‘‘गायनाकडे मी आत्मिक व बौद्धिक या दोन्ही प्रकारे पाहतो. मैफलीत होणारे गायन आत्मरंजन व जनरंजन यांचा छान मेळ साधणारे असावे. ते केवळ लोकांसाठीही नसावे व फक्त स्वत:साठीही नसावे. या गायनात जागृत प्रतिभेच्या रूपाने स्वरचित्रांचा शोध व त्यांचे प्रकटीकरण इतके सुंदर व्हावे की स्वत:लाही आश्चर्य वाटावे. हे घडत असताना रागाच्या भावविश्वाशी इतकी एकरूपता व्हावी, की मी स्वत:च ते रागरूप बनून जावे आणि श्रोत्यांचे भान हरपून जावे. माझ्या मते आदर्श मैफल ही अशी असावी. अशी मैफल  संपल्यानंतर मन अत्यंत निर्मळ व तृप्त अवस्थेत जातं..’’ सांगताहेत, सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर.
सं गीताचे संस्कार हे मला घरातूनच मिळाले. माझी आजी श्रीमती विमल सोहोनी ही चांगलं गायची. माझे पणजोबा कै. नरहरीबुवा गोखले हे पं. अतुबुवा जोशींचे पट्टशिष्य होते व माझी आई डॉ. शोभा अभ्यंकर ही संगीतातील ‘डॉक्टर’ आहे. संगीत माझ्या रक्तातच आहे. त्यामुळे मी अगदी तिसऱ्या वर्षांपासूनच वयाच्या खूपच पुढचं गाणं गात होतो. मी जन्मजात कलाकार आहे याची जाणीव आईला फार लवकर झाली होती. आठव्या वर्षी आईनं मला तिचे गुरू पं. गंगाधरबुवा पिंपळखरे सरांकडे शास्त्रीय गायन शिकायला पाठवलं. त्यांच्या बरोबरीने आईपण मला शिकवत असे. १९८१ मध्ये वयाच्या अकराव्या वर्षी माझा पहिला जाहीर कार्यक्रम मुंबईत झाला. पुढील तीन वर्षे ‘वंडर बॉय’ असे बिरुद मिरवत अनेक शहरांत माझे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचे कार्यक्रम झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा नियमित रियाज होईल या हेतूने आई-बाबा कार्यक्रम स्वीकारत असत. आई माझ्याकडून तबल्याबरोबर खूप रियाज करून घेत असे. बैठक कशी रंगवावी याचे धडे ती मला देत असे. माझ्या गाण्याला आकार येण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली. त्यामुळे ‘ख्याल’ गायनाला अत्यंत आवश्यक असणारी स्थिरता लहान वयापासूनच माझ्यात रुजली.
माझे भाग्य थोर म्हणून श्रीमती हिराबाई बडोदेकर, पं. भीमसेन जोशी, पु. ल. देशपांडे, श्रीमती गंगूबाई हनगळ, पं. वसंतराव देशपांडे, श्रीमती ज्योत्स्ना भोळे अशा दिग्गजांनी समोर बसून माझे लहान वयातील गाणे ऐकण्याचा योग माझ्या आयुष्यात आला. या सगळ्यांनी माझ्या गाण्याचे खूप कौतुक केलं. ‘‘संजीव अभ्यंकर हे नावच एखाद्या पदवीसारखं वापरलं जाईल व सर्व प्रकारचं संगीत याच्या गळ्यातून फुलेल,’’ अशी भविष्यवाणी पु. ल. देशपांडे यांनी त्या वेळी केली होती. तर, ‘‘हा मुलगा ज्ञानेश्वरांच्या कुळातला आहे.’’ हे उद्गार होते पं. भीमसेनजींचे. या सर्वानी माझ्या आई-बाबांना असा सल्ला दिला की हा एक ‘गिफ्टेड कलाकार’ आहे. याला इंजिनीअरिंग – मेडिकल करायला लावू नका. याचे आयुष्य हे पूर्णपणे एका ‘गायकाचे’ आयुष्य बनू दे.
