उत्साहाने सळसळणारी एक बुद्धिमान मुलगी अमेरिकेच्या टीव्ही, सिनेमा या क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करते. नृत्यदिग्दर्शिका, फोटोग्राफर किंवा फिल्म मेकर म्हणून नावारूपाला येते, पण अवघ्या ३२ व्या वर्षी एका दुर्मीळ कर्करोगाचे निदान तिला होते, मात्र हताश, असहाय होण्याऐवजी ती या आजारालाच ‘क्रेझी सेक्सी कॅन्सर’ बनवते. कर्करोगाला व्हॅलेंटाइन मानणारी, अनेक बेस्ट सेलर पुस्तके लिहिणाऱ्या क्रिस कारविषयी..
‘चमत्कार होतातच! स्वत:वर दुर्दम्य विश्वास ठेवा!’ हे सुभाषित क्रिस कार हिच्याबाबतीत तंतोतंत लागू पडते. क्रिस कार ही बहुतेक इंग्रजी वाचकांना तिच्या पुस्तकांच्या व ब्लॉग्जच्या  ‘क्रेझी सेक्सी’ मालिकांमुळे माहिती असेल. गेल्या दहा-बारा वर्षांपासून अत्यंत नाजूक प्रकृतीशी सामना करत असूनही  सर्वाधिक खपांची पुस्तके, ब्लॉग्ज लिहिणारी आणि मिश्कीलपणे आपल्या वेदनांना वाकुल्या दाखवणारी क्रिस जगाला, कुठल्याही परिस्थितीत आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देते आहे.
 हताश होण्याच्या क्षणी उन्मळून न पडता आपली सर्व मन:शक्ती आपले आत्मबळ वाढवण्यासाठी तिने वापरली आणि त्याच आत्मबळाच्या जोरावर आज ती अनेकांसाठी प्रेरणा, दिलासा, आशा बनली आहे. असे काय घडले क्रिसच्या आयुष्यात?
एक उत्साहाने सळसळणारी, बुद्धिमान मुलगी आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर, आपल्या मेहनतीमुळे अमेरिकेतील नाटय़, टीव्ही आणि सिनेमा क्षेत्रांत स्वतची वेगळी ओळख निर्माण करते, यश आणि कौतुकाची थाप मिरवत असतानाच अचानक सगळे बदलते. तिला दुर्दैवी वगैरे म्हणणे चूकच कारण नशिबाने उगारलेला क्रूर आसूड हसून झेलत ती त्याचे रूपांतर एका दिव्य स्पर्शात करते. जो स्पर्श तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करतो.
क्रिसचा जन्म १९७१ मध्ये पोलिंग, न्यूयॉर्क येथे झाला. तिचे शालेय शिक्षण कनेक्टिकट येथे झाले. तिचे उच्च शिक्षण ‘इतिहास आणि इंग्रजी साहित्य’ या विषयात झाले. न्यूयॉर्कमध्येच वास्तव्याला असलेल्या क्रिसने नृत्य, फोटोग्राफी आणि अभिनय या क्षेत्रात आपले करियर सुरू केले. अमेरिकेतील ‘ब्रॉडवे’ या नाटय़ आणि अभिनय क्षेत्रातील नामांकित चळवळींसोबत आणि स्वतंत्रपणेही तिने सुरुवातीच्या काळात काम केले आहे. काही टीव्हीवरील जाहिरातींनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. ‘मि. पीटर्स कनेक्शन’ या सिनेमात मेरलिन मन्रो या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे ‘भूत’ तिने अतिशय प्रभावीपणे उभे केले. ‘स्टोन स्ट्रीट स्टुडिओज’ व ‘प्लेराइट हॉरिझोन्स थिएटर स्कूल’सारख्या न्यूयॉर्कमधील अग्रगण्य संस्थांमध्ये तिने फॅकल्टी म्हणून काम करीत असतानाच अनेक स्टेज शो अमेरिका आणि परदेशातही केले. यात तिने नृत्यादिग्दर्शिका म्हणून विशेष ओळख मिळवली!
१९९९ पासून पुढची चारपाच वर्षे क्रिसने न्यूयॉर्कमध्ये फोटोग्राफी व्यवसायात चांगला जम बसवला. पुढे तिने ‘फिल्म मेकिंग’ व ‘रायटिंग’वरच आपले लक्ष केंद्रित केले. तिने बनवलेली ‘रिडेम्पशन’ नावाची शॉर्ट फिल्म बहुचíचत ठरली. प्रसिद्धी, ग्लॅमर, पसा, कामाचे समाधान हे सर्व तिला तिच्या मेहनती स्वभावामुळे वयाच्या मानाने फार लवकर प्राप्त झाले.    
