19 September 2020

News Flash

अपयशाला भिडताना : जमाखर्च

संसारात आपण जे लहानमोठे निर्णय घेतो त्याचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो.

आयुष्यातल्या इतर कोणत्याही निर्णयाप्रमाणे यातले काही निर्णय फायद्याचे ठरतात, तर काही सपशेल चुकतात.

योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

संसारात आपण जे लहानमोठे निर्णय घेतो त्याचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो. आयुष्यातल्या इतर कोणत्याही निर्णयाप्रमाणे यातले काही निर्णय फायद्याचे ठरतात, तर काही सपशेल चुकतात. जगण्याच्या एका टप्प्यावर थांबून मागे वळून पाहिलं, तर यातल्या प्रत्येक निर्णयाचं त्या वेळेच्या परिस्थितीप्रमाणे मूल्यमापन करता येईल. ते निर्णय आताच्या स्थितीत कसे ठरतील, याचाही विचार करता येईल. अनुभवांमधून गाठीशी आलेलं हे शहाणपण वारशासारखं पुढच्या पिढीकडे सोपवलं तर?

संध्याकाळी मैदानावर फेऱ्या मारून आपल्या नेहमीच्या बाकावर बसताना त्याचं लक्ष शेजारच्या बाकाकडे गेलं. त्याच्या अपेक्षेप्रमाणे आजही ते आजी-आजोबा तिथेच बसले होते. गेली अनेक र्वष संध्याकाळी ते आजी-आजोबाही नेमानं मैदानावर चालण्यासाठी येत असल्यामुळे त्यांची तशी ओळख होती.

गेला महिनाभर फक्त दोनच फेऱ्या मारून आजी-आजोबा बाकावर बसायचे. कधी शून्यात नजर लावून ते कसला तरी गहन विचार करायचे, तर कधी हळू आवाजात, पण त्वेषानं एकमेकांशी भांडायचे. कधी-कधी त्यांची चर्चा इतकी रंगायची, की अंधार झाला आहे याची जाणीवही त्यांना उशिरा व्हायची. दोन्ही बाकांमध्ये तसं थोडंसंच अंतर असल्यानं काही अर्धवट वाक्यं अधूनमधून त्याच्या कानावर पडायची; पण त्यातून त्याला कोणताच बोध व्हायचा नाही. मात्र एक गोष्ट होती, की आजी एका वहीत सतत काही तरी लिहीत असायच्या.

त्या भल्या मोठय़ा लाल वहीत आजी नेमकं काय लिहितात, याबद्दल त्याला कमालीची उत्सुकता होती. बाकावर बसताना तो नेहमीसारखा आजी-आजोबांकडे बघून हसला. त्यांनीही त्याला हसून प्रतिसाद दिला. तसं त्याचं लक्ष आजोबांच्या हातातल्या त्या उघडय़ा वहीकडे गेलं. तीच संधी साधून तो म्हणाला, ‘‘आजोबा, अक्षर मस्त आहे.’’ त्यावर आजींकडे बोट दाखवत आजोबा म्हणाले, ‘‘लिखाणकाम हे हिचं डिपार्टमेंट. माझी फक्त बडबड!’’

‘‘अरे वा, काय आत्मचरित्राचं लिखाण का?’’ त्यानं बोलता बोलता खडा टाकला. त्यावर मोठय़ानं हसत आजोबा म्हणाले, ‘‘आमचं तेवढं कर्तृत्व असतं तर मग किती तरी प्रश्न आपोआप मिटले असते. आम्ही फक्त आयुष्याचा जमाखर्च लिहितो आहे.’’