याच काळात माझी आई पं. जसराजजींकडे गाणं शिकू लागली. पं. जसराजजींची गायकी माझ्या सांगीतिक प्रवृत्तीला साजेशी ठरेल हे ओळखूनच तिने मला त्यांच्याकडे पाठवायचे ठरविले. किती बारकाईने तिने माझी जडणघडण केली हे आता मला प्रकर्षांने जाणवते. वेगवेगळ्या प्रचलित व अप्रचलित रागांविषयी चर्चा करणे, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणे अशा गोष्टी आईमुळे आमच्या घरात सतत येता-जाता घडत असतात आणि त्याचा मला प्रचंड फायदा होतो. पालकांनी फक्त सुविधा उपलब्ध करून देणे एवढेच पुरेसे नसते, तर प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा आढावा घेण्याचा सुजाणपणाही त्यांच्याकडे असावा लागतो याचा अनुभव माझ्या आई-बाबांवरून मला वारंवार येत असतो.
१९८३ साली पं. जसराजजींनी माझे गाणे ऐकले. ते माझ्यासमोरच आई-बाबांना म्हणाले, की ‘आदमी तिसरे जनम में कलाकार बनता है। ये तो कलाकारही है। मी याला नक्कीच शिकवीन. याची शिक्षणात गती कशी आहे? हा इंजिनीअर वगैरे बनू शकतो का?’ आई-बाबांनी होकारार्थी उत्तर दिले. यावर त्यांनी अशी अट घातली की, शिक्षण सोडून मी जर त्यांच्याबरोबर जायला तयार असेन तरच ते मला शिकवतील. आई-बाबांसाठी हा अतिशय अवघड निर्णय होता. ‘‘तुला पूर्ण वेळ गायन म्हणून करिअर करायला आवडेल का?’’ असे आई-बाबांनी विचारले. गाण्यावर माझे मनापासून प्रेम होते. पण गाणे पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारायचे म्हणजे योग्य का अयोग्य वगैरे कळण्याचे माझे वयच नव्हते. मी फक्त चौदा वर्षांचा होतो. या क्षेत्रातील अनिश्चितता समजण्याचे वय व समज या दोन्हींपासून मी खूप दूर होतो.
मग दहावीची परीक्षा संपल्यावर मी गुरू-शिष्य परंपरेने पूर्णवेळ (म्हणजे महिन्यातले वीस दिवस) पं. जसराजजींबरोबर राहू लागलो. मला त्यांच्यासमोर बसून खूप शिकायला मिळाले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या जवळपास चारशे मैफली मी मागे स्वरसाथ करताना आजवर प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत. ते जे शिक्षण होत असे त्याला तोड नाही. मैफलीत प्रत्येक रागाचे भावविश्व ते ज्या प्रकारे उलगडते व ते उलगडण्यासाठीचा त्यांचा जो प्रयत्न असे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव काही फुटांवरून पूर्ण एकाग्र चित्ताने मी घेत असे. वेगवेगळ्या शहरांत गाण्याच्या कार्यक्रमासाठी ते कायम व्यस्त असत. त्यामुळे मुंबईला त्यांच्या घरच्या वास्तव्यापेक्षा, माझा जास्त कालावधी हा त्यांच्या बरोबरच्या प्रवासात, कार्यक्रमाच्या जागी आणि त्यांच्या कार्यक्रमासाठीच्या माझ्या एकटय़ाच्या प्रवासात व्यतीत होत असे. या माझ्या एकटय़ाच्या प्रवासात ऐकलेल्या मैफलीचे चिंतन हे आपोआपच होत असे. ‘सिखा, देखा और परखा’ ही त्रिसूत्री शिक्षणात फार महत्त्वाची आहे. ‘सिखा व देखा’ हे माझे आपोआप घडतच होते व ‘परखा’ हा माझा उपजत स्वभावच आहे. कोणीही सांगितले म्हणून त्याच्यावर विचार न करता केले असे मी कधीच केले नाही.
