नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान मुलीला शाळेत सोडून मी घरी परतलो आणि लगबगीने ऑफिसला जायला निघालो होतो. वाटेत आमच्या नानांच्या ‘पर्णकुटी’ बंगल्यासमोर रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत एका गरीब कुटुंबासोबत माझे दोन सहकारी बोलताना दिसले. माझीच वाट बघत उभे होते. त्यांच्याजवळ पोहोचताच मी सवयीप्रमाणे त्यांना लवकर निघण्यासाठी घाई करणार एवढय़ातच माझे लक्ष समोरच्या अंदाजे पन्नाशी-साठी गाठलेल्या व्यक्तीकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर जगण्याच्या निरिच्छेचा विलक्षण भाव दिसला. वाढलेली दाढी, अर्धवट पिकलेले पांढरेशुष्क  केस, अंगात मळका सदरा व पांढऱ्या पायजाम्याचा रंग तर अगदीच बदलून गेलेला. त्यांची नजर बाजूलाच बसलेल्या त्याच्या पत्नी व दोन मुलींकडे वळून पाहत, पुन्हा वर आकाशाकडे स्थिरावत होती..
मी विचारलं, ‘कोण आहेत हे?’ एरव्ही केवळ चहा व पुडीच्या पशासाठी एकमेकांचे खिसे तपासणारा, भांडणं करणारा माझा मित्र अमोल व सुनीलभाऊ त्या कुटुंबाला विचारत होते, ‘‘काय बाबा, तुमची काय अडचण हाय? मला आठवतं तसं तुम्ही काल रात्रीपासून इथेच ठिय्या मांडलेला आहे ना?’’ त्यावर तो खंगलेला माणूस व त्याचं कुटुंब अचानक चटका बसावा तसं जवळच्या मळलेल्या अन् काहीशा फाटलेल्या सामानाच्या थल्यांना घट्ट पकडून एकाएकी स्वप्नातून जागं झाल्यासारखं दचकलं. हळूच घाबरलेल्या व कापत्या स्वरात आवाज आला, ‘‘कं.कं.काही नाही साहेब.. गावाकडं चाललो होतो..’’जालन्याजवळचं कुठल्याशा खेडय़ाचं नाव त्यांनी सांगितलं.
 ‘मग? पसे संपले की काय?’ आमच्या या प्रश्नावर काहीच उत्तर आलं नाही. ‘‘कुठून आले?’’
‘‘अ..अं..अमरावतीहून, हिच्या इलाजासाठी गेलो होतो.. दवाखान्यात..! पण तशीही नशिबांनं साथ दिली नाय.’’ ते शब्द ऐकून आम्हीही नि:शब्द झालो. वयात येणाऱ्या त्यांच्या मुलीनं अंगावरची जीर्ण झालेली ओढणी आणखीनच घट्ट पकडत वर पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यांत काटा रुतावा तसं टचकन पाणी आलं. अठराविश्वे दारिद्रय़ात, कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या आपल्या हतबल बापाकडं पाहून तिला हुंदका आवरत नव्हता. जवळच्या धर्मादायी संस्थेचा उल्लेख करत, ‘त्या मंदिरात जा, तिथं सगळी व्यवस्था आहे. काळजी करू नका’ असा सल्ला आम्ही दिला. भाडय़ाला पसे पहिजेत का? असं विचारताच इतक्या बिकट परिस्थितीतही वृद्ध चटकन बोलला, ‘‘नाही नाही.. धन्यवाद.. तुमी इचारलं हेच लयं झालं..!’’
