संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर ज्यांचा ‘टर्न’ असेल त्याने स्वयंपाकघराचा ताबा घेऊन भाजी बनवायची वा दाल तडका बनवायचा आणि जिरा राईस वा पुलाव बनवायचा, पण हे सगळं इतकं बनवायचं की रात्रीचं जेवण उरकून दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या डब्याकरिता उरलं पाहिजे. भारतामध्ये कोडकौतुकांत वाढलेली आजची तरुणाई अमेरिकेत काही दिवसांकरिता का होईना कशी स्वावलंबी बनून राहते हे पाहायला मिळालं.
परदेश प्रवास हे काही आता अप्रुप राहिलेले नाही. त्यामुळेच ‘फॉरिन रिटर्नड’ ही बिरुदावली आता पैशाला पासरी इतकी ‘चीप’ झाली आहे. पूर्वीच्या काळांत तुम्ही काही कर्तृत्व दाखवले असेल वा दाखवणार असाल तरच परदेश-प्रवासाची संधी मिळायची. आता तुमची सून वा मुलगी परदेशांत बाळंत होणार असेल तर त्याच्या वा तिच्या आईला ही परदेशगमनाची संधी लगेच मिळतेच मिळते आणि ‘केअरटेकर’ म्हणून आईबरोबर बाबाही ‘फॉरिन रिटर्नड’ म्हणून परत येतात.
हे भाग्य वयाची पंच्याहत्तरी उलटली तरी माझ्या वाटय़ाला आलं नाही. सुनेने आपले बाळंतपण भारतातच उरकून घेतले आणि मुलींनी भारतातच राहणं पसंत केलं. एवढा मोठ्ठा विमान प्रवास आपल्याला काही झेपणार नाही, म्हणून पत्नीने प्रथमपासूनच रणांगणांतून माघार घेतली, त्यामुळे हे परदेशगमन आपल्या वाटय़ाला येईल का याबद्दल मनांत शंका होती.
तीन वेळा मुलगा अमेरिकेची वारी करून आला. पण काही ना काही कारणांनी माझी ही अमेरिकेची वारी होऊ शकली नाही. आता तर मुलगा एकटाच अमेरिकेत राहत होता आणि ते सुद्धा एका वर्षांच्या मुदतीकरता. त्यामुळे सूनबाई गेली नव्हती. झाली तर वारी याच वेळी व्हायला पाहिजे होती. तशी संधी मुलानेच दिली. ‘बाबा तुम्ही अमेरिकेचा व्हिसा काढा’ एक दिवस मुलानेच फोनवरून जाहीर केलं, ‘‘अरे, पण तिथं राहण्याची व्यवस्था?’’ मी प्रश्न केला, कारण मुलाचं स्वतंत्र बिऱ्हाड नव्हतं. ते चार मुलगे एकत्र एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. ती सर्व व्यवस्था मी करतो. तुम्हाला मी बोलावीत असल्याचे पत्र, माझ्या ऑफिसचे पत्र, माझा पासपोर्ट, व्हिसा सारं काही कॉम्प्युटरवरून पाठवितो. तुम्ही मुलाला भेटण्याकरता सहा आठवडे जायचं आहे, असा व्हिसाचा अर्ज करा. मुलाने जणू ऑर्डरच केली. अमेरिके तून मुलगा-मुलगी वा नातेवाईकाचे भेटायला इकडे या, असं आमंत्रणपर पत्र असेल तर व्हिजिटर व्हिसा लवकर मिळतो म्हणून पत्र असणं जरुरीचं.
यथावकाश अर्ज केला. इंटरव्हय़ूचा कॉलही आला. मुलाने नेहमीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांची रंगीत तालीम घेतली. ‘‘तुम्ही एकटेच अमेरिकेला जात आहात, मग भारतात तुमच्या पत्नीची काळजी कोण घेणार,’’ असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुलाने सांगितले. त्याचंही उत्तर तयार ठेवलं.  कागदपत्रांची फाइलच बनविली आणि इंटरव्हय़ूला सामोरे गेलो. नेमका पत्नीचा प्रश्न विचारला गेला. उत्तर पाठच होतं त्यामुळे ठरावीक प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिल्याने व्हिसा इंटरव्हय़ू समाधानकारक झाला आणि दहा वर्षांचा व्हिसाही पदरात पडला.
अमेरिकेतल्या कनेक्टिकट राज्यांतल्या स्टॅम्पफर्ड या शहरात माझा मुलगा सचिन राहत होता. १४ मजली भव्य इमारत. प्रत्येक मजल्यावर वीस अपार्टमेंट. प्रत्येक अपार्टमेंट दोन बेडरूम हॉल आणि किचनने युक्त. अशा जागेत माझ्या यू. एस.मधल्या निवासाला सुरुवात झाली, त्याच्या तीन पार्टनरसह!
प्रत्येक जण आपापल्या कामाला लागला. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. आज भाजी करण्याची पाळी उन्मेषची होती. उन्मेष गुजरात राज्यांतल्या सुरतहून या ठिकाणी सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून आलेला होता. पहिल्याच दिवशी मला कळलं की जेवण हे साग्रसंगीत असलं पाहिजे असं नाही. ताजी केलेली भाजी आणि मायक्रोवेव्हवर गरम केलेल्या पोळय़ा हे एक वेळचं पुरेसं जेवण होऊ शकतं. बरोबर मुबलक दही घ्यावं. एक गॅलनचे म्हणजे जवळजवळ चार लिटरचे दहय़ाचे कॅन्स मिळतात. त्यामुळे जेवताना दहय़ाचा वापर मुबलक प्रमाणात करता येतो. असेच दुधाचे कॅन्स मिळतात. सारा हिशेब गॅलनमध्ये.
