13 December 2019

News Flash

एक ‘टाका’ आत्मविश्वासाचा!

‘यू कॅन हॅव एनिथिंग इन लाइफ, इफ यू आर ड्रेस्ड फॉर इट!’ कॉस्च्यूम डिझाइनर एडिथ हेड यांचे हे उद्गार..

२०१७ च्या पहिल्या व्हीलचेअर मिस इंडिया नीनू केवलानी.

|| गीता कॅस्टलिनो

‘यू कॅन हॅव एनिथिंग इन लाइफ, इफ यू आर ड्रेस्ड फॉर इट!’ कॉस्च्यूम डिझाइनर एडिथ हेड यांचे हे उद्गार.. दिसायला स्मार्ट आणि वापरायला सुटसुटीत असे कपडे घातले तर आत्मविश्वास वाढायला नक्कीच मदत होते, हा विचार मांडणारे. आजपर्यंत दिव्यांगाना सोयीच्या ठरणाऱ्या खास कपडय़ांविषयी आपल्याकडे कुणीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले नव्हते ही किती खेदाची गोष्ट. एकवीस वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व अभ्यासले की कपडे परिधान करणं सर्वच अपंगांना केवढं मोठं आव्हान आहे हे सहज लक्षात येतं आणि सहजरीत्या हे कपडे बाजारात उपलब्ध करता आले तर त्यांचं आयुष्य कितीतरी पट सुसह्य़ करता येतं याची खात्री पटते.

सध्याची स्थिती पाहता कुठल्याही अपंग व्यक्तीला गरजेनुसार कपडे उपलब्ध नसल्यामुळे ते मिळवण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. कापड विकत आणून सोयीनुसार शिवून घेण्यावर दुप्पट खर्च होतो होतोच शिवाय योग्य कापड व अडचणी समजून योग्य प्रकारचे कपडे शिवून देणारा टेलर मिळवणं, त्याच्या सतत मागे राहून ते करून घेणं, ही थकवा आणणारी गोष्ट आहे. आपल्या देशात सर्वच दृष्टीने हे परवडत नाही.

‘प्लस साइज’चे कपडे किंवा विशिष्ट आकाराचे गर्भारपणात सुटसुटीत वाटतील असे कपडे पूर्वी सहज मिळत नव्हते, पण आता ते फॅशन जगताचा एक भाग बनून गेलेत. प्रक्रिया वेळ घेतातच. तशाच प्रकारे नजीकच्या भविष्यात ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’ वा ‘स्वीकारार्ह कपडे’सुद्धा फॅशनच्या जगतात तरंग निर्माण करतील याबाबत शंका नाही. कारण ही काळाची गरज आहे.

याच भूमिकेतून, दिव्यांगानाही आकर्षक आणि सुटसुटीत कपडे मिळाले पाहिजेत या विचाराने ‘झपाटलेल्या’ ‘एकांश ट्रस्ट’च्या संचालिका अनिता अय्यर आणि माझ्यात सुसंवाद झाला तेव्हा ‘अ‍ॅड-ड्रेस नाऊ’ या ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’बद्दलच्या आंतरराज्यीय रचना (डिझाइन) स्पर्धेचा उगम झाला. हे इन्क्ल्युजिव्ह वा सर्वसमावेशक किंवा ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’ म्हणजे काय? तर याचा दुसरा अर्थ असा, की दुसऱ्यांच्या गरजा, अडचणी, मागणी यांचा संपूर्ण विचार करत आपली सर्जनशीलता आणि अनुभव पणाला लावत आपल्या आसपासच्या वेगळ्या गरजा असणाऱ्यांच्या आनंदी जगण्यासाठी काम करणं. त्यातून जो सकारात्मक परिणाम तयार होतो त्यातून ‘सर्वसमावेशक’ जग घडत जातं.

‘नाईके’ ‘फ्लायर्स’, ‘झॅपर्स’, ‘टॉमी हिलफिगर’, ‘बिली फूटवेअर’ या सगळ्यांनीच अलीकडच्या काळात खूपच व्यवहार्य, सर्वसमावेशक डिझाइन्स बनवली. उदा. सहज दिसून येणार नाहीत असे वेलक्रो, बटण किंवा झिपऐवजी मॅग्नेटिक क्लोजर, स्नॅप्स, बटन्सविरहित कपडे, लेस नसलेली फूटवेअर्स इत्यादी. त्याचा अनेक अपंगांना फायदा होतो आहे.