‘‘आयुष्याचा जमाखर्च?’’ आजोबांचं ते उत्तर ऐकून त्यानं प्रश्नार्थक चेहऱ्यानं विचारलं. तेव्हा आजोबांनी आजींकडे वळून पाहिलं. आजींनी मानेनंच होकार दिला. तसं आजोबा म्हणाले, ‘‘त्याचं असं आहे, की पुढच्या महिन्यात आमच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं घरी एक छोटेखानी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात घराच्या किल्लय़ा आणि आमचे सगळे व्यवहार आम्ही मुलगा, सून, मुलगी, जावई यांच्याकडे सोपवून निवृत्ती घेणार आहोत; पण त्या सगळ्या प्रकाराला फक्त ‘व्यवहार’ किंवा ‘वाटणी’ असं रूक्ष स्वरूप आम्हाला नको होतं. मग काय करावं, असा विचार करताना हिनं या वहीची कल्पना सुचवली. एक अशी वही ज्यात गेल्या चाळीस वर्षांच्या आमच्या संसारात आम्ही घेतलेल्या निर्णयांचा थोडक्यात लिहिलेला जमाखर्च असेल. म्हणजे आमच्या बरोबर आलेल्या आणि चुकलेल्याही निर्णयांचा लेखाजोखा.’’

त्यावर आजी म्हणाल्या, ‘‘म्हणजे कसं असतं, की घराच्या किल्लय़ा मिळाल्या, अधिकार मिळाले, म्हणजे सगळं अगदी सुरळीत होतं असं आपल्याला वाटतं; पण तसं नसतं. संसारात एखादी गोष्ट मिळणं वेगळं आणि मिळालेली गोष्ट राखणं वेगळं, हे मी स्वानुभवावरून सांगते. कित्येक गोष्टी अशा असतात, की ज्या वेळेवर कुणी सांगितल्या तर त्याचा मिळालेल्या गोष्टी राखण्यासाठी आणि नवं काही तरी मिळवण्यासाठी उपयोगच होतो. अर्थात सध्याच्या या काळात आम्हाला कोणताही उपदेशाचा डोस द्यायचा नाही, की मुलांच्या संसारात लुडबुड करायची नाही; पण बरंच काही सांगायचं आहे. कधीही बोलले न गेलेले, किंबहुना बोलण्यासाठी अवघड असणारे काही विषय पोहोचवायचे आहेत. म्हणून ठरवलं, की अशी वही तयार करावी.’’

‘‘वा! फारच छान.’’ त्यानं मोकळेपणानं दाद दिली. त्यावर आजोबा म्हणाले, ‘‘मलाही ही कल्पना आवडली. ती लगेच अमलात आणावी, असा विचार करून मी बाजारात वही आणण्यासाठी गेलो. तिथे ही जमाखर्च लिहिण्याची वही दिसली. ती पाहून वाटलं, की आपलं काम सोपं झालं. एका बाजूला जमेचं पान आहे, तिथे बरोबर आलेले निर्णय आणि त्यामुळे झालेले फायदे लिहू, तर दुसऱ्या बाजूला जिथे खर्चाचं पान आहे, तिथे चुकलेले निर्णय आणि त्यामुळे बसलेले फटके, याची माहिती लिहू; पण इथूनच सगळ्या घोळाला सुरुवात झाली.’’

‘‘घोळ?’’ त्यानं आश्चर्यानं विचारलं. त्यावर सुस्कारा सोडत आजोबा म्हणाले, ‘‘पहिला घोळ हा, की चाळीस वर्षांचा संसाराचा पट उघडल्यावर कोणते निर्णय चुकले आणि कोणते निर्णय बरोबर ठरले, या बाबतीत आमचं एकमतच होईना. शिवाय निर्णय नेमका कुणी घेतला, हाही वादाचा मुद्दा होताच. बऱ्याच ठिकाणी हिच्या मते, मी हिचं काहीही न ऐकता माझंच घोडं पुढे दामटलं आणि बऱ्याच गोष्टी फसल्या. उदाहरणार्थ- आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय. तर काही ठिकाणी मला हिचे काही निर्णय या वहीत लिहावेत, इतके महत्त्वाचे वाटेनात. उदाहरणार्थ- दरवर्षी नेमानं सत्यनारायण आणि हळदीकुंकू केल्यामुळे बरीच माणसं आणि नाती टिकली. या प्रकारामुळे आमचे पहिले काही दिवस तर याच भांडणात गेले. शेवटी जे निर्णय महत्त्वाचे वाटतात ते एकमेकांना विरोध न करता लिहायचे, यावर आमचं एकमत झालं आणि मग लिखाण सुरू झालं. अर्थात हेही आहे, की या आमच्या भांडणामुळे कित्येक विषयांवर आम्ही अनेक वर्षांनी पुन्हा बोललो.’’

