15 August 2020

News Flash

अनुभवांचं जग

प्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊनच जन्माला येतं यावर पालकांचा विश्वास हवा. शाळेत ठरावीक विषयच असल्यामुळे कधी कधी त्या गुणांचा पत्ताच लागत नाही. हा गुण शोधण्यासाठी

| April 11, 2015 01:01 am

प्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊनच जन्माला येतं यावर पालकांचा विश्वास हवा. शाळेत ठरावीक विषयच असल्यामुळे कधी कधी त्या गुणांचा पत्ताच लागत नाही. हा गुण शोधण्यासाठी मुलांना अनेक चांगल्या गोष्टी करता यायला हव्यात, अनुभवून पाहता यायला हव्यात.

एक फार सुंदर आफ्रिकी गोष्ट आहे. आफ्रिकेतल्या एका छोटय़ा गावात थोडीशीच घरं होती. रविवार आला की गावातल्या सर्व बाया उठून जवळच्या गावात जात. कारण तो बाजाराचा दिवस असायचा. कुणी बाया धान्य विकायच्या, तर कोणी फळं. कुणी चटया तर कुणी भांडी. त्यातली एक बाई तिच्याकडचे आंबे विकायला चालली होती. तिनं तिच्या मोठय़ा म्हणजे आठ वर्षांच्या मुलीला सांगितलं, ‘‘आज तू बाळाला छान सांभाळ. मला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.’’ मुलगी अभिमानानं फुलून आली. ती स्वत:शी म्हणाली, ‘‘आज मला वेळ पुरणारच नाही. बाळाला सांभाळायचं म्हणजे सोपं नाही.’’ आईबरोबर जाता जाता ती हेच सर्वाना सांगत होती आणि आई तिचं बोलणं ऐकून गालात हसत होती.
बाजारात पोचल्यावर आईनं आंबे नीट मांडले. ते पाहता पाहता मुलगी विसरून गेली की आपल्यावर आपल्या भावाची जबाबदारी आहे. ती बसली खेळत आणि अचानक तिला बऱ्याच वेळानं आठवण झाली. ती लगबगीनं निघाली. तिला वाटलं आपल्या भावाला तहान लागली असेल. तेव्हा बाजारातली एक मावशी म्हणाली, ‘‘अगं हो! खरंच त्याला तहान लागली होती. माझ्याकडचं पाणी मी त्याला पाजलं.’’ तेवढय़ात तिला वाटलं, ‘‘किती हा उशीर! त्याला भूक लागली असेल!’’ तेवढय़ात तिला दुसरी एक मावशी भेटली. ती म्हणाली, ‘‘अगं, भाऊ ना तुझा? तो आला होता माझ्याकडे. त्याला खूप भूक लागली होती. मग माझ्या डब्यातलं मी त्याला खाऊ घातलं. खाऊन तो त्या दिशेला गेला.’’ मुलगी तशीच पुढं गेली. जाता जाता म्हणत होती, ‘‘आता त्याला झोप आली असेल.’’ आणि ती अचानक थांबली. तिला तो चटईवाल्या काकांजवळ झोपलेला दिसला. तो उठल्यावर ती त्याला घेऊन आईकडे आली आणि त्याला कुणी कसं खाऊ-पिऊ घातलं, झोपवलं; ते सांगितलं. तेव्हा आई हसून म्हणाली, ‘‘एक मूल वाढवायचं तर सगळ्या गावाची साथ लागते.’’ या गोष्टीचं नाव आहे, It takes a village to raise a child. आमच्या लहानपणी नातेवाईकांकडे, शेजारी जाण्याची पद्धत होती. आमच्याकडेही खूप पाहुणे यायचे. एप्रिल-मे महिन्यामध्ये मामाकडे जायचो तर मामा खूप लाड करायचा सर्व भाच्यांचे. एकूणच समाजातलं वातावरण स्वागतशील होतं. आता सोसायटय़ांमध्ये सर्वाची घरं बंद असतात. आपल्या लहान मुलांना कुणाकडे खेळायला पाठवायचं तरी भीती वाटते. हल्ली म्हणे मुलं शाळेच्या माध्यमावरूनही गट पाडतात. इंग्लिश मीडियमवाले मराठी माध्यमातल्या मुलांशी खेळत नाहीत. मोठी माणसंही धर्म, जाती यांच्या भेदभावापासून ते थेट सोसायटीत मालकीचं घर असलेले भाडय़ाच्या घरात असलेल्यांशी संबंध ठेवत नाहीत. एकूणच समाजात आता माणसं जोडलेली राहिली नाहीत. ‘प्रायव्हसी’ हा परवलीचा शब्द आहे.