बंगलोरहून आलेल्या संजयला स्वयंपाकाचं काहीही ‘ट्रेनिंग’ नव्हते. भात करताना तांदुळाच्या प्रमाणात पाणी घालावं लागतं हे त्याच्या गावीही नव्हतं. त्यामुळे पाण्याचे कमी प्रमाण घेऊन केलेला त्याचा भात फडफडीत झाला होता. पण कुणी कुणाच्या पदार्थावर टीका करायची नाही हा एक अलिखित नियम. त्यामुळे थोडा फार पाण्याचा हबकारा मारून नंतर मायक्रोओव्हनमध्ये गरम करून प्रत्येक जण आपल्याला हवा तसा भात मऊ करून घेत होता.
तिथं गेल्यावर मला कळलं की ही मंडळी दिवसातून दोन वेळा स्वयंपाक करीतच नाहीत. (भारतीय गृहिणीनों, या मंडळींचं अनुकरण करून पन्नास टक्के वेळ वाचवा. कामं कमी करा.) सकाळी ९ला ऑफिसमध्ये जायचं असतं म्हणजे सकाळी काही करता येत नाही, त्यामुळे रात्री केलेली भाजी गरम करून डब्यात भरायची. जितक्या पोळय़ा पाहिजे असतील तितक्या प्लॅस्टिक पॅकेटमधून काढून फक्त तीस सेकंद मायक्रोओव्हनमध्ये गरम करायच्या (पोळय़ा छान फुगतात)आणि डब्यात भरायच्या. हवं असेल तर डबीमध्ये लोणचं घ्यायचं की झालं दुपारचं जेवण तयार!
संध्याकाळी घरी आल्यावर मात्र ज्यांचा ‘टर्न’ असेल त्याने स्वयंपाकघराचा ताबा घेऊन भाजी बनवायची, वा दाल तडका बनवायचा आणि जिरा राईस वा पुलाव बनवायचा, पण हे सगळं इतकं बनवायचं की रात्रीचं जेवण उरकून दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या डब्याकरिता उरलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कणिक भिजवा, मळा, पोळय़ा लाटा आणि तव्यावर भाजा. या सर्वातून पूर्ण मुक्तता! आयत्या तयार पोळय़ांची पाकिटे विकत आणायची. जेवायला बसायच्या अगोदर फक्त तीस सेकंद पोळय़ा मायक्रोओव्हनमध्ये गरम करायच्या. ताटात वाढून जेवायला सुरुवात करायची, अशीच परोठय़ाची पाकिटंही मिळतात. चवीने पोळय़ा खाणाऱ्याला ‘फ्रोझनपोळय़ा’ मिळतात. बटरपेपरमध्ये प्रत्येक पोळी गुंडाळलेली असते. ही मात्र तव्यावर भाजावी लागते. या पोळय़ा चविष्ट असतात. इन्स्टंट भाज्यांची पाकिटंही मिळतात. गरम पाण्यात टाका. पाच मिनिटांत भाजी तयार आणि उदरभरणनोहे म्हणत आपणही भाजीवर ताव मारण्यास मोकळे.
स्वावलंबन हा अमेरिकेमध्ये कळीचा शब्द आहे. अहो, काम करायला माणसंच मिळत नसतील तर आपलं काम आपणच करावं लागतं. स्वावलंबनाला पर्यायच कुठे आहे. भांडी घासायला मोलकरीण नाही म्हणजे ती आपणच घासणं आलं आणि कपडे धुवायला मोलकरीण नाही म्हणजे मशीनमध्ये कपडे टाकणं आणि काढणं आपणच करायचं. बरं वॉशिंग मशीन इस्त्री करीत नाही आणि इस्त्री करून देणारेही नाहीत, त्यामुळे कपडय़ांना इस्त्री करण्याचं काम ज्याचं त्यालाच करावं लागलं. फार काय घरातला कचरा कचरेवाला येऊन घेऊन जात नाही तर आपणच कचरेवाला बनून कचरा व्यवस्थित प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून तळमजल्यावर असलेल्या कचरापेटीत टाकायचा असतो. वॉचमन कुठेही नसतो. त्याचं काम ऑटोमॅटिक लॉक्स करीत असतात. आपल्या इकडच्या सोसायटींतील मोलकरीण, झाडूवाला आणि वॉचमन ही अत्यावश्यक असणारी माणसं इथं कुठंच दिसत नाहीत.
मुलाला भेटण्याच्या निमित्ताने अमेरिकेला आलो आणि तात्पुरत्या निवासाकरिता अमेरिकेत आलेली आजची ही भारतीय तरुण पिढी इथं कशी राहते याचं वास्तव दर्शन घडलं. इथं फक्त तरुण मुलगेच अपार्टमेंट शेअर करून राहतात असं नाही. अपार्टमेंट शेअर करून राहणाऱ्या सचिनच्या ऑफिसमधील काही विवाहित तरुणीही भेटल्या. एक तर आपल्या एक वर्षांच्या लहानग्याला आई-बाबांकडे सोपवून अमेरिकेत आली होती. मुंबई ऑफिसमधून एक वर्षांकरिता कंपनीने तिची इथं बदली केली होती. आपापला व्यवसाय सोडून नवऱ्याबरोबर वा बायकोबरोबर येणं कुणालाच शक्य नव्हतं.
भारतामध्ये कोडकौतुकात वाढलेली आजची ही तरुणाई अमेरिकेत काही दिवसांकरिता का होईना कशी स्वावलंबी बनून राहते हे पाहायला मिळालं, हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं होतं.