या मुलांचा पहिलाच ट्रेक नेला रायगडला. त्यांना त्यांच्या या अनोख्या अनुभवांबद्दल भरभरून सांगायचं असतं. रॅपलिंग, रोप क्लायम्बिंग, रिव्हर क्रॉसिंग, व्हॅली क्रॉसिंग, रात्री आभाळाची चादर पांघरून मचाणावर, रस्त्यांवर झोपणं, स्वत:च तंबू उभारणं, कधी दोरीला लटकत चालणं तर कधी बांबूवरून तोल सांभाळत चालणं, पेटत्या ज्वालांतून उडी मारणं, हातानेच नदीतले मासे, खेकडे पकडणं याबद्दल न थकता ती तासन्तास बोलत राहतात.

मुलं होणं हा अपघात असू शकतो, पण मुलं वाढवणं असतं व्रत, तपश्चर्या, ध्येयाच्या दिशेनं केलेली वाटचाल! ‘माझ्या मुलाला मी आज वेगळं काय दिलं? तो आज कालच्यापेक्षा थोडा तरी समृद्ध झाला का?’ असा विचार करणारी आई मग स्वत:च वेगळे मार्ग शोधते. मग तिच्यासारखेच इतर पालक भेटतात आणि सुरू होतो प्रवास वेगळय़ा दिशेने..
संध्या ओक, आताची वेलणकर. तिचं स्वत:चं बालपण गेलं वाडा संस्कृतीतल्या समृद्धीत! उत्तम खेळाडू, अभ्यासात हुशार. एन.सी.सी. कॅडेट, गिर्यारोहक. सचिन-शंकर यांच्या बॅलेत काम करणारी, अनेक नाटकांतून, टीव्ही मालिकांतून काम करणारी. तेजसच्या जन्मानंतर धडपडू लागली, आपल्याला मिळालेला समृद्ध वारसा अधिक भर घालून तेजसला आणि त्याच्यासारख्याच इतर मुलांना कसा देता येईल यासाठी.
तो लहान असताना ती ‘दिशा’ या कर्णबधिर शाळेत नृत्य-नाटय़ शिकवायला जायची. सोबत असे तेजस. हेतू एकच. न सांगता त्याला देवानं दिलेल्या शरीरयष्टीचे महत्त्व कळावं. संध्याकाळी सोसायटीतल्या मुलांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी गप्पागोष्टी, शिस्तबद्ध खेळ, स्पर्धा घेणं हे करता करता ती सर्वाची लाडकी संध्यामावशी झाली. तिच्याबरोबर मुलं रमतात. ती मुलांना छान सांभाळते हा पालकांचा विश्वास. मग या मुलांसाठी सुरू झाले छोटे-छोटे ट्रेकस्, कॅम्पस, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीज! ती तिची ताई, मेव्हणे तिच्या मैत्री ग्रुपचे प्रशिक्षित गिर्यारोहक सर्वाच्या मदतीने. मुलं मोकळी व्हावी, त्यांचं मीपण गळून पडावं, आत्मविश्वास वाढावा यासाठी हा खटाटोप,  ‘मी ठरवलं तर काहीही करू शकतो, मी निसर्गाचं देणं लागतो. मी शहरात समृद्धीत, मजेत राहतो पण गावातला शेतकरी, कातकरी, वारली अनवाणी पायानं डोक्यावर ओझं घेऊन चालतो, उन्हातान्हात राबतो ’ हे मुलांना समजावं याचा!
