योगेश शेजवलकर

yogeshshejwalkar@gmail.com

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
ayesha jhulka, High Court, Pet Dogs Killing, Ayesha Jhulka Moves High Court, Seeking Expedited Justice, ayesha jhulka pet dog killed, ayesha jhulka dog killed case, mumbai high court, mumbai news,
हत्या झालेल्या श्वानाला न्याय मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आयेशा जुल्का उच्च न्यायालयात
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

‘‘अपयशाचा विचार न करता, तू जर तुझ्या भीतीसमोर ठामपणे उभं राहण्याची तयारी दाखवलीस, तर परिस्थिती कशी हाताळायची? ती नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायचं? तत्त्वांशी तडजोड न करताही व्यवहारचातुर्य कसं दाखवायचं? या कुठेही न शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी तुला शिकता येतील. पुस्तकातून मिळणारं शिक्षण म्हणजे ‘थेअरी’ आणि प्रत्यक्ष व्यवहार म्हणजे ‘प्रॅक्टिकल’ यात कमालीचं अंतर असतं.’’ बाबांचं हे वाक्य त्याला विचारप्रवृत्त करून गेलं.

मेडिकल एंटरन्सच्या म्हणजे ‘नीट’ परीक्षेचा निकाल लागला आणि वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. मिळालेल्या गुणांमुळे एका मोठय़ा शहरातल्या ज्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याला अ‍ॅडमिशन हवी होती, तिथं त्याला ती मिळण्याची आता पूर्ण शक्यता होती. निकालानंतरचे त्याचे दोन दिवस अभिनंदनाचा वर्षांव स्वीकारण्यात गेले. आईबाबाही निकालाची धाकधूक संपल्यामुळे निवांत झाले होते आणि अनेक महिन्यांनी, आपल्याला गप्पा मारण्यासाठी आता इतरही विषय असतील या जाणिवेने सुखावलेही होते. शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना आपापल्या अभ्यास न करणाऱ्या मुलांवर डाफरण्यासाठी आणि त्यांची तुलना करण्यासाठी आणखी एक हुशार मुलगा मिळाला होता. थोडक्यात, परीक्षेच्या त्या निकालानं सर्वानाच काही ना काही दिलं होतं.

अ‍ॅडमिशनसाठी फॉर्म मिळायला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तो फॉर्म घेऊन आला. आता लगेच दुसऱ्याच दिवशी आपल्याला हव्या असलेल्या कॉलेजचं नाव पहिल्या प्रेफरन्समध्ये लिहून तो फॉर्म भरेल, अशी आई-बाबांची अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही. उलट दोन-तीन दिवस उलटल्यावरही फॉर्म भरण्याचं कोणतंही चिन्ह दिसेना. उलट फॉर्म भरण्याचा विषय काढल्यावर त्याची काहीशी चिडचिडच होत होती. आई-बाबांसाठी ही गोष्ट अगदीच अनपेक्षित होती. शेवटी न राहवून एके दिवशी आईनं त्याला विचारलं, ‘‘अरे फॉर्म भरण्याची मुदत संपायला आता फक्त तीनच दिवस शिल्लक आहेत. सेंट्रलाइज पद्धतीनं जरी अ‍ॅडमिशन असली तरी आपण आपल्या गोष्टी वेळेवर पूर्ण करायला पाहिजेत नाही का?’’ आईचं बोलणं ऐकल्यावर त्याने क्षणभरासाठी पॉज घेतला आणि काही तरी विचार करून तो म्हणाला, ‘‘मला वाटतंय की पहिल्या प्रेफरन्समध्ये मी आपल्या शहरातलंच कॉलेज लिहावं.’’ ते ऐकून आईच्याही नकळत तोंडून शब्द बाहेर पडले ‘‘पण का?’’

‘‘तुम्हाला इथं एकटं सोडून जावं, असं मला वाटत नाही.’’ त्याचं उत्तर पूर्ण होण्याआधीच आई म्हणाली, ‘‘अरे पण एकटा तू असणार आहेस. आम्ही नाही.. तुला एकटं राहण्याचं टेन्शन आलं आहे का?’’ असं म्हणून आईनं त्याच्या मनात काय सुरू आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर काहीच न बोलता ‘‘हं.. बघू.. बोलू आपण,’’ असं तुटकपणे म्हणत तो आपल्या खोलीत निघून गेला.