मग आजी पुढे म्हणाल्या, ‘‘त्यापुढचा घोळ म्हणजे निर्णय चूक की बरोबर हे ठरवण्याचा. काही विषयांतले निर्णय हे काळाच्या ओघात यशस्वी ठरले की अपयशी ठरले, हेच आम्हाला ठरवता येईना. कारण निर्णय घेताना केलेला विचार, हातात असलेले अधिकार, तेव्हा असलेली परिस्थिती आणि मग बदलत गेलेला काळ, यामुळे बरीच गुंतागुंत वाढली. काही निर्णय हे आमच्या, मुलांच्या भविष्यासाठी घेतले होते; पण गोष्टी कल्पनेपलीकडे इतक्या बदलल्या, की मूळ प्रश्न तसाच राहिला आणि त्याच्या जोडीनं चार नवीन प्रश्न उभे राहिले.’’

आजींच्या त्या बोलण्यावर आजोबा वही त्याच्यासमोर धरत म्हणाले, ‘‘हे बघ.. म्हणूनच दोन्ही पानांवरची थोडी थोडी जागा घेऊन रेघा मारून आम्ही एक तिसरा खण तयार केला आणि त्याला नाव दिलं- ‘सांगता येत नाही’. आज मागे वळून बघताना, घेतलेल्या अनेक निर्णयांचं ‘पूर्ण चूक’ किंवा ‘पूर्ण बरोबर’ असं वर्गीकरण करताना आमचीही तारांबळ उडते. तेव्हा ते सरळ ‘काही सांगता येत नाही’ या खणात नोंदवणं बरं पडतं.’’

त्यावर आजी म्हणाल्या, ‘‘म्हणूनच मग आम्ही आणखी एक गोष्ट केली आहे. ती म्हणजे, आमचा निर्णय बरोबर वाटून जेव्हा आम्ही जमेच्या खात्यात लिहितो किंवा चुकीचा वाटून खर्चाच्या खात्यात लिहितो, तेव्हा त्याखाली टीपही लिहितो. जसं की, ‘हा निर्णय त्या काळानुसार सुसंगत’, ‘हा निर्णय त्या काळात अचूक, पण कदाचित आज बरोबर नाही’, ‘हा निर्णय तेव्हा चुकलेला, पण कदाचित आज बरोबर ठरू शकेल असा,’ वगैरे.’’

‘‘ही अशी टीप लिहिणं नक्कीच उपयोगी पडणारं आहे.’’ त्याला आजींचा तो मुद्दा आवडला. त्यावर आजोबा म्हणाले, ‘‘तू आमच्या मुलांच्या आणि नातवंडांच्या मधल्या वयाचा आहेस. त्यामुळे माझा मुद्दा नेमका समजू शकशील. कसं असतं, आपल्या वयानुसार आयुष्याचे वेगवेगळे टप्पे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात हे टप्पे एकदाच येतात. काळानुरूप त्याचे संदर्भही वेगवेगळे असतात. म्हणजे माझं बालपण आणि माझ्या मुलांचं बालपण हे जरी बालपणच असलं, तरी त्यात किती गोष्टी बदललेल्या होत्या याची आपण कल्पनाही करू शकत नाही. माझं बालपण कोकणात गेलं, तर मुलांचं या शहरात. इथपासून बदलाची सुरुवात. हे चांगलं की वाईट, यात पडण्यात काहीही अर्थ नाही. जे आहे ते आहे, म्हणूनच मान्य केलं पाहिजे; पण एकाच घरातल्या पिढय़ा या वेगवेगळ्या परिस्थितींतून, वातावरणातून घडत असतात ही गोष्ट विसरली जाते. त्यामुळे प्रत्येकाची या टप्प्याला प्रतिसाद देण्याची पद्धत वेगळी असू शकते, हे लक्षात घेतलं जात नाही.’’