गुरुजी मला सांगत, की जोपर्यंत माझ्याबरोबर व मागे गातो आहेस, तोपर्यंत मला योग्य वाटते तेच कर. तुझ्या स्वतंत्र मैफलीत मात्र तुला योग्य वाटेल ते कर. गुरू हा स्वत: कायम शोध घेत असतो. त्यामुळे उत्तम गुरू हा त्याला लागलेला शोध शिष्यांपर्यंत पोहोचवतो व शोध कसा घ्यावा हे शिष्यांना दाखवतो. माझ्या गुरुजींनीपण हेच केले. पुढे प्रत्येक शिष्य आपापल्या ताकदीनुसार हा शोध घेत राहतो.
दहा वर्षे पूर्णवेळ गुरुजींचा सहवास घडल्यावर मला जाणीव झाली, की आता माझा हा शोध मी समर्थपणे घेऊ शकेन. माझ्या या शोधातला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे माझे देशभरात सुरू झालेले स्वतंत्र कार्यक्रम. माझ्या स्वत:च्या व्यावसायिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. यात पुण्यातील संगीत पंढरी सवाई गंधर्व महोत्सव, भारतातील सर्वात जुना अशी ख्याती असलेला जालंदरमधला हरिवल्लभ संगीत समारोह, अहमदाबादमधील ‘सप्तक’ समारोह अशा अनेक महोत्सवांत मला आमंत्रणे येऊ लागली. विसाव्या वर्षी एच.एम.व्ही. अलूरकर म्युझिक हाऊस यांनी माझ्या कॅसेट्स (तेव्हा सी.डी. हा प्रकार नव्हता) ध्वनिमुद्रित केल्या. प्रयत्नांचे केंद्रीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून १९९४ पासून मी फक्त या ‘स्व-शोधावर’ पूर्णपणे केंद्रित झालो. ‘स्व-शोधाचा’ माझा हा प्रवास असा दणक्यात सुरू झाला.
या प्रवासात माझी गायकी कशी असावी याचा मी अत्यंत बारकाईने विचार केला. शिकलेल्या गायकीमध्ये आमूलाग्र बदल करायचा झाल्यास गायकीच्या तत्त्वांची गुंफण बदलावी लागेल हे मला समजत होते. गायकीतील तत्त्वे म्हणजे आवाजाचा लगाव, आवाजावर जोर देण्याची पद्धत, लयकारीचा वापर करायची पद्धत, मींड व खटका इत्यादींचा वापर करायची पद्धत, फक्त आकारावर भर देऊन केलेले गायन वा शब्दांमधील नादाची साथ घेऊन जाणारी आलापी, गायन सादर करायची लय व या लयीला न्याय देणाऱ्या विविध तालांचा वापर, गायनाचा मूळ स्वर (पट्टी) इत्यादी.. इत्यादी..
पण माझ्या हेही लक्षात आले, की पूर्णपणे वेगळी गायकी हे काही साध्य नव्हे. गायकी हे साध्य नसून साधन आहे. स्वरांचे सामथ्र्य हे साधनेने वाढवत नेऊन, रागभावाशी एकरूप होत, स्वयंभू स्वरचित्रांची गुंफण करत शेवटी भावसमाधी अवस्था हे जर साध्य असेल तर त्यासाठी गायकी हे फक्त साधन आहे. गायकीचे हे साधन मात्र मनाला भावणारे हवे, हे मला उमजले.
गायकीतील सर्व ‘तत्त्वांची’ मला भावलेली फार उत्तम अशी गुंफण माझ्या गुरुजींच्या गायकीत आहेच. ही गायकी माझ्या गळ्याला अत्यंत साजेशी होती. त्यामुळे गायकी पूर्णपणे वेगळी करण्याचा अट्टहास मी केला नाही. त्याचा गाभा कायम ठेवून ही गायकी आपल्या स्वतंत्र विचाराने मांडायची असे मी ठरविले.  