संध्याकाळी ऑफिसमधून बाबा घरी आल्यावर आईनं सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्याचं असं म्हणणं बाबांसाठीही अनपेक्षित होतं. काही वेळ विचार करून बाबा म्हणाले, ‘‘त्याला एकटं राहण्याचं टेन्शन आलं असेल असं मला तरी वाटत नाही. कारण एक दिवस शिक्षणासाठी घर सोडून हॉस्टेलमध्ये जावं लागेल हे त्याला दहावीपासून माहिती होतं आणि त्याबद्दल काही हरकत नाही.. हे त्यानं आपल्याला अनेकदा बोलूनही दाखवलं आहे. इथं प्रॉब्लेम काही तरी वेगळाच आहे.’’

हा प्रॉब्लेम नेमका काय असेल? याबद्दल आई-बाबांचं बराच वेळ विचारमंथन झालं. मुळात तो ‘होमसिक’ होणाऱ्या मुलांपैकी नक्कीच नव्हता. शिवाय त्याच्या शाळेतल्या मित्र-मत्रिणींच्या कंपूपैकी कोणालाही ‘मेडिकल’ करायचं नसल्याने त्यांच्यासाठी इथं अ‍ॅडमिशन घेण्याचाही प्रश्न नव्हता. त्यात ते मोठं शहर सध्याच्या घरापासून फक्त चार तासांच्या अंतरावर होतं. तेव्हा घरी येण्यासाठी कॉलेजला मोठी सुट्टी असण्याचीही गरज नव्हती. शिवाय त्याच्या शिक्षणासाठी केलेली आर्थिक तरतूद पुरेशी असल्यानं आणि त्याची त्याला कल्पना असल्यानं आर्थिक ओढाताण होण्याचं कोणतंही दडपण त्याच्यावर असण्याचं काहीही कारण नव्हतं. असं असतानाही त्याच्या अशा वागण्याचा अर्थ समजेना.

शेवटी आईबाबांनी त्याला थेट विचारायचं ठरवलं. पुढच्या काही क्षणात दोघंही त्याच्या खोलीत गेले आणि पुढची काही मिनिटं त्याच्यावर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती झाली. इतकं होऊनही तो काहीच बोलेना. शेवटी आई-बाबांचा नाइलाज झाला. त्याच्या खोलीतून बाहेर पडताना बाबा त्याला म्हणाले, ‘‘तुला जेव्हा काही सांगावंसं वाटेल.. तेव्हा सांग. पण फॉर्म भरायला फार दिवस आपल्या हातात नाहीत हे लक्षात ठेव.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी तो टेबलापाशी आला आणि आपल्या हातातली फाइल आई-बाबांसमोर ठेवत म्हणाला, ‘‘ज्या ठिकाणी अभ्यास सोडून मला भलत्याच गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे तिथं जाण्यात तरी काय अर्थ आहे?’’ त्याने दिलेली फाइल आई-बाबांनी उघडून पाहिली. त्या फाइलमध्ये त्या मोठय़ा शहरातल्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये होणाऱ्या रॅगिंगच्या बातम्या होत्या. कॉलेज उत्तम होतं पण कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गेल्या काही वर्षांत बऱ्याच घटना घडलेल्या होत्या.

अर्थात कॉलेज मॅनेजमेंटही गप्प बसली नव्हती. काही केसेसमध्ये कडक कारवाई झालेली होती. पण कालांतराने पुन्हा जुन्या काही गोष्टी सुरू झाल्या होत्या. अर्थात त्याची परिणती कोणत्याही दुर्दैवी गोष्टीत अजून तरी झाली नसल्यामुळे वर्तमानपत्रात काहीही छापून आलेलं नव्हतं. पण सोशल नेटवìकग साइटवरती सध्या होत असणाऱ्या काही गोष्टींचे संदर्भ होते. हे सगळं वाचल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येत होती की बाहेरगावाहून येणारे विद्यार्थी हे सीनियर विद्यार्थ्यांचं ‘सॉफ्ट टाग्रेट’ असायचं. एकूण आर्थिक गणित बघता बाहेरच्या विद्यार्थ्यांना होस्टेलमध्ये राहणंच परवडण्यासारखं होतं त्यामुळे ते आयते सीनियर विद्यार्थ्यांच्या हाती लागायचे.