त्यांचे शब्द एकदम काळजालाच भिडले. तहानभुकेनं मुलींचे चेहरेसुद्धा पार सुकून गेल्याचे दिसत होते. पसे आहेत काय? त्यावर अचानक त्याच्या धाकटय़ा मुलीनं ‘नाही सांगावं’ तशी ओठांतच काहीतरी पुटपुटत मान हलवली. ते पाहून मोठीनं तिचं मनगट घट्ट पकडत तिला चूप करण्याचा केलेला प्रयत्न आमच्या लक्षात आला. अन् आमचे हात चाचपडत खिशांकडे गेले. त्या गृहस्थाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी अंत:करण हळहळलं. मित्रांनी आणि मी खिशातून होते नव्हते तेवढे पसे न मोजताच त्या वृद्धाकडे देऊ केले. पण ते पाहून वृद्धाच्या संयमाचा बांध सुटला आणि तो ढसाढसा रडू लागला. ‘‘नाही साहेब, नाही. मला काहीच नको आहे! मला या जगात काहीच नको. कालपासून मी सगळ्या कुटुंबासोबत आयुष्य संपविण्याचा विचार करत आहे. आता जगून तरी काय करू?’’ त्याची ती विवशता पाहून आम्हालाही असहाय्यपण घेरून आलं. आवाज चढवत आम्ही बोललो, ‘‘चूप बसा.. एकदम चूप..! असं थोडंच असतं.. या निष्पाप जीवांचा काय कसूर? गावाकडं जा. काहीतरी मार्ग निघेल.’’ दिलासा देत आम्ही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. वृद्ध स्वत:ला सावरत म्हणाला, ‘‘साहेब, मला माझ्या हालावर सोडून द्या, काय व्हायचं ते होईल त्याच्या इच्छेनं. लय बरं वाटलं, तुमी इचारलं, खरंच हेच लय झालं माझ्यासाठी.’’
दोन्ही हात जोडत वृद्ध विनवत पसे घेण्यास नाकारत होता. ‘‘अरे, हे उसने म्हणून घ्या, देवानं दिले तर परत द्या, एखाद्याला अशाच अडचणीत मदत करून. ’’असे आमचे शब्द ऐकून वृद्ध आणखीच रडायला लागला.
‘‘तुमचं नाव-पत्ता द्या. तरच मी पसे घेतो, न्हाय तर नाय. मी परत पाठवीन तुमचे पसे.’’ त्याचा स्वाभिमानी स्वर. आमचं मुक्काम पोष्ट इथेच माउलीच्या सावलीत. ‘पर्णकुटी’ बंगल्याच्या आवाराकडे बोट दाखवीत मी त्या वृद्धास सांगितलं.
आम्ही तिघांनीही दिलेले पसे त्यांना गावापर्यंत पोहोचता येईल एवढे झाल्यामुळे त्यांच्या मनाला धीर आला होता. गोळे आलेल्या पावलाने मी गाडीला किक मारली अन् ऑफिसच्या दिशेनं निघालो. डोक्यात चाललेल्या विचारांच्या कल्लोळानं मन कातर होऊन गेलं होतं. अशात कॉलेजचं गेट कधी आलं मलाही कळलंच नाही. पाìकगमध्ये गाडी उभी करत, हॅन्डलला लावलेल्या टिफीनकडे लक्ष गेलं आणि हातातली बॅग तिथेच खाली पडली. हँग झालेल्या मशीनसारखा ऑफिसमधल्या टेबलपर्यंत कसाबसा पोहोचलो. नियोजित दोन-तीन कामं पूर्ण केल्याबरोबर अध्र्या तासासाठी सरांकडून वेळ मागितला. जवळ असलेला टिफीन पाहून मला तहान-भुकेनं व्याकूळ झालेल्या त्या सगळ्यांचे चेहरे डोळ्यांसमोर यायला लागले. मी सत्तर-ऐंशीच्या वेगाने गाडी सरळ बसस्टँडच्या दिशेने वळवली. बसस्टँडचा अख्खा परिसर धुंडाळून काढला. उभ्या-बसलेल्यांना पाहिलं. प्रत्येक बसच्या खिडक्यांतून डोकावलं. स्वच्छतागृहापासून ते प्रवेशद्वाराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत त्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कुठेच दिसत नव्हते. चौकशी कक्षात माहिती घेतल्यावर कळले, औरंगाबाद-जालना जाणारी बस काही क्षणापूर्वीच निघाली होती. ते ऐकून काही वेळ तिथेच शांत बसलो. बहुधा आम्ही केलेल्या मदतीमुळे ते कुटुंब घराकडच्या प्रवासाला निघालं होतं. एकीकडे काहीतरी चांगलं करण्याच्या प्रयत्नाचं समाधान वाटत होतं, अन् त्या कुटुंबाच्या आठवणीनं जिवाची लाही लाही होत होती..
संदीप कराळे -sandipkarale1@gmail.com