घटस्फोटासाठी हजारो जोडपी अटीतटीने कायदेशीर लढाई लढण्यासाठी न्यायालयाची पायरी चढतात. मनात द्वेष, सूड,अपमान, अपेक्षाभंग अशा अनेक नकारात्मक भावनांनी ग्रस्त असलेली ही जोडपी, एका बाजूला वर्तमानकाळातील चिंता तर दुसरीकडे भविष्यकाळाबद्दल अनिश्चितता याचं ओझं घेऊन वाटचाल करत असतात. यातल्या शंभराहून अधिक जोडप्यांनी नुकताच आपल्या नात्याला पुन्हा एकदा संधी देत नव्याने संसाराचा खेळ मांडण्याचा निर्णय घेतला आहे. या वाटचालीत समुपदेशकांची भूमिका विधायक होतीच, पण महत्त्वाची ठरली ती त्यांची आयुष्याला पुन्हा एकदा संधी देण्याची, आनंदाने जगण्याची तीव्र इच्छा.
एकदा का काच तडकली की ती सांधता येत नाही, तद्वत एकदा का नात्यात दरी निर्माण झाली की ती बुजवणं कठीण असतं, असं म्हणतात. असू शकेल. ती सांधणं कठीण नक्कीच असू शकेल पण अशक्य नाही, हे अलीकडेच शंभरापेक्षा जास्त जोडप्यांनी दाखवून दिले आहे. आणि त्याला आधार ठरलीय वांद्रे, मुंबई येथील कुटुंब न्यायालयातील समुपदेशन व्यवस्था!
मैथिली-राघव यांचा संसार सुखाने आणि सुरळीतपणे सुरू होता. तिला गाण्याची खूप आवड, पण मध्यमवर्गीय चौकटीत शिक्षण, नोकरी, लग्न यात ही आवड जोपासता आली नाही. लग्नानंतर राघवने तिच्या गाण्याला प्रोत्साहन दिले. त्यात ती इतकी गुंतली की एक वेळ अशी आली, की संसारापेक्षाही छंदाचे महत्त्व वाढले. त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. याची तिलाच जाणीव झाली आणि अपराधीपणाच्या जाणिवेने तिला ग्रासलं. त्यातूनच नवऱ्याला लग्नबंधनातून मुक्त करावं, त्यानं त्याचं आयुष्य नव्याने जगावं आणि आपण गाण्यात कोणत्याही अपराधी भावनेशिवाय बुडून जावं, यासाठी तिने त्याला तयार केलं. सहमतीने वेगळं होण्यासाठी दोघं न्यायालयात आले होते. दोघांनाही वाईट वाटत होतं. पण त्याचं दु:ख अधिक गहिरं होतं. त्याने ते मोकळेपणाने समुपदेशकाला सांगितले. तिच्यापासून दूर होण्याचा निर्णय त्याने तिच्या सुखासाठी नाइलाजाने घेतला होता. पण त्याचं मन तिच्यातच गुंतलं होतं. समुपदेशनात तिच्याकडूनही नवऱ्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त होत होती. त्याचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम आणि आदर लक्षात घेऊन हे जोडपं विभक्त होऊ नये हे कुणालाही वाटणारच. आपलं आवडतं करिअर करताना सहजीवनसुद्धा फुलवणे अवघड नाही. थोडी आणि योग्य ठिकाणी तडजोड केल्यास छंद व नाते दोन्ही सांभाळता येऊ शकतात, हे समुपदेशनात अशा पद्धतीने सांगितलं गेलं की दोघांनाही ते पटलं. व सहमतीने विभक्त होण्याऐवजी समंजसपणे एकमेकांना कायम साथ देण्यासाठी दोघांनीही पुन्हा हातात हात घालून वाटचालीस सुरुवात केली..
