उद्याच्या ‘फादर्स डे’निमित्त २६ नोव्हेंबर २००८ च्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या लाडक्या पित्याच्या, विजय साळसकर आणि तुकाराम ओंबळे यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत, दिव्या साळसकर-पिंपळे आणि वैशाली ओंबळे
परीक्षेच्या काळात आम्ही रात्री जागून अभ्यास करीत असू, तेव्हा डय़ुटीवरून कितीही उशिरा किंवा थकून आले तरी पप्पा आमच्याबरोबर जागरण करीत. आम्ही झोपल्यानंतरच ते झोपत आणि सकाळी पुन्हा डय़ुटीवर निघत. सकाळी उठल्यावर तोच त्यांचा हसरा चेहरा पाहून आम्हालाही प्रसन्न वाटे. कधी कधी मला त्यांच्या या हसऱ्या चेहऱ्याचं खूप कौतुक वाटे आणि आश्चर्यही! ही किमया ते कशी साध्य करीत, याचा मनात अनेकदा विचार येई..
पपा शहीद झाले त्याच्या आदल्या दिवशीचा प्रसंग मला आजही लख्ख आठवतोय. त्या दिवशी आम्हा चौघी बहिणींना केक खावासा वाटत होता. आपण पपांना केक आणायला सांगू असं ठरवून आम्ही झोपी गेलो आणि आमच्या ध्यानीमनी नसतानाही पपा सकाळी डय़ुटीवरून घरी आले ते केक घेऊनच! पपांच्या बाबतीत नेहमी असंच व्हायचं. कुणास ठाऊक कसं, पण समोरच्या माणसाच्या मनात नेमकं काय चाललंय हे त्यांना अचूक ओळखू यायचं आणि आम्ही चौघी तर त्यांच्या लाडक्या लेकी.. त्यांच्यासाठी त्यांचे प्राणच जणू.. पण प्रत्येक वेळी पपांना आमच्या मनातील गोष्ट कशी समजे, हे आमच्यासाठी एक कोडंच होतं. आता कधीही न उकलणारं!
पपांचं आम्हा मुलींशी नातं हे मित्रत्वाचं होतं. ते जेव्हा भेटतील तेव्हा शाळेत, कॉलेज, खेळताना जे काही घडलं त्याचा इतिवृत्तांत आम्ही त्यांना सांगत असू. आमच्यातली कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपून राहात नसे. त्यांच्या डय़ुटीमुळे ते आम्हाला फारसा वेळ देऊ शकत नसत, पण कामावरून कितीही दमून आले तरी ते आराम करण्याऐवजी आमच्याशी खेळणं पसंत करीत. तासन्तास आमच्याशी खेळत. मुख्यत: कॅरम. आम्ही खूप मज्जा करायचो. त्यांचा सुट्टीचा दिवस हा खास आमचाच असे.. अगदी आमचा हक्काचा! पपांनी कामावरच्या ताणतणावाची जाणीव आम्हाला कधीही करून दिली नाही. त्यांचा दुर्मुखलेला चेहरा मी कधीही पाहिलेला मला आठवत नाही. त्यामुळे कितीही ताणतणाव असला तरी नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा संस्कार नकळत आमच्यावरही झाला.
आम्ही चौघी बहिणीच. भाऊ नसल्याने रक्षाबंधनाच्या दिवशी तेच सांगायचे, ‘तुम्ही मलाच राखी बांधा.’ त्यामुळे दर वर्षी पपांनाच राखी बांधून आमचा रक्षाबंधनाचा सोहळा साजरा व्हायचा. पपांना अनेक लोक सांगत की, तुम्हाला मुलगा हवा होता; पण पपा त्यांना निक्षून सांगत, ‘या चौघी माझे मुलगेच आहेत.’ त्यांना आमच्याविषयी खूप अभिमान वाटे. आपल्या पपांना आमच्याबद्दल इतकी खात्री आहे हे पाहून आम्हालाही खूप आनंद होत असे.
परीक्षेच्या काळात आम्ही रात्री जागून अभ्यास करीत असू, तेव्हा ते डय़ुटीवरून कितीही थकून आले तरी आमच्याबरोबर जागरण करीत. आम्ही झोपल्यानंतरच ते झोपत आणि सकाळी पुन्हा डय़ुटीवर निघत. सकाळी उठल्यावर तोच त्यांचा हसरा चेहरा पाहून आम्हालाही प्रसन्न वाटे. कधीकधी मला त्यांच्या या हसऱ्या चेहऱ्याचं खूप कौतुक वाटे आणि आश्चर्यही! ही किमया ते कशी साध्य करीत, याचा मनात अनेकदा विचार येई. आम्ही शाळा-कॉलेजमध्ये जायचो तेव्हा ते नेहमी बाहेरच्या जगाबद्दल आम्हाला सजग राहण्याचा सल्ला देत. जग चांगल्या-वाईट अशा दोन्ही प्रकारच्या माणसांनी भरलेलं आहे. तुम्ही माणसांची योग्य पारख करायला शिका, असं वारंवार सांगत. आज ते नसताना त्यांच्या या सल्ल्याचा खूप उपयोग होतोय.
मला आठवतयं, मी सातवीत असेन तेव्हा. गणेश विसर्जनाचा दिवस होता तो. पपा डय़ुटीवर व्यस्त होते. मी खेळता खेळता पडले होते. फारसं लागलं नव्हतं, पण त्यांना कळल्यावर तडक घरी आले. सगळीकडे ट्रॅफिक जाम होतं. त्यामुळे वाहन मिळणंही मुश्कील होतं. तरीही ते मजलदरमजल करत घरी पोहोचले आणि ते तसेच मला उचलून डॉक्टरकडे घेऊन गेले. एकदा माझी मोठी बहीण खूप आजारी होती. तेव्हा तिच्या काळजीने बेडरूममध्ये एकटेच रडताना मी त्यांना पाहिलंय. कर्तव्यदक्ष आणि खमका माणूस आपल्या लेकीच्या काळजीने ढसाढसा रडतोय हे पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं होतं. आपल्या मुलीच्या काळजीने व्याकूळ होऊन रडणारे पपा माझ्यासाठी नवीन होते. पप्पांचं एक वेगळंच रूप दिसलं मला त्या वेळी.
एक वडील म्हणून ते कर्तव्यदक्ष होतेच म्हणूनच आमच्या हातून एखादी चूक झाली की ते ओरडत नसत. या वेळेस तात्पुरती आमची समजूत काढत; पण दुसऱ्या दिवशी जवळ घेऊन ते आम्हाला आमची चूक समजावून सांगत, अगदी शांतपणे. पपा गेले त्याच्या दोन दिवस अगोदरच नेमकी मला कॉलेजची सुट्टी मिळाली आणि पपांनाही सुट्टी होती. त्या दिवशी मग त्यांच्यासोबत खूप गप्पा झाल्या. बोलता बोलता ते म्हणाले, ‘इथून पुढे जरा जबाबदारीनं वागा. सर्वाकडे लक्ष द्या. प्रत्येक वेळी मी तुमच्या सोबत असेनच असं नाही. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला हिमतीने तोंड द्यायला शिका.’ त्यांचं हे सारवासारवीचं बोलणं मला जरा खटकलंच. नंतर दोनच दिवसांनी ते आम्हाला सोडून गेले..
त्यांना त्यांचं मरण कळलं होतं का? आजही मला या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाहीए. मुंबईवर जेव्हा अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा सगळीकडेच गोंधळाचं वातावरण होतं. मी पपांना फोन केला, ‘पपा, जरा जपून. जास्त पुढे जाऊ नका.’ मी काळजीपोटी त्यांना सल्ला दिला, पण ते ऐकणाऱ्यांतले नव्हते हेही मला माहीत होतं.
‘हो’ एवढंच बोलून त्यांनी फोन ठेवला आािण पाचच मिनिटांनी मला कळलं की, ते या घटनेत शहीद झाले. त्यांच्याशी हे माझं शेवटचंच बोलणं ठरलं. त्यांचा ‘हो’ हा शेवटचा शब्द आजही मनात साठून आहे.
लोकांना सतत मदत करणं, हे त्यांच्या रक्तातच होतं. कोणीही त्यांच्याकडे मदतीसाठी आला आणि त्यांनी त्या व्यक्तीला मदत केली नाही, असं कधी झालेलं मला आठवत नाही आणि तोच संस्कार त्यांनी आमच्यावरही केला. माणसांमध्ये गरीब-श्रीमंत, जातपात असा भेदभाव न करता त्यांना मदत करत राहावं हेच ते आम्हालाही सांगत. ‘समानते’चा हा संस्कार त्यांनी नकळत आमच्यात रुजवला.
ते गेले तेव्हा त्यांनी ज्या ज्या लोकांना मदत केली ती माणसं आम्हाला भेटायला आली होती. त्यातला एक प्रसंग न विसरण्यासारखा. भेटायला आलेलं जोडपं घटस्फोटासाठी पोलीस स्टेशनला त्यांच्याकडे तक्रार घेऊन आलं होतं. त्या जोडप्याला त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे समजावलं की, त्यांनी घटस्फोट न घेता पुन्हा सुखाने संसार करण्याचा निर्णय घेतला. ‘आज आमचा सुखाचा संसार सुरू आहे तो ओंबळेंमुळेच.’ हे सांगून ते जोडपं ढसाढसा रडत होतं, आमच्याहीपेक्षा जास्त. त्या वेळी पपांच्यातल्या परोपकाराचा गुण प्रकर्षांने जाणवला. या प्रसंगानं मला खूप काही शिकवलं. दुसऱ्याचं आयुष्य आपण कशा प्रकारे सुखकर करू शकतो हे मला त्या दिवशी कळलं.
पपा जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा फक्त आपले लाडके ‘पपा’ यापलीकडे त्यांचा फारसा विचार केला नाही; परंतु ते गेल्यानंतर लोकांकडून त्यांच्यातील माणूस म्हणून असलेल्या चांगल्या गुणांचा परिचय होत गेला आणि कुठे तरी मनात पक्कं केलं- त्यांच्या संस्कारांचा, स्वभावाचा वसा आपणही पुढे न्यायचा, त्यांच्यासारखंच चांगलं वागून, लोकांना मदत करून.. अनेकदा लोक म्हणतात की, ‘तू पूर्वीची रागीट स्वभावाची वैशाली राहिली नाहीस. तू खूप शांत, समजूतदार झाली आहेस.’ याचं कारण फक्त मलाच माहीत आहे..
मी आता त्यांच्यासारखं व्हायचं ठरवलंय, चांगलं माणूस ! ल्ल
शब्दांकन- लता दाभोळकर
lata.dabholkar@gmail.com