आजी -आजोबांसाठी
कीर्तनातील सर्वोच्च पदवी वयाच्या  ७७ व्या वर्षी मिळवणाऱ्या, आजही तितक्याच उत्साहाने कीर्तन करणाऱ्या आणि दादरचं ‘फॅमिली स्टोअर्स’ही सांभाळणाऱ्या शैलाताई जोशी यांनी ‘मी घरात आले’ ही कविता शब्दश: स्वत:मध्ये मुरवली आणि समाधान मिळवलं. सगळी कर्तव्यं निभावून आता ‘म्हातारपणी सुख उपभोगणाऱ्या’ शैलाताईंविषयी..
अठराव्या वर्षी मी जोशी यांच्या घरात आले त्या घटनेला आत्ताच्या १२ मार्चला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी म्हणजे लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याने दिलेला कानमंत्र आजही माझ्या मनात जागा आहे. त्यांचे शब्द होते, ‘हे बघ, माझ्यावर सर्व संसाराची जबाबदारी आहे. वडिलांना अंथरुणावर असताना मी माझ्या भावंडांची शिक्षणं, लग्नकरय व्यवस्थित पार पाडीन, असा शब्द दिलाय. तेव्हा आपली हौसमौज खुंटीला बांधून ठेवायची आणि कामाला लागायचं. सगळी कर्तव्ये निभावल्यानंतर म्हातारपणी सुख मिळालं तर उपभोगू..’ दादरच्या ‘फॅमिली स्टोअर्स’चे मालक अप्पा जोशी यांच्या सहधर्मचारिणी ह.भ.प. शैलाताई जोशी गतजीवनातील आठवणींना उजाळा देत होत्या.
 त्या दिवसापासून शैलाताई कुटुंबाच्या आणि दुकानाच्या व्यापात बुडून गेल्या. या धबडग्यातून थोडी उसंत मिळाल्यावर ५०व्या वर्षी त्यांनी बी.ए. केलं. आणखी काही वर्षांनी म्हणजे ६५व्या वर्षी कीर्तन शिकायला सुरुवात करून ६९ व्या वर्षी ‘कीर्तनालंकार’ ही पदवी मिळवली आणि त्याही पुढे जाऊन गेल्याच वर्षी म्हणजे वयाच्या ७७व्या वर्षी ‘कीर्तनमधुकर’ म्हणजे कीर्तनातील मास्टर्स ही पदवी त्यांनी विशेष श्रेणीत पटकावली.
वयाच्या उत्तरार्धात शिकायला सुरुवात करूनही त्यांचे आजवर साडेचारशेच्या वर कीर्तनाचे कार्यक्रम झाले आहेत. आजही जेव्हा त्या काठपदरी नऊवारी नेसून झांजा चिपळय़ांच्या साथीने खडय़ा आवाजात आख्यान लावतात तेव्हा समोरचा श्रोतृवृंद डोलायला लागतो.  
कीर्तनकलेचं मूळ त्यांच्या संस्कारांत सापडतं. त्यांचं माहेर कोकणातलं. वडील दशग्रंथी ब्राह्मण. त्यामुळे श्लोक, ओव्या, आर्या.. लहानपणापासूनच मुखोद्गत, पण फायनल पास झाल्या झाल्या लग्न झालं आणि माहेरचा मोठा वाडा, तिथली सुबत्ता सगळं मागं राहिलं. दादर चौपाटीजवळील एका बराकीतील दोन छोटय़ा खोल्यांत त्यांचा संसार सुरू झाला. अवतीभवती माणसंच माणसं. त्यात यजमानांच्या व्यवसायात स्थिरता नाही, सगळय़ा जबाबदारींची मालकी पहिल्याच दिवशी अंगावर सोपवलेली. अशा परिस्थितीत त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली की, ‘देवाने आपली जी इथे योजना केलीय त्यामागे निश्चितपणे काही तरी हेतू असणार. त्यासाठी आता समोर येणारं कोणतंही काम मला न भीता पार पाडायचंय.’ ही निर्मळ भावना मनात पक्की रुजवल्यामुळे पुढे अनेक वर्षे उपसलेल्या अमाप कष्टांचं त्यांना कधी दु:ख वाटलं नाही. त्यांचे आनंदाचे झरे झाले.