मला आजवर मिळालेल्या बंदिशींमध्ये मी माझ्या गळ्याला अनुरूप अशा अनेक बंदिशींची भर घातली आहे. यात मी स्वत: बांधलेल्या रचना तर आहेतच, त्याचबरोबर इतरांनी बांधलेल्या रचनाही मी गातो. त्यामुळे माझ्या गायकीला एक वेगळाच ‘आयाम’ प्राप्त होतो असा अनुभव मला आला. त्यामुळे स्वत:साठीच्या सर्व रचना व बंदिशी फक्त स्वत:च बांधायचा अट्टहास मी कधीही केला नाही. माझी गायकी व गळा नजरेसमोर ठेवून भक्तिसंगीतातील दीडशेहून अधिक उत्तमोत्तम रचना माझा मित्र व अत्यंत गुणी असा संगीतकार केदार पंडित आणि याशिवाय सलील कुलकर्णी, अजय जोगळेकर, आसित देसाई, आशीष केसकर इत्यादी संगीतकारांनी बांधल्या आहेत.
१९८५ ते १९९५ अशी दहा वर्षे मी सकाळ, दुपार, संध्याकाळ गात असे. वयाच्या पंधराव्या वर्षी आवाज बदलल्यावर पुरुष गायकांसाठी खूप कठीण काळ येतो. आवाजाला परत वजन यायला बरीच वर्षे जातात. पहाटे साडेचारच्या सुमारास उठून मी रियाज करायला सुरुवात केली. डोक्यातून जो आदेश दिला जाईल तो आवाजाने हुबेहूब पाळलाच पाहिजे अशी तयारी होईपर्यंत सकाळ-दुपार-संध्याकाळच्या रियाजाला पर्यायच नाही. रियाज ही निरंतर क्रिया आहे. पण रियाजाची व्याख्या ही फक्त गळ्यापर्यंतच मर्यादित नाही; उत्तम गाण्याचे व वादनाचे कानावर होणारे संस्कार, त्यावरचे चिंतन व मनन हाही रियाजाचाच भाग आहे. चित्तवृत्ती स्थिर ठेवण्यासाठी शांत राहणे, त्यासाठी आहार, विहार व संगत व विचार यांचे पथ्य पाळणे हाही रियाजाचाच भाग आहे. उत्तम गायन हे जर साध्य असेल तर त्यासाठीचे साधन म्हणजे आवाज. प्रत्येकाच्या आवाजाचे व प्रकृतीचे गुण-दोष वेगवेगळे असतात. त्याचा अभ्यास करून स्वत:चा आवाज कायम उत्तम स्थितीत ठेवणे व त्यासाठीची पथ्य पाळणे आणि या सर्वाचे भान हाही रियाजाचाच भाग आहे. स्वत: ते गायन तटस्थपणे ऐकून त्यात प्रगती कशी करता येईल याची तळमळ, स्वत:चे सर्वोत्तम देण्याचा व अनुभवण्याचा सततचा प्रयत्न हे सारे रियाजातच मोडते. या सगळ्याचे गणित हे प्रत्येकाने आपापले मांडायचे असते. यात ‘बाबा वाक्यम् प्रमाणम्’ असू शकत नाही. वर उल्लेखलेल्या सर्व गोष्टी मिळून होते ती संगीत साधना. स्वत:चा जो विचार आहे तो साधनेने सतत तपासून पाहायचा असतो. आजच्या घडीला जो विचार आहे त्यात वेगळे अनुभव आल्यास बदलही होऊ शकतो. अनुभवच खूप काही शिकवतो. त्यामुळे कलावंताला आपली बुद्धी कायम तल्लख ठेवून कान नेहमी उघडे ठेवावे लागतात. मी स्वत: यासाठी कायम प्रयत्न करतो.
