‘‘गात असताना रंगदेवता कशी प्रसन्न होत जाते, हे कळत नाही मला. पण पहिला ‘सा’ लावताना गुरूंची आठवण केल्याशिवाय तो लावला नाही. अत्यंत प्रामाणिकपणे ‘सा’ची आराधना केली की मग रंगदेवता प्रसन्न होते. माझी मैफल कधी रंगली नाही असं झालं नाही. ती रंगलीच. ती रंगतेय हे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर कळून येतं लगेच. मग एका वेगळ्या दुनियेची सफर घडते..’’
अलीकडेच वयाची शहात्तर र्वष पूर्ण केली. पंचवीस-पंचवीस वर्षांचे तीन टप्पे पार पडले. छान होते ते तीनही टप्पे. तीन पावलांत पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ व्यापल्यावर वामनाला जसं वाटलं असेल तसंच आता वाटतंय! पण माझ्याकरिता पृथ्वी, स्वर्ग व पाताळ हे तीन अक्षरांतच सामावलेले होते. ही तीन अक्षरे म्हणजे संगीत!
आज आठवणींच्या वळचणीला बसले आणि सगळंच भराभरा आठवू लागलं, गदगदलेल्या श्रावण आभाळातून सरणाऱ्या धारांसारखं! आठवू लागली ती सत्तर-पंच्याहत्तर वर्षांपूर्वीची हिंदू कॉलनी. हिंदू कॉलनीतली आमची जोशींची इमारत. त्या इमारतीत परकराच्या ओच्यात फुलं गोळा करत नाचत-गात बागडणारी मी! सतत गुणगुणणारी मी! मग डोळ्यांसमोर उभी राहते ती देशपांडे गुरुजींसह आलेली आई. मग एक दिवस आई हिंदू कॉलनीतच पलीकडच्या रस्त्यांवरच्या एका घरात राहणाऱ्या पं. सुरेश हळदणकरांकडे घेऊन गेली तो क्षण. आधी त्यांनी गाणं शिकवण्यासाठी घेतलेले आढेवेढे, नंतर चिकाटी पाहून माझी शिष्यत्वासाठी केलेली निवड आणि जगण्याला मिळालेली एक नवी दिशा! सारं सारं आठवतं..
माझे वडील रघुनाथ जोशी हे इंजिनीअर होते. त्यांची नोकरी फिरतीची होती. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून माझी आई सुमती जोशी ही आम्हां भावंडांना- सरोज, मी, रवींद्र, प्रकाश आणि नंतर माधुरी यांना घेऊन हिंदू कॉलनीत एकटी राहिली. तिथे मी पिंगेज क्लासेसमध्ये जाऊन व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास झाली. आईनं माझं गुणगुणणं ऐकलं व मला गाणं शिकवण्याचा निश्चय केला. शाळेत माझं कौतुक व्हायचं. मी बालमोहनची विद्यार्थिनी. दादासाहेब रेगे माझं कौतुक करायचे. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांवर एक खास अंक काढला होता, त्यात माझा समावेश केला होता. त्यामुळेही माझा संगीताकडे कल वाढला. आई मला हळदणकर मास्तरांकडे घेऊन गेली. त्यांनी मला गाणं शिकवायला सुरुवात केली.
