औषधी गुणांनी परिपूर्ण अशी मेथी भाजी, मेथी दाणे आणि मोड आलेल्या मेथ्यांमध्ये प्रथिनं, फायबर, ‘क’ जीवनसत्त्व, नायसिन आणि मोठय़ा प्रमाणात लोह आढळतं. कोलेस्टॉॅलची पातळी कमी करण्यासाठी, हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी मेथीचा उपयोग केला जातो. बाळंतिणीला मेथीचे लाडू तसंच मोड आलेल्या मेथ्या आहारात दिल्यामुळे दूध तर वाढतंच शिवाय हाडं बळकट होण्यास मदत होते. मेथीची पानं चवीला कडवट असली तरी स्वादिष्ट असतात, पचनालाही उपयुक्त असतात. मोड आलेल्या मेथ्या तेलात वाटून केसाला लावल्याने केसांचं आरोग्य सुधारतं.
मेथी-पोळी सँडविच
साहित्य: १ वाटी चिरलेली मेथी, १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/२ वाटी केळ्याचा गर, १ चमचा मिरची-आलं ठेचा, पाव वाटी किसलेलं चीज, चवीला मीठ, एक मोठा चमचा तेल, दोन-तीन पोळ्या किंवा फुलके.
कृती : तेलावर आलं-मिरची परतावी, कांदा, मेथी घालून परतावं, एक वाफ आल्यावर त्यात मीठ आणि केळ्याचा गर मिसळावा. पोळीच्या अध्र्या भागावर र्अध मिश्रण पसरावं, वर चीज पेरावं आणि पोळी दुमडून दोन्ही बाजूंनी भाजून गरम खावी.