गायनाकडे मी आत्मिक व बौद्धिक या दोन्ही प्रकारे पाहतो. गायनाचा उपयोग हा आत्मिक आनंदासाठीही असतो. पण कोणत्याही व्यावहारिक चौकटीचा विचार न करता होणारी ही क्रिया फक्तएकांतातच शक्य असते. या उद्देशाने केलेले गायन हे जनरंजक असेलच असे नाही, पण स्वत:ला मात्र असे गायन मैफलीपेक्षा एक वेगळा आनंद, समाधान व तृप्ती देते. मैफलीत होणारे गायन आत्मरंजन व जनरंजन यांचा छान मेळ साधणारे असावे. ते केवळ लोकांसाठीही नसावे व फक्त स्वत:साठीही नसावे. या गायनात जागृत प्रतिभेच्या रूपाने स्वरचित्रांचा शोध व त्यांचे प्रकटीकरण इतके सुंदर व्हावे की स्वत:लाही आश्चर्य वाटावे. हे घडत असताना रागाच्या भावविश्वाशी इतकी एकरूपता व्हावी, की मी स्वत:च ते रागरूप बनून जावे. या प्रक्रियेत माझ्या गळ्यातून निघणारे स्वर इतके सामथ्र्यवान बनून यावेत, की मी स्वत:ला विसरून जावे व अशा गायनाचा एकत्रित प्रभाव असा असावा, की श्रोत्यांचे भान हरपून जावे. माझ्या मते आदर्श मैफल ही अशी असावी. माझी प्रत्येक मैफल या अवस्थेत जावी असा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. प्रत्येक वेळेस मला यात शंभर टक्के यश मिळत नाही. पण जेव्हा अशी मैफल जमून येते तेव्हा ती संपल्यानंतर होणाऱ्या माझ्या अवस्थेचे वर्णन मात्र शब्दात करता येणार नाही. अशा वेळी मन अत्यंत निर्मळ व तृप्त अवस्थेत जातं. ‘ये दिल माँगे मोर’ ही भावनाच विरून जाते. ‘जो जे वांच्छील तो ते लाहो प्राणिजात’ अशी भावना माझ्या मनात इतरांसाठी निर्माण होते व हा भाव त्यानंतर बरेच दिवस टिकतो.
अशा दोन मैफलींचा उल्लेख आज मला करावासा वाटतो. १९९० साली पुण्यात टिळक स्मारक मंदिरामध्ये माझ्या गुरुजींचा षष्टय़ब्दीपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. पुण्यातील सर्व कलावंत व जाणकार मंडळी श्रोत्यांमध्ये उपस्थित होती. माझ्यानंतर पं. शिवकुमार शर्मा व उत्साद झाकीर हुसेन यांचे वादन होणार होते. पण आधीचा कार्यक्रम खूपच लांबल्यामुळे माझ्या वाटय़ाला फक्त वीसच मिनिटे आली. या २० मिनिटांत मी गात असलेल्या ‘बागेश्री’ने असे काही मोहिनी रूप धारण केले, की नंतर सभागृहातल्या टाळ्या थांबेचनात. सर्वासमक्ष स्टेजवर येऊन गुरुजींनी मला मिठी मारली आणि आनंदाश्रू पुसले. रसिकांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले. आजही या मैफलीची आठवण काढणारे अनेक जण भेटतात. २००७ मधल्या माझ्या अमेरिका दौऱ्यात ओरलांडो शहरात माझा कार्यक्रम होता. मी मारवा रागाने सुरुवात केली. जवळजवळ एक तास मारवा रंगत गेला. मारवा जेव्हा संपला तेव्हा हॉलमध्ये अशी नीरव शांतता पसरली, की काही काळ श्रोते टाळ्या वाजवायचे विसरून गेले. एका मोठय़ा पॉझनंतर रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. योगायोगाने हा मारवा ध्वनिमुद्रित झाला व हा अनुभव माझ्या www.sanjeevabhyankar.com या संकेत स्थळावर मी उपलब्ध करून ठेवलेला आहे. तो जरूर ऐका. ईश्वर कृपेने अनेक मैफलींमध्ये मी हा अनुभव घेत असतो.
