19 September 2020

News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : प्रपंच करावा नेटका?

घर बदलताना सामान भरायला घेतलेल्या मंजिरीची अवस्था संसाराच्या महाभारतातल्या अर्जुनासारखी झाली होती.

छोटय़ाशा वारुळामधून एकेक मुंगी बाहेर येत-येत समोर मुंग्यांची भलीमोठी रांग दिसावी तसं घरातून सामानाचं एकेक पोतं, खोकं, पेटी, गाठोडं असं बाहेर येत गेलं.

मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

घर बदलताना सामान भरायला घेतलेल्या मंजिरीची अवस्था संसाराच्या महाभारतातल्या अर्जुनासारखी झाली होती. अर्जुनाला प्रश्न पडला होता, की समोरचे सगळे माझेच आप्त. कुणाला मारू आणि कुणाला सोडू? मंजिरीचा प्रश्नही काहीसा तसाच होता, समोरचं सगळं सामान या ना त्या संदर्भानं माझंच. ‘जपण्यासाठी जन्म आपुला’ असं असताना काय सांभाळू आणि काय दूर लोटू? मग उत्तरासाठी तिनं सरळ वत्सलावहिनींच्या ‘व्वा हेल्पलाइन’ला फोन लावला.

छोटय़ाशा वारुळामधून एकेक मुंगी बाहेर येत-येत समोर मुंग्यांची भलीमोठी रांग दिसावी तसं घरातून सामानाचं एकेक पोतं, खोकं, पेटी, गाठोडं असं बाहेर येत गेलं. नजर टाकावी तिथे फक्त सामान आणि सामानच दिसू लागलं, तसा मधू दचकला. आपल्या एवढय़ाशा घरात एवढं सामान? कबूल आहे, घरातलं शेल्फ, कपाटं, फळ्या, माळे, सगळं भरलं होतं. तरी एवढा पसारा? कुठे, कसा मावला? की मंजिरी भिंतींमध्ये चिणून ठेवत होती तिचे डबेडुबे, बरण्याफिरण्या? ठेवेल बुवा. तिचा काही नेम नाही. हव्यासच फार बयेला. नाही तर मी बघा! कसा सुटसुटीत माणूस. मधूनं टी-शर्टाला नसलेली कॉलर ताठ करत स्वत:शीच म्हटलं. तो स्वत:वर खूश असला की (- म्हणजे नेहमीच) बनियनचीही कॉलर टाइट करू शकायचा; पण तूर्तास मात्र या जगड्व्याळ पसाऱ्यापुढे त्याची हवाच टाइट झाली होती. हे एवढं सगळं इथून नव्या फ्लॅटमध्ये धड न्यायचं, मांडायचं, म्हणजे चेष्टा नव्हती.

तो धसकून म्हणाला, ‘‘अगं मंजिरी, हे सामान बांधणं संपणार कधी?’’

‘‘आले रे. हा संगमरवरी खल फुटायला नको म्हणून जरा जपून आणत्येय ना..’’ मंजिरीनं बोलत-बोलत प्रवेश केला. तिनं हातात वेलदोडे, केशर वगैरे खलण्याचा संगमरवरी खल एखाद्या ट्रॉफीसारखा कौतुकानं धरलेला होता. तो खल आणि ते कौतुक बघून मधू खेकसला, ‘‘आता हा सुद्धा घेऊन जायचाय नव्या घरी? क्रशर, ग्राइंडर, मिक्सर, फूड प्रोसेसर, असं सगळं आहे ना आपल्याकडे?’’

‘‘ते त्यांच्या जागी. खल आपल्या जागी. आजीनं खास पाथरवटाकडून बनवून घेतला होता रे माझ्यासाठी. वेलदोडय़ाची अशी बारीक पूड होते ना.. डोळ्यात गेली तरी बोचणार नाही.’’ मंजिरी.