   समंजसपणा असल्यास नवरा-बायकोतील वाद विकोपाला जात नाहीत, पण याच समंजसपणाचा गैरफायदा एका जोडीदाराने जरी घेतल्यास दुसऱ्याला नाहक मनस्ताप भोगावा लागतो. उच्चपदस्थ नोकरी, त्यानुसार निवास, वाहन व इतर मुबलक सुविधा, भरपूर वेतन; खरंच दृष्ट लागावा असा जगन आणि आराधनाचा संसार. पण तिचा खर्चीक स्वभाव. सोयीसाठी तिला त्यानं क्रेडिट कार्ड घेऊन दिलं तर तिची बेफाम उधळपट्टी सुरू झाली. एकदा तर एका महिन्यात पगारापेक्षा बिलाची रक्कम जास्त आली. धावपळ करून तो महिना कसातरी पार पडला. त्याची पुनरावृत्ती जेव्हा व्हायला लागली तेव्हा मात्र स्फोट झाला. महिन्याला दोन लाख रुपये पगार असून महिनाअखेरीस उधार उसनवार करायला सुरुवात झाली तसं त्याने घरात बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली तर मॉलमधून आणलेल्या महागडय़ा वस्तू न वापरताच फेकून देण्याची तिची सवय त्याला कळली. आवश्यक नसलेल्या अनेक वस्तू धूळ खात पडल्या होत्या. मग भांडणं, आरडाओरडा असं नेहमीच व्हायला लागल्यावर त्याने तिला माहेरी नेऊन सोडलं. इच्छा नसतानासुद्धा तिच्यापासून सुटका व्हावी यासाठी न्यायालयात आल्याचं त्यानं सांगितलं. असं का घडलं याचा तटस्थपणे विचार करण्यास समुपदेशकाने प्रवृत्त केलं. धैर्याने चूक कबूल केल्यास परिस्थिती बदलू शकते ही आशा निर्माण केली. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री नवऱ्याला देण्यात ती यशस्वी झाली. पुन्हा क्रेडिट कार्ड वापरणार नाही. त्याला विचारूनच खर्च करेन, या अटीवर दोघांनी एकत्र राहायला सुरुवात केली. वस्तूंच्या अकारण हव्यासापोटी घराचं अर्थकारण कोलमडून जातं, हे तिने मन:पूर्वक कबूल केलं. एक संसार कोसळता कोसळता सावरला गेला.
हव्यास कोणत्याही प्रकारचा असला तरी त्याचा अतिरेक त्रासदायकच असतो. मी लोकप्रिय असावं. इतरांनी माझं कौतुक करावं. त्यासाठी कायम‘लाइम लाइट’ मध्ये राहण्याची धडपड माधव नेहमी करायचा. ऑफिसमध्ये सगळ्या कार्यक्रमात पुढाकार घ्यायचा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही चांगला करायचा. स्त्री सहकाऱ्यांमध्येही तो लोकप्रिय होऊ लागला आणि त्यातच एकीशी त्याची घट्ट मैत्री झाली. घराकडे दुर्लक्ष होऊ लागलं. पत्नीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. संशयकल्लोळ वाढत गेला. वाद विकोपाला गेला, ती रागाने घर सोडून गेली. पुन्हा त्याच्याबरोबर राहायचं नाही, यासाठी तिने न्यायालयात धाव घेतली. आरोपांच्या फैरी झडल्या. महिला सहकारी ही फक्त मैत्रीण आहे, ज्या अनेक घटानांचा तिने आरोप करताना आधार घेतला होता, त्या घटना केवळ गैरसमजावर आधारित आहेत हे त्यानं तिला पटवून दिलं. सुदैवाने त्याच्या मैत्रिणीनेही संशय दूर करण्यास सहकार्य केलं. उथळ व्यक्तिमत्त्व व लोकप्रियतेचा हव्यास या गोष्टी सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत हे त्यानं कबूल केलं. तिच्यावरील प्रेमाची खात्री तिला दिली. समुपदेशनामुळे गैरसमज दूर होण्यास मदत झाली, एकमेकांबद्दलचा विश्वास पुन्हा निर्माण झाला.
 मनवा-शेखरचं प्रकरण यापैकीच.  ‘मला आता तिचं तोंड बघण्याची इच्छा नाही, मला घटस्फोट हवाच आहे, कुठल्याही परिस्थितीत.  तिच्या घरच्यांनी माझं जगणं नकोसं करून टाकलं आहे.’’ तो तावातावाने बोलत होता. तिचं म्हणणं मात्र वेगळंच होतं. ‘‘आम्ही दोघेही नोकरी करतो. घरात बाळाचे आगमन झाले होते. त्याचे आई-वडील गावी राहायचे. आमच्याकडे येऊन राहण्याची त्यांची मानसिक तयारी नव्हती. अशा अडचणीच्या वेळी माझ्या आईवडिलांनी आम्हाला मदत व्हावी म्हणून आमच्याकडे काही दिवस राहायचं ठरवलं. ते आमच्या संसाराला वळण लागावं, घडी बसावी म्हणून सूचना करायचे; त्यावरून आईवडिलांशी त्याचे खटके उडायचे. त्याचं पर्यवसान भांडणात व्हायचं. शेवटी आम्ही वेगळे झालो.’’ खरं तर तिची घटस्फोटासाठी अजिबात तयारी नव्हती. हा एकच धागा त्यांचा संसार पुन्हा सुरू करण्यास पुष्कळ होता. दोघांबरोबर समुपदेशनाच्या अनेक सत्रांत प्रदीर्घ चर्चा झाल्या. दोघांच्याही मनोभूमिकेत बदल होत गेला. तिच्या आईवडिलांचा हेतू चांगला होता हे त्याला पटलं,  तर आईवडिलांची भूमिका काही वेळा हट्टी होती हे तिने मान्य केलं. घटस्फोटासाठी आग्रही असलेला नवरा पत्नी व मुलाला आनंदाने घरी घेऊन गेला. जाताना सासू-सासऱ्यांच्या पाया पडायला विसरला नाही. मुलांच्या संसाराची अतिरेकी काळजी करणारे आईवडील, तर त्यांच्या काळजीला, प्रेमाला लुडबुड समजणारा जावई यांनी नातेसंबंधात एकमेकांना समजून घेण्याची तयारी दाखवली. मुलीने आईवडील व नवरा यांच्या नात्यात समतोल साधण्याची तयारी दाखवली. सन्माननीय तडजोड स्वीकारून दोघांनीही एकत्र राहायला सुरुवात केलीय.