वयाच्या तिशीत असतानाच जगभरातील दोनशेहून अधिक निरनिराळ्या शहरांत माझे शास्त्रीय गायनाचे अनेक कार्यक्रम झालेले होते. माझे गाणे किंवा सीडी ऐकून वेदना कमी झाल्या, प्रकृतीत खूप सुधारणा झाली अशा आशयाची लोकांची पत्रे आणि फोन जेव्हा मला येतात तेव्हा गाण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. या संदर्भातील अतिशय हृद्य आठवणी तुम्हाला सांगतो. डॉ. अलका मारूलकर यांच्या शिष्या सौ. सुहास जैन-कहाते यांची हकिकत त्यांच्या पत्रातील त्यांच्याच शब्दात. ‘मी १८ दिवस पूना हॉस्पिटलमध्ये खूप आजारी होते. अँटिबायोटिक्सची इंजेक्शन्स आणि किडनीच्या आजाराच्या वेदना मला सहन होईनात. मी जेवण बंद केलं होतं. औषधाचाही फायदा होईना. अलकाताई म्हणाल्या, संजीवचं गाणं तुला आवडतं, ते तू ऐक. मी दिवसभर आपला भीमपलासी आणि पूरिया धनाश्रीच आलटून पालटून ऐकत होते. नंतर आपल्या अनेक कॅसेटस् ऐकण्यात मी एवढी रंगून जायचे की प्रकृतीत कधी सुधारणा व्हायला लागली हे कळलंही नाही. सर्व वेदना मी विसरले. मला जेवण जायला लागलं, औषधं प्रतिसाद देऊ लागली. तेव्हा डॉक्टरसुद्धा म्हणाले, ‘काय जादू आहे या अभ्यंकरांच्या गाण्यात!’ मी डॉक्टरांना धन्यवाद दिले तर म्हणाले, धन्यवाद संजीव अभ्यंकरांना द्या हो!’ अशा आठवणी खोलवर जपल्या जातात. २००० साली अमेरिकेत सिअ‍ॅटल शहरात माझे गाणे झाले. तिथे टेक्ससमध्ये राहणारे डॉ. चितळे चार तास विमानाचा प्रवास करून गाणे ऐकायला आलेले होते. पण सिएटलचे गाणे झाल्यावरही डॉ. चितळ्यांचे मन भरले नाही. ते आमच्याबरोबर त्यांच्या गाडीतून पोर्टलंडलाही आले. तिथला कार्यक्रम संपल्यावर एक महिन्याने डॅलस शहरातल्या माझ्या कार्यक्रमाला तर संपूर्ण परिवारासह आले होते. यानंतर काही वर्षांनी त्यांना कर्करोगाचे निदान करण्यात आले. त्यांच्या पत्नीने काही दिवसांनी माझी भेट घेऊन मला सांगितले, ‘संपूर्ण आजारपणात डॉक्टर फक्त सतत तुझे गाणे ऐकायचे व शेवटी अतिदक्षता विभागातही त्यांनी मला सांगून ठेवले होते की शेवटच्या श्वासापर्यंत संजीवचे गाणे बंद करू नकोस व मी तसेच केले.’ मी हे ऐकून स्तब्ध झालो.
संगीत हे माझ्यासाठी सर्वस्व आहे व संगीताशिवाय आयुष्याचा मी विचारही करू शकत नाही. आजवरच्या माझ्या संगीतिक वाटचालीत मला आकाशवाणीतर्फे राष्ट्रपती पदक, फाय फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार, पं. जसराज गौरव पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा पं. कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान व ‘गॉडमदर’ या हिंदी चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट पाश्र्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. परंतु रसिकांचे मला मिळणारे उदंड प्रेम व आशीर्वाद, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. हे प्रेम व आशीर्वाद अखंड मिळत राहोत हीच प्रार्थना.


चतुरंग मैफलमध्ये पुढील शनिवारी (२५ मे ) सुप्रसिद्ध चित्रकार रविमुकुल

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन