05 August 2020

News Flash

पळा पळा दिवाळी आली..

दिवाळीची चाहूल ही नवीन ऊर्जा घेऊन येते. सणाच्या आधीचे काही दिवस म्हणजे प्रत्यक्ष सेलिब्रेशनच्या बांधणीचे दिवस असतात

(संग्रहित छायाचित्र)

योगेश शेजवलकर

‘‘दिवाळीची चाहूल ही नवीन ऊर्जा घेऊन येते. सणाच्या आधीचे काही दिवस म्हणजे प्रत्यक्ष सेलिब्रेशनच्या बांधणीचे दिवस असतात. त्या दिवसात केल्या जाणाऱ्या विविध गोष्टींमुळे जुन्या आठवणी जाग्या होतात, ऋणानुबंध बळकट होतात पण इथे माझ्या मागे लागलेल्या कामांची यादी पाहता येऊ घातलेल्या दिवाळीचं दडपण वाटायला लागलं होतं, आणि मन म्हणायला लागलं,

‘पळा पळा दिवाळी आली.. कामं संपवण्याची वेळ झाली!’..’’  दिवाळीच्या निमित्ताने सणाआधीची ही हवी-नकोशी धांदल खुसखुशीत शब्दांत..

गेल्या आठवडय़ात नेहमीसारखा ऑफिसमध्ये पोचलो.. सॅक डेस्कवर ठेवली आणि मीटिंगसाठी कॉन्फरन्सरूमकडे निघालो. तेवढय़ात कॉरिडॉरच्या टोकाला माझा बॉस घाईघाईने त्याच्या केबिनमध्ये जाताना दिसला. त्याला पाहून मी स्वाभाविकपणे माझा चालण्याचा वेग कमी केला. पण मला पाहिल्यावर कमालीच्या घाईत असूनही तो मागे वळला आणि केवळ ‘गुड मॉìनग’ असं म्हणून तो थांबला नाही.. तर आपल्या चेहऱ्यावरच्या चरबीच्या थरांची वेगवान हालचाल करून एक भलं मोठं स्माईल दिलं. त्याच्या अनपेक्षित स्माईलमुळे माझ्या पोटात भीतीनं गोळा उभा राहिला.

कोणतंही कारण नसताना अचानक कोणी चांगलं वागलं की त्यानंतर कोणतं तरी बिल आपल्या नावानं हमखास फाटतं हा माझा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे ‘ध्यानीमनी नसताना एखाद्या दुपारी फक्त खुशाली विचारण्यासाठी म्हणून सासूबाईंचा फोन आला’ किंवा ‘चारचौघांत कोणताही टोमणा न मारता बायकोनं कौतुक केलं’ किंवा ‘नातेवाईकांकडून ‘तुझ्या आवडीचं’ असं लेबल लावलेल्या खाऊचा डबा आला’ की मला कमालीचं टेंशन येतं. कारण या घटना म्हणजे येणाऱ्या वादळाची नांदी असते.. त्यानंतर जे काही होतं त्यात आपण पालापाचोळ्यासारखे उडून जाणार हे विधिलिखित असतं.

त्या दिवशीही तेच झालं. मी मीटिंग संपवून डेस्ककडे निघालो आणि तेवढय़ात बॉसनं गाठलं. मग कमालीच्या आपुलकीने तो म्हणाला, ‘‘महिन्याच्या शेवटच्या सोमवारी सकाळी एक खूप महत्त्वाचा कॉन्फरन्स कॉल आहे. अमेरिकेतली आपली टीम तिकडे रविवार संध्याकाळ असतानाही त्या कॉलमध्ये असणार आहे. तेव्हा मला असं वाटतं, की हा कॉल आपल्याकडून तू लीड करावास. तू आता मोठय़ा प्रोजेक्टसाठी पुरेसा मॅच्युअरपण झाला आहेस. इथे तुला चांगलं एक्सपोजरही मिळेल, काय?’’

