रात्री अपरात्री
दर पाच दहा मिनिटांनी
बाळ दचकून उठतंय्

कुठे तरी
कुणी तरी त्याच्या विरोधात
कट रचल्याचं
त्याला कळलंय् की काय

नुकत्याच गावी गेलेल्या
आजीचा चेहरा
त्याच्या मेंदूच्या जाळीत
फुलपाखरासारखा अडकलाय्

चेहरे अपरिहार्यपणे बदलतात
शेवटी सोबत काहीच उतरतात
नंतर नंतर तर
आपलं प्रतिबिंब पहायलाच
समोर डोळे नसतात
हे त्याला
आताच कळलंय् की काय

पृथ्वीवरल्या
त्याच्या पहिल्याच पावसाळ्यात
बाप म्हणून
पाऊस दाखवताना बाल्कनीतून
घाबरून तो छातीला बिलगतोय्
हळूच मागे वळून पाहातोय्

त्याच्या इवल्याशा डोळ्यांना
सारं शहर
मिठी नदीच्या त्सुनामी लाटांचा
कहर झेलत हात उंचावत
बुडत चाल्लेलं दिसतंय् की काय

उसनं अवसान भरल्या गळ्यानं
त्याची आई गाताना अंगाई
चुळबुळ थांबवून
तो निश्चल का होतो

सकाळी वर्तमानपत्रावर शी
करवताना
त्याचा आश्चर्यचकित चेहरा
साऱ्या बातम्यांवर का फिरत
राहातो

बेल वाजली की नेहमीच तो
दचकून दाराच्या दिशेने का पाहातो
आपला काहीच गुन्हा नसताना
कुणी तरी उगाच आपल्या मागावर
असल्याचं त्याला वाटतंय् की काय

आता याचं काय होईल म्हणून
झोपेतही तो माझं बोट घट्ट धरून
मलाच जगायची वाट दाखवतो
आहे की काय

खांद्यावर डुगडुगती मान
विसावताना
माझ्या पाठीमागला
विस्तीर्ण भूतकाळ त्याला दिसला
की काय

कधीकधी
बाळ झोपेत खुद्कन हसतं
मी न सांगताच माझी गोष्ट
त्याला कळली की काय.