आजोबांच्या बोलण्यातला धागा पकडत आजी म्हणाल्या, ‘‘कारण आपल्याकडे इतरांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा या तुमच्या वयानुसार बदलत असतात. आम्ही आमच्या आयुष्यातल्या या टप्प्यात अमुक गोष्टी केल्या, तेव्हा इतरांनीही त्या तशाच केल्या पाहिजेत, अशाच दृष्टिकोनातून बघितलं जातं. मग ते लग्न असो, करिअर असो, आर्थिक स्थिरता असो, की नव्या पिढीचा जन्म असो, नात्याचं यशापयश यावर ठरवलं जातं; पण त्यामुळे घरातलं वातावरण बिघडतं, संवाद संपतो. मात्र ही ‘जनरेशन गॅप’ नेमकी कशामुळे वाढत गेली, हे आपण लक्षात घेत नाही. काळानुसार निर्णयांची आणि त्यांच्या परिणामांची व्याख्या आणि व्याप्ती बदलते, हे आपण समजून घेत नाही. हे आपलं सर्वात मोठं अपयश आहे. काल जे बरोबर होतं, ते आज पूर्णपणे बरोबर असेलच असं नाही आणि काल चुकीचं वाटत होतं, ते आजही तितकं चूक असेलच हे सांगता येत नाही.’’

‘‘मग यावर उपाय काय?’’ थोडय़ा अधीरतेनं त्यानं विचारलं. त्यावर आजी शांतपणे म्हणाल्या, ‘‘आमच्यासाठी आम्ही शोधलेला उपाय हाच, की जमाखर्च शक्य होईल तितक्या प्रामाणिकपणानं लिहायचा.’’ त्यावर आजोबा म्हणाले, ‘‘ही वही घरातल्यांना दिल्यानंतर यात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी वाचल्या जातील, आमच्या चुकीच्या किंवा बरोबर  निर्णयांवर सखोल चर्चा होईल, अशी कोणतीही अपेक्षा आम्ही ठेवलेली नाही. कदाचित चार दिवस अप्रूप वाटून ही वही वाचली जाईल आणि मग ती पडून राहील. मात्र एक गोष्ट नक्की आहे, की ही वही त्यांना दिल्यानंतर पुढे कधीही, कुणीही ‘तुम्ही आम्हाला हे सांगितलं का नाही?’ असं आम्हाला म्हणू शकणार नाही. सर्व गोष्टी त्यांच्यासमोर असतील. त्या स्वीकारायच्या, की संदर्भ म्हणून वापरायच्या, की वही रद्दीत घालायची, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल आणि त्याबद्दल आम्हाला कोणतंही दु:ख वाटणार नाही.’’

त्यावर काय बोलावं हे न सुचून तो फक्त हसला. तेव्हा आजी म्हणाल्या, ‘‘अर्थात काहीही झालं, तरी हा जमाखर्च पूर्ण केल्याचं समाधान आमच्यापाशी ‘बाकी’ म्हणून राहील. शेवटी तेच महत्त्वाचं. नाही का?’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 12:59 am

Web Title: family decisions apayashala bhidatana dd70
Next Stories
1 निरामय घरटं : नित्य नेमे विसर्जन!
2 आक्रमकतेचा तळ शोधताना…
3 चित्रपुष्पांजली
Just Now!
X