एक व्यावसायिक म्हणून, सामाजिक मानसशास्त्रज्ञ म्हणून अपंग व्यक्तींबरोबर काम करताना, त्यांचं समुपदेशन करताना माझ्याही लक्षात आलं की, सगळ्यात मोठं, ढळढळीत दिसणारं आव्हान आहे, ते आरामदायक फॅशनेबल कपडय़ांचं. ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’ ही सोयच उपलब्ध नसणं हे दर्शनी दिसणारं आव्हान पेललं तर मूलभूत काम करता येईल.

आपणापकी प्रत्येक व्यक्तीलाच प्रतिष्ठेचं आयुष्य जगायला मिळायला हवं. तडजोड करत जगायची वेळ कुणावरच येऊ नये. गेली तीन दशकं शिक्षणव्यवस्थेत काम करताना, टेक्स्टाइल व डिझाइनचा अभ्यासक्रम बनवताना मी नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोदिंग’ या संकल्पनेचं महत्त्व सांगत, बोलत आले आहे. मी स्वत: पोलिओमुळे शरीरात निर्माण झालेल्या अडचणींचा विचार करून स्वत:साठी वेगळे कपडे डिझाइन करून वापरत आले आहे त्यामुळे अपंग व्यक्तींच्या याबाबतच्या संवेदना नि दु:ख मला कळू शकते. प्रत्येक अपंगत्वाची मर्यादा वेगळी. उदाहरणार्थ ज्यांना ‘कॅलीपर्स’ वापरावे लागतात त्यांच्या ट्राऊजर्स, जिन्स, पायजमा अथवा चुडीदारचं काही गुंडाळलं तर ते पायात येण्यानं तोल जाण्यासारखी घटना असेल किंवा सासू झोपून असताना तिला दुसऱ्यांनी कपडे घालण्यातून येणारं अवघडलेपण, डायपर बदलताना वाटणारी दुय्यम भावना वगरे गोष्टी असतील. त्यातून अनिता विचार करायला लागल्या की तात्पुरत्या अडचणी असणाऱ्यांचं एकवेळ ठीक पण कायमस्वरूपी ज्यांना या अडचणी आहेत त्यांचा कपडय़ांसाठी रोजचा केवढा झगडा चालू असेल? त्यांना कुणाच्याही मदतीशिवाय घालता यावेत, सांभाळता यावेत व आकर्षकही असावेत असे कपडे मिळतात का?

असाच विचार मनात चालू असणाऱ्या, गीता कॅस्टलिनो, निवेदिता साबू, राजू भाटिया अशा फॅशन डिझायनर, सल्लागार व अभ्यासक असणाऱ्या समविचारी मत्रिणींबरोबर अनिताच्या चच्रेच्या फैरी झडायला लागल्या आणि ‘अ‍ॅड-ड्रेस नाऊ’ या कल्पनेनं आकार घेतला. देशभरातील फॅशन डिझाइन कॉलेजेस नि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आंतरराज्यीय स्पर्धा घोषित करावी नि तिची रचना अशी करावी, की ज्यातून सहभागी स्पर्धक विशिष्ट अपंगत्वासाठी चर्चा नि संवादातून मार्ग काढत कपडे घडवतील अशी ती कल्पना. कापडाचा रंग नि पोत, अपंगत्वाच्या दृष्टीनं कपडय़ाचं करावं लागणारं डिझाइन, त्याच्या ट्रायल-एररमधून उद्भवलेल्या अडचणी व काढलेले मार्ग याचा संकीर्ण विचार स्पर्धकानं करावा हे अपेक्षितच असणार होतं.

या सगळ्या गोष्टी ठरवत स्पर्धा नियम-अटींसह जाहीर झाल्यावर अक्षरश: पुणे, मुंबई, दिल्ली, बडोदा, बंगळुरू, चेन्नई, भुवनेश्वर, हैद्राबाद अशा ठिकाणांहून तब्बल ५२ गटांनी आपलं नाव या स्पर्धेसाठी नोंदवलं. जाहीर केल्याप्रमाणं तीन स्पर्धक, विशेष गरजा असणारा म्हणजे अपंगत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेत असलेला त्यांचा एक मेंटॉर आणि एक डिझाइन एक्सपर्ट अशी मिळून एक टीम बनली. फॅशन डिझाइनचे स्पर्धक विद्यार्थी २१ अपंगत्वापकी ज्या अपंगत्वाच्या प्रकारासाठी कपडे बनवत आहेत त्याबद्दल त्यांच्या मेंटॉरशी चर्चा करण्याचा मंच कायम खुला ठेवला गेला. ‘एकांश’ टीमही अपंगत्वाबद्दलच्या प्रश्नांबद्दल, अडचणींबद्दल उत्तर देण्यासाठी, संवाद करण्यासाठी दक्ष राहिली. जगभरात ‘अ‍ॅडॅप्टिव्ह क्लोद्स’च्या बाबतीत घडणाऱ्या घटना शेअर करत राहिली. कपडय़ांच्या वैविध्यातून येणारी प्रतिष्ठा हा अपंग व्यक्तीचाही हक्क आहे व या प्रकारात खूप महत्त्वपूर्ण शक्यता दडलेल्या आहेत याविषयी संवेदनक्षम करत राहिली.

