आज घट बसतील. नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. आदिशक्ती, दुर्गा, अंबा.. अशा अनेक रूपांत भेटणाऱ्या शक्तीच्या गौरवाचा, स्मरणाचा हा उत्सव.. संकटांच्या महिषासुरांचं मर्दन करणारी.. हारी पडलो असं वाटत असताना संकट निवारणारी.. प्रसन्न वदने प्रसन्न होणारी.. ही शक्ती. त्या शक्तीचा हा चतुरंग जागर.
 ती भेटते अनेक रूपांत. चेटकिणीसारख्या अभद्र प्रथा संपवणाऱ्या आसाममधल्या बिरुबाला रभा हिच्या अस्तित्वात, अ‍ॅसिड हल्ल्यातील होरपळ सहन करून त्याविरोधात मोहीम उघडणाऱ्या बंगळुरूच्या हसीना हुसैन हिच्या रूपात, महिलांवरल्या अत्याचारांच्या बीमोडासाठी आपल्याच घरापासून सुरुवात करणाऱ्या झारखंडच्या वसावी किरो हिच्या अवतारात, महाराष्ट्रातल्या नीरजेसारख्या छोटय़ा गावात सरपंचपदाची धुरा सांभाळताना पाणी योजना आणि दारूबंदी आणण्यासाठी गावातल्याच पुरुषांशी संघर्ष करणाऱ्या शारदा पवार हिच्या असण्यात आणि सुखासीन आयुष्य सोडून काश्मीरमधल्या आपल्या छोटय़ाशा गावात इंग्रजी शाळेसाठी झटणाऱ्या सबा हाजी खानच्या प्रतिमेतही असते ती आदिशक्तीच!
वडिलांकडून आपल्याच मुलांचं होणारं अपहरण मोडून काढण्यासाठी जीव धोक्यात घालणारी इंग्लंडची डोन्या-अल-नही, वाहन चालवणाच्या अधिकारासाठी भांडणारी सौदी अरेबियाची मनल-अल-शरीफ, यादवीनं गांजलेल्या कुपोषित सोमालियात निर्वासितांना आसरा देणारी आणि त्यासाठी अतिरेक्यांना ठणकावणारी डॉ. हवा अबिदी आणि तालिबानी राजवटीत पहिली सिनेदिग्दर्शिका ठरलेली रोया सदत.. ही सगळी त्या शक्तीचीच रूपं!
मोहवणारी, भुलवणारी, अचंबित करणारी आणि मुख्य म्हणजे काही तरी शिकवणारी..
एक अर्धशिक्षित महिला आपल्या मुलाच्या ‘जिवंत’पणाबाबत वर्तविलेले भविष्य चुकल्याने डोळे ‘उघडायचे’ ठरवते. समाजातील एका अपप्रवृत्तीविरोधात दंड थोपटते आणि एक-दोन नव्हे तर ३६ महिलांचा जीव वाचवते.. त्या ‘वीरबाले’ची, धाडसी बिरुबाला राभाची ही कथा!
भारतीय जनमानस हे मुळात श्रद्धाळू ! आपल्याला होणारे त्रास, वेदना, कष्ट, आपल्याला येणारे अपयश अशा सगळ्या बाबींची जबाबदारी अनेकदा भारतीय मन देवावर ढकलून मोकळं होतं!  (काही बाबतीत अपवाद म्हणून ही जबाबदारी सरकार नावाच्या यंत्रणेवर फोडली जाते.) पाऊस अडला, पाऊस धो-धो पडला, रोगाची साथ पसरली, संकटांमागून संकटे उभी राहिली की आपल्याला आठवतात ‘दैवी शक्ती’.. अनेकदा साध्या-साध्या आजारांवरही वैद्यकशास्त्राचे उपचार करण्याऐवजी ‘वैदू’शास्त्राच्या उपचारांना सुशिक्षित म्हणवणाऱ्यांकडूनही प्राधान्य दिले जाते. शहरी किंवा निमशहरी भागात जर ही परिस्थिती असेल तर, जिथे रस्ताही धड नाही अशा गावांबद्दल काय विचारता?
   अशाच एका गावातील ही कहाणी.. घरातला मतिमंद असलेला लहानगा धम्रेस्वर आजारी पडतो, वैद्यकशास्त्रावरील दृढ ‘अविश्वासामुळे’ घरातील मंडळी मुलाला गावातल्याच नामांकित वैदूकडे (देवधनीकडे) घेऊन जातात. ‘तुमच्या मुलात चेटकीण संचारली आहे, तुमचा मुलगा तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस जगणार नाही’ वैदू जाहीर करून मोकळे होतात. घरातल्यांवर वज्राघात होतो..  प्रत्यक्षात चौथ्या दिवशी मुलगा जिवंत राहतो. पण