डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

लग्नात किंवा कोणत्याही नात्यात तडजोड ही येतेच. परंतु ते संपूर्ण नातं मात्र कधीच तडजोड म्हणून आयुष्यात असू नये. शारीरिक सौंदर्य, हे आकर्षण टिकवण्यासाठी महत्त्वाचे, हे जरी खरे असले तरीही नाते तयार होताना किंवा ते टिकवण्यासाठी केवळ तोच एक निकष असेल तर त्या नात्यात कितीशी ऊब, खोली असणार? याचा प्रत्येक वळणावर आपण सगळ्यांनीच डोळसपणे विचार करत निकोप शारीर-बंध अनुभवायला हवा.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

या लेखाचा पूर्वार्ध (२ नोव्हेंबर) होता वैवाहिक नात्यातील शारीर-बंध आणि त्यातून निर्माण होऊ शकणारी गुंतागुंत सांगणारा. त्यापलीकडे जात प्रेम-विवाह किंवा लग्नाशिवाय  एकत्र राहणाऱ्यांचाही विचार करायला हवा.

गेल्या लेखातील जे दुसरे उदाहरण होते ते प्रेमविवाह झालेल्या जोडप्याचे. प्रेमविवाह असूनदेखील नवरा शरीरसंबंध टाळतोय हे काही काळातच तिच्या लक्षात आलं. त्यामागचं कारण म्हणजे त्याला तिच्याविषयी वाटणारं आकर्षणच नष्ट झालं होतं. सुरुवातीला एक चांगली समजून घेणारी मत्रीण, जात-पात न जुमानता त्याच्यासोबत असणारी व्यक्ती म्हणून तो तिच्या प्रेमात पडला. सर्वाच्या विरोधाला न जुमानता तिने त्याच्याशी लग्नही केलं, पण काही दिवसांतच चित्र पालटलं. तो तिला सांगू लागला, की ती त्याला हवी आहे फक्त एक मानसिक आधार म्हणून. तिच्याबद्दल त्याला शारीरिक आकर्षणच वाटत नाही. कारण ती त्याच्या संकल्पनेत असलेल्या ‘तशा’ मुलीसारखी नाही. हे ऐकून तिला वाईट वाटले तरीही तिने त्यावर काम चालू केलं. वजन कमी करणं, त्यात विचित्र पद्धतीची अशास्त्रीय आहारप्रणाली, व्यायाम, सगळंच. परंतु यातून तिच्या मनावर, शरीरावर विपरीत परिणाम होऊन तिचं शरीर वेगवेगळ्या व्याधींचं घर बनलं. त्यातून टोकाचं नराश्य आलं. अशा वेळेस ‘आपण वेगळे होऊ’ हेसुद्धा तिने त्याला बऱ्याचदा सांगितलं, तेव्हा मात्र त्याने तिला अडवलं. ‘‘होईल हळूहळू. आवडायला लागशील, तू मला.’’ हे सांगून. हे सगळंच विचित्र. त्याला ती केवळ आधार म्हणून हवी आहे परंतु यात ती भरडली जातेय याकडे त्याच्याकडून ठरवून दुर्लक्ष केलं जातंय.

असंच दुसरं उदाहरण. वयाची पन्नाशी उलटून गेलेलं, लग्नाशिवाय एकत्र राहणारं एक जोडपं. वाचताना आश्चर्य वाटेल, कारण ‘लिव-इन रिलेशनशिप’ हे तरुण वयातलं ‘फॅड’ आहे, असा गैरसमज मोठय़ा प्रमाणात दिसतो. या दोघांनीही ठरवून, केवळ शारीर-नातं अनुभवण्यासाठी एकत्र राहण्याचं ठरवलं. आता आपण बरेच पावसाळे अनुभवलेले आहेत, त्यामुळे सोबत राहताना, आपणाला हवं असणारं नातं आणि भावनांची गल्लत होणार नाही, असा आत्मविश्वास दोघांनाही वाटत होता. परंतु काहीच आठवडय़ात या सगळ्यात बरेच अडथळे येण्यास सुरुवात झाली. दोघांच्याही वयानुरूप येणाऱ्या, असणाऱ्या शारीरिक मर्यादा, त्यातून त्यांच्या आनंदात येणारे अडथळे पार करण्यासाठी त्यांना एकमेकांच्या भावनिक आधाराची अर्थातच गरज भासू लागली. झालेल्या चर्चेवर पुन्हा एकदा विचार करून एकमेकांना समजून घेणं त्यानंतर अग्रक्रमावर येऊन ठेपलं.