आनंदाने आयुष्य जगत असताना एका बेसावध क्षणी नियतीने तिच्यावर वार केला. १४ फेब्रुवारी २००३ रोजी सगळीकडे ‘व्हॅलेन्टाइन डे’ जोशात साजरा होत होता. त्या दिवशी क्रिसदेखील नेहमीप्रमाणेच उत्साहात होती. फक्त काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीच्या सततच्या काही ना काही तक्रारी होत्या त्यामुळे काही तपासण्या डॉक्टरांनी करायला सांगितल्या होत्या. डॉक्टरांना थोडी शंका होतीच म्हणून काही अधिकच्या चाचण्याही करण्यात आल्या होत्या. त्यांचे रिपोर्ट घ्यायला ती गेली आणि ‘एपिथेलिओइड हिमनजिओएन्डोथेलिओमा’ या क्लिष्ट नाव असलेला, अत्यंत दुर्मीळ आणि दुर्धर असा कर्करोग तिला झाल्याचे निदान झाले. तो चौथ्या पायरीवर असल्याने ती वाचण्याची शक्यता कमी होती कारण तिचे यकृत आणि फुप्फुसे यांना बऱ्याच मोठय़ा प्रमाणात संसर्ग झालेला दिसत होता! एरवी कोणतीही व्यक्ती अशा परिस्थितीत पार खचून गेली असती, नाउमेद झाली असती!  पण क्रिस त्यातली नव्हती! तिच्या आयुष्याला या दुर्धर रोगाने अत्यंत सुंदर कलाटणी दिली!
१४ फेब्रुवारीला (व्हॅलेंटाइन डे) तुमच्या आयुष्यात आलेली व्यक्ती तुमची साथ कधीही सोडत नाही, असे पाश्चात्त्य देशांत मानले जाते! क्रिस म्हणते, ‘‘आता कर्करोग हाच माझा व्हॅलेंटाइन’’ आता जेवढे दिवस आपले आयुष्य उरले आहे तेवढे दिवस कर्करोगालाच आपला प्रियकर मानून त्याच्याशी आपला प्रणय मोठय़ा दिमाखाने ती मिरवते!
 एवढय़ा भीषण आजारात तुमची प्रतिकारशक्ती वेगाने घटत जाते हे क्रिसला माहिती होते. तिच्या डॉक्टरांनी तिला तिच्या आजाराविषयी, त्यातून पुढे उद्भवू शकणाऱ्या काही गुंतागुंतीविषयी, औषध योजना आणि त्याचे ‘साइड इफेक्टस्’ यांबाबत संपूर्ण कल्पना दिली. तिने आता अधिक मेहनत, शारीरिक तसेच मानसिक दोन्हीही टाळावे असाही सल्ला दिला! आरोग्याने साथ दिली तर अजून आठ-दहा वष्रे जास्तीत जास्त तू जगू शकतेस, हेही सांगितले.
  क्रिस सांगते, ‘‘एकदा हे निदान तुमच्याबाबत झाले की आपल्या आयुष्याचा आता जो काही थोडा काळ उरला आहे तो आनंदाने जगायचं की रडत, हा निर्णय तुम्हाला अगदी ताबडतोब घ्यावा लागतो. किंबहुना पुढील आयुष्यात तुमच्याजवळ विचार करत बसायला फारसा वेळ नसणार त्यामुळे जे काय करायचे आहे ते आत्ताच हे तुम्हाला कळून चुकते.’’
 क्रिसने आता संपूर्ण लक्ष ‘आहार आणि पोषण’ या विषयांवर केंद्रित केले. अव्याहतपणे चालणाऱ्या ऑडिशन्स देताना एनर्जी बार्स, फास्ट फूड आणि कॉफी यांच्यावर उमेदीची वष्रे ढकलणारी, कामाच्या ओढीने तर कधी ओझ्याने, आरोग्याशी सर्व तऱ्हेच्या तडजोडी करत राहणारी तिची पिढी अशा आजारांना सहज बळी पडते आहे, हे तिला प्रकर्षांने जाणवले! आपण खात-पीत असलेल्या अन्नाविषयी, पाण्याविषयी, आपण वापरत असलेल्या वस्तू, प्रसाधने, कपडे, आपला भवताल आदी अनेक गोष्टी आधुनिकतेच्या नावाखाली कशा घातक ठरत आहेत याबाबत तिने कसून अभ्यास सुरू केला. स्वत:वरच प्रयोग करून तिने विविध निष्कर्ष मांडले. जितके निसर्गाच्या अधिक जवळ आपण जाऊ तेवढे या आजाराचा सामना करणे सोपे जाते, असे तिच्या लक्षात आले.
२००७ साली आपल्या कर्करोगासोबतच्या आयुष्यावर क्रिसने एक माहितीपट बनवला. त्याचे नावही तिने अतिशय रंजक असे निवडले होते, ‘क्रेझी सेक्सी कॅन्सर’!  सोबतच या दुर्धर आजाराशी मत्री करून आनंदाने कसे जगावे या संबंधीचे एक छोटेखानी पुस्तकही  ‘क्रेझी सेक्सी कॅन्सर टिप्स’ या नावाने तिने लिहिले! कर्करोग झालेल्या इतक्या तरुणींच्या  प्रत्यक्ष अनुभवांवर तोपर्यंत कुठलेच पुस्तक लिहिले गेले नव्हते किंवा सिनेमा बनवला गेला नव्हता!