ही आणि अशी असंख्य प्रकरणं. घटस्फोटाची अक्षरश: हजारो प्रकरणे राज्याच्या न्यायालयात दाखल होत असतात. प्रकरण घटस्फोटापर्यंत तेव्हा जातं जेव्हा नवरा-बायकोला, दोघांना किंवा त्याच्यातल्या एकाला त्या नात्याचा तिरस्कार वाटायला लागलेला असतो. या नात्याला काही भविष्य नाही ही जाणीव झालेली असते. त्याआधी कदाचित दोघांनीही आपले नाते टिकवण्याचा मनापासून प्रयत्न केलेला असतो, पण अनेकदा ते साध्य होतच असं नाही. आणि मग नातं दुभंगायला सुरुवात होते. एकेका घटनांनी, बोलण्याने ते अंतर वाढत जातं आणि एकत्र राहणं शक्य नाही या निष्कर्षांप्रत येऊन जोडपं घटस्फोटाच्या दिशेने वाटचाल करू लागतं. अशाच त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या अनेक जोडप्यांची वाट कुटुंब न्यायालयातील समुपदेशकांकडे वळवली गेली आणि पुन्हा एकदा त्यांच्यातल्या नात्याला फुलायचा मार्ग मोकळा झाला. घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर समुपदेशकांकडे तुमची फेरी कुटुंब न्यायालयाने आता अपरिहार्य केली आहे. या वेळी होणाऱ्या चर्चेतून, स्पष्टीकरणातून, गैरसमजाच्या निराकरणातून अनेकदा प्रश्न सुटलेले आहेत आणि जोडपं पुन्हा एकदा नव्याने नांदायला लागलं आहे. हे नक्कीच सुचिन्ह आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंब न्यायालयात फक्त घटस्फोटच होतात, हा गैरसमज निदान या किंवा अशा घटनांनी दूर होईल आणि घटस्फोट घेऊ इच्छिणारे लोक आपल्या विचारापासून प्रवृत्त होण्याचा प्रयत्न करतील म्हणून नुकताच अशा घटस्फोटाचा विचार बाजूला सारून नव्याने संसार मांडणाऱ्या शंभरापेक्षा अधिक जोडप्यांचा वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात सभारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. आज महाराष्ट्र राज्यातील सर्व कुटुंब न्यायालयांमध्ये समुपदेशनाची सेवा उपलब्ध असून येथे व्यावसायिक, प्रशिक्षित विवाह समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैवाहिक विवादांमध्ये समेट-तडजोड होऊन दावे सामोपचाराने संपवण्यासाठी समुपदेशक सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे ही शंभरापेक्षा जास्त जोडपी, ज्यांनी आपल्या संसाराला पुन्हा एक संधी द्यायचं ठरवलं आहे.