 पहिलाच ट्रेक नेला रायगडला. तेव्हा तेजस होता केवळ साडेतीन वर्षांचा. अनय, चिन्मय, श्रेया आणि इतर अनेक वयाच्या ४-५ वर्षांपासून सतत ट्रेकला जातात. त्यांना त्यांच्या या अनोख्या अनुभवांबद्दल भरभरून सांगायचं असतं. रॅपलिंग, रोप क्लायम्बिंग, झुमारी, रिव्हर क्रॉसिंग, व्हॅली क्रॉसिंग, स्टार गेझिंग, रात्री आभाळाची चादर पांघरून मचाणावर, रस्त्यांवर झोपणं, स्वत:चा तंबू उभारणं, तंबूत रातकिडय़ांचं संगीत ऐकणं कधी दोरीला लटकत चालणं तर कधी बांबूवरून तोल सांभाळत चालणं, पेटत्या ज्वालांतून उडी मारणं, नदीच्या बंधाऱ्यावर धरण्याच्या सांडव्यावर पाण्यात पाय सोडून बसणं, हातानेच नदीतले मासे, खेकडे पकडणं याबद्दल न थकता ती तासन्तास बोलतात, ‘खाली दरीत पडलात तर किंवा जंगलात हरवलात तर?’ अशी भीती नाही वाटत? असं विचारताच ती सांगतात, ‘प्रथम टीव्हीवर थ्रिलिंग, अ‍ॅडव्हेंचर्स प्रोग्राम बघताना मजा वाटायची, पण त्यापेक्षा आपण हे सारं करू शकतो याची मजा जास्त वाटते. आणि पडलोच तर जंकलकाका असतो ना बरोबर’ ‘जंगलकाका’ म्हणजेच संध्याचे सारे सहकारी. मुलांना बक्षीस म्हणून कधी सागाच्या बिया वा बर्डस् नेस्ट देणारे, बुलफाइट दाखवणारे आणि गड-दुर्ग चढताना तिथला इतिहास जिवंत करणारे! तिथलं वास्तुशास्त्र समजवणारे. गीत, पोवाडे, कवनं मुलांकडून म्हणवून घेणारे. तर कधी बाबासाहेब पुरंदरे, १९ वेळा एव्हरेस्ट चढलेले शेरपा, आल्पस् पर्वतात हिमवादळात १३ दिवस अडकल्यानं पाय गमवावा लागलेले गिर्यारोहक- मार्क हिंगलिस अशांची भेट घडवून देतात. अशा मोठय़ा माणसांना ऐकणं, बघणं, सारंच अपूर्व! मुलांना मिळते प्रचंड ऊर्जा, सकारात्मक विचार मिळतात. मुलं किती तरी मोठी होतात.
कधी कधी काही मुलांचे पालकही सहभागी होतात. पण काही मुलं परस्पर बजावतात, ‘पेरंटस् नॉट अलाऊड.’ पालक सांगतात, ‘आमची मुलं खूप बदलली. त्यांच्यातील वेगळेपण आम्हाला जाणवते. ती अभ्यासात जराही मागे नाहीत. आम्हाला सोडून एकटी राहतात. खाण्यापिण्याचे हट्ट, हवं नको सारं कमी झालंय. वेळ पाळणं, ठरावीक वेळेत ठरावीक काम करणं, स्वत:ची कामं स्वत: करायला ती शिकली.’ अनयची आई सांगते, ‘आम्हीही खूप प्रवास करतो. अगदी लांबचा प्रवास असला तरी अनय स्वत:च लागणाऱ्या वस्तूंची यादी बनवतो. त्यांचे गट करणं, पॅकिंग करणं, स्वत:ची बॅग स्वत:च भरणं. उचलणं सारं तोच करतो.’ श्रेयाची आई सांगते, ‘आमच्या श्रेयाला मुलांची आवड. इथे तिला भेटतात वेगळय़ा वयांची वेगळय़ा शाळांतून, माध्यमांतून शिकणारी मुलं. त्यांच्याबरोबर जुळवून घेणं, मैत्री करणं तिला जमतं. त्यातून ती इतरांचा विचार करायला शिकली. इतरांना सांभाळून घेणं, मदत करणं हा तिचा स्वभाव बनला. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेणारी बिनधास्त श्रेया इतरांकडे पाहून तेवढीच हळवी होते,’ संध्या सांगते, ‘एकदा तर आमच्याबरोबर एक मंदबुद्धी मुलगी आली होती. तिला सर्वानी वर सांभाळून नेलं. डोंगराच्या माथ्यांवर, मोठय़ा शिळेवर भन्नाट वाहणाऱ्या वाऱ्यानं तिचा सुखावलेला चेहरा, तिला झालेला आनंद ती शब्दांत व्यक्त करू शकत नव्हती. पण मुलांना तो जाणवला. त्यांनी तो फोटोत बंदिस्त केला. मुलं निसर्ग वाचवायला शिकली. निसर्गाचा भेदभाव न करता मुक्तपणे उधळण करण्याचा गुण त्यांना लागला. कोणतीही जाहिरात न करता एकाच्या ओढीनं दुसरा, तिसरा करत अनेक जण गेली काही र्वष सातत्यानं आमच्याबरोबर येतात. कोणी इतरांबरोबर आणखी मोठे कॅम्प करतात.’