सुरुवातीचे चटके सोसल्यानंतर हळूहळू ‘फॅमिली स्टोअर्स’ची घडी बसू लागली. त्या वेळी दुकानातला सगळा माल घरीच बनायचा. दर आठवडय़ाला किलो किलोचा गोडा मसाला, ५ किलो दाण्यांचं कूट, लसूण चटणी हे सर्व खलबत्त्यात कुटून बनवावं लागे. याशिवाय होळीला पुरणपोळय़ा, संक्रांतीला तीळगूळ अशा हंगामी पदार्थाबरोबर चिवडा, चकल्या, लाडू इत्यादींचा बारमाही घाणाही सुरू असे. झालंच तर दुकानाचा पसारा वाढल्यावर गणपती, दिवाळी अशा सणांच्या प्रसंगी उशिरापर्यंत राबणाऱ्या आप्तजन व सेवकांसाठी डबे भरून जेवण पाठवण्याचं कामही त्यांनी स्वत:हून अंगावर घेतलं होतं. त्यासाठी शैलाताई वेळेला १०० चपात्या त्यांना पुरेशी रस्साभाजी, चटणी, ताक असा २५ माणसांचा स्वयंपाक एकहाती करत. (ती धमक व हौस आजही तशीच आहे.) फटाक्यांच्या दारूमुळे आणि जागरणांमुळे बऱ्याच जणांचे आवाज बसायचे. अशावेळी कोणाला हळद घालून गरम दूध दे, कुणाला आलं घालून चहा, तर कुणाला लिंबू सरबत.. अशी प्रत्येकाची आईच्या मायेने काळजी घेतल्याने ‘फॅमिली स्टाअर्स’ची संपूर्ण ‘फॅमिली’ आपुलकीच्या नात्याने जोडली गेली. वर सांगितलेल्या यादीतील राहिलेली कामं म्हणजे उटण्याची पाकिटं भरणं, तारचक्री वळवणं, काडेपेटय़ात रंगीत काडय़ा भरणं, कापसाची वस्त्र करणं.. ही येताजाता करण्यातली!
या धुमश्चक्रीत आयुष्याची पन्नाशी कधी आली ते शैलाताईंना कळलंच नाही. या उंबरठय़ावर त्यांनी बी.ए.ची पदवी घ्यायचं ठरवलं खरं, पण प्रत्येक वर्षी बरोबर परीक्षेच्या वेळी नेमकं कोणाचं तरी आजारपण, नाही तर कोणाचं तरी बाळंतपण मध्ये येई. या अडचणींवर मात करत पदवीचा गड आपण कसा काय सर केला याचं त्यांनाच आश्चर्य वाटतं.
घरच्या आणि दुकानाच्या जबाबदाऱ्या कमी होऊ लागल्या तसं त्यांच्यातील सुप्त गुणांनी डोकं वर काढायला सुरुवात केली. त्यावेळी कीर्तनकार दादा सबनीस गावोगाव जाऊन भजनं शिकवत. दादरला ते महिन्यातून दोनदा येत. लहानपणापासून गाता गळा असल्याने हा भजनाचा क्लास त्यांच्यासाठी एक पर्वणीच ठरली. अशातच दादरच्या विठ्ठल मंदिरात पौरोहित्याचा अभ्यासक्रम सुरू होतंय असं त्यांच्या कानावर आलं. वडिलांमुळे ही आवडही रक्तात होतीच. त्यामुळे हा दोन वर्षांचा कोर्स त्यांनी उत्साहात पूर्ण केला व त्यानंतर मंगळागौर, सत्यनारायण, वास्तुशांत.. अशा पूजा घरोघर जाऊन सांगायला सुरुवात केली.
शैलाताईंच्या आयुष्यातील कीर्तन अध्यायाची सुरुवात एका योगायोगाने झाली. मारुती जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्या आपल्या गावी कुबेशीला (ता. राजापूर) गेल्या असताना त्यांना कीर्तन करायची इच्छा झाली. भजन येत होतं. त्याबरोबर समर्थाच्या एका कॅसेटवरून त्यांनी आख्यानही बसवलं. पण धीर होईना. देवळात कीर्तन करण्यासाठी आलेल्या बुवांच्या हे कुठूनसं कानावर गेलं. त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि कुबेशीच्या गावकऱ्यांसमोर त्यांचं पहिलं कीर्तन सादर झालं. ते ऐकून बुवा उद्गारले, ‘तुम्हाला कीर्तनाचं अंग आहे, त्याला अभ्यासाची जोड द्या!’