ते सगळं वाचून त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हेही आई-बाबांना समजेना. ते काही बोलणार, तेवढय़ात तो म्हणाला, ‘‘तिथं जाऊन आपल्याला फक्त त्रास होणार आहे आणि जिथं आपण नकोसे आहोत? तिथं कशाला जायचं?’’ त्यावर आई म्हणाली, ‘‘तुला तिथं होत असणाऱ्या गोष्टींबद्दल प्रॉब्लेम आहे? की त्या सगळ्या गोष्टी तुझ्याबाबतीतही होतील याची भीती वाटते आहे? आता तसं म्हणाल तर ही गोष्ट चांगली आहे की या गोष्टी तुला जाण्याआधीच समजल्या. पण समजा यातलं तुला काहीच माहिती नसतं आणि तिथं गेल्यानंतरच या गोष्टी समजल्या असत्या तर तू काय केलं असतंस?’’

‘‘ते मला माहिती नाही, पण आता या गोष्टी समजल्या आहेत त्यामुळे विचार करण्याची एक संधी माझ्याकडे नक्कीच आहे. खरं सांगायचं तर नवीन ठिकाणी तुम्ही ‘टाग्रेट’ होणार असाल तर भीती वाटणारच ना? शिवाय तो त्रास असह्य झाला तर माझं अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यावरही त्याचा परिणाम होणार आणि पर्यायाने गुणांवरही. तसं झालं तर आजपर्यंतची सगळी मेहनत फुकट जाईल, याची भीती जास्त मोठी आहे. समजा, एखादा प्रसंग घडल्यावर मी तक्रार करायची ठरवली तरी परिस्थिती अवघडच असणार आहे. म्हणजे त्यावर काही ठोस अ‍ॅक्शन घेतली गेली नाही तर मी तक्रार केली म्हणून माझा त्रास वाढणार. समजा अ‍ॅक्शन घेतली गेली तर ज्याला फटका बसेल तो डूख धरून राहणार. असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. ज्यांची उत्तरं मला माहिती नाहीत. ‘आपण बरं.. आपलं काम बरं.. आपला अभ्यास बरा’ या वृत्तीने काम करत असताना या ‘आऊट ऑफ सिलॅबस’ असलेल्या प्रश्नांना तोंड का द्यायचं? आणि ज्या वातावरणात हे प्रश्न असणार आहेत त्या वातावरणात आपणहून का जायचं? त्यापेक्षा आपल्या इथं असलेल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्यावी आणि मोकळं व्हावं.’’ असं म्हणत तो तणतणत पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला.

त्याक्षणी त्याच्यापाठोपाठ त्याची समजूत काढायला कोणी गेलं नाही. कारण त्याचे प्रश्न बरोबर होते.. त्याला वाटत असलेल्या भीतीत तथ्यही होतं.. त्याची भीती खरी ठरली तर त्याचा हॉस्टेलमधला प्रत्येक दिवस अवघड असणार होता. बाबांच्या लंच टाइममध्ये आई-बाबांचं फोनवर बराच वेळ बोलणं झालं. पण नेमकं उत्तर शोधताना बऱ्याच ‘जर-तर’वर विचार करावा लागणार होता. त्या दृष्टीने त्यानं त्याच्या शहरात अ‍ॅडमिशन घेणं हा सुवर्णमध्य वाटत होता.

रात्री सगळे जण जेवायला एकत्र बसले. जेवण सुरू असताना विषयांतर म्हणून वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. हसतखेळत जेवण झाल्यामुळे घरातलं वातावरण थोडं हलकं झालं. जेवण झाल्यावर फॉर्म त्याच्यासमोर ठेवत बाबा म्हणाले, ‘‘तू आज सकाळी जे म्हणालास त्यावर आम्ही विचार केला. आम्हाला तुझं म्हणणं पटलं. फक्त तू विचारात न घेतलेल्या एका गोष्टीबद्दल आपण बोलू. अर्थात त्यानंतरही कॉलेज कोणतं निवडायचं? हा तुझाच निर्णय असेल.

‘‘कोणती गोष्ट?’’ त्याने काहीशा साशंकतेनं विचारलं. त्यावर बाबा म्हणाले, ‘‘तू इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतलीस. तरीही ‘टाग्रेट’ होण्यापासून तुझी सुटका नाही.’’

‘‘म्हणजे?’’ बाबांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याचा प्रश्न आलाच.

‘‘एक तर इथल्या कॉलेजमध्ये होत असलेल्या घडामोडी आपल्याला अजून पूर्ण माहीत नाहीत. शिवाय डॉक्टर होण्यासाठी साडेचार वर्ष वर्गात शिकल्यानंतर एका वर्षांची इंटर्नशिप करावी लागते. ती ज्या हॉस्पिटलमधून तू करशील, तिथं तुझ्या असण्याबद्दल कोणाला तरी प्रॉब्लेम असू शकतो. तेव्हा तिथं तुला ‘टार्गेट’ केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर तू डॉक्टर म्हणून काम करताना एखाद्या प्रसंगात तू पूर्ण प्रयत्न करूनही काही कमी-जास्त झालं तर तूच मुख्य ‘टार्गेट’ असण्याची भीती आहेच. थोडक्यात, कोणती ना कोणती भीती आहेच.. असं कायम भीतीतच राहायचं असेल, तर कशाला इतकी मरमर करून डॉक्टर व्हायचं?’’ आई शांतपणे त्याला म्हणाली.

