‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ असं मानत अनेक गोष्टींवर लहानपणी फुली मारली जायची. सिनेमा बघायला मिळायचा नाही, आणि ताटातलं सक्तीने खावंच लागायचं, पण त्याचवेळी परीक्षांच्या काळात आमच्याबरोबरीनं जागरण करणारे, क्लास कितीही उशिरा सुटला तरी जेवणासाठी वाट बघणारे कुटुंबवत्सल प्रेमळ बाबाही तेच होते. आणि आताच्या काळात बाबांनी बोलणं टाकणं ही शिक्षा वाटावी, असे दिवसच नाहीत. मुलांनी ऑलरेडी कान ‘बंद’ केलेले असतात, व्यक्तिस्वातंत्र्याच्या वाऱ्यांमुळे खोलीचं दारही बंदच असतं. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने कालचे बाबा आणि आजचा बाबा याविषयी

‘फादर्स डे’ जसजसा जवळ येऊ लागतो तसतशी जन्मदात्यासाठी भेटकार्डे, शुभेच्छापत्रे घेण्यासाठी दुकानात एकच गर्दी उसळते. कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी हातून निसटून जाऊ नये म्हणून सगळेच ‘अॅलर्ट’ होतात. वडिलांशी असलेले नात्याचे बंध घट्ट (?) करण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी छापील शब्दांचं हे माध्यम सगळ्यांना जवळचं आणि प्रभावी वाटू लागलं आहे. खिशात पॉकेटमनीही खुळखुळत असल्यामुळे मुक्या भावनांना शब्दरूप देण्याचा हा पर्याय सोपा व सुलभ वाटतो. पण..
तसं असेल तर वयाची पन्नाशी उलटलेल्या आमच्या पिढीला चक्क कृतघ्नच म्हणावे लागेल. वडिलांसाठी आम्ही कधी असा खास दिवस पाळलाच नाही. आमच्यासाठी आदर व्यक्त करणं हे रोजचं विहित कर्मच असायचं. आदरयुक्त भीती मनात दडलेली असायची. कुटुंबप्रमुख म्हणून वडिलांचा निर्णय महत्त्वाचा असे. त्यांनी घराच्या स्वास्थ्यासाठी घालून दिलेले नियम, शिस्त पाळणे, ‘कां?’ हा प्रश्न न विचारता त्यांच्या मतांचा आदर राखणे, उलट उत्तर न देणे, दिल्यास ‘छडी लागे छम छम’चा प्रसाद खाणे, एखादी गोष्ट करावीशी वाटली तरी वडिलांचा विरोध असेल तर न करणे; यातून त्यांच्याविषयीचा आदरभावच व्यक्त केला जात असे. त्यांच्या शब्दाचा मान ठेवला जात असे. याचा अर्थ आम्ही, वडिलांच्या सांगण्यावरून १४ वर्षे वनवास भोगणारे आज्ञाधारक रामचंद्र होतो, असं मुळीच नाही. आमच्याही नाकावर राग बसलेला असायचा. आम्हीही कुरकुरायचो, पण वडिलांचा शब्द खाली पडू देत नव्हतो, हे खरं.
माझ्या वडिलांना सिनेमा बघितलेला, त्यात पैसे फुकट घालवलेले आवडायचं नाही. आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणी (विशेष करून मैत्रिणीच) सिनेमाला निघाल्या की वाईट वाटायचं. पण वडील रागावतील हा धाक असल्यामुळे आम्ही चेहरे पाडून बसायचो. पण हट्ट करत नव्हतो. सुट्टीत कधी तरी मग ‘मोगॅम्बो खुश हुआ’ असा मामला घडायचा आणि सिनेमा बघण्याचा ‘अलभ्य लाभ’ व्हायचा. मात्र त्याच वेळी इतरांच्या घरात डोकावण्याची वेळ आल्यावर ‘भाताशिवाय’ होणारी जेवणं बघताना, आमच्या घरात मात्र सगळ्यांना भात आवडतो म्हणून कोणत्याही किमतीला जिथून मिळेल तिथून तांदूळ आणून, तिथे काटकसर न करण्याच्या वडिलांच्या स्वभावाचे दर्शन व्हायचे आणि सिनेमा बघू न देण्यामागची तर्कसंगती लागायची. अर्थात हे सार्थ नियोजन कळण्यासाठी काही पावसाळे जावे लागले होते हे मात्र खरं! पण त्याक्षणी ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ मानत सिनेमावर फुली मारली जायची.
घरात बाजारहाट वडीलच करायचे. ऋतुमानानुसार सगळ्या भाज्या घरात आणण्याचा त्यांचा प्रघात. त्यात शेपू, कारले, परवर बघितली की आम्हा मुलांची तोंडं बघण्याजोगी व्हायची. पण पानात पहिल्यांदा सगळं वाढायचं आणि पहिलं वाढलेलं सगळं खायचंच अशी शिस्त. तिथे फटकन् ‘नाही’ म्हणण्याची प्राज्ञा नव्हती. ‘आज माझ्या आवडीची म्हणून शेपू खा, उद्या तुझ्या आवडीची म्हणून फ्लॉवर खा’ असा वर घरातल्या इतरांचा सल्ला. पाण्याच्या घोटाबरोबर भाजी खाल्ली जायची. ‘आधी सक्तीने, मग भक्तीने’ अशी जिव्हा संस्कृती घडत गेली. पण त्याचा परिणाम म्हणून सुदृढ आरोग्यसंपदा पदरात पडली, कुठेही गेलो तरी उपासमार झाली नाही, हे आता जाणवतंय.
आजूबाजूच्या घरातील ‘पर्यावरण’ही थोडं फार मिळतंजुळतं होतं. माझ्या मैत्रिणीला सातच्या ठोक्याला घरात पोहोचावे लागे. कुकर लावायचा आणि कामवाल्या बाईने घासून ठेवलेली भांडी धुऊन जागेवर लावायची हे तिचे काम होते. सकाळी आठला जेवून बाहेर पडणारे वडील डबा नेत नसत. त्यामुळे घरात आल्याबरोबर सगळ्यांनी जेवायला बसायचे हा वडिलांचा शिरस्ता. त्यामागे छुपा उद्देश मुला-मुलींनी काळोख पडायच्या आत घरी परतायचे. खास करून मुलींच्या सुरक्षिततेसाठी काळजीपोटी घातलेली ही लक्ष्मणरेषा. तिचे पालन करण्यात मैत्रिणीने कधी कसूर केली नाही. पायरीवरच्या गप्पा रंगात येऊ देत नाही तर अभ्यासगटाची चर्चा असू दे ‘मला जाऊ द्या नं घरी आता वाजले की सात’ हा तिचा मंत्र चुकला नाही. भविष्याकडे नजर ठेवून अव्यक्त प्रेमापोटी मुलांच्या सुसंस्कृत घडणीसाठी अनुभवी वडिलांनी घातलेलं हे कुंपणच. अंतर्यामी कुठं तरी जाणवायचं की हे आमच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे कुंपणाच्या तारा जरा वाकवल्या जायच्या, पण अखेर ते पेल्यातील वादळच ठरायचे. दोन पिढय़ांमध्ये मतभेद असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे ते खोटं ठरणार नाही. पण त्या सत्याची धार पित्याला मानसिक त्रास होण्याइतकी तीव्र नसायची. शिवाय ‘अहो बाबा’ असल्यामुळे भीतीचा पडदा असला तरी ‘हितचिंतक मित्र’ दिसण्याइतका तो पारदर्शक होताच की. परीक्षांच्या काळात आमच्याबरोबरीनं जागरण करणारे, सांगितलेल्या वेळेला उठवणारे, मनातलं ओळखून आवडीची खानपान सेवा पुरवणारे, अभ्यासात लक्ष घालणारे, काही अडलं तर मदतीला तत्पर असणारे, क्लास कितीही उशिरा सुटला तरी जेवणासाठी वाट बघणारे कुटुंबवत्सल प्रेमळ बाबा त्यातून दिसायचे.
आजचा बाबा त्या उलट?
सद्यपरिस्थिती मात्र थोडी बदलत चालली आहे, असे वाटते. बाबालाच मुलाचा धाक वाटायला लागला आहे. घरगुती मेनू बघितला की ‘शी काय बोअर आहे, मी नाही खाणार’ असा खास कुमारवयीन शेरा बाबाच्या कानावर आदळल्याशिवाय राहात नाही. फास्टफूडचं मेनूकार्ड अगदी तोंडावर. शिवाय खिसा ऊबदार. मग काय पिझाबर्गरची ऑर्डर ठरलेली. बाबा ‘आरोग्यम् धनसंपदा’ची रेकॉर्ड वाजवतो, पण पालथ्या घडय़ावर पाणी. आर्थिक परिस्थितीच्या उंचावलेल्या आलेखामुळे ‘उपाशी राहू नको बाबा, खा हवं ते’ असे लाड मग होतातच. त्यामुळे दिवसा पाल्य समोर दिसला तर रागवायचं आणि त्यांच्या उपरोक्ष त्यांची कुरकुरणारी देहयष्टी, स्थूलता बघून काळजी करायची हाच बाबांच्या डोक्याला विकतचा ताप झालाय. काळजी करण्यापेक्षा वेळीच काळजी घ्यायची हे बाबाचे शब्द हवेतच विरून जातात. घरी येताना बिनधास्तपणे एखाद्या फास्ट फूड सेंटरवर किंवा फूड कॉर्नरवर चापून तरुणाई घरी. जन्मदात्यांच्या कष्टाची किंमत जाणवण्याचं प्रमाण थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय खरं. पण ते का याचाही विचार व्हायला हवा. काही घरात या बाबांचं म्हणणं ऐकलं जातंही, पण अनेकदा चर्चा किंवा वाद घातल्यानंतरच.
या बाबाचा धाक तर नाहीच. घरात कोणी पाहुणे आले आणि पाल्याला बोलावलं तर मोठय़ा मुश्किलीने खोलीबाहेर येणार. कोणत्याही कौटुंबिक स्नेहसंमेलनाला, लग्नकार्याला यायला चक्क नकार. इंटरनेट, मोबाइल इतर गॅझेटस् हेच त्यांचे विश्व. तिथे त्वरित प्रतिसाद पण समोर असलेल्या किंवा आलेल्या व्यक्तीकडे सरळसरळ दुर्लक्ष. या माध्यमांबाबत बाबा अगदीच अनभिज्ञ असेल तर ‘‘ही पोरं करतात काय? काही गैर तर नाही ना?’’ या विचाराने त्याचा मेंदू पोखरला जातो. पुन्हा विचारलं तर सरळ उत्तर मिळणारच नाही. एकूणच देहबोलीतून ‘काय नस्त्या चौकशा करताय?’ असा उमटलेला त्रासिक सूर. मुलांची एखादी अवाजवी मागणी धुडकावून लावली तर, ‘त्यात काय एवढं न आणून देण्यासारखं आहे? सगळ्याच मित्रांकडे या वस्तू असतातच.’ असं उर्मट भाष्य ठरलेलं. रागावून संभाषण बंदी जारी करावी तर त्याचाही फायदा नसतो. मुलांनी ऑलरेडी कान ‘बंद’ केलेले असतात, व्यक्तिस्वातंत्र्याच्या वाऱ्यांमुळे खोलीचं दारही बंदच असतं. वडिलांनी बोलणं टाकणं ही शिक्षा वाटावी असे आजकालचे दिवसच नाहीत. त्यामुळे मुलांच्या मागण्या पुरवताना बाबालोकांची दमछाक होताना दिसते. ‘फादर्स डे’ ला कृतज्ञता व्यक्त करताना ती जाणवली तर..
मुलांच्या मित्र-मैत्रिणींच्या नात्यातले अघळपघळ बंधही वडिलांच्या भूमिकेला छळत राहतात. त्यात भर पडते वेगवेगळ्या साइटवरून वाटलेल्या ज्ञानाची. माझ्या मैत्रिणीच्या लेकाने एकीशी सूत जमवलं. वडिलांच्या कानावर आल्यावर त्यांनी लेकाला धारेवर धरले. परिस्थितीची जाणीव करून देत शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करायला लावून मुलीचा नाद सोडायला भाग पाडलं. मुलाने नंदी-बैलासारखी मान हलवली खरी, पण मुलगी ‘बदला’ घेणार नाही ना, कारण कायदा तिच्या बाजूने, या विचाराने वडिलांची झोप उडाली.
अशा अनेक चिंतांनी ग्रासलेले सध्याचे वडील आणि आपल्याच कोशात गुरफटलेली त्यांची मुलं. दोन पिढय़ांत विचारांची दरी असतेच, ती असणारच आणि असायलाच हवी. पण तिची खोली जरा जास्त वाढलेली आहे. ही दरी भरून निघण्यासाठी गरज आहे. वडिलांना सगळं कळतं, त्यांचाच शब्द अंतिम मानायचा असतो. मुलाच्या यशाची कमान वर जावी म्हणून वडिलांची सगळी धडपड असते. हे निखळ सत्य मुलांनी थोडं समजून उमजून घेतलं तर वडिलांच्या मनातील काळजीचे ढग थोडे विरळ होतील. आणि बाबा-मुलं यांच्यातील नातं अधिक परिपक्व होईल नि ‘फादर्स डे’ खऱ्या अर्थाने साजरा करता येईल.