परंतु, इथे मात्र त्यांच्या नात्याने सुरेख वळण घेतलं आणि केवळ शारीर-सहवास अनुभवण्यासाठी एकत्र आलेले हे दोघेही आता एकमेकांशी घट्ट बांधले गेले. त्यांच्यातील आकर्षण कैक पटींनी वाढलं इतकंच नाही तर त्यांना ज्या प्रकारचं नातं हवं होतं त्याबाबत ते संपूर्ण समाधानीदेखील झाले.

यात विचारात घेण्यासारख्या बाबी म्हणजे –

मुळात आपले समोरच्या व्यक्तीवर प्रेम जडले आहे ते नैसर्गिक, सहज असे आहे, की केवळ क्षणिक आकर्षण, हे ठरवता आले पाहिजे. त्यातही एखाद्या विशिष्ट गुणांवर किंवा व्यक्ती म्हणून असणाऱ्या एखाद्या सामर्थ्य-स्थानावर की कसे? उदा. एखाद्याने सतत समजून घेऊन आपल्या पाठीशी उभं राहणं यातून प्रेम वाटतंय, परंतु त्याचं दिसणं किंवा वावर तितकासा आवडत नाहीये किंवा एखाद्याच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात असणं किंवा काही काळापुरते विशिष्ट आकर्षण जाणवून त्या व्यक्तीचा सहवास हवासा वाटणं. इत्यादी.

प्रेम आणि आकर्षण यातली गल्लत ओळखण्यासाठी, स्वाभाविक आकर्षण वाटल्यानंतर बराच काळ जाऊ द्यावा. त्यात त्या व्यक्तीचे इतर पलूदेखील समोर येतात. तरीही भावना तशीच राहिली, तर नात्यात पुढे जावे.

एकमेकांवर प्रेम असूनही, ठरवूनच, त्याची परिणती लग्नात झाल्यावरच काही जोडपी शारीरिक बंधांचा विचार करतात. अशा वेळेस, ही, असलेल्या नात्याचीच नवी सुरुवात आहे हे लक्षात घेऊन त्यालाही सहजतेने पुढे जाऊ द्यावे. त्यात बऱ्याचदा आपल्याकडून घाई होण्याची शक्यता असते.

प्रेम-विवाहानंतर काही पातळ्यांवर भ्रमनिरास होतोय किंवा जोडीदाराच्या काही मूळ बाबीच बदलल्यात असं लक्षात आलं तर मात्र त्यावर लगेच बोलणे उत्तम. यातून किती काळ या नात्यात थांबायचं हेसुद्धा आपल्याला ठरवता येईल.

प्रेमात असताना आणि लग्नानंतर काही बाबी बदलणारच हे व्यावहारिक सत्यही आपण डोळ्यासमोर ठेवलेच पाहिजे. त्यामुळे आपल्याच जोडीदाराच्या वागण्याची आपल्याच मनात सतत होणारी तुलना आपल्याला टाळता येईल. उदा. प्रेमात असताना सुरुवातीच्या काळात, छानपैकी आवरून एखाद्दोन तास मस्त गप्पा मारण्यासाठी भेटणे, याचं रूपांतर नंतर, एकत्र मिळून केलेली साफसफाई किंवा एकमेकांची वाट बघत राहणे यात होऊन जाते. इथे आकर्षण आणि ओलावा टिकवण्यासाठी एखाद्दिवशी ठरवूनच पूर्वीसारखी भेट घडवून आणली तर नात्यात अधिक गंमत येते.

आपण कितीही नाकारले किंवा मूल्यांच्या आधारावर, ‘प्रत्येक व्यक्तीसाठी एकच व्यक्ती’ असे गणित नक्की केले, तरीही, अनेक व्यक्तींविषयी, विशेषत: शारीरिक आकर्षण वाटणे नैसर्गिक आहे. त्यावेळेस पुढचे पाऊल उचलण्याआधी मात्र आपल्या आणि जोडीदाराच्या आयुष्याचा विचार आलाच पाहिजे. काही व्यक्ती यात अगदीच स्वायत्त असतात. परंतु त्यांचा तसाच विचार जोडीदाराबाबतही आहे का, हेसुद्धा महत्वाचे. नाहीतर केवळ स्वत:ला हवे त्या पद्घतीने हवा तसा आनंद घेत, त्यात आपल्या जोडीदाराच्या इच्छा मारल्या जातायत हेसुद्धा अशा व्यक्तींच्या लक्षात येत नाही.

आपल्याला जोडीदाराबाबत अनाकर्षण वाटायला लागलं तर ते त्याच्या/तिच्यापर्यंत पोचवताना, तो/ती दुखावणार नाही याची काळजी मात्र नक्की असावी. म्हणजे दोघांनाही मिळून त्यावर काम करता येईल.