एका बाजूनं मी गाणं ऐकतही होते. आमच्या घरी रेकॉर्डप्लेअर होता; रेडिओ होता. रेकॉर्ड प्लेअरवर मी सतत शास्त्रीय गाणं ऐकत असायचे. मला मल्लिकार्जुन मन्सूर यांचं गाणं आवडायचं, हिराबाई बडोदेकरांचं गाणं आवडायचं. सरस्वतीबाई राणेंचं गाणं ऐकायची. मल्लिकार्जुनांची नायकी कानडाची रेकॉर्ड आमच्याकडे होती. ती रेकॉर्ड मी एका दिवसात पंचवीस-तीस वेळा ऐकत असे. हळदणकर मास्तरांनी तर एकदा विचारलंही, ‘‘तुला इतका चांगला नायकी कानडा राग कसा येतो, मी तर थोडासाच शिकवला.’’ तेव्हा मी मास्तरांना खरी गोष्ट सांगितली. मास्तर परीक्षांचं गाणं शिकवत नसत. ते बैठकीचं गाणं शिकवत होते; मैफिलीचं गाणं शिकवत होते. त्यांच्याबरोबर प्रभाकर कारेकर गायला बसायचा. सतत त्यांच्यासोबत असायचा. मास्तरांनी त्याला गोव्यातून गाण्यासाठीच आणला होता. प्रभाकर ‘श्रीरंगा कमलाकांता’ हे पद सुंदर म्हणायचा. मला त्याच्यासारखं गाता येत नसे. आईच्या लक्षात आलं की मास्तरांच्या मैफिलीत प्रभाकर सतत असतो. गाणं नुसतं शिकून नाही तर ऐकूनही संस्कार होत असतो. कोणता राग कधी गावा, कसा गावा, कोणत्या प्रेक्षकांसमोर काय गावं, गाण्याचा विस्तार कसा करावा, क्रमवारी कशी असावी हे सारं मैफिली ऐकून, पाहून व त्यांची निरीक्षणं करून कळतं. हे कळल्यानंतर आई मला, मास्तरांच्या जिथे जिथे मैफिली होत असत तिथे तिथे घेऊन जाऊ लागली. मुंबईतील अन्य मैफिलींनाही आम्ही जात असू.
हळदणकर मास्तरांचं गाणं जोरकस होतं. ते माझ्या परीनं मी आत्मसात करत होते. माझ्या गाण्याची पहिली मैफल, आईची मैत्रीण माणिक गुप्ते हिच्याकडे मी अठरा-एकोणीस वर्षांची असताना झाली. मी तीन तास गायले. काय गायले ते आता आठवत नाही. पण लोक बसून ऐकत होते हे मात्र खरे. यानंतर मला मैफिलीचा आत्मविश्वास आला. स्वरभास्कर भास्करबुवा बखलेंचे जावई धामणकर यांना माझं गाणं आवडलं. धामणकर हे शास्त्रीय व नाटय़संगीताचे मोठे चाहते. फारसे श्रीमंत नव्हते, कित्येकदा गिरगावातून दादरला चालत यायचे. धामणकरांनी साक्षात बालगंधर्वाना सांगितले की अशी अशी एक मुलगी फार चांगलं गाते. तेव्हा माझी रेकॉर्ड एच. एम. व्ही. नं काढली होती. त्यातलं ‘बालसागर’ पद गंधर्वाना ऐकवलं. बालगंधर्व कॅडल रोडवर राहत असत. त्यांनी बोलावलं व त्यांच्यासमोर गाण्याची आज्ञा केली. साथीला वसंतराव आचरेकर व गोविंदराव पटवर्धन होते. धीर करून गायले. ऐकता ऐकता बालगंधर्वाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. गाणं संपल्यावर त्यांनी जवळ बोलावलं, आशीर्वाद दिला. माझा गाण्याचा धीर अधिक वाढला.
त्यानंतर एकदा एक गंमत झाली. अमरावतीला नवसाळकर कॉन्फरन्स होते, तिथे गाण्यासाठी म्हणून मी गेले. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा ऐकून ऐकून घोटवलेला नायकी कानडा सादर केला; अगदी त्यांच्या शैलीत. मला कुठे ठाऊक समोर खुद्द पं. मल्लिकार्जुन बसलेत. आपण आपलं गावं एवढंच ठाऊक. गाणं झाल्यावर त्यांनी जवळ बोलावले. स्वत:ची ओळख करून दिली, ‘‘माझी रेकॉर्ड ऐकतेस वाटतं, छान उचललंस’’ असं म्हणून कौतुक केलं आणि काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. किती थोर कलावंत हे!
मी मुंबईत गात असे. जी. एन. जोशी यांनी माझं गाणं ऐकलं व मला बिर्ला मातोश्री सभागृहात सूरसिंगर संसदेत गाण्यासाठी बोलावलं. त्यांनी तेव्हा माझी खूप काळजी घेतली. गाण्याआधी कोणालाही भेटू दिलं नाही, मला नव्‍‌र्हस होऊ दिलं नाही. मी तिथे गायले. समोर नौशादजींसारखे अनेक दिग्गज होते. ती स्पर्धा आहे, हेही मला माहीत नव्हतं. मला त्या दिवशी सूरमणी पुरस्कार मिळाला. माझ्यावर दडपण येऊ नये म्हणून जोशीजींनी केवढी काळजी घेतली. त्यावर्षी माझ्या समवेत उस्ताद झाकीर हुसेन आणि हरिप्रसाद चौरसियाही होते. सूरमणी पुरस्कारानंतर माझं नाव सर्वदूर जाऊ लागलं. लोक मैफिलींना बोलवू लागले. मीही आई, बाबा, भाई किंवा बहिणींसोबत जात होते. माझ्यासमोर अवघड आयुष्य नव्हतं, पण संगीताचं अवघड जग सहज होऊन समोर उभं होतं, मी त्याचा नम्रतेने स्वीकार करत होते इतकंच.
त्यावेळी आकाशवाणीवर गाण्यासाठी मान्यताप्राप्त कलावंत असणं महत्त्वाचं होतं. मी गुरुजींकडून आवश्यक तेवढे २५ राग तयार क रून घेतले आणि मग आकाशवाणीची ऑडिशन दिली. प्रारंभी मला ‘बी’ ग्रेड कलाकार म्हणून मान्यता मिळाली. ती नंतर ‘ए’ ग्रेडमध्ये परिवर्तित झाली. सुगम संगीताची ऑडिशन दिली. तिथे मला लगेच ‘ए’ ग्रेड आर्टिस्ट म्हणून मान्यता दिली.
त्याचवेळी मला जाणवलं की नाटय़ संगीतात योग्य ते भावदर्शन व्हावे यासाठी मी नाटकात काम करायला हवं. मग मास्तरांकडे आग्रह धरला, की तुम्ही नाटक बसवा. त्यांनीही सं. सौभद्र बसवायचं ठरवलं. मी सुभद्रा, प्रसाद सावकार अर्जुन आणि ते स्वत: कृष्ण! मा. दत्तारामही होते. त्यांनी माझी सुभद्रेची भूमिका बसवून घेतली. नाटकात गायचं म्हणजे सगळंच वेगळं. उभं राहून गायचं, चापून चोपून बसवलेल्या नऊवारी साडीत गायचं. ती नऊवारी वेगळीच होती. राजकमल स्टुडिओत संध्याला जे नऊवारी साडी नेसवत तेच मलाही नेसवायला यायचे. अखेरीस पहिला प्रयोग साहित्य संघात झाला. दाजी भाटवडेकर आदी दिग्गज होते. जसदनवाला आधी शेवटच्या खुर्चीत बसले होते. ते ‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी’ची सम ऐकल्यावर पुढे येऊन त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले. (जर सम साधली गेली नाही, तर ते शेवटच्या खुर्चीतून उठून जात असत, अशी त्यांची ख्याती होती.)
मैफल करायची म्हणजे सर्व प्रकारचं गाणं गायला हवं. म्हणून आईने प्रारंभी जमाल सेन यांच्याकडून, नंतर शोभा गुर्टू यांच्याकडून ठुमरीची तालीम दिली. एस.एन.डी.टी. विद्यापीठात मी संगीतात एम.ए. केलं. तिथे सुरुवातीला रजनीकांत देसाई आणि नंतर प्रभा अत्रेंचं मार्गदर्शन मिळालं.
ही सर्व माणसं, या सर्व कृती माझ्या सरळ आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. १९६९ साली माझ्या सांगीतिक आयुष्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा झाला तो म्हणजे गुरू निवृत्तीबुवा सरनाईक यांचा. पं. सुरेशबुवा हळदणकरांची परवानगी घेऊन, निवृत्तीबुवा सरनाईकांना शास्त्रोक्त संगीत शिकवण्याची मी विनंती केली व त्यांनी ती मान्यही केली. डागोरी, नायकी कानडा, भूप, यमन तेच सारे राग त्यांनी मला नव्याने शिकवले त्यांच्या शैलीतून. त्यामुळे माझ्या गाण्याला नवे पैलू मिळाले.
माझं लग्न डॉ. रवींद्र जुवेकर यांच्याशी झालं. ते डेंटिस्ट आहेत. माझं गाणं सुरू राहिलं पाहिजे या अटीवर आमचं लग्न झालं. आजही माझं गाणं अखंड सुरूच आहे, याचं कारण डॉक्टरांनी त्यांचा शब्द प्रेमानं आणि कौतुकानं पाळला.
१९६९ साली माझी पहिली रेकॉर्ड आली. जी. एन. जोशी व वसंतराव कामेरकर यांनी ती काढली. माझं पहिलंच रेकॉर्डिग रॉयल्टी बेसिसवर झालं. तो मोठाच मान होता. हळदणकरांनी तयारी करून घेतली, वसंतराव आचरेकर तबल्याला तर गोविंदराव पटवर्धन संवादिनीवर. अक्षरश: वनटेक रेकॉर्डिग झालं. ‘बलसागर’ आणि ‘सुजन कला’ ही पदं त्या रेकॉर्डवर होती. नंतर अनेक रेकॉर्ड होत गेल्या.
मला ठिकठिकाणी गाण्यासाठी बोलावणी येत होती. देशाच्या कानाकोपऱ्यात मी जात होते. अनुभव घेत होते. एक गमतीशीर आठवण. ‘लोकसत्ता’चे संपादक ह. रा. महाजनी यांना माझं गाणं ऐकायचं होतं. मी १७-१८ वर्षांची होते. आई-वडिलांसह पारशी कॉलनीत ते राहात होते. तेथे हळदणकर मास्तर मला घेऊन गेले. गोविंदराव व वसंतराव होतेच. आम्ही गेलो तर महाजनी झोपलेले. म्हणाले, ‘‘माझं डोकं दुखतंय. पुन्हा केव्हा तरी ऐकू.’’ पण मास्तरांनी त्यांना विनंती केली, ‘‘आली आहे, तर एखादं सादरीकरण ऐका.’’ ठीक आहे. असं म्हणून त्यांनी एक सतरंजी अंथरली व म्हणले, ‘‘गा.’’ मी बिहाग गायले. तो संपल्यावर महाजनी म्हणाले, ‘‘उठा.’’ आम्हाला काही कळेना. आम्ही उठलो. ते घरात गेले. मसाल्याचं दूध आणलं, आम्हाला दिलं. सतरंजी काढली व गालिचा अंथरला. म्हणाले, ‘‘आता पुढे गा.’’ सलग दोन-तीन तास मी गात होते. त्यांनी नंतर माझ्यावर वर्तमानपत्रात लिहिल्याचंही आठवतं.
निपाणीला एका लग्नानिमित्त गाणं होतं. अख्खा गाव लोटला होता. साडेतीन-चार हजार लोक गाणं ऐकायला. अशा गर्दीसमोर काय गायचं? गुरूंचं नाव घेतलं. डी. आर. नेरुरकर व अनंत राणे साथीला होते. नेरुरकर म्हणले, ‘‘ताई गा हो. अशा ठिकाणी नव्‍‌र्हस व्हायचं नाही. रियाझ करून घ्यायचा.’’ शास्त्रीय मैफलही सर्वसामान्य रसिकांसमवेत कशी जमवून आणायची याचं एक तंत्र गवसलं. नंतर मग नाटय़पदे, अभंग गायले. गात असताना रंगदेवता कशी प्रसन्न होत जाते, हे कळत नाही मला. पण पहिला ‘सा’ लावताना गुरूंची आठवण केल्याशिवाय तो लावला नाही. अत्यंत प्रामाणिकपणे ‘सा’ची आराधना केली की मग रंगदेवता प्रसन्न होते. माझी मैफल कधी रंगली नाही असं झालं नाही. ती रंगलीच. ती रंगतेय हे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर कळून येतं लगेच. मग एका वेगळ्या दुनियेची सफर घडते.
इंग्लंड, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथेही गाण्याची संधी मिळाली. लंडनमधील एका युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात दोन-चार भारतीय व त्यातील एक मराठी माणूस सोडला तर सर्व पाश्चात्त्य रसिक होते. तीन-साडेतीन तास मी गात होते. पाश्चात्त्य रसिक कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू असताना आपल्यासारखे ‘वा’ अशी दाद देत नाहीत. ते गाणं संपल्यावर दाद देतात. त्या कार्यक्रमात मराठी रसिकानं एक नाटय़पद गाण्याची फर्माईश केली. अमराठी-अभारतीय लोकांसमोर, मराठी नाटय़पद कसं गायचं? मग विचार करून ‘वद जाऊ कुणाला शरण’ गायले. अर्धा तास गायले. ते पद संपवलं आणि अख्खं सभागृह उठून उभं राहिलं व त्यांनी मला स्टॅण्डिंग ओव्हेशन दिलं. ‘‘या गाण्याचे आम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. पण त्याचं रेकॉर्डिग आम्हाला द्या,’’ अशी त्यांनी मागणी केली. पैसे हा माझ्यासाठी प्रश्न नव्हताच. ते रेकॉर्डिग आम्ही सर्वाना विनामोबदला दिलं. आनंदाचे पैसे घेतं का कुणी? एक ब्रिटिश बाई दुसऱ्या दिवशी वेळ घेऊन आली. माझ्या सर्व कॅसेट्स घेतल्या व ‘‘भारतीय संगीताचा एक ठेवा माझ्याकडे आला,’’ असं म्हणून गेली. संगीत हे कागदावरच्या सीमारेषा ओलांडून रसिकांना- जगाला जोडतं हे इथं जाणवलं. ऑस्ट्रेलिया – अमेरिकेतही असेच सुंदर अनुभव आले.
संगीतानं माझं जगणं सुंदर केलं. देवानं योग्य घरात जन्म दिला. आई-बाबांनी प्रेमानं, काळजीनं गाणं वाढवलं, नवऱ्यानं जपलं. मीही माझ्या परीनं त्यांच्या त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. मनापासून संगीतसेवा केली. डॉ. मंजिरी व डॉ. मीनेश अशी माझी दोन मुलं. दोघेही डॉक्टर आहेत व दोघेही संगीताशी संबंधित आहेत. मीनेश हा पं. अरविंद मुळगावकरांचा तबल्याचा शागीर्द आहे. तो सोलोही चांगला वाजवतो. मंजिरी सुगम गाणी छान गाते. या मुलांनी घराचं गोकुळ केलं. मी संगीत सेवेसाठी कुठेकुठे जायचे तर माझी बहीण, आई, बाबा, भाऊ कोणी ना कोणी मुलांना सांभाळायला यायचेच. बाबा १९६९ मध्येच गेले. आई अलीकडेच वयाच्या ९६ व्या वर्षी गेली. सासरच्या मंडळींनाही गाण्याचं कौतुक होतं. माझ्या नणंदेचे पती स्वर्गीय बाळ निमकर तर खूप कौतुक करायचे.
मीही एका दीर्घ आजारातून उठले. दहा वर्षे लोटली, प्रत्यक्ष मैफल करत नाही. पण माझ्याकडे गाणं शिकायला मुली येतात. दोन घराण्यांची तालीम मिळालेल्या माझ्याजवळ खूप चीजा, बंदिशा आहेत. त्या माझ्यापर्यंतच राहण्यापेक्षा त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचायला हव्यात म्हणून त्यांचे रेकॉर्डिग करून ठेवतेय. लवकरच हा ठेवा सर्वासाठी उपलब्ध होईल.
संगीतयज्ञाच्या वेदीसमोर मी माझं निरांजन लावून ठेवलंय. त्याचा जेवढा प्रकाश तेवढाच माझा आनंद! आज त्या आनंदात पुन्हा एकदा तुम्ही सहभागी झालात..
शब्दांकन- प्रा. नितीन आरेकर – nitinarekar@yahoo.co.in

young man committed suicide as he did not want to marry
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
Bhandara Special Aloo Tamatar Rasa Bhaji Recipe
भंडाऱ्यातली बटाटा भाजी चवीला एकदम स्पेशल.. भंडारा स्पेशल भाजीची घ्या झणझणीत रेसिपी