या महिन्याच्या कॅलेंडरचं पान माझ्या डोळ्यांसमोर आलं आणि एका क्षणात सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. पण चेहरा कमालीचा मख्ख ठेवून मी बॉसला म्हणालो, ‘‘या महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी.. म्हणजे आपल्याला ऑफिशीयली सुटी असताना आणि तुम्ही सुटीसाठी दुबईला गेले असताना मी हा कॉल घ्यायचा आहे.’’

‘‘करेक्ट.. फक्त दोन तासांचा कॉल आहे.. आणि तू मस्त फराळ खात खात घरूनच कॉल घे, ज्या काही स्लाइड्स दाखवल्या जातील त्या फक्त बघ. फोनवर जे काही बोलणं होईल ते फक्त ऐक.’’

‘फक्त एवढं.. फक्त तेवढं’ म्हणण्याची बॉसची सवय मला चांगलीच माहीत होती.

‘‘सर, पण त्या कॉलच्याच वेळेला आमच्या घरी फॅमिली गेटटूगेदर आहे. माझी सख्खी बहीण कुटुंबासह भाऊबीजेसाठी आणि फराळासाठी येणार आहेत. त्या दिवशी मी आईला अगदी स्वयंपाकापासून लागेल ती मदत करण्याचं कबूल केलं आहे. आता जर मी काहीही कारण दिलं तर ती मला फाडूनच खाईल.’’ मी दिनवाण्या स्वरात बॉसला म्हणालो. पण त्याचा काहीही परिणाम न होता तो मला म्हणाला, ‘‘अरे तुझी सख्खी बहीण येते आहे ना.. मग तिला सांग ना आईला मदत करायला. तिला पण बऱ्याच दिवसांनी माहेरी काम केल्याचा आनंद मिळेल आणि तुझ्या आईलाही बरं वाटेल.. सगळ्यांसाठी विन-विन सिच्युएशन.. काय?’’

गेली अनेक वर्ष बॉसनं ‘लॉजिक’ हा विषय ऑप्शनला टाकला असल्यामुळे त्याच्याशी वाद घालण्यात काहीही अर्थ नाही हे ओळखून मी फक्त ‘हं’ म्हणालो. त्याबरोबर तो कमालीचा खूश झाला आणि ‘तुझ्यासारखा समजूतदार माणूस संपूर्ण कंपनीत मिळणार नाही.’ असं स्तुतीसुमन उधळून पुढच्या क्षणाला तिथून गायबही झाला. अर्थात पुढच्या अप्रायझलपर्यंत ते ‘स्तुतीसुमन’ कोमेजून त्याचं निर्माल्यही झालं असेल हे मला माहिती होतं. तेव्हा त्याबद्दल फार हुरळून जाण्यात काहीही अर्थ नव्हता. उलट ‘घरी काय सांगितलं म्हणजे कमीत कमी शिव्या बसतील?’ यासाठी विचारमंथन गरजेचं होतं. तो विचार करतच मी माझ्या डेस्कपाशी आलो आणि अचानक मोबाइलकडे लक्ष गेलं.

सोसायटीतल्या मुलांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’वर मेसेजेसचा पाऊस पडला होता. इतका वेळ फोन सायलेंट मोडवर असल्यानं ते माझ्या लक्षातच आलं नव्हतं. येत्या शनिवारी दुपारी सोसायटीच्या मागच्या भिंतीपाशी किल्ला करायचा बेत मुलांनी नक्की केला होता. दरवर्षी सोसायटीतली मुलं मोठय़ा मेहनतीने किल्ला करायची. गेली अनेक वर्ष किल्ला करण्यासाठी लागणाऱ्या त्या मऊ ओलसर मातीचा स्पर्श माझ्या हातांना झाला नव्हता म्हणून गेल्या वर्षी मोठय़ा उत्साहानं ‘मी किल्ला करायला येतो,’ असं त्यांना प्रॉमिस केलं होतं. त्याचबरोबर किल्ला कमिटीच्या मीटिंगमध्ये जाऊन आणखीही काही गोष्टींची जबाबदारी मी घेतली होती. खरं तर त्यामुळेच त्यांनी मला त्यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’मध्ये घेतलं होतं. नाही तर माझ्यासारखे ‘ओल्ड स्कूल’चे लोक त्यांच्या दृष्टीने बोअिरग आणि आऊटडेटेड होते.

