12 August 2020

News Flash

जीवन विज्ञान : उपवास-अतिआहाराचा सुवर्णमध्य!

मानवी पचनसंस्था एखाद्या जैविक सयंत्राप्रमाणे आहे. प्रथम तोंडामध्ये अन्नाचे तुकडे होतात व त्यात लाळ मिसळली जाते

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. स्मिता लेले

dr.smita.lele@gmail.com

तुमचे वजन बदलल्यानंतर २७ महिने सलगपणे नवीन वजन राखल्यावर तुमची शारीरिक ठेवण बदलेल व हे नवीन वजन आपोआप तसेच राहील. डाएटिशियन रासायनिक अभियांत्रिकी अभ्यास करत नसल्यामुळे प्रक्रिया काल व स्थिर स्थिती नियंत्रण हे त्यांना माहीत होत नाही. म्हणून जीवनामध्ये आहार-विहारात वारंवार बदल केले की आरोग्य बिघडते. आपल्याला मनाला झेपतील आणि शरीराला सोसतील असेच बदल करावेत व स्वेच्छेने आहार बदलला तर तो बदल जास्त काळ ठेवावा, ज्याच्यामुळे शरीराला नवीन आरोग्यदायी स्थितीमध्ये स्थिर राहण्याची सवय होईल. शरीर तंदुरुस्तीसाठी उपवास आणि अतिआहार यांचा सुवर्णमध्य साधायला हवा.

मानवी पचनसंस्था एखाद्या जैविक सयंत्राप्रमाणे आहे. प्रथम तोंडामध्ये अन्नाचे तुकडे होतात व त्यात लाळ मिसळली जाते. असे म्हणतात की, नीट पचन होण्यासाठी भाजी व चपाती प्यावी (इतकी चावावी की त्याचे द्रव व्हावे). अन्ननलिकेतून पुढे हे अर्धवट पचलेले खाणे जठर (पोट) या स्नायूंच्या पिशवीमध्ये येते. येथे हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे पाचक रस तयार होतो व अन्नावर त्याची रासायनिक क्रिया होते. आकुंचन-प्रसरण होत असल्यामुळे या ठिकाणी थोडय़ा प्रमाणात ‘बॅकमिक्स’ पद्धतीने कार्य होते. परंतु यानंतर अन्न मागे-पुढे न मिसळता म्हणजे ‘प्लगफ्लो’ पद्धतीने पुढे जाते. लहान आतडय़ामध्ये अनेक जैव-रासायनिक क्रिया होतात. सर्वात शेवटी लाखो मित्र-जंतूंच्या मदतीने अन्नाचा जास्तीत जास्त भाग जैविक पद्धतीने पचतो. निरुपयोगी गोष्टी मल व मूत्र म्हणून शरीराबाहेर फेकल्या जातात.

कारखान्यातील प्रकल्पामध्ये कच्चा माल आत येतो व तयार माल बाहेर बाजारात जातो आणि काही टाकाऊ गोष्टी तयार होतात ज्याला कचरा/ सांडपाणी/ नको असलेला माल म्हणतात. प्रदूषण टाळण्यासाठी या टाकाऊ गोष्टीपासून जनावरांचे खाद्य, खत, बायोगॅस किंवा इतर उपयुक्त गोष्टी बनविल्या जातात व अगदीच उपयोग नाही अशा गोष्टी जाळून ऊर्जा मिळवितात. परंतु पचनसंस्थारूपी सयंत्रामध्ये अन्न हा कच्चा माल असला तरी तयार माल कोणता? मलमूत्र यातर निरुपयोगी गोष्टी! परंतु नीट विचार केला तर दिसेल की शोषण होणारे अन्न ज्यामुळे अन्न रक्त, मांस, मज्जा निर्मिती होते हा खरा तयार माल. अर्थातच आपले आरोग्य या तयार मालाच्या प्रतीवर ठरते.

