डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

आपलं यशापयश इतरांशी सारखी तुलना करून ठरवण्याची खोड आपल्यापैकी कित्येकांना असते. कितीही उत्तम प्रयत्न केले, उत्कृष्ट काम केलं, तरी आपल्यापेक्षा वरच्या पातळीचं यश मिळवणारे लोक आजूबाजूला असतातच. मग आपण स्वत:ला ‘कमी’  समजायला लागतो आणि हा न्यूनगंड आत्मविकासात अडसर ठरू लागतो. काहींच्या बाबतीत तर न्यूनगंड हा स्वत:चं अनावश्यक आत्मसमर्थन करण्याच्या आणि ‘आपणच कसे अतिश्रेष्ठ’ हे ठसवण्याच्या स्वरूपात अहंगंडातून बाहेर पडतो. कमीपणाच्या गंडाचे हे दोन्ही आविष्कार नुकसान करणारे असतात. पण त्यातून बाहेर पडण्याचे काही मार्ग निश्चित आहेत.

श्रुतीला दहावीत ९२ टक्के  गुण मिळाले. बारावीनंतर एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर तिला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. पण श्रुती स्वत:च्या कारकीर्दीबाबत फारशी समाधानी नाही. तिला वाटतं, की हल्ली अनेकांना दहावीत नव्वदच्या वर टक्के मिळतात. त्यात काही विशेष नाही. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला असला, तरी अग्रस्थानावरच्या ‘संगणक’ शाखेत तिला प्रवेश मिळाला नव्हता आणि बहुराष्ट्रीय कंपनीतल्या नोकरीसाठी तिची निवड झाली असली, तरी तिच्या महाविद्यालयातल्या काही जणांना तिच्यापेक्षा जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे तिच्या मते, तिची कामगिरी भरीव नाही. तिच्यापेक्षा उच्च यश संपादन करणारी एखादी व्यक्ती दिसली, की तिला वाटतं, त्या व्यक्तीच्या तुलनेत आपण कुणीच नाही. आपण असं देदीप्यमान यश मिळवू शकलो नाही, या विचारानं ती अस्वस्थ होते. तिचं कुणी अभिनंदन केलं, तरी ती खूश होत नाही. तिला वाटतं, की तिला बरं वाटावं म्हणून ते तसं बोलत आहेत.

कुणालची शैक्षणिक कारकीर्द श्रुतीसारखीच आहे. पण तो म्हणतो, की त्याला दहावीत खरं तर ९७ टक्के मिळायला पाहिजे होते. पण परीक्षकांकडून कडक तपासणी झाल्यामुळे ते कमी झाले असणार. त्यालाही अभियांत्रिकीची संगणक शाखा मिळाली नव्हती. पण तो म्हणतो, की संगणकीय आज्ञावली लिहिण्यासारखं कंटाळवाणं काम मला जमलंच नसतं. माझ्यातली सर्जनशीलता त्यामुळे मारली गेली असती. त्यालाही श्रुतीसारखीच बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली आहे. त्याबद्दल त्याचं कुणी अभिनंदन केलं की तो म्हणतो, की वरकरणी हे माझं अभिनंदन करत असले, तरी त्यांना मनातून माझा मत्सर वाटतोय. लोक आपल्यापासून दूर राहातात,  टाळतात, हे लक्षात अल्यामुळे तो अस्वस्थ होतो.