किल्ला करण्यासाठी गेल्या वर्षीही असाच एक शनिवार फिक्स झाला होता पण आयत्या वेळी नशिबानं फितुरी केली आणि ‘मातीचा स्पर्श’ वगैरे कल्पना मनातच राहून माती खाण्याची वेळ आणली. प्रोजेक्टमध्ये शेवटच्या क्षणी काही तरी बदल झाले आणि तो शनिवार-रविवार मला ऑफिसमध्ये जावं लागलं. त्या दिवसापासून सोसायटीतल्या मुलांच्या मुबलक शिव्या आणि टोमणे चिरंतन मनाने खाण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

आजच्या मेसेजेसमध्येही मी रडारवर होतो. सगळ्यांनी माझी यथेच्छ पिसं काढली होती. ‘बोले तसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ असा पहिला मेसेज होता. मग ‘चौदा वर्ष आय.टी.मध्ये राहूनही ज्यांना टाइम मॅनेजमेंट जमत नाही त्यांचं आयुष्यात काहीच होऊ शकत नाही.’ अशी भविष्यवाणीही होती. ‘यावेळी जर आपल्याला शेंडी लावली गेली तर शेंडी लावणाऱ्याच्या कारच्या बोनेटवरपण आणखी एक किल्ला केला जाईल.’ असा सूचक इशाराही होता. एकाने तर ‘दगा देणाऱ्यांना आपण ग्रुपमधून हाकलून का देत नाही?’ असा थेट प्रश्न अ‍ॅडमीनला विचारला होता. त्या प्रश्नावर अ‍ॅडमीनचं उत्तर येण्याआधीच एकानं यावेळी बोलबच्चन दगलबाजांचा कडेलोट करण्याची व्यवस्थाही आपल्या किल्ल्यावर असायला हवी.’ अशी सूचनाही मांडली होती. एकूणच मेसेजेसचा सूर पाहता सगळे मेसेजेस वाचण्याचं माझं काही धर्य झालं नाही. ‘या शनिवारी जगाची कितीही उलथापालथ झाली किंवा बायको कितीही नाही म्हणाली.. तरीही मी किल्ला करायला येणार आहे.’ असा मेसेज लिहून आणि त्यासोबत स्माईलीज्चा गठ्ठा टाकून मी विषयावर काही काळापुरती का होईना पण ‘माती’ टाकली आणि सुस्कारा सोडला.

अर्थात, माझा तो आनंद काही फार वेळ टिकला नाही. बरोबर लंच टाइममध्ये बायकोचा फोन आला. माझं ‘हॅलो’ म्हणून होण्याआधीच तिचं वाक्य कानावर पडलं, ‘‘मी काय म्हणते..’’ खरं तर त्या वाक्याचे प्रत्युत्तर म्हणून ‘‘आपल्याकडे सगळं नेहमी तूच म्हणतेस’’ असं म्हणण्याचा मला कमालीचा मोह झाला पण तो मी मोठय़ा संयमानं टाळला. कारण तसं मी म्हणालो असतो तर त्यावरच्या तिच्या तडाखेबंद प्रतिक्रियेमुळे माझ्या फोनचा डिस्प्लेही फुटला असता. शेवटी काहीही न बोलता मी तिचं बोलणं ऐकायला सुरुवात केली. दिवाळीची साफसफाई, फराळाची तयारी, अगदी मोती साबणापासून करायच्या खरेदीची यादी, घरी बोलावलेले पाहुणे, त्यांच्यासाठीच्या गिफ्ट, यावर भरपूर चर्चा झाली. म्हणजे ती भरपूर बोलत होती आणि मी ऐकत होतो.