तांत्रिक दृष्टीने ‘आदर्श सयंत्र’ म्हणजे प्रत्येक अणू-रेणू (अन्नाचा कण) सारखाच वेळ सयंत्रामध्ये राहून एका पद्धतीनेच वागणे. पण आपली पचनसंस्था अशा पद्धतीने कार्य का करत नाही? नवजात बाळ दूध प्यायले की प्रत्येक वेळा शी करते. याचा अर्थ जन्मत: बाळाचे पचन आदर्श सयंत्रासारखे असते. जितक्या वेळा अन्न प्राशन तितक्या वेळा टाकाऊ भाग शरीराबाहेर पडणार. लहान बाळाच्या खाण्या-पिण्याच्या व झोपण्याच्या सवयी आदर्श जैविक घडय़ाळाप्रमाणे सूर्याच्या गतीशी निगडित असतात. परंतु मोठेपणी आपण दैनंदिन जीवनात असे आदर्श जैविक घडय़ाळाप्रमाणे वागत नाही आणि म्हणून दिवसातून एकदाच शौचाला जायची सवय शरीराला लावली जाते. शरीराची स्थिर स्थिती कायम राखण्यासाठी (आरोग्य आणि वजन) पचनसंस्थेचे योग्य नियंत्रण करणे आवश्यक आहे. जैविक व रसायन अभियांत्रिकी शिक्षणामध्ये प्रक्रियांचे नियंत्रण करण्यासाठी व सयंत्रात योग्य ते पदार्थ निर्माण होण्यासाठी काय करावे हा एक स्वतंत्र विषय शिकविला जातो. बॅच पद्धत वापरताना कोणताही बदल सहज करता येतो. परंतु सातत्याने चालणाऱ्या प्रक्रियेत यंत्रणेच्या एका बाजूला (प्रवेशद्वाराशी) होणारे बदल दुसऱ्या बाजूने (उत्पादनद्वार) बाहेर येताना वेगळे व विचित्र परिणाम दाखवितात. एखादे सयंत्र जर नियंत्रणात ठेवायचे असेल तर बाहेरून येणाऱ्या गोष्टीमधील बदल, उदाहरणार्थ, आत येणाऱ्या पदार्थाचे तापमान किंवा ‘पीएच’ एकदम वेगळे असले तर त्याचा उत्पादनावर काय परिणाम होईल? म्हणजे या बदलाला जैविक सयंत्र कशी प्रतिक्रिया व प्रतिसाद देते याचा अभ्यास करावा लागतो. याचे अनुमान समीकरणे लिहून करता येते. यामध्ये ‘प्रक्रिया काल’ हे गुणक वापरले जाते. सयंत्राचे वागणे पूर्ववत पहिल्या स्थिर स्थितीला आणण्यासाठी किती वेळ लागतो ते काढता येते. तसेच प्रवेशद्वारातील बदल कायमचा असल्यास ‘नवीन स्थिर स्थिती’ किती वेळाने येईल याचे अनुमान करता येते. एक महत्त्वाचे तत्त्व पुढीलप्रमाणे आहे. प्रक्रिया कालाच्या तिप्पट काळ एखादा बदल चालू ठेवला तरच ते सयंत्र ‘नवीन’ (बदललेल्या) स्थिर स्थितीला राहते.

प्रत्यक्षात जगताना आपण रोज अधूनमधून खात असलो किंवा दिवसातून एकदाच खूप जास्त खात असलो तरी अशी क्रिया आपण रोज, वर्षांनुवर्षे करत असल्यामुळे आरोग्य व शरीराचे वजन या दृष्टीने आपले पचन ही ‘सातत्याने चालणारी’ प्रक्रिया आहे. सातत्याने होणाऱ्या प्रक्रियेमध्ये ‘काळ’ कसा मोजायचा हा मोठा कठीण प्रश्न आहे. एका वर्षांचा विचार केला तर काही तासांनी खाणे हे जणू काही सतत अन्नपदार्थ आत घालण्यासारखे आहे. आपल्या शरीरामध्ये विविध संस्था आहेत. पचनसंस्था, श्वसनसंस्था, मज्जासंस्था इत्यादी. प्रत्येक प्रकाराच्या संस्थेला वेगवेगळा प्रक्रिया काल आहे. श्वासोच्छ्वासाकरिता काही सेकंद किंवा मिनिटे, पचनासाठी किंवा खाण्यासाठी एक दिवस, शरीर निर्माण होण्यासाठी नऊ महिने (आईच्या पोटात बाळाच्या वाढीसाठीचा कालावधी). मन आणि बुद्धी अतिसूक्ष्म आहे म्हणून त्यांच्यात बदल होण्यासाठी लागणारा प्रक्रिया काळ खूप जास्त असतो. जन्मल्यानंतर सुमारे ४ वर्षांचा काळ मुलाला चालणे, बोलणे अशा गोष्टी शिकण्यासाठी लागतो. अशा वेळी अनुकरण करून मूल शिकते. स्वभाव म्हणजे स्व स्थानी असलेला भाव व हा कधी फारसा बदलत नाही असे म्हणतात. परंतु आपण रोजच्या जीवनात आवश्यक असे संगणक प्रोग्राम मनावर रेखण्यासाठी लागणारा काळ ४ वर्षे म्हणू शकतो. कदाचित त्यामुळेच जगभर शालेय शिक्षण १२ वर्षांचे म्हणजे प्रक्रिया काळाच्या तीनपट आहे. एखादी कला अथवा विद्या शिकण्यासाठी पूर्वी ८ व्या वर्षी सुरुवात करत (गंडा बांधणे- उपनयन संस्कार) व १२ वर्षे त्याचा अभ्यास केला जाई. अशा प्रकारे २० वर्षे वय पूर्ण झाल्यावर विद्यार्थिदशा संपवून गृहस्थाश्रमाची सुरुवात होई.