हा आशीर्वाद मिळाला तेव्हा त्यांचं वय होतं ६५. पण उत्साहाचा संबंध वयाशी थोडाच असतो? त्यानंतरच्या जूनपासून त्या दादरच्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेत शिकायला जाऊ लागल्या. तीन वर्षांचा अभ्यासक्रम होता. कौतुकाची गोष्ट म्हणजे या तिन्ही वर्षी ३५-४० विद्यार्थ्यांतून अव्वल नंबर पटकावत त्यांनी ६९व्या वर्षी ‘कीर्तनालंकार’ ही पदवी सहज खिशात टाकली.
पहिल्या कीर्तनाला उभं राहिल्यापासूनच सगळीकडे बोलावणी येऊ लागली. दुकानाची कामं आणि कीर्तन यांचा समन्वय साधत दिवस पळू लागले. त्यानंतर जवळजवळ पाच-सहा वर्षांनी म्हणजे २०१०मध्ये ध्यानीमनी नसताना अखिल भारतीय कीर्तन संस्थेकडून एक पत्र आलं. ते असं की, त्यांनी कीर्तनालंकार झालेल्यांसाठी नवा दोन वर्षांचा प्रगत अभ्यासक्रम आखलाय सांगणारं! तेव्हा शैलाताई पंच्याहत्तरीच्या काठावर होत्या. अभ्यासक्रमातील दुसरा पडाव असा होता की, या कोर्सच्या पहिल्या वर्षी कर्जत येथील संस्थेत दर तीन महिन्यांनी दोन दिवस राहून धडे गिरवायचे होते. हे वाचल्यावर त्यांचे पाय किंचित लटपटले, पण घरच्यांचा आग्रह आणि सहाध्यायींनी दिलेला मदतीचा हात यामुळे पुढची दोन वर्षे निर्विघ्नपणे पार पडली आणि ७७ व्या वर्षी ७० विद्यार्थ्यांमधील सर्वात ज्येष्ठ अशा शैलाताई जोशींच्या नावापुढे ‘कीर्तनमधुकर’ ही त्या क्षेत्रातली सर्वोच्च पदवी मोठय़ा दिमाखात झळकली.
ही परीक्षा अर्थातच कस पाहणारी होती. कीर्तनासाठी ‘धर्म’ हा विषय दिला होता. शैलाताईंनी हिंदुधर्म, राष्ट्रधर्म व वैदिकधर्म अशा तीन अंगांनी पूर्वरंग रंगवला आणि सनातन वैदिक धर्माची स्थापना करणाऱ्या अदिशंकराचार्यावर आख्यान लावलं. परीक्षेआधीच्या १० दिवसांत त्यांनी शंकराचार्याचं चरित्र, त्यांची ग्रंथसंपदा, स्तोत्रवाङ्मय, त्यांची वचनं.. इत्यादींचा अभ्यास करून त्यांच्यावर सलग १० दिवस कीर्तन करता येईल एवढी सामग्री जमा केली होती. एवढी मेहनत घेतल्यावर ‘उत्तम’ शेरा न मिळाला तरच नवल!
शैलाताई पारंपरिक विषयांबरोबर संत स्त्रियांवरही कीर्तन करतात. त्या म्हणाल्या, ‘अवघा रंग एक झाला’ हा अभंग आपल्याला माहीत आहे, पण तो संत सोयराबाई (संत चोखामेळांच्या पत्नी) यांनी लिहिलाय हे माहीत नसतं. त्या म्हणाल्या की, समर्थ रामदासांच्या शिष्या वेण्णास्वामी या आद्य महिला कीर्तनकार. बालविधवा असूनही त्या काळी समर्थानी त्यांना कीर्तनासाठी उभं केलं, म्हणूनच पुढे स्त्रियांसाठी हे कवाड खुलं झालं. दोन-तीन वर्षांपूर्वी माई सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकर सदनात ‘राष्ट्रीय संत विनायक दामोदर सावरकर’ या विषयावर कीर्तन करण्याची संधी शैलाताईंना लाभली होती.
नेहमीच्या कीर्तनात पूर्वरंग व आख्यान हे दोन भाग असतात, तर लळित या कीर्तन प्रकारात आख्यानानंतर ब्राह्मण, जोगवा, गोंधळी, प्रवचनकार, ज्योतिषी, नांदी.. अशी अनेक पात्रं कथेत गुंफत (त्यानुसार निरनिराळे कलाकार घेत) कथानक पुढे न्यायचं असतं. साहजिकच हे कीर्तन तीन-साडेतीन तास चालतं. गेल्याच वर्षी आपल्या गावी त्यांनी ‘कृष्णजन्म’ हा विषय घेऊन लळिताच्या कीर्तनाचा प्रयोग केला. विशेष म्हणजे घरातलेच अनेक कलाकार त्यांच्या या सादरीकरणात सहभागी झाले होते.