तिचं सगळं बोलणं संपल्यावर, ‘‘इतक्या गोष्टी आहेत तर मग खरेदीसाठी उद्याच फंड ट्रान्सफर करतो आणि थोडे जास्तीचे पण ट्रान्सफर करून ठेवतो.’’ असं म्हणायचं आणि शेवट दोघांसाठी गोड करायचा असं मी ठरवलं होतं. पण एखादी गोष्ट करायचं आपण नक्की केलं की नशिबाचा ‘इगो’ दुखावतो आणि ठरवलेली गोष्ट काहीच्या काही मापात फिसकटते हा नियमच आहे. तेव्हा यावेळीही काहीही वेगळं होणार नव्हतं. सगळं बोलून संपल्यावर मी काही बोलण्याआधीच बायकोने विचारलं, ‘‘आता खर्चाचा तुला अंदाज आला आहे तर तेवढे पैसे आणि थोडेसे जास्तीचे उद्या दुपापर्यंत ट्रान्सफर कर. पण ही खरेदी, घरातली साफसफाई करण्यासाठी तू वेळ कधी देणार आहेस? ते आताच सांग. दरवर्षी मदत करतो म्हणून आश्वासन द्यायचं आणि मग आयत्या वेळी.. तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर ‘कल्टी’ मारायची, हे यावेळेस चालणार नाही.’’ एकुणात तिची वाद घालण्याची तयारी बघून ‘‘आज घरी आलो की निवांत बोलू’’ असं म्हणून मी फोन बंद केला.

साधारणपणे दिवाळीची चाहूल ही खरं तर एक नवीन ऊर्जा घेऊन येते. सणाच्या आधीचे काही दिवस म्हणजे प्रत्यक्ष सेलिब्रेशनच्या बांधणीचे दिवस असतात. त्या दिवसात केल्या जाणाऱ्या विविध गोष्टींमुळे जुन्या आठवणी जाग्या होतात, ऋणानुबंध बळकट होतात पण इथे माझ्या मागे लागलेल्या कामाची यादी पाहता येऊ घातलेल्या दिवाळीचं दडपण वाटायला लागलं होतं. ते दडपण कसं दूर करायचं? हा खरा प्रश्न होता.

याचा विचार करत असतानाच माझ्या टीममधला ज्युनियर माझ्यासमोर येऊन उभा राहिला. तो काही बोलायच्या आधीच मी त्याला म्हणालो, ‘‘टीममधल्या बऱ्याच लोकांनी सुट्टय़ा घेतलेल्या आहेत. काही लोक तर हा आठवडा संपला की गायब होणार आहेत. वर्कलोड प्रचंड आहे. तेव्हा सुटी मागायचा विचारही करू नकोस.. माझ्याकडून अ‍ॅप्रूव्हल न घेता कुठे बुकिंग केलं असशील तर तिकडे तुला मलाही घेऊन जावं लागेल हे लक्षात ठेव आणि मगच जे बोलायचं आहे ते बोल.. आणि आज सुटी वाढवून मिळाली नाही म्हणून मग ‘दिवाळीत अचरबचर खाणं झालं म्हणून तब्येत बिघडली आहे.’ असं नंतर सांगून दांडी मारू, असा विचार करत असलास तर तुला शून्य मार्क आहेत.. कारण तसं काही केलंस तर तुला आणायला तुझ्या घरी मी माणसं पाठवेन.’’ खूप वेळानं मला माझ्या मनातलं बोलण्याची संधी मिळत असल्यामुळे मी जितकं सुचेल ते सगळं त्याला बोललो.

