दुर्गाबाई- डोळस सश्रद्ध
‘दुर्गाबाईंचा विठोबा’ (२५ जुलै) या प्रभाकर बोकील यांच्या लेखाच्या निमित्ताने त्यांना घडलेल्या परमेश्वरानुभुतीचे वर्णन वाचून ती परंपरा खंडित झालेली नाही याची खात्री पटली. दुर्गाबाई बुद्धिवादी खऱ्या पण त्याचवेळी डोळस सश्रद्ध. त्यांनी आपली श्रद्धा लपवली नाही, तसेच कोणावर लादलीही नाही. उपनिषदात कोणा एका देवाची उपासना सांगितलेली नाही. ज्याची जशी श्रद्धा तसा त्याचा भाव. तसेच भाव तसा सिद्धीस जाण्याचा मार्ग असे उपनिषदात सूत्ररुप मांडले आहे, हे लेखातून पटले. गीतेच्या १७ व्या अध्यायात याचे वर्णन- ‘श्रद्धेचा घडिला जीव, जशी श्रद्धा तसाचि तो’ असे आले आहे. दुर्गाबाईंचा बुद्धिवाद वादातीत बुद्धीचा असल्याने सफल झाला. जे बुद्धिवादी बुद्धीने वाद घालतात ते श्रद्धेला गौण मानतात, त्यांची यज्ञ, दाने, तपें, कर्मे अश्रद्धेने घडतात ती मिथ्या असून निष्फल ठरतात. दुर्गाबाईंच्या बुद्धिवादाचे (स—फल) दर्शन घडवल्याबद्दल लेखकाचे धन्यवाद.
-रामचंद्र महाडीक, सातारा

संस्थानिर्मिती झाली पाहिजे
‘आधारस्तंभ लोकसंख्या नियंत्रणाचे’ हा . किशोर अतनुरकर यांचा लेख अतिशय आवडला. तीन दिग्गजांचे तुलनात्मक चरित्र आणि कार्य स्पष्ट करून चांगला विषय आणि ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचवले असे वाटते. र. धों. कर्वे यांचे कार्य देशाला तसे फारसे परिचित नाहीच. भारतात दुर्दैवाने अशा क्रांतिकारी, संशोधक लोकांचे मूल्य ओळखले जात नाही. आजही लोकसंख्या नियंत्रणाबाबत सरकारकडून किती गंभीर प्रयत्न केले जातात? म्हणूनच कर्वे यांच्या नावाने या विषयात संशोधन व प्रसार करणारी संस्था उभी राहिली तरच देशापुढील भविष्यातील बऱ्याच गंभीर समस्या आपोआप सुटणार आहेत.
-योगानंद शिंदे, पुणे</strong>