‘‘तुझ्याकडच्यांची खलप्रवृत्ती काय मला माहीत नाही? आणि वेलदोडय़ाची पूड डोळ्यात का घालतात तुमच्याकडे? मग श्रीखंडाला काय काजळ लावता की काय?’’ वैतागाच्या भरात मधू अंमळ विनोदीच बोलला, पण मंजिरीनं त्याकडे दुर्लक्ष करत त्याला समजावलं, ‘‘अरे, असं काय करतोस? आपल्या एवढय़ा भरल्या गाडय़ाला त्या खलाचं आणि या सुपांचं का ओझं होणारे?’’

‘‘आणखी सूप?  मगाच्या ट्रकफेरीत पोत्यातून चार सुपं गेलीयेत पुढे. गेल्या चार वर्षांमध्ये सुपात चार दाणे घेऊन पाखडताना तुला पाहिलं नाही कधी.’’ मधू म्हणाला.

‘‘होतील अधूनमधून माझ्यावर आग पाखडायला. अरे, आपल्याला एक मुलगी आहे. तिचं एकदा लग्न होईल. लग्नानंतर सूप वाजवावं लागेल. आताच्या मुलींना डिझायनर सूपबीप लागणार. म्हणून ती व्हरायटी ठेवलीये घरात. तिच्या शालूच्या मॅचिंग रंगात सूप रंगवून घेतलं की झालं ना काम? याला म्हणतात दूरदृष्टी.’’ मंजिरीचं स्पष्टीकरण.

‘‘वंडरफुल! असं जमवत जमवत घराचं पुराणवस्तू संग्रहालय केलं आहेस तू.  या घरात राहायला आलो तेव्हा एका रिक्षातून सामान आणलं होतं आपण. या खेपेला ट्रकची तिसरी फेरी व्हायची वेळ आलीये. तांब्याच्या बंबाच्या जाळीपासून गीझपर्यंत, चांदीच्या फुल्या कोपऱ्यावर बसवलेल्या लाकडी पाटांपासून ‘बीनबॅग चेअर्स’पर्यंत. काय पसारा घातलायस तू! भांडीकुंडी तुझी. कपडेलत्ते तुझे. चादरी-पडदे तुझे. भिंती-खिडक्या तुझ्या. कडय़ाकुलपं तुझी.. किती काय घेणार उरावर?’’

गेल्या अडीच दशकांच्या संसारात ‘मी-तूपण सारे विसरून’ मधू इतका मिसळून गेला होता, की घरातल्या कोणत्याही गोष्टीच्या असण्याला, नसण्याला फक्त आणि फक्त मंजिरीच जबाबदार आहे असं त्याला वाटे. ‘तू-तू’ करता-करता अलीकडे तो आपल्या आईचाही उल्लेख ‘तुझी सासू’ असाच तिच्यासमोर करे. आताही वैतागाच्या परमावधीत त्यानं ‘‘आता तू आणि तुझा मनोज निस्तरा थोडा वेळ,’’ असं म्हणून नाक्यावरच्या पानवाल्याकडे जाऊन दोन-चार झुरके मारण्यासाठी बुटात पाय सरकवले (किंवा पायात बूट सरकवले). एकूण डोकं सरकलं असल्यानं, कशात काय सरकवलंय हे त्यालाही कळलं नाही.

बराचसा संसार भाडय़ाच्या छोटय़ा घरात झाला. आता मोठय़ा हौसेनं आणि भरभक्कम ‘ई.एम.आय.’ मोजून त्यांनी घसघशीत दोन बेडरूमचा फ्लॅट खरेदी केला होता. घेताना वाटलं होतं, आता जन्मभराची जागेची टंचाई संपली. जादाच्या त्या खोलीत अगदी डबा ऐसपैस नाही खेळलं तरी टेबल टेनिस तरी नक्कीच जमेल! पण ट्रकच्या सामान वाहण्याच्या पहिल्याच फेरीत घरच्या डबे-बाटल्यांनी ऐसपैस पसरून दाखवलं आणि हे घरही बघता बघता भरणार ही बाब डोळ्यांत भरली. मधू तणतणत घराबाहेर पडल्यावर मंजिरीनं ‘तिच्या’ मनोजला हाक मारली.