मला दलाई लामा यांची एक कविता फार आवडली. त्यांनी त्यांच्या या कवितेत आपल्या काळाचं फार छान वर्णन केलं आहे. ते म्हणतात,
आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणुसकीची कमी झाली का?
रस्ते रुंद झाले पण दृष्टी अरुंद झाली का?
घरं मोठी पण कुटुंबं छोटी
सुखसोयी पुष्कळ पण वेळ दुर्मीळ झाला.
जसजशी संपर्काची साधनं वाढली तसतशी माणसं एकमेकांपासून तुटत गेली. आता तर अनेक माणसं घरातही आपापल्या मोबाइलवर बाहेरच्यांशी बोलत असतात पण घरातल्यांशी बोलत नाहीत. घरात एकमेकांशी संवादच नसतो. दलाई लामा लिहितात, पदव्या स्वस्त झाल्या
आणि शहाणपण महागमाहितीचे डोंगर जमले,
पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर, पण आरोग्य कमी झालं
हा विरोधाभास तर आपल्याही डोळ्यांना दिसत असतो. आपण खूप पसे मिळवले की आपण समाधानी होऊ असं बऱ्याच जणांना वाटतं. त्यामुळे पशाच्या मागे धावताना माणसं मागे पडतात. आजच्या बाजारांनी माणसांचा कब्जा घेतला आहे. कुणी ठरवलं तर तो किंवा ती रोज शंभर नव्या गोष्टींची खरेदी करू शकेल. असं म्हणतात की काही माणसं पसे मिळवण्यासाठी खूप वेळ खर्च करतात आणि उरलेला वेळ खर्च करण्यासाठी पसेच खर्च करतात. या जीवनशैलीत आपण फार गोष्टी गमावतो आहोत. आपली भाषाही बदलली आहे.
मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी.
आपण बोलतो फार, प्रेम क्वचितच करतो
आणि तिरस्कार सहज करतो
माणसामाणसांच्या नात्यांविषयी ते पुढे लिहितात-
आपण भले चंद्रावर गेलो आलो,पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत पण आतल्या हरण्याचं काय? हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटापण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय? दलाई लामांच्या नजरेला हे सगळं दिसतं आणि त्याचं दु:ख वाटतं. मुलांच्या दृष्टीनं तर असा समाज घातकच आहे. आणि त्याचे परिणामही दिसत आहेत. घरापासून तुटलेल्या, समाजापासून तुटलेल्या, स्वत:पासून तुटलेल्या, शाळेत ज्ञान आणि शहाणपण यांची फारकत झेलणाऱ्या या मुलांची आपण वाढच तर खुंटवत नाही ना? मोठेपणी त्यांना स्वत:च्या जोडीदाराशी तरी जुळवून घेता येईल की नाही? तेही न जमणाऱ्यांची संख्या वाढते आहे. घटस्फोट घटस्फोट असा शब्द सतत कानावर पडणाऱ्या एका लहान मुलानं निरागसपणे विचारलं होतं, ‘‘घटस्फोटाचा आवाज खूप मोठा असतो का?’’ आपली आवक वाढली पण नियत कमी झाली
हा काळ उदंड फायद्यांचा पण उथळ नात्यांचा, जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युद्धांचा.