माझा हा सगळा डोस देऊन झाल्यावर तो फक्त हसला आणि म्हणाला, ‘‘अहो सर, तुम्ही लोड घेऊ नका. मला सुटी नकोय. इथे विषय खूप सोपा आहे.’’ आमच्या दोघांतल्या जनरेशन गॅपचा विचार केला तर त्याचं सोपं म्हणजे माझ्यासाठी कमालीचं अवघड असतं, हे मला माहिती होतं. ‘आता काय?’ अशा काळजीनं मी त्याच्याकडे पाहिलं. ‘किमान तू तरी माझ्यावर दया कर’ असे केविलवाणे भाव माझ्या नजरेत होते पण अर्थात तसं चुकूनही घडणार नव्हतं.

हातात असलेला कागद फडफडवत तो म्हणाला, ‘‘एचआर डिपार्टमेंटचा ई-मेल आला आहे. आपल्या टीममधल्या लोकांसाठी दिवाळीच्या काही फन अ‍ॅक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत. शिवाय या अ‍ॅक्टिव्हिटीज वìकग अवर्समध्येच घ्यायच्या आहेत. मी कंपनीच्या कल्चरल कमिटीत आहे तेव्हा अ‍ॅक्टिव्हिटीज मी अरेंज करेन. पण प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटीला जज म्हणून तुम्हालाच यावं लागेल आणि लोकांना बक्षीसपण द्यावं लागेल.’’

‘‘अरे वा.. मग या सगळ्याबद्दल मला बक्षीस कोण देणार?’’ मी शक्य तेवढय़ा उपहासानं त्याला विचारलं.

पण तो भाऊ सगळ्याच्या पलीकडे गेला होता.. तो शांतपणे म्हणाला, ‘‘मी! म्हणजे कसं आहे.. शेवटची अ‍ॅक्टिव्हिटी संपल्यावर तुमची बक्षिसं देऊन झाली की कल्चरल कमिटीच्या वतीने मी तुम्हाला अडीचशे रुपयाचं एक फूड व्हाउचर देणार. म्हणजे ते तुम्हाला नको असेल तर चोवीस पणत्यांचा सेटपण आहे आपल्याकडे किंवा ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी एक काचेचा बाऊलपण आहे. तुम्ही लोड घेऊ नका.. तुम्ही म्हणाल ते देतो.’’

ते ऐकून काकुळतीने मी त्याला म्हणालो, ‘‘अरे मी काय वाईट केलंय तुझं? का जीव घेतोयस माझा? खरं सांग.. तुला सुटी हवी आहे ना?.. काही तरी करून ती मी तुला मिळवून देतो. पण असा सूड घेऊ नकोस रे.’’

पण अर्थात तो माझं काहीही ऐकणार नव्हता. माझ्या सगळ्या विनंत्यांकडे दुर्लक्ष करून तो म्हणाला, ‘‘या अ‍ॅक्टिव्हिटीजच्या वेळा आणि दिवस तुम्हाला ई-मेल करून पाठवतो म्हणजे तुमच्यापाशीही माहिती राहील. फक्त या ई-मेलचा विषय काय ठेवू? म्हणजे तुम्हाला फार शोधाशोध करावी लागणार नाही.’’ त्यावर एक दीर्घ सुस्कारा सोडत मी त्याला म्हणालो, ‘‘याचा विषय एकच असू शकतो.. ‘पळा पळा दिवाळी आली.. कामं संपवण्याची वेळ झाली!’’

yogeshshejwalkar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 12:28 am

Web Title: festive mood before diwali festival abn 97
Next Stories
1 अवघे पाऊणशे वयमान : ..देठालाही कळू नये
2 आरोग्यम् धनसंपदा : दिवाळीत नजर ठेवा वजनकाटय़ाकडे
3 तळ ढवळताना : झाडांचं काय घेऊन बसलात राव..
Just Now!
X