 आत्माराम परब ज्यांनी आतापर्यंत १०० वेळा पर्यटकांना लेह-लडाखला नेलं आहे. ते रेणू गावस्करांच्या मुलांना आवर्जून छोटय़ा ट्रेकला नेतात. माणसांनी नाकारलेली, पालकांनीही झिडकारलेली, काही जण तर घरापासून दूर राहणारी. त्यांना कपडे, खाऊ देण्यापेक्षा ते निसर्गाची भ्रमंती करायला नेतात. कारण निसर्गासारखा मोठा दाता नाही, गुरू नाही. कोणत्याही शाळेत शिकवले जाणारे, शिकवता न येणारे तो शिकवत असतो. त्याच्या सान्निध्यात आल्यावर मुलं मस्ती विसरतात, पण मोकळी होऊन बोलू लागतात.
संध्या, तिचे सारे सहकारी ट्रेकपूर्वी प्रचंड व्यस्त असतात. मुलांना भरभरून देण्याची जय्यत तयारी सुरू असते. जंगल, राहुटय़ातल्या रात्रीपण वेगळय़ा असतात. गप्पा, गाणी, गोष्टी, विनोदी चुटके, वैज्ञानिक माहिती, चालू घडामोडींवर चर्चा. दिवसभर दमलेली मुलं रात्री हे सारं एन्जॉय करतात. आता तर ती पण तयारीनं येतात. चढाओढीनं प्रत्येकाला काही सांगायचं असतं त्यांना.
संध्याला स्वत:ला थिएटरचा अनुभव! म्हणूनच ती सांगते, ‘मुलांनो, काही ऐकवण्यापेक्षा अनेक उतारे, स्वगत, नाटुकली त्यांना शिकवणं, पाठ करून घेणं, नाटय़रूपात सादर करवून घेणं चांगलं. मुलं ती भूमिका जगतात. त्यांच्या मनात कोऱ्या पाटीवर ते सारच मोठं, विशाल, भव्य-दिव्य असतं. हे सारं करताना मुलाचं मूलपण जपायचं असतं. अकाली प्रौढपण त्यांना येऊ नये. म्हणून!’
आपण हल्ली तक्रार करतो. घरातला संवाद संपल्याची. आई-बाबा-मुलं एकमेकांना भेटत नाहीत. एकमेकांशी बोलत नाहीत यावर तिनं तिच्यापरीनं उपाय शोधलाय. तेजस १२ तासांच्या गुरुकुल शाळेत जातो. अशा शाळांत पालकांच्या मदतीची गरज असते. कोणत्याही इनडोअर वा आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीत ती सहभागी होतेच, पण ‘नाटय़ाभिनय अभिव्यक्ती’ हा शाळेतला विषय ती शिकवते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणि कौतुकाचं ती तेजसला रोज पत्र लिहिते, त्याला त्याच्या डब्यातून ही चिठ्ठी शाळेत पोचते. त्यात अनेक गोष्टी असतात. त्या पत्राचं मग वर्गातले त्याचे मित्र सामूहिक वाचन करतात. कधी त्या मायलेकांच्या गप्पा असतात. कधी दिलेली समज, केलेलं कौतुक. गेली ३ र्वष सातत्यानं अशी पत्रं लिहिणं सोपी गोष्ट नाही. मी ती पाहिली-वाचली. तिला सुचवलं, याचं ंपुस्तक काढ. ज्यांना स्वत:ला लिहिता येत नाही तेही पत्र वापरतील त्यांच्या मुलांसाठी. पत्रं बनतील एक बंधन- दोघांना जवळ आणणारी साखळी!
बघा, तुम्हाला काय सुचतंय, काय करता येतंय? एक मात्र नक्की हय़ा गोष्टी तुम्हालाच करायला हव्यात. पालक किंवा महापालक म्हणून ‘पूर्वीसारखं काही राहिलं नाही. सारं बदललं’, असं केवळ म्हणत न राहता बदललेल्या काळाची पावलं ओळखून स्वत:ला बदललं. मुलांना मोठ्ठं जग दाखवण्याची तळमळ ठेवलीत तर सारं काही जमेल. तेव्हा लवकर सुरुवात करा! तुम्हाला आपोआप सोबती भेटतील!  
संपर्क : संध्या ओक -sandhyaoka@gmail.com