वरकरणी पाहता श्रुती आणि कुणालचे विचार आणि वर्तन विरुद्ध स्वरूपाचं असलं तरी त्यांच्या अस्वस्थतेचं मूळ मात्र समान आहे. ते आहे- ‘कमीपणाचा गंड’. इतर आपल्यापेक्षा वरचढ आहेत, अशा समजुतीमुळे श्रुतीला न्यूनगंड (इन्फिरिऑरिटी काम्प्लेक्स) वाटतोय. तर कुणाल स्वत:चा क मीपणा उघड न करण्याच्या धडपडीतून श्रेष्ठगंड (सुपिरिऑरिटी काम्प्लेक्स) जोपासतोय. ‘कमीपणाचा गंड’ ही संकल्पना ‘अल्फ्रेड अ‍ॅडलर’ या मानसशास्त्रज्ञानं प्रचलित केली. त्यानं असं प्रतिपादन केलं, की वयाच्या विशिष्ट टप्प्यावर कमीपणाची भावना आपण सर्वजण अनुभवतो. आपण सगळेच इतरांपेक्षा कुठल्या ना कुठल्या वैशिष्टय़ांत कमी असतो. या कमतरतांची जाणीव होणं म्हणजे कमीपणाची भावना वाटणं होय. कमीपणाची भावना वाटली तर स्वत:मधल्या कमतरता दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, एखाद्याला स्वत:त गणिती कौशल्य कमी असेल याची जाणीव झाली तर तो ते विकसित करण्यावर भर देईल. म्हणजे कमीपणाची भावना आत्मविकासाला मदत करते. अस्तित्ववादी मानसशास्त्रज्ञांनी तर कमीपणाच्या भावनेचा संबंध आत्मशोधाशी लावला आहे. मात्र कमीपणाची भावना आणि कमीपणाचा गंड यात फरक आहे. जेव्हा आपण स्वत:च्या कमतरतांचा संबंध संपूर्णत्वाशी जोडतो, तेव्हा ‘कमीपणाचा गंड’ निर्माण होतो. उदाहरणार्थ- माझ्यात गणिती कौशल्य कमी आहे, म्हणून ‘माझ्यातच कमतरता आहे’ असा संपूर्णत्वावर शिक्का मारला, तर कमीपणाचा गंड निर्माण होतो आणि कितीही प्रयत्न केला तरी मी ‘पूर्ण’ नसल्यामुळे मी ते शिकू शकणार नाही, असा निष्कर्ष मनुष्य काढतो. थोडक्यात कमीपणाचा गंड आत्मविकासाला मारक आहे.

कमीपणाच्या गंडाचा थेट आविष्कार म्हणजे न्यूनगंड, तर छुपा आविष्कार म्हणजे श्रेष्ठगंड होय. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. न्यूनगंडामध्ये कमीपणा थेट व्यक्त होतो, तर कमीपणा झाकण्याच्या प्रयत्नातून श्रेष्ठगंड जन्माला येतो. श्रेष्ठगंड बाळगणारी व्यक्ती आत्मविश्वासाचा आव आणत असली तरी तो आत्मविश्वास नकली असतो. स्वत:ची कमतरता झाकण्यासाठी आणलेलं ते उसनं अवसान असतं. नंतरच्या काळात श्रेष्ठगंडाच्या कारणांचं वेगवेगळ्या प्रकारे अर्थबोधन झालं, तरी कमीपणाचा गंड सार्वत्रिक आहे, यावर बहुतेक मानसशास्त्रज्ञांचं एकमत आहे.

कमीपणाचा गंड जोपासणाऱ्या व्यक्तींचं दिवसेंदिवस वाढणारं प्रमाण हा मानसशास्त्रज्ञांच्या चिंतेचा विषय आहे. स्वत:बद्दलची तीव्र नकारात्मक भावना, कमी आत्मसन्मान, परिपूर्णतेचा हव्यास, स्वतबद्दलचं असमाधान, लोकमान्यतेची गरज, इत्यादी घटक हा गंड जोपासण्यास कारणीभूत ठरतात. तसंच पालक जर मुलावर सतत टीका करत असतील किंवा एखाद्या कमतरतेबद्दल त्याला काळ्या यादीत टाकत असतील किंवा अतिनम्र राहाण्याचं दडपण आणत असतील, तर मूल स्वत:बाबत चांगलं वाटणंच थांबवतं. यश मिळवलं तरी ते फार उच्च नाही असं त्याला वाटतं. म्हणूनच कमीपणाचा गंड अयशस्वी, अपयशी किंवा कमी क्षमतेच्या व्यक्तींत असतो असं नसून श्रुती आणि कुणालप्रमाणे उच्च यश संपादन केलेल्या व्यक्तींतही तो आढळून येतो.