शैलाताई म्हणाल्या, ‘अविश्रांत मेहनत, परमेश्वरावर नितांत श्रद्धा, परोपकारी वृत्ती आणि माणसं जोडण्याची कला अंगी असणारे अप्पा जोशी मला जीवनसाथी मिळाले, ही माझी पुण्याई. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या सान्निध्यात माझं आयुष्य घडत गेलं.’
पण फक्त ‘तू तिथे मी’ न करता त्यांनी अप्पांच्या पावलावर पाऊल टाकत समाजकार्यातही वाटा उचलला. अप्पांनी स्थापन केलेल्या ‘मराठी मित्र मंडळ’ या संस्थेतर्फे काढण्यात येणाऱ्या ‘मराठी व्यापारी मित्र’ मासिकाच्या त्या ८ वर्षे संपादक होत्या. त्यासाठी त्यांनी जाहिराती मिळवण्यापासून यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घेण्यापर्यंत सगळी कामं केली. मंडळातर्फे भरवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र व्यापारी पेठेच्या आयोजनात भाग घेतला.
वेळोवेळी मदतीचा हात देऊन माणसं जोडण्याचा अप्पांचा वसाही त्यांनी जपला. १९८५ पासून गिरण्यांमध्ये संप सुरू झाले तेव्हा त्या कामगारांच्या बायकांना त्यांनी तिळाचे लाडू, वडय़ा, पापड-कुरडया.. इ. बनवायचा उद्योग दिला. दुकानातील सेवकांच्या बायकांनाही दाण्याचं कूट बनवणं, वाती भिजवणं, कापसाची वस्त्रं करणं.. अशी कामं देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावला. म्हणून गेल्या ६० वर्षांत त्यांचे सेवक तर बदलले नाहीच, शिवाय त्यातील कित्येकांनी आपल्या पुढच्या पिढय़ांना जोशांकडे सुपूर्द केलंय.
दुकान व ग्राहक यांना उभयतांनी देव मानलंय. आज अप्पाचं वय  ८२ आहे. तर शैलाताईंचं ७८  तरीही संध्याकाळी ६ ते ९ दोघंही दुकानात असतात. तिथे गेल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.
या दाम्पत्याला तीन मुलं. मोठा शेखर ‘फॅमिली स्टोअर्स’च्या स्टेशनरी विभागाची जबाबदारी सांभाळतो, मधली जयश्री संगीत घेऊन बी.ए. झालीय, तर धाकटी माधुरी तबलाविशारद आहे. जोशांची तिसरी पिढीही आता धंद्यात उतरलीय. त्यांच्या मोठय़ा नातवाने अभिजीतने इम्पोर्ट-एक्स्पोर्टचं प्रशिक्षण घेतल्याने ‘फॅमिली स्टोअर्स’चे लाडू, चकल्या आता २४ देशांतील खवय्यांपर्यंत पोहोचताहेत.
१९९५ साली भारतातल्या शिष्टमंडळातर्फे एक व्यावसायिक म्हणून अमेरिकेला जाण्याची संधी अप्पांना मिळाली. बरोबर शैलाताई होत्याच. सातासमुद्रापलीकडची ती झगमगती दुनिया पाहताना त्या हरखून गेल्या. त्यांना लग्नाच्या पहिल्या दिवशी मिळालेला कानमंत्र आठवला. त्याच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली होती. पद्मा गोळे यांची ‘मी घरात आले’ नावाची एक कविता आहे. नववधूला सासरी आल्यावर कोणती कर्तव्य खुणावू लागतात, याचं प्रत्ययकारी वर्णन त्यात आहे.
चूल म्हणाली, तू माझी, मी तिची लाकडं झाले
जातं म्हणालं, तू माझी, गहू झाले ज्वारी झाले
ताकातली रवी होऊन मथणीत नाचू लागले..
कवयित्री या सर्व भूमिकांचा आनंदाने स्वीकार करते, पण त्याबरोबर माझे म्हणून जे काही आहे ते मला मिळावे, इतकेच तिचे मागणे आहे.
सारी ओझी जड झाली, ती उतरवून आता तरी
माझी मला शोधू दे, मोकळा श्वास घेऊ दे
श्वास दिला, त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे
जोशांच्या घरात आल्यावर गृहिणीपदाच्या अनेक पायऱ्या चढताना शैलाताईंनी स्वत:लाही विकसित केलं, ते बघताना या कवितेची आठवण आली इतकंच.