    अशी अनेक जोडपी आहेत. त्यांच्या समस्यांचे स्वरूप, तीव्रता वेगवेगळी आहे. काही प्रकरणांमध्ये वर्तनविषयक समस्या आहेत, तर काही प्रकरणात लैंगिक, वैद्यकीय समस्या आहेत. व्यसनाधीनता, नातेवाइकांचा अतिरेकी हस्तक्षेप, आर्थिक अडचणी आहेत, राहण्याच्या जागेच्या अडचणी आहेत, नोकरी-व्यवसायातील असुरक्षितता, जीवघेणी स्पर्धा, स्थैर्याचा अभाव यामुळेही नातेसंबंधांवर दुष्परिणाम होत आहेत. ज्या प्रकरणांमध्ये समस्या सोडवण्याची मनाची तयारी आहे, वागणुकीत बदल करण्याची तयारी आहे व मुख्यत: नात्यामध्ये ओढ, आपुलकी, प्रेम टिकवून ठेवण्याची इच्छा आहे, अशा सर्व प्रकरणांत समुपदेशन नाते टिकविण्यासाठी, विवाह टिकविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. वैवाहिक वादविवाद हे सुरुवातीला क्षुल्लक व किरकोळ असतात. मात्र सुसंवादाच्या अभावामुळे एकमेकांना समजावून घेण्यात अडथळे येतात. त्यामुळे गैरसमज वाढीला लागतात. गैरसमजातून वाद उत्पन्न होतात, तीव्र प्रतिक्रिया तात्काळ देणे, भावनांच्या आवेगावर नियंत्रण ठेवण्यास अपयश येणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून न घेता त्या व्यक्तीला दोष देणे, वर्तनविषयक समस्या व मानसिक व लैंगिक आजार लपवून ठेवणे इतकेच नव्हे तर अशा आजारांवर / समस्यांवर योग्य तज्ज्ञांकडून उपचार घेण्यास नकार देणे यामुळे वादांचे पर्यवसान कटू भांडणांमध्ये होते. त्यात रुसवा-फुगवा, अबोला, शरीरसंबंध बंद करणे, एकमेकांच्या नातेवाइकांनी खोटय़ा प्रतिष्ठेसाठी आरोप-प्रत्यारोप करणे, त्यामुळे पती-पत्नी विभक्त राहण्याचा निर्णय घेतात. कोणत्याही नातेसंबंधामध्ये संवाद बंद झाल्यास त्याचे दुष्परिणाम म्हणून त्या नात्यांचा दु:खद अंत होऊ शकतो, हे आपण नेहमी लक्षात  ठेवले पाहिजे. बऱ्याचदा अनेक समस्यांमध्ये उपाययोजना उपलब्ध असूनही सामोपचाराने चर्चा करण्याची मानसिकता  नसल्याने असे नातेसंबंध संपुष्टात येऊ शकतात.
 आजच्या काळात स्त्रियांना आदर, समानता, निर्णयप्रक्रियेत बरोबरीचे स्थान दिलेच पाहिजे, हा तिचा हक्कच असतो, पण तथाकथित सुशिक्षित समाजातही दुटप्पीपणा, ढोंगीपणा यामुळे छुप्या पद्धतीने  स्त्रियांवर अन्याय करण्याची प्रवृत्ती आढळते. घर टिकविण्यासाठी व चालविण्यासाठी स्त्रियांनाच कष्ट व मेहनत करावी लागते. त्याबद्दल प्रत्येक घरात किमान कृतज्ञता व आदर व्यक्त करायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. घरकामात पुरुषांनी बरोबरीने जबाबदारी घ्यावी यासाठी मुलांवर घरकामाचे संस्कार झाले तर पुढे समस्या उद्भवणार नाहीत. घरकामाचे मूल्य रुपयांत ठरवता आले नाही तरी त्याबद्दल प्रतिष्ठा व मान गृहिणींना दिल्यास अनेक वैवाहिक विवाद टाळणे अशक्य नाही.
भारतामध्ये आजही कुटुंबसंस्था व विवाहसंस्था टिकून आहेत. आपल्याकडील कायदेसुद्धा कुटुंब व विवाहसंस्था सक्षम राहावी या दृष्टिकोनातून बनवले गेले आहेत. समाजाचे स्वास्थ्य कुटुंब व विवाहसंस्थेच्या सक्षमतेवर अवलंबून आहे. वैवाहिक विवाद वाढून कोर्टकचेरी करण्याची वेळ येण्याऐवजी वैवाहिक विवाद योग्य पद्धतीने सोडविणे शक्य आहे.  कुटुंब न्यायालय अंतर्गत असलेली ही विवाह समुपदेशक संघटना केवळ समुपदेशापर्यंत मर्यादित न राहता व्यापक सामाजिक हिताचा विचार करून विवाहोत्सुक तरुण-तरुणींसाठी विवाहपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करीत असते. नाती ही टिकवण्यासाठी असतात कारण ती टिकली तर तुमचं आयुष्य फुलतं. म्हणूनच कुटुंब न्यायालयातल्या या समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित होते.
वर उल्लेखलेल्या शंभरपेक्षा जास्त जोडप्याने स्वत:चा कोसळणारा संसार स्वत:च सावरायचं ठरवलं आहे, नात्याला नव्याने संधी देताना मागचा भूतकाळ विसरून, सगळे कटू आरोप-प्रत्यारोप विसरून त्यांना आता नव्याने खेळ मांडायचा आहे.
या सर्व पती-पत्नींना ‘नांदा सौख्यभरे’या शुभेच्छा!
(यातील व्यक्तींची नावे बदलली आहेत.)
(लेखक महाराष्ट्र राज्य विवाह समुपदेशक संघटना, मुंबईचे कोषाध्यक्ष आहेत.)