यात स्वार्थी प्रवृत्तीने कारण नसताना जोडीदाराला नात्यात थांबवून ठेवू नये. उदा. शारीर-बंध नकोसे वाटत असताना किंवा तशा इच्छाच नसलेल्या (असेक्शुअल) एका मुलीच्या लग्नानंतर, केवळ लोक काय म्हणतील किंवा तिचा आधार जाईल म्हणून तिने बराच काळ तिच्या जोडीदाराला याविषयी वाच्यताही करू दिली नाही.

आपापल्या भूतकाळात असलेल्या इतरांसमवेतच्या शारीरबंधांची तुलना वर्तमानातील जोडीदाराशी करणे म्हणजे ठरवून दु:खी-कष्टी राहण्यासारखेच. त्या भूतकाळात रमण्यापेक्षा एक आठवण म्हणून त्याकडे पाहणे योग्य.

महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारे एकत्र राहताना, जसे लादलेली शारीरिक गुंतवणूक किंवा संबंध हे चुकीचे तसेच ते हवे असताना किंवा तशी इच्छा असताना जोडीदाराला त्यापासून मुद्दाम वंचित ठेवणे, दूर ठेवणे हेसुद्धा अयोग्यच.

ठरवून, केवळ शारीर-सहवास ठेवणाऱ्या, कित्येक जोडीदार असणाऱ्या व्यक्तीही अनेकदा नराश्यात सापडलेल्या किंवा आनंदी नसलेल्या दिसतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इथे कित्येकदा भावनिक गुंतवणूक टाळता येईलच असे नाही किंवा ती आपल्या मनाविरुद्ध झालेली आहे हे कळताच एकप्रकारचा ताण मनावर येऊन मग त्या जोडीदाराविषयी वाटणारे आकर्षण जाणीवपूर्वक नष्ट करण्याकडेही कल असतो किंवा लगेच दुसऱ्या नात्यात उडी घेण्याची घाईही दिसते. इथे स्वत:च्या या वागण्यामुळे स्वत:लादेखील शारीर-सहवासात उदासीनता वाटू शकते, हे लक्षात ठेवणे आवश्यकच.

आपल्या आणि जोडीदाराच्या विशेषत: या अशा खासगी आयुष्याविषयी, आनंदाविषयी किंवा त्यातल्या समस्यांविषयी मित्र-मत्रिणी किंवा अनोळखी व्यक्ती (सोशल मीडियावरील) यांच्याशी बोलणे आपण कटाक्षाने टाळू शकतो कारण त्यातून उपाय होण्याऐवजी अपाय होण्याचीच शक्यता जास्त. शारीर-बंध हा पती-पत्नी किंवा जोडीदारासोबत राहताना नात्यात असणारा श्वास. त्यामुळे याभोवती सततच्या समस्यांमुळे विचार घोळत राहत असतील किंवा यात समाधान नसेल, आनंद नसेल, तर त्यातून नात्यात एक ताण यायला, तो दृश्य व्हायला वेळ लागत नाही. बऱ्याचदा यामुळे एकंदरीत आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊ शकतो. इथे आपण वेळीच सावध झालो तर हे टाळता येतं.

लग्नात किंवा कोणत्याही नात्यात तडजोड ही येतेच. परंतु ते संपूर्ण नातं मात्र कधीच तडजोड म्हणून आयुष्यात असू नये. शारीरिक सौंदर्य, हे आकर्षण टिकवण्यासाठी महत्त्वाचे, हे जरी खरे असले तरीही नाते तयार होताना किंवा ते टिकवण्यासाठी केवळ तोच एक निकष असेल तर त्या नात्यात कितीशी ऊब, खोली असणार? याचा प्रत्येक वळणावर आपण सगळ्यांनीच डोळसपणे विचार करणं गरजेचं आहे.

शिवाय ज्या शारीरिक सौंदर्यामागे धावत किंवा त्याचे त्यासंबंधी आडाखे बांधत आपण जोडीदाराला कमी लेखतो किंवा त्याच्याशी शारीर-बंध ठेवणे नाकारतो, तेव्हा त्या जोडीदाराच्या कितीतरी चांगल्या बाबी आपण दृष्टिआड करत राहतो. तिथे आपण हेसुद्धा विसरतो, की शारीरिक सौंदर्य हे क्षणभंगुर आहे, बदलणारे आहे, मात्र आपले नाते आपल्याला चिरकाल नक्कीच टिकवता येईल. तेव्हा नात्यातील या सुरेख शारीर-बंधाकडे निकोप दृष्टीने पाहायला हवं. त्यातच खरं जगणं आहे.

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com