 तिने बनवलेला माहितीपट ऑस्टिन येथील ‘साउथ वेस्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये खूप गाजला आणि टीएलसी या वाहिनीवरून तो त्याच वर्षी प्रक्षेपित करण्यात आला! यापाठोपाठच क्रिसने ‘क्रेझी सेक्सी लाइफ डॉट कॉम’ नावाची वेबसाइट २००७ ला सुरू केली! या वेबसाइटच्या माध्यमातून तिने आपले कर्करोगाशी देत असलेल्या लढय़ाविषयीचे, आपल्या आहार-विहारात केलेल्या आमूलाग्र बदलांचे आणि त्यातून तिला झालेल्या फायद्याचे विविध ब्लॉग्ज लिहिणे सुरू केले! तिने भाजीपाला, फळे यांच्या उपयोगासंबंधी  व त्यांच्यातील कर्करोग निरोधक गुणधर्माविषयी लिहिलेले अत्यंत अभ्यासपूर्ण ब्लॉग्ज अल्पावधीतच चर्चाचे विषय बनले आणि वेज न्यूज या प्रतिष्ठित मासिकातर्फे तिला ‘व्हेजी अवार्ड’ प्रदान करण्यात आले!
मृत्यू साक्षात् उभा ठाकलेला असताना त्याच्याशी लीलया लढणारी व्यक्ती म्हणून क्रिस कारला ‘ऑप्रा विन्फ्रे’च्या लोकप्रिय शोमध्ये आमंत्रित केले गेले! २००८ साली क्रिसने ‘क्रेझी सेक्सी’ या मालिकेतील आणखी एक पुस्तक ‘क्रेझी सेक्सी कॅन्सर सव्‍‌र्हायव्हर’ लिहिले! तुफान खप झालेले हे पुस्तक लिहिल्यानंतर लगेच तिने ‘माय क्रेझी सेक्सी लाइफ’ नावाची कॅन्सर ग्रस्तांसाठीची ऑन लाइन कम्युनिटी सुरू केली! त्याचे आज ३९ हजारांहून अधिक सदस्य आहेत! ‘क्रेझी सेक्सी ज्युसेस’ आणि ‘क्रेझी सेक्सी प्रोग्राम्स’ ही तिची आणखी दोन लोकप्रिय पुस्तके!
२०११ साली प्रकाशित झालेल्या आपल्या खाद्यांन्नातील बदलांशी निगडित असे अनुभव तिच्या ‘क्रेझी सेक्सी डाएट’ या  पुस्तकात तिने लिहिले आहेत! न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वाधिक खपाच्या (बेस्ट सेलर) यादीत हे पुस्तक सलग चार आठवडे अग्रमानांकित राहिले तर ‘अ‍ॅमेझॉन’नेही या पुस्तकाच्या खपाचे विक्रम केले!
आता क्रिसला अनेक देशातले लोक ओळखू लागले आहेत, पण तिची ओळख नृत्यदिग्दíशका, फोटोग्राफर किंवा फिल्म मेकर अशी नसून फूड काऊन्सेलर म्हणून अधिक होऊ लागली आहे! कर्करोग झालेली अनेक माणसे तिच्या या अनुभवांचा फायदा घेण्यासाठी तिच्या संपर्कात राहू लागली आहेत. तिची वेब साइट  CrissKarr.com च्या माध्यमातून तिच्याशी कुणालाही सहज संपर्क करता येतो. २०१२ साली तिचे आणखी एक पुस्तक ‘क्रेझी सेक्सी किचन’ बाजारात आले. जवळपास १५० रेसिपीज, स्वयंपाकघरातील टिप्स आणि संपूर्ण शाकाहारवर भर देणारे पुस्तकदेखील न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर यादीत राहिले आहे!
 विविध शाळा, महाविद्यालये, संस्था, हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्रे, होल फूड्ससारखी दिग्गज कॉर्पोरेट कंपनी, तसेच हार्वर्ड विद्यापीठातून क्रिस नियमित व्याख्याने देते! नॅचरल हेल्थ मॅगेझिनची ती संपादिका असून अनेक ऑन लाइन प्रकाशनांमधून ती लिहीत असते! गुड मॉìनग अमेरिका,ओन वरील सुपर सोल संडेसारख्या अनेक टीव्ही शोजमध्येही क्रिसची उपस्थिती असते!
‘कर्करोग ही खूपच ‘थ्रीिलग’ बाब आहे असे मला म्हणायचे नाही! पण आपण त्याकडे कसे पाहतो, आपण नवनवीन वैद्यकीय शोधांबाबत माहिती घेतो का? आपण हुशार  कर्करोगतज्ज्ञ शोधतो का? जर नाही तर आजच आपला शोध सुरू करा!’ असे अनेक सल्ले आणि सूचना ती कर्करोग रुग्णांना ‘क्रेझी सेक्सी’ पद्धतीने देत असते!
हे सर्व वाचल्यानंतर आपणासही पटेल, चमत्कार होतात. ज्यांना ते व्हावे असे मनापासून वाटत असते त्यांच्यासाठी !