशल्ये, संधी व साधने प्राधान्याने कसे उपलब्ध होतील, या प्रश्नाचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. 
अ‍ॅड.पल्लवी रेणके -pallavi.renke@gmail.com

First Published on April 11, 2015 1:01 am

Web Title: excluded community
Just Now!
X