‘इतरांपेक्षा कमी असणं’ ही समजूत यात केंद्रस्थानी असल्यामुळे हा गंड जोपासणाऱ्या व्यक्ती स्वत:ची इतरांशी सतत तुलना करत राहातात. श्रुतीप्रमाणे स्वत:च्या क्षमतांचं अवमूल्यन करतात, नाही तर कुणालप्रमाणे अतिमूल्यन करतात. श्रुती तुलनेसाठी उच्च मापदंड ठेवत असल्यामुळे इतर आपल्यापेक्षा उजवे आहेत, असं तिला वाटत राहातं. त्यामुळे उच्च मानदंड प्रेरणादायी ठरण्याऐवजी तिचा आत्मविश्वास खच्ची करतात आणि स्वत:कडे नकारात्मकतेनं पाहाण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे मिळालेल्या यशाचा आनंद ती निर्भेळपणे घेऊ शकत नाही. कारण ते यश फार उच्च नाही असं तिला वाटत राहातं.

कुणालला आपण कमी आहोत हे मान्य करणं कमीपणाचं वाटतंय. त्यामुळे स्वत:च्या क्षमता आहेत त्यापेक्षा जास्त दाखवण्याचा आणि आपण इतरांच्या तुलनेत कमी नसून वरचढ आहोत, हे पटवण्याचा प्रयत्न तो करत राहातो. आत्मस्तुती करणं, कमतरतांवर पांघरूण घालणं, नाहक आत्मसमर्थन करणं अशा प्रकारचं वर्तन याच प्रयत्नांतून निपजलेलं आहे. त्यानं स्वत:भोवती आत्मसंरक्षक यंत्रणेची (डीफे न्स मेकॅ निझम) इतकी भक्कम तटबंदी उभारली आहे, की कमीपणा वाटेल अशी एकही गोष्ट तो स्वत:पर्यंत पोहोचू देत नाही. कमीपणाचा गंड नसता, तर स्वत:ला सिद्ध करण्याची किंवा आत्मसमर्थनाची गरज त्याला भासली नसती. खरं तर त्याला श्रुतीपेक्षाही जास्त दडपण आहे. कारण स्वत:ला जाणवणारा कमीपणा तसाच्या तसा न दाखवण्याचं बंधन त्यानं स्वत:वर लादून घेतलं आहे. त्यामुळे तो लपवण्यासाठी त्याला जास्त श्रम लागतात. आपण आहोत तसं न दाखवता वेगळं दाखवण्याची धडपड त्याला करावी लागते. आपण इतरांपेक्षा कमी आहोत असं वाटल्यामुळे इतरांना आपलं यश चांगलं वाटू शकतं हे श्रुती आणि कुणालला मान्य होत नाही. त्यामुळे इतरांनी अभिनंदन केलं तर ते मनापासून करत नाहीत असं श्रुती समजते आणि कुणाल ते मत्सरग्रस्त आहेत असं समजतो. आपण अभिनंदन करूनही श्रुती दुर्मुखलेली आहे, हे पाहून इतर अभिनंदन करणंच थांबवतात. परिणामी श्रुती नकारात्मक भावनेच्या विळख्यात अधिकाधिक सापडते. कुणालच्या आत्मस्तुतीला कंटाळून इतर त्याला टाळतात. थोडक्यात, कमीपणाचा गंड त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम तर करतोच, पण त्यांच्या इतरांशी असलेल्या परस्परसंबंधांतही अडथळा आणतो.

कमीपणाच्या गंडातून बाहेर येण्यासाठी श्रुती आणि कुणालनं काय करायला हवं?

बिनशर्त आत्मस्वीकार-

श्रुती आणि कुणाल दोघंही स्वत:चा सशर्त स्वीकार करत आहेत. स्वत:ची कामगिरी उच्च असण्याची अट त्यांनी आत्मस्वीकारासाठी घातली आहे. ती उच्च आहे की नाही, हे ठरवण्याचे मापदंड त्यांनी इतरांवर अवलंबून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मस्वीकार इतरांवर अवलंबून राहातो. तसंच स्वत:च्या कामगिरीपेक्षा इतरांची अधिक उच्च कामगिरी दिसून आली की त्या तुलनेत त्यांना स्वत:ची कामगिरी कमी वाटते. परिणामी आत्मस्वीकार करण्याची अट ते कधीच पूर्ण करू शकत नाहीत. आत्मस्वीकार न केल्यामुळे श्रुती स्वत:चा धिक्कार करते आणि कुणाल आत्मसमर्थन करतो.