प्रवेशद्वाराशी होणारा बदल म्हणजे आहारातील बदल. त्या बदलामुळे विविध रासायनिक व तांत्रिक क्रियांमध्ये काय बदल होईल व याचा शेवटी पूर्ण प्रकल्पावर (म्हणजे आपले शरीर व आरोग्य) काय परिणाम होईल? तसेच बाहेर पडणाऱ्या गोष्टी यामुळे बदलतील का? कारखान्यामध्ये बाहेर पडणारी वस्तू महत्त्वाची असते व पूर्ण प्रकल्प कमी महत्त्वाचा असतो. पण पचनसंस्थेबाबत मात्र दृश्य स्वरूपात बाहेर पडणारी गोष्ट ही घाण असते आणि शोषण होणारे अन्न व त्यापासून बनणारे रक्त, स्नायू, हाडे इत्यादी गोष्टी प्रकल्पातील निर्मिती असते ज्यामुळे पूर्ण शरीराचे पोषण होते. अशा पद्धतीने शरीराची निर्मिती होते व झीज भरून निघते. प्रत्यक्षात क्षणाक्षणाला काही होताना दिसत नाही, परंतु काही महिन्यांत त्वचा बदलते. तसेच रक्ताची प्रत, त्वचेची प्रत व स्नायूंनाही बदलायला बरेच महिने लागतात. हाडे बदल व्हायला काही वर्षे लागतात. फक्त मेंदूतील पेशी निसर्गत:च प्रचंड जास्त प्रमाणात दिलेल्या असतात व त्यांची नवनिर्मिती होत नाही, परंतु चुकीच्या आहार-विहारामुळे मोठय़ा प्रमाणात त्यांचा नाश होण्याची शक्यता असते.

पचनसंस्थेचा प्रक्रिया काल एक दिवस – याचा अर्थ असा की, जर तुम्ही योग्य खाल्ले नाही, थोडेसे अपचन, कुपचन झाले तर त्यातून बाहेर पडायला तुम्हाला तीन दिवस लागतात. अति खाण्यामुळे किंवा चुकीचे खाण्यामुळे पोट बिघडले आहे हे दुसऱ्या दिवशी दिसते आणि तिसऱ्या दिवशी त्याचा थोडा परिणाम जाणवतो. चौथ्या दिवशी आपण पोट बिघडले होते हे विसरून जातो. योग्य न खाणे हा बदल खूप महिने चालू ठेवला तर मात्र प्रकृती कायमची बिघडू शकते. त्याच प्रकारे शरीरनिर्मितीचा काळ हा नऊ महिने असल्यामुळे जर डाएट करून वेगळ्या पद्धतीने आहार-विहारात क्रांतिकारक बदल केला व आपण शरीराचे वजन कमी केले किंवा वाढविले तर पहिल्यासारखा आहार-विहार सुरू झाल्यावर, झालेला ‘बदल’ नष्ट होतो. झपाटय़ाने आपले वजन पूर्ववत होते. कायमस्वरूपी बदलासाठी म्हणजे ‘नवीन स्थिर’ स्थितीसाठी तीनपट वेळ लागतो. तुमचे वजन बदलल्यानंतर २७ महिने नवीन वजन राखल्यावर तुमची ठेवण बदलेल व हे नवीन वजन आपोआप तसेच राहील. डाएटिशयन रासायनिक अभियांत्रिकी अभ्यास करत नसल्यामुळे प्रक्रिया काल व स्थिर स्थिती नियंत्रण हे त्यांना माहीत होत नाही. म्हणून जीवनामध्ये आहार-विहारात वारंवार बदल केले तरी आरोग्य बिघडते. आपल्या मनाला झेपतील आणि शरीराला सोसतील असेच बदल करावेत व स्वेच्छेने आहार बदलला तर तो बदल जास्त काळ ठेवावा, ज्याच्यामुळे शरीराला नवीन आरोग्यदायी स्थितीमध्ये स्थिर राहण्याची सवय होईल. शरीर तंदुरुस्तीसाठी उपवास आणि अतिआहार याचा सुवर्णमध्य बरा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 4:11 am

Web Title: fast food dietary medium jivan vidnyan article abn 97
Next Stories
1 आमार कोथा
2 पुरुष हृदय ‘बाई’ : अनादि अनंत!
3 अपयशाला भिडताना : जुगाड
Just Now!
X