‘अ‍ॅड-ड्रेस नाऊ’नेच शेअर केलेली एक लिंक बघून मला आठवलं, की माझे पाय अचेतन आहेत असं मी सांगतेय नि तरी कधी उजवा, कधी डावा पाय दणादण उचलतेय हे बघून मला लोक विचारायचे, ‘‘आम्हाला वाटलं तुझे पाय निर्जीव आहेत, मग ते कसे काय उचलतेस?’’ मी उत्तर द्यायचे, ‘‘खरंतर ते निर्जीवच आहेत, मात्र सलवार किंवा लेगिंग्जच्या कपडय़ाला चिमटीत धरून कुठं खेचलं तर पाय कष्ट न होता उचलता येतील हे साधलंय मला. मात्र माझ्यासारखी अडचण असंख्य पॅराप्लेजिक्सची असू शकते व त्यांनी मार्ग काढलेले असू शकतात हे माझ्या ध्यानात येणं शक्य नव्हतं. ‘अ‍ॅड-ड्रेस नाऊ’ने शेअर केलेली एक लिंक पाहून कळलं की लिली पाझमनी नावाच्या फॅशन व कॉश्च्यूम डिझायनरने ‘अनऑब्स्ट्रक्टेड’ नावाची एक ‘अ‍ॅडॅप्टिव्ह’ कपडय़ांची, खरं तर ‘स्ट्रीट वेअर’ची रेंज आणली होती. त्यात तिनं पँट्सना मांडय़ांपाशी, तळपायांपाशी, गुडघ्यांखाली अशा तऱ्हेने मजबूत स्ट्रीप्स शिवले होते. त्यामुळे अचेतन पाय कुठल्याही अनावश्यक धक्क्याशिवाय उचलता तर येतीलच, पण ती सोय फॅशन म्हणून देखणीही दिसेल. लिलीची आई ‘मल्टिपल स्क्लेरॉसिस’ या विकारामुळे व्हीलचेअर वापरणारी. मात्र ‘सेवा’ नावाच्या मूल्याला झळाळी देण्यासाठी ‘आपण आपल्या आईसाठी नर्स ठेवू व तिचे कपडे बदलू, वाटलं तर स्वत: तिचं स्पंजिंग करत तिला झकासपकी आवरून व्हीलचेअरवर शिफ्ट करू व कृतकृत्य होऊ.’ असा त्यातल्या त्यात सोपा, पारंपरिक विचार न करता लिलीनं स्वत:च्या शिक्षणातून सर्जनशील विचार करत आईची प्रतिष्ठा सांभाळली. तिला कपडय़ांच्या माध्यमातून अधिक मोकळं व आधुनिक करण्यासाठी वेगळा विचार केला. हाच विचार करणं ही काळाची गरज आहे हे ओळखून अमेरिकेत २०२६ पर्यंत अडॅप्टिव्ह क्लोद्सचं मार्केट अद्ययावत करण्याचा विचार सुरू झालाय.

हे असं सुचण्यासाठी तुम्ही कुठल्या ना कुठल्या शारीरिक अक्षमतेनं बांधलेलं असावं असं काही नाही, पण समोरच्या माणसाची गरज, त्याविषयी वाटणारी सहसंवेदना नि कल्पकता या गोष्टीतून नवं काही नक्की घडू शकतं. घडतही असतं तुरळक प्रमाणात, पण त्याचा गाजावाजा न झाल्यामुळं खूपशा गरजू माणसांपर्यंत आपली ‘अ‍ॅडॅप्टिव्ह’ कपडय़ांची गरज लावून धरावी याचं भान व धाडस झिरपत नाही. म्हणूनच ‘एकांश’सारख्या संस्थेनं सुरू केलेल्या ‘अ‍ॅड-ड्रेस नाऊ’ या चळवळीला ताकद देणं गरजेचं. स्पर्धा घेणं हा या चळवळीचा पहिला टप्पा, पण त्यापुढे बरंच काही करायचं आहे याबद्दल बोलताना या प्रकल्पाच्या एक ज्युरी नि सल्लागार गीता कॅस्टलिनो म्हणाल्या, ‘‘पुढच्या टप्प्यात भारतभरातील फॅशन व डिझाइन इन्स्टिटय़ूूट्सना भेटी देऊन त्यांना विविध प्रकारच्या अपंगत्वाची सविस्तर माहिती देणं, प्रशिक्षण देणं, ‘इन्क्लूजिव्ह क्लोदिंग’ हा भाग अभ्यासक्रमामध्ये घ्यावा यासाठी प्रयत्न करणं वगरे गोष्टी असणार आहेत. ही कल्पना मध्यवर्ती व मुख्य प्रवाहातील व्हावी यासाठी खूप संवेदनशीलतेची, नियोजनाची नि कल्पकतेची गरज आहे. फॅशन इन्स्टिटय़ूटमधल्या उगवत्या डिझायनर्सचे मेंदू ढवळून काढणं व त्याला नवी चेतना देणं यातून हे घडू शकेल. अशा संस्थांमधून वर्षभरात बाहेर पडणाऱ्या ५००० डिझाइनर्सपकी दोन जणांमध्येही हा विचार रुजला तर बराच बदल घडू शकतो.’’ दोन्ही पायातल्या कॅलीपर्स व कुबडीसह ‘अ‍ॅडॅप्टिव’ कपडे बिनधोक कसे वापरता येतील नि आजची फॅशन कॅरी करूनही ते व्यवहार्य म्हणजे सुटसुटीत कसे असतील याचे असंख्य प्रयोग गीता यांनी स्वत:वरच केले आहेत. त्यामुळे त्यांना या प्रयोगाबद्दल वाटणारी आत्मीयता वेगळीच. पोलीओसारखं सर्वसाधारण ओळखीचं अपंगत्व उदाहरणादाखल घेतलं तरी प्रत्येक पोलीओ असणाऱ्या माणसाच्या सोयी, गरसोयी निराळ्या असतात. त्यामुळं कामाची व्यापकता वाढते हेही त्या सांगतात. तरी पहिल्या टप्प्यात, कुठल्याही अपंग व्यक्तीला आपला आत्मविश्वास वाढवणारे, काळाशी नातं सांगणारे कपडे हवेत हे वाटणं-पटणं व समोरच्या न-अपंग व्यक्तीला याबद्दलच्या त्याच्या ‘प्रतिष्ठे’ची गरज कळणं हे जरुरीचं आहे असं ‘एकांश’ टीम मानते. या जाणिवेतूनच १७ ऑगस्टला शॉर्टलिस्ट झालेल्या पंधरा स्पर्धकांची कामं व त्यामागचा विचार कळेल. अंतिम निवडीत तीन विजेते जाहीर होतील.

‘अ‍ॅड-ड्रेस-नाऊ’ या स्पर्धेनं अपंग माणसांसाठी विशेष गरजांनुसार बनवलेल्या कपडय़ांबाबतीत असलेल्या उदासीनतेला उत्साहाचा स्पर्श होईल हे मात्र खरं. एखाद्या मतिमंद मुलाबाबतीत कंटाळवाण्या टी-शर्टला वगळून बटणांशिवायचा एखादा झकास शर्ट व झिपची कटकट नसलेली रुबाबदार पँट हवी असू शकेल, एखाद्या व्हीलचेअरवरच्या मुलीला स्कर्ट घालावा वाटू शकेल नि या वेषात मदतनीसाला तिला उचलून ठेवणं अवघडून टाकणार नाही अशा पद्धतीची रचना असू शकेल, एखादा ऑटिस्टिक मुलगा त्याला आवडणाऱ्या पॅटर्नचे कपडे घालून खूष होईल नि माझ्यासारख्या एखाद्याला कॅथेटर वा युरिन बॅग सहजपणाने वागवता येईल व जरूर तेव्हा कुणाच्याही मदतीशिवाय रिकामी करता येईल अशा ट्राऊजर्सचं आकर्षण असेल. शिवाय हे कपडे आमचं स्वावलंबन वाढवून आत्मविश्वासाचं नवं रोपण करतील हे निश्चितच.

वस्त्रोद्योगाच्या, फॅशनच्या जगभरातल्या एवढय़ा मोठय़ा ‘ब्रँडेड-नॉनब्रँडेड’ पसाऱ्यात अपंग माणसांचं एक जग अस्तित्वातच नसणं हे किती मोठं धक्कादायक कटू सत्य. पण या त्रासदायक नकोसेपणाला भेदण्याचा, मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे नि ‘एकांश’सारखी संस्था, सेल्मा ब्लेअरसारखी अभिनेत्री याची मानसिक गरज जाहीरपणे बोलून दाखवते आहे ही आशादायक घटना!

sonali.navangul@gmail.com

First Published on August 10, 2019 12:11 am

Web Title: fashionable clothes for handicap people mpg 94
Just Now!
X