‘‘मनोज.. या बाजूला ठेवलेलं सामान आहे ना, या काचेच्या बाटल्या वगैरे, ते शेवटी आपल्या गाडीच्या डिकीतून न्यायचंय हं!’’

‘‘डिकी केव्हाच भरलीये आई.’’

‘‘तुझा बाबा रे! पसारा घालण्यात अट्टल.’’ मंजिरी.

‘‘कमॉन आई. बाबांमुळे या असल्या बाटल्या नाही ना गोळा होत? हळदी-तिखटाच्या, लोणचं-मुरंब्याच्या..’’

‘‘तो वेगळं सामान बाळगतो. आठवतंय? आठ दिवससुद्धा पोहायला गेला नसेल बाब्या; पण ऑलिम्पिक स्विमरला लागेल एवढं पोहण्याचं सामान, ‘अ‍ॅक्सेसऱ्या’ की काय ते, विकत घेऊन ठेवलंन्. पडलंय तिकडे. मी म्हटलं, पावसाळ्यात बाहेर जातानाही वापर तो पाण्यातला गॉगल, पण नाही. कॉलेजच्या क्रिकेट टीममधून खेळतानाची ती बॅट आणि कॅप. जन्मभर सांभाळलीये. मोजून १२ धावा केल्या होत्या म्हणे. तरी आपलं माझी कॅप, माझी कॅप.’’ मंजिरी चिडचिडली.

‘‘कारण हा तुमच्या जनरेशनचाच प्रॉब्लेम आहे. ‘थ्रो अवे कल्चर’च नाही तुमच्यात. दिसेल ते गोळा करत राहायचं. असू दे, असू दे, म्हणत राहायचं. आम्ही बघा, वस्तू नकोय? देतो फेकून. थ्रो अवे!’’ मनोज म्हणाला.

‘‘म्हणून मग सारखे पैसे फेकावे लागतात. प्रत्येक ट्रेकला जाताना नवे शूज घ्यावे लागतात तुला, कारण पहिले धड ठेवलेले सापडत नसतात. म्हणून तर पाय दोनच असले, तरी पायताणं निदान दोन डझन असतात तुमची प्रत्येकाची. आम्ही बै पैसे वाचवले! आता मोनाच्या लग्नातला सुपाचा खर्च माझ्याचमुळे वाचणार आहे ना? सुपंसुद्धा १००-१०० रुपयांना असतात हल्ली.’’ मंजिरी कहर कृतकृत्यतेनं म्हणाली. मोना नुकतीच इंजिनीयरिंगच्या पहिल्या वर्षांसाठी हॉस्टेलला गेली होती आणि तिच्या लग्नासाठी निदान सात-आठ लाख रुपयांची बेगमी करण्यामागे मधू लागला होता. तरी मंजिरी पैसे वाचवण्यात मग्नच!

‘‘अगं आई, सामानाच्या ट्रकच्या प्रत्येक जादा फेरीचे प्रत्येकी तीन-तीन हजार जास्त मोजावे लागणारेत आणि फूटवेअरचं म्हणशील तर ते ‘स्टाइल स्टेटमेंट’ असतं आई. तुला नाही कळणार.’’ मनोज हताशपणे म्हणाला.

एकूण काय, तर कुणाची स्टाइल, कुणाची भावना, कुणाची काटकसर, कुणाची दूरदृष्टी, कुणाचा हव्यास, कुणाचा आळस, अशा कशा ना कशामुळे घरामध्ये सामानात बेसुमार वाढ झाली होती. साहजिकपणे प्रत्येकाला दुसऱ्यानं गोळा केलेल्या वस्तू फालतू वाटत होत्या. मुळामध्ये आपल्यामुळे सामान वाढलेलंच नाहीये, डबे-भांडी शेल्फातल्या शेल्फात आपली आपण व्यायल्यासारखी वाढली असतील, असं मानायलाही मंजिरीची ‘ना’ नव्हती. मात्र जी ही काही अडगळ, पसारा असेल त्यातली काडीही गमावण्याची तिची काडीची तयारी नव्हती.