‘‘आई, मला व्हायचंच आहे डॉक्टर. पुढे असं होईल.. पुढे तसं होईल..

गोष्टी ‘फेल’ होतील. हाच विचार करत बसलो तर कोणत्याच प्रोफेशनमध्ये काम करता येणार नाही. म्हणजे मला ही कल्पना आहे की मला त्या हॉस्टेलबद्दल जी भीती आहे, त्याचाच मी या क्षणी विचार करतोय. पण माझं म्हणणं इतकंच आहे की आज माझं वय लहान आहे त्यामुळे या माझ्या भीतीला मला कदाचित तोंड देता येणार नाही, पण उद्या..’’ त्याचं बोलणं अर्ध्यातच तोडत आई म्हणाली, ‘‘आज वय लहान आहे, उद्या अनुभव लहान असेल. परवा तुझं सोशल स्टेटस.. तुझे कॉन्टॅक्ट्स लहान असतील. हे बघ, परिस्थिती कोणत्या

ना कोणत्या बाबतीत ‘तुम्ही कसे लहान आहात,’ याची जाणीव आपल्या प्रत्येकालाच करून देत असते आणि तुम्हाला जे करायचं आहे त्यात अपयश येईल ही भीती दाखवत असते. तेव्हा प्रश्न इतकाच आहे की अपयश येईल ही भीती वाटल्यावर आपण काय करतो? त्याच्यापासून पळतो.. मी ठामपणे त्या भीतीसमोर उभं राहतो.’’

‘‘सगळं समोर दिसत असताना उगाच हिरोगिरी करण्यात मला काहीही तथ्य वाटत नाही.’’ तो अजूनही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हता. ‘‘हे बघ, उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. तुझ्यासमोर एकच प्रश्न आहे. तुला ज्या गोष्टीची भीती वाटते त्याला तोंड देण्याची धमक तुझ्यात आहे की नाही? त्याचं उत्तर ‘नाही’ असेल तर ते लढाईच्या आधीच पराभव मान्य केल्यासारखं होईल. अर्थात तशी धमक तू दाखवलीस म्हणजे ती भीती प्रत्यक्षात येणारच नाही किंवा आली तरी तू त्याच्यावर मात करशील, असं मला अजिबात म्हणायचं नाही. कदाचित आपण पूर्ण तयारी केली असतानाही अपयश येईल.’’

‘‘मग?’’ तो हळूहळू आपल्या विचारांच्या कोशातून बाहेर पडत होता.

‘‘अपयशाचा विचार न करता, तू जर तुझ्या भीतीसमोर ठामपणे उभं राहण्याची तयारी दाखवलीस, तर अशी परिस्थिती कशी हाताळायची? ती नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायचं? तत्त्वांशी तडजोड न करताही व्यवहारचातुर्य कसं दाखवायचं? या कुठेही न शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी तुला शिकता येतील. पुस्तकातून मिळणारं शिक्षण म्हणजे ‘थेअरी’ आणि प्रत्यक्ष व्यवहार म्हणजे ‘प्रॅक्टिकल’ यात कमालीचं अंतर असतं. अपयशाची भीती ही खरं तर या अंतरामुळेच तयार होते. तेव्हा ते अंतर कमी करण्याची संधी आपणच आपल्याला द्यायची असते. आमच्या दृष्टीने तू मेडिकल कॉलेजमध्ये जाणं ही तुझी व्यावहारिक जगातली ‘अ‍ॅडमिशन’ आहे. पण कॉलेज कोणतं? हा निर्णय तुझाच आहे. अर्थात तुझा जो निर्णय असेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील.’’ असं म्हणून बाबांनी फॉर्मशेजारी पेन ठेवलं आणि आई-बाबा आपल्या खोलीत निघून गेले.

मग पुढचा बराच वेळ त्यानं विचार केला आणि शेवटी हॉस्टेलमध्ये काय होईल त्याला सामोरे जाऊ, हे ठरवत मोठय़ा शहरात असलेल्या कॉलेजलाच त्यानं पहिलं प्राधान्य दिलं.