20 September 2020

News Flash

निरामय घरटं : निचरा भावनिक साचलेपणाचा!

शरीराप्रमाणेच मनाचीही स्वच्छता नियमितपणे, स्वत:हून करायची मूलभूत सवय लावूया.

निचरा होणं किंवा करून घेणं, ही पण एक गरज आहे.

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

वेळच्या वेळी आणि योग्य मार्गानं अनावश्यक बाबी शरीरातून आणि मनातूनही रिकाम्या होऊ शकल्या नाहीत, तर गळू ठसठसावं तसा ठणका लागू शकतो. त्यामुळे निचरा होणं किंवा करून घेणं, ही पण एक गरज आहे. बालपणीच्या रडण्यापासून ते म्हातारपणी स्मरणरंजनात रमण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे हा निचरा होऊ शकतो. शरीराप्रमाणेच मनाचीही स्वच्छता नियमितपणे, स्वत:हून करायची मूलभूत सवय लावूया. घरटय़ातल्या साचलेपणाला जायला वाट मोकळी करू या.

चार-पाच वर्षांची सावनी काहीही कारण नसताना रडत होती. घरातले सगळे तिला काय झालं म्हणून विचारत होते. आपापल्या परीनं तर्क लढवत तिचं रडणं थांबण्यासाठी युक्त्या शोधत होते. सावनी कशाला दाद देत नव्हती. काही मुलं रडत रडत थांबून मध्ये बोलू शकतात. तसं शेवटी सावनी म्हणाली, ‘‘पण मला बरं वाटतं रडलं की!’’. लहान मुलालासुद्धा कळू शकतं आपल्याला काय केलं की बरं वाटतं. लक्ष वेधून घेण्यासाठी रडणं, आकांडतांडव करत रडणं, यापेक्षा वेगळं होतं सावनीचं रडणं. मोठय़ांनाच हे समजून घ्यायला कदाचित वेळ लागू शकतो. स्वत:त डोकावून पहिलं तर उलगडायला लागेल बहुतेक!

लहान वयात होते तशी कधी चिडचिड झाली की प्रांजली स्वत:हून थोडा वेळ पेटी वाजवायची. तिला शांत वाटलं की परत घरात वावरायला सुरुवात करायची. अनिरुद्ध अनेक र्वष घरापासून लांब राहिला. आधी शिक्षणासाठी वसतिगृहात, मग नोकरी, ती तर परप्रांतात. घरापासून लांब राहायची सवय झाली तरी कधी एकटेपणा गडद वाटला तर लांब चालायला गेल्यावर आपल्याला बरं वाटतं, असं त्याचं त्याला जाणवलं. भावनांचा समतोल सांभाळायची सहज योजना माणसात अंगभूतच आहे. विविध वयात ती वयाजोगी, काळानुरूप प्रकट होते. याबाबत वरच्या उदाहरणांसारखे आपले स्वत:चे अनुभव आठवू शकतो.

‘निराशेतून आशेकडे’ (४ जुलै) या लेखात आपण पाहिलं, की उदास, खिन्न वाटणं, वैतागणं, राग येणं या स्वाभाविक भावना आहेत. त्या डोकं वर काढणार. पण जेव्हा एखादी नकारात्मक भावना तिच्या सामान्य आवाक्यापेक्षा तीव्रतेनं वरचेवर जाणवायला लागते, तेव्हा लक्ष देण्याची गरज आहे हे समजावं. अशा वेळी मन:स्वास्थ्य परत मिळवण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक यांचा सल्ला घेणं हा योग्य पर्याय आहे. खोलवर रुतून बसलेली शल्यं दूर करणं सोपं नसलं तरी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्यावर सातत्यानं काम करत गुंता सोडवता येतो. काही गंभीर समस्या घेऊन व्यक्ती समुपदेशनसाठी येतात, तेव्हा त्या समस्येचे एक एक पदर सुटे करत जावं लागतं. कधी रुतून बसलेलं एखादं शल्य लहानपणी घडलेल्या कटू प्रसंगांपर्यंत धागा जोडतं. कधी मनाला झालेली जखम आपोआप भरलेली नसते. अशा वेळी निचरा होईल अशी मदत देणं अत्यावश्यक असतं. साचलेलं वाहून देण्याबरोबरच व्यक्तीला स्वत:कडे अलिप्तपणे बघायला शिकवणं, दुखरी-खुपरी शल्यं वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची ताकद त्या व्यक्तीला देणं, हा प्रयत्न समुपदेशनाच्या प्रक्रियेत असतो.

कुटुंबातले कलह, चिघळलेले नातेसंबंध, कुटुंबाच्या पातळीवर समेट करायला कु णी बांधील नसणं, घटस्फोट हा उभयतांना सुटकेचा निश्वास वाटणं, एकल पालकत्वातले ताण, तरुण मुलामुलींनी भान सोडून वागल्यानं पूर्ण कुटुंबावर ओढवलेल्या समस्या, व्यसनाधीनता, आत्महत्येचा प्रयत्न अशा अनंत मानसिक व्यथा त्यातली दुर्मीळता गमावून बसल्या आहेत. अशा घटना कानावर येण्याची वारंवारिता गेल्या काही वर्षांत शहरी सुशिक्षित कुटुंबांमध्ये वाढलेली जाणवते. यांसारख्या समस्यांसाठी समुपदेशन घ्यायची जागरूकता शहरांमध्ये वाढत असल्याचंही निदर्शनास येतं. पण त्याआधी मानसिक आरोग्य बिघडू न देणं ही पायरी अत्यंत महत्त्वाची आहे ती गाळून चालणार नाही आणि त्यासाठी त्याचं भान येणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे.

मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी जी पायरी गाळलेली नाही त्याची काही उदाहरणं आपण वर पाहिली. भावनांची तीव्रता वाढली तरी आपल्या मनाचं संतुलन परत मिळवायला कसं जमतं ते स्वत:च शोधून ठोस पावलं उचलणं, ही ती पहिली पायरी. आपणही आपापली तंत्रं विकसित केली असतील, त्याचा जरूर विचार करू या. त्याचबरोबर, निचरा होऊ देण्याची हक्काची जागा म्हणून आपली कुटुंबव्यवस्था आणि आधाराचं जाळं, याचा खूप मोठा वाटा आहे. आपलं घरटं एकमेकांना आश्वस्त करणारं आहे ना? आपल्या घरटय़ाची ऊब इतरांपर्यंत पोहोचली आहे का, तेही आठवून पाहायला हवं.

माईंचं घर त्यांच्या नातेवाईकांनाच नाही, तर परिचितांनाही मायेचं घर वाटतं. वात्सल्याचा अनुभव तिथे वातावरणातही जाणवतो. त्यांच्याकडे काही प्रत्येक अडचणीवर उपाय नसतो, पण अधूनमधून माईंना भेटलं की बरं वाटतं. असं आपलं कु णाशी नातं आहे का? आपल्याशी कु णी असा संपर्क करतं का? सध्याच्या काळात ते प्रत्यक्ष भेटणं नसेलही, संवादाचं माध्यम वेगवेगळं असेल. पण अशा कारणांसाठी आपल्या व्यग्र दिनक्रमातून आपल्याला वेळ काढता येतो का? कु णाच्या दु:खाचं ओझं आपल्याला अंगावर घेता येतं का? टीका न करता खुला स्वीकार असतो का?, तसंच आडपडदा न ठेवता आपण आपलं मन कुठे रितं करू शकतो का? एकीकडे स्वत:च्या मनाची पारदर्शकता आणि दुसऱ्याच्या मनातला साचलेपणा वाहून जाऊन दुसऱ्याला नितळ तळ दिसण्यासाठी आपली शांत सोबत करता येणं, ही दोन्ही मनाच्या विशालतेची लक्षणं आहेत. निचरा होण्यासाठी अशा समृद्ध मनांची जोडणी निकडीची आहे.

पूर्वीच्या काळी रोजच्या व्यवहारातही निचरा होऊन जाईल असा सहजी समावेश सामान्यपणे पाळल्या जाणाऱ्या समग्र दिनचर्येत होता. शारीरिक कामातून रग निघणं आणि कलेतून ताण हलका होणं, यांनी समतोल साधायला वेळच्या वेळी संधी होती. ती घरातच आणि सगळ्यांना आपसूकच मिळायची. दळण-कांडणात शारीरिक कष्ट आणि मिळून काम करत ओव्या गुणगुणताना कला यांचा सुंदर मिलाफ ही एक कार्यसंस्कृती होती. काळानुरूप बदल झाले, तरी कलेचं आणि शारीरिक श्रमाचं आपल्या जीवनातलं स्थान आपण नक्कीच सांभाळू शकतो. शक्य तेव्हा, शक्य होईल तोपर्यंत लिफ्टच्या ऐवजी जिन्यांचा वापर करून बघता येईल.  जिना उतरता उतरता शारीरिक हालचालीतून आतला वैताग शरीराच्या बाहेर पडायची वाट शोधेल. कला ही बघ्याच्या भूमिकेपलीकडे जाऊन अनुभवणं आवश्यक. स्वत:च कलानिर्मिती करण्यानं मनावरचा ताण हलका होईल. मग तुम्ही चित्रकार असायची गरज नाही. वेगळा वेळ चित्रकलेसाठी काढण्याची किंवा पूर्वतयारीची पण गरज नाही. समोरच्या पाठकोऱ्या कागदावर रेघोटय़ा काढण्यापासून ते आंघोळीला सुरुवात करण्याच्या आधी बादलीतल्या पाण्यात बोटं फिरवणं, असं कुठेही चित्र साकारता येऊ शकतं. पोळ्यांसाठी कणीक भिजवल्यावर मुलांना त्यातली थोडी कणीक खेळायला देणं, धान्यात हात घालू देणं, हेही ताण मुक्त करणारं असतं. स्वत:चा गळा मोकळा केल्याशिवाय कोंडलेल्या भावना मोकळ्या कशा होणार?

मुलांना कधी वेगवेगळे आवाज काढायला आवडतात. त्यांची ऊर्जा बाहेर पडण्याचं तेही एक साधन असतं. कधी उडय़ा मारणं, घरातली वेगवेगळी कामं खेळ म्हणून करणं, अशा गोष्टी मुलं आपणहून करतात. मुलांनापण स्वत:हून स्वत:ला सावरायचं असतं. यासाठी अवकाश देणं, ही घराची मोठी देणगी ठरते आहे. मुलांमध्ये भावना पेलण्यासाठीची स्वयंपूर्णता येणं हे स्वावलंबनाचं महत्त्वाचं अंग आहे. एखाद्याला मळमळत असलं तर म्हणतात, की  उलटी झाली की बरं वाटेल. तसंच मनाचंही असतं. दरवेळी तात्पुरतं दडपण्यापेक्षा वाहून जाणं ही गरज मानावी. प्रत्येकाला बोलल्यावरच बरं वाटतं असं मात्र नाही. प्रत्येक मूल वेगळ्या प्रकारे व्यक्त होतं. कु णी अबोल राहून स्वत:शी केलेल्या संवादातून शांत होईल. काही मुलं दैनंदिनी लिहितात. ती त्यांना कु णाला दाखवायची नसते. कुमारवयातल्या त्यांच्या खासगी व्यथा, स्वप्नं, मनाची दोलायमान अवस्था याची ती एकमेव साक्षीदार, जिवाभावाची सखी असते.

मानसशास्त्रात ‘कॅथारसिस’ अशी एक संकल्पना मानसोपचारातील एक तंत्र म्हणूनही वापरलं जातं. मनात दाटलेल्या तीव्र भावनांना समाजमान्य अशा वेगवेगळ्या मार्गानी मोकळी वाट करणं असा त्याचा साधा अर्थ सांगता येईल. काही वेळा एखादी प्रसिद्ध कलाकृती एखाद्या व्यक्तीनं स्वत:च्या भावनांना वाट देण्यासाठी केलेली उत्स्फूर्त अभिव्यक्ती असू शकते. कदाचित उत्तम कलाकृती निर्मिती असा त्यात पूर्वहेतू नसतोही.  पण प्रत्यक्षात मात्र ती त्याच व्यक्तीसाठी नाही, तर अनेकांना आपली कहाणी वाटून जाते. कु णाला निचरा करून द्यायला मदतसुद्धा करते. ‘अरे संसार संसार’ अशा सोप्या, ओघवत्या वाणीत बहिणाबाईंनी कित्येक संसारी जीवांना हलकं वाटायला शब्दवाट तयार करून दिली जणू. मुळात निकड म्हणून दैनंदिनीत केलेला भावनांचा निचरा म्हणजे ‘डायरी ऑफ अ‍ॅन फ्रँ क’ नंतर जगभरात अनेक भाषांत भाषांतरित झालेली साहित्यकृती ठरली.

मनात दाटलेल्या भावभावनांच्या कल्लोळाचा निचरा योग्य तऱ्हेनं होणं ही माणसाची निकड आहे. फक्त साचलेलं वाहून जाण्यापलीकडे त्याचे काय पडसाद आपल्या भावतरंगांवर पडले आहेत, याची तटस्थ, नवी समज येण्यासाठी निचरा होणं अत्यावश्यक. हे जाणून आपल्या घरटय़ात या पारखण्याला यथायोग्य स्थान देणं महत्त्वाचं आहे. त्यात लाज वाटण्याचं कारण नाही. वेगवेगळ्या वयात, वेगवेगळ्या कारणांसाठी तशी गरज लागू शकते. कु णाला खूप मोठय़ा हादऱ्यानंतर, प्रदीर्घ सोसल्यानंतरच लागेल, कु णाला रोजच्या छोटय़ा-मोठय़ा अडचणींसाठीही ही आवश्यकता भासेल. ताण, दु:ख, अनिश्चितता सहन करण्याची शक्ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. लहानपणापासून स्वत:च्या भावनांची जाण आली, त्यांचं व्यवस्थापन करण्याची सवय जडली, तर वेळप्रसंगी चिखलात अडकल्यासारखं वाटलं तरी स्वत:ला बाहेर पडायचं आहे हे पक्कं ठाऊक असतं. स्वत:च स्वत:चे उपचार करण्यापासून आवश्यक ती मदत घेण्याची कसर न ठेवणं, असा आपल्या घरटय़ाचा बाज ठेवायला हवा. जगण्याची शैली म्हणून साचलेला गाळ काढून नितळतेची कास धरूया. आपलं घरटं परस्परांसाठी मोकळं व्हायला उबदार मायेचा आसरा बनवू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2020 5:53 am

Web Title: express your emotions niramay gharta dd70
Next Stories
1 प्रत्येक जीव मोलाचा
2 आम्ही शिक्षक!
3 शिक्षक घडवणाऱ्या ‘शाळा’
Just Now!
X