पण अखेरीस सगळी वरात नव्या फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर अगोदर खूप वेळ बऱ्याच गोष्टी सापडल्या नाहीत आणि शोधाशोधीअंती सापडलेला तो संगमरवरी खल- जो आजीनं खास मंजिरीसाठी पाथरवटाकडून बनवून घेतला होता तो, तुटलेला निघाला. त्या खलाला श्रद्धांजली वाहायची सोडून मधूनं नव्यानं मंजिरीवरच डाफरायला सुरुवात के ली.

‘‘हे बघ.. अति सामानामुळे हे असं होतं तुमचं. ऐन वेळेला हवी ती वस्तू सापडत नाही, सापडली तर वापरण्याजोगी  ‘वनपीस’ राहिलेली नसते, मग तुम्ही दु:ख करता.’’

इकडे खल फुटल्यानं मंजिरीच्या दिलाचेच हजार तुकडे झाल्याचं वातावरण आणि तिकडे नवऱ्याचा ‘तुम्ही-तुम्ही’ करत अवेळी उपदेश. मंजिरी टीव्हीवरच्या मालिकेतली खलनायिका असती तर तिनं तो खलच नवऱ्याच्या टाळक्यात हाणून प्रश्न, खल आणि नवरा असं सगळ्यांना हातासरशी संपवलं असतं;  पण ती पडली एक कौटुंबिक, ‘काऊन्सेलिंग’च्या काळातली बाई. साहजिकच तिला वत्सलावहिनींच्या सल्ल्याची आठवण झाली आणि तिनं त्यांना फोन लावला. रडक्या आवाजात विचारलं, ‘‘वत्सलावहिनी, आमच्या घरातलं सामान फार वाढलंय हो.’’

‘‘ तुम्ही अगदी आपलं ‘वजन वाढत चाललंय’ म्हणावं, तसं म्हणताय हो या वाढीबद्दल.’’ वत्सलावहिनी.

‘‘मग काय करू? वजन वाढलं तर फक्त आपल्या पायांनाच त्रास होतो ना हो किंवा फार तर बघणाऱ्याच्या डोळ्यांना.  घरातला पसारा वाढत गेला की सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो, जिकडेतिकडे गर्दी होते, वस्तूंची हरवाहरवी होते..’’

‘‘असं म्हणता? बरं. बाकी वयाबरोबर आपण आणि काळाबरोबर सामान वाढणं अगदीच नॉर्मल आहे बरं का. अहो, प्रपंच हा स्वभावत: प्रसरणशील असतो.’’ वत्सलावहिनी सांगत्या झाल्या.

‘‘ते शीलबिल सोडा हो. सगळ्या पसाऱ्याचं बिल घरातले लोक खुश्शाल माझ्यावर फाडतात ना, त्याचा त्रास होतो.’’ मंजिरी.

‘‘मग सोपंय. आपण त्रास करून घेऊ नये. सुरुवातीपासूनच आपला संसार आटोपशीर ठेवण्याचा प्रयत्न करावा. ‘आधी प्रपंच करावा नेटका..’ असं समर्थानी म्हटलंच आहे ना.’’

‘‘त्यांचं पुरे हो. स्वत: बोहल्यावरून पळून जायचं आणि मागच्या माणसांना सांगायचं, हे नीट करा, ते नेटकं करा. त्यांच्या आजीनं खास त्यांच्यासाठी बनवून दिलेला संगमरवरी खल फुटला असता म्हणजे कळलं असतं त्यांना!’’ मंजिरी वैतागत म्हणाली.  पण वत्सलावहिनी शांत होत्या. चुचकारत म्हणाल्या, ‘‘तुम्ही घरबिर बदलताय का?’’

‘‘तुम्ही कसं ओळखलंत?’’