श्रुतीनं जर बिनशर्त आत्मस्वीकार केला, तर ती स्वत:वर आसूड न ओढता स्वत:कडे ममत्वानं पाहील. स्वत:मधल्या अपूर्णत्वाचा स्वीकार खिलाडूपणे करेल आणि सामथ्र्यस्थळांवर लक्ष केंद्रित करू शकेल. सशर्त स्वीकारामुळे स्वत:च्या उणिवा उघड होणं कुणालला महाभयंकर वाटतंय. त्या लपवण्यासाठी तो आत्मसंरक्षक यंत्रणा वापरतो. बिनशर्त आत्मस्वीकार केला तर उणिवा लपवण्याची गरज त्याला भासणार नाही. आत्मसंरक्षक यंत्रणा वापरावी न लागल्यामुळे त्याच्या मनावरचं ओझंही कमी होईल.

स्वत:चं वस्तुनिष्ठ मूल्यमापन-

कमीपणाचा गंड असलेल्या व्यक्तींना कृष्णधवल रंगात मूल्यमापन करण्याची सवय असते. अशा सवयीमुळे श्रुती स्वत:तल्या फक्त कमतरतांवर लक्ष केंद्रित करून स्वत:ला काळ्या यादीत टाकते. तर कुणाल त्या लपवण्यासाठी उलटय़ा टोकाला जाऊन स्वत:ला सद्गुणांचा पुतळा समजतो. वस्तुनिष्ठ मूल्यमापन केलं, तर ते स्वत:कडे समतोलतेनं पाहू शकतील आणि सध्या फक्त कमतरतांवर असलेलं लक्ष सामर्थ्यांकडे वळवू शकतील. तसंच आपल्यातल्या कमतरतेमुळे आपण माणूस म्हणून कमी आहोत, असं अतिशयोक्तीपूर्ण मूल्यमापनही ते करणार नाहीत. स्वत:चं वैशिष्टय़ आणि संपूर्णत्व यात फरक करू शकतील आणि केवळ स्वत:कडेच नाही, तर इतरांकडेही वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहू शकतील.

इतरांशी तुलना न करणं- तुलना करण्यासाठी दोन व्यक्ती सर्व वैशिष्टय़ांत समान असणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती ही वैशिष्टय़पूर्ण असते, तसंच कुठल्याही दोन व्यक्ती या समसमान नसतात. त्यामुळे अशा तुलनेचा पाया ठिसूळ असतो. श्रुती आणि कुणाल जेव्हा तुलना करतात, तेव्हा स्वत:पेक्षा कमी कामगिरी असलेल्या व्यक्ती त्या तुलनेसाठी निवडत नाहीत, तर उच्च कामगिरी केलेल्या व्यक्ती निवडतात. म्हणजेच त्यांची तुलना निवडक असते. त्यामुळे कितीही चांगली कामगिरी केली, तरी कुणाची तरी कामगिरी त्यांच्यापेक्षा जास्त चांगली असल्यामुळे त्यांना कायमच स्वत:ची कामगिरी अपुरी वाटत राहाते आणि कमीपणाच्या गंडातून त्यांची सुटका होत नाही. इतरांशी तुलना थांबवली, तर स्वत:च्या वर्तनाचे मापदंड ठरवण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहाण्याची गरज राहाणार नाही आणि कमीपणाच्या गंडाची ते हकालपट्टी करू शकतील.

श्रुती आणि कुणालनं जर वरील विचार आत्मसात करण्यासाठी नेटानं प्रयत्न केले, तर ते स्वत:च्या जवळ जातील. स्वत:ला आहे तसं स्वीकारतील. स्वत:च्या जमेच्या बाजूंकडून सकारात्मक ऊर्जेचं बळ मिळवतील आणि कमतरतांचं अवलोकन करून त्या दूर करण्याचा प्रयत्न करतील. मग राल्फ वॉल्डो इमर्सनच्या उद्गारांप्रमाणे तेही म्हणतील, की ‘‘काळ्या छायेत वावरताना मला कळलंच नव्हतं, की मीच मध्ये उभं राहिल्यानं सूर्यकिरणं अडवली जात होती. आता किती मोकळं वाटतंय!’’