घरं नटली पण घरकुलं दुभंगली आणि शेवटी दलाई लामा असं म्हणतात की-दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं पण कोठीची खोली रिकामीच! त्यांची एकेक ओळ आपल्या जगण्याचं चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करते आणि प्रश्न विचारते, असंच जगायचं आहे का आपल्याला? की यातलं काही बदलावंसं वाटतं?
या सगळ्याचा मुलांच्याही मनावर परिणाम होतो. गेल्या पंचवीस वर्षांत मुलं किती बदलली आहेत! ती अशांत आहेत, अस्वस्थ आहेत, त्यांची भाषा बदलली आहे. हावभाव बदललेत. खेळणी बदललेली आहेत. मारामाऱ्या करण्याची पद्धत बदलली आहे. सगळं समजण्याचं वय अलीकडे येतं आहे. व्यसनमुक्ती केंद्रात पूर्वी स्त्रिया- मुलं नसत आता १०-१२ वर्षांची मुलंही व्यसनमुक्तीचे उपचार घेतायेत. नऊ नऊ वर्षांच्या मुली इंटरनेटच्या जाळ्यात अडकून फसवल्या जातायत. मुलांवरच्या अत्याचारांचं प्रमाण वाढलं आहे.
समस्या अनेक आहेत. उपायही अनेक शोधले जात आहेत. कुणी शहरी जीवनपद्धतीला कंटाळून ग्रामीण भागात जाऊन राहात आहेत. कुणी शेती करतायत. मुलांच्या समस्यांचा प्रचंड अवकाश आपल्यापुढे उभा राहात आहे तर त्यावरचा उपाय म्हणजे त्याहूनही मोठा अवकाश चांगल्या गोष्टींनी भरून टाकायला हवा.
मुलांवर बारीक लक्ष ठेवणं, हेरगिरी करणं, बंधनं घालणं, त्यांची कोंडी करणं, सतत मागे राहाणं हे मार्ग नाहीत मुलांना बिघडू न देण्याचे! लहानपणापासून त्यांची स्वतंत्र बुद्धी, स्वत:चा विचार जागा करण्याची गरज आहे. माझं मूल मोठेपणी सर्वस्वी स्वावलंबी असलं तर त्याहून मोठा आनंद काय असू शकतो? त्यानं स्वावलंबी तर असावंच पण त्याचबरोबर समाजाशीही जोडलेलं राहावं. समाजातल्या सर्व स्तरांमध्ये वावरण्याचा अनुभव असेल तर आपलीच दु:खं मोठी वाटत नाहीत.
प्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊनच जन्माला येतं यावर पालकांचा विश्वास हवा. तो गुण ओळखणं, फुलण्याला मदत करणं हे पालकांचं काम. मुलांमध्ये अनेक गुण असतात. शाळेत मात्र ठरावीक विषयच असतात त्यामुळे कधी कधी त्या गुणांचा पत्ताच लागत नाही. आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा तो गुण साकार होतो. मुलांचं व्यक्तिमत्त्व त्याच्याभोवती आकार घेतं. हा गुण शोधण्यासाठी मुलांना अनेक चांगल्या गोष्टी करून, अनुभवून पाहता यायला हव्यात. लहानपणी त्यांना अनेक खेळ खेळू देत, अनेक कला हाताळू देत, गाणी म्हणू देत, वाद्यं वाजवू देत, गोष्टी ऐकू देत, पुस्तकांच्या जगात हरवून जाऊ देत, चित्रं काढू देत, नृत्य,अभिनय करू देत, अनेक चांगल्या माणसांचा सहवास मिळू दे, अनेक चांगली ठिकाणं पाहू देत, समाजासाठी काही करू देत. ही सगळी मुलांचा रिकामा अवकाश भरण्याची चांगली साधनं आहेत. ही मुलांना अनुभवू देत म्हणजे मोठेपणी त्यांची कोठी भरलेली राहील आणि दिखाव्याच्या खिडकीची गरजच भासणार नाही!
शोभा भागवत -shobhabhagwat@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2015 1:01 am

Web Title: experience of world
टॅग Children,Parents
Next Stories
1 निष्पत्ती सात वर्षांच्या धडपडीची!
2 सुरक्षित अन्न!
3 गच्चीवरची बाग – खिडकी/ जिन्यातली बाग
Just Now!
X