‘‘सहसा त्या वेळी उपरती होते माणसाला. काहींना तर सर्वसंगपरित्यागही करावासा वाटतो.’’

‘‘खरंय. मला तर नेहमी वाटतं. मधूनं थप्पी लागलेल्या टी-शर्टस्चा, मनोजनं खेटरांचा, मोनानं शेकडो हेअरक्लिपा- हेअरबँण्डस्चा परित्याग करावा. मी ठेवत्येय ना सगळ्यांच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सांभाळून.’’

‘‘त्याबद्दल तुमच्या सत्तरीला ते आभाराचं भाषण करतील. वाटल्यास आम्ही लिहून देऊ ते. तोवरचं ‘लोडशेडिंग’चं एक तत्त्व सांगू का? हे बघा, जी वस्तू आपण गेल्या वर्षभरात वापरली नाही आणि पुढच्या वर्षभरात आपल्याला लागेल असं वाटत नाहीये, ती टाकून द्यायची.’’

‘‘कुठे?’’

‘‘कुठेही, कशीही; पण घराबाहेर घालवायची.’’

‘‘अशानं आमचा संगमरवरी खलही टाकावा लागेल.’’

‘‘तो गेला ना. त्याला पंचतत्त्वात विलीन होऊ द्या. वाटल्यास त्याच्यासाठी तुम्ही दोन मिनिटं शांतता पाळा; पण बाकी प्रत्येक या अटीत बसणारी वस्तू काळजावर दगड ठेवून काढून टाका. मन जड झालं, तरी घर हलकं होईल.’’

‘‘इश्श.. वस्तूवस्तूंत एवढय़ा आठवणी. कुणी दिलं, कधी दिलं, आपण हौसेनं आणलं, त्याच्यावर कुणाचा डोळा होता, मुलांच्या बालपणाशी काय निगडित होतं.. खजिनाच की आठवणींचा.’’

मंजिरीची अवस्था संसाराच्या महाभारतातल्या अर्जुनासारखी झाली होती. अर्जुनाला प्रश्न पडला होता, ‘‘समोरचे सगळे माझेच आप्त. कुणाला मारू? कुणाला सोडू?’’ तसाच हिचाही प्रश्न होता, ‘‘समोरचं सगळं सामान या ना त्या संदर्भानं माझंच. काय जोपासू? कशाला दूर लोटू?’’ पण वत्सलावहिनी ठाम होत्या. म्हणाल्या, ‘‘आठवणी ठेवायच्या तेवढय़ा ठेवा हो. वस्तू घालवत चला घराबाहेर. सतत वरचेवर ‘स्टॉकटेकिंग’ करायचं. गर्दी हटवायची.’’

‘‘आणि हे जमणार नसेल तर?’’ मंजिरी.

‘‘तर दर चार-पाच वर्षांनी घर बदला. प्रत्येक वेळी पसारा उघडय़ावर आला की वैराग्य येईल. थोडय़ा-थोडय़ा वस्तू काढून टाकल्या जातील, काही चोरीला जातील, काही हरवतील, काहींची हलवाहलवीत तोडमोड होईल. कशानं का होईना, बोजा हलका होईल. प्रपंच नेटका होईल. पटतंय का?’’

मंजिरीनं फोनवरच मान हलवली. या नियमामुळे मधूचं पोहण्याचं सामान, ऐतिहासिक क्रिकेट कॅप वगैरे हातोहात जाणार, या कल्पनेनं ती खूश झाली. बाकी तो सुप्रसिद्ध संगमरवरी खल तर ती गोंद, खळ, चिकटपट्टय़ा वगैरे लावून चिकटवण्याचा प्रयत्न करणारच होती. ‘जपण्यासाठी जन्म आपुला’ हा मंत्र काय उगाच जपला होता?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 1:01 am

Web Title: family counselling waa helpline dd70
Next Stories
1 अपयशाला भिडताना : जमाखर्च
2 निरामय घरटं : नित्य नेमे विसर्जन!
3 आक्रमकतेचा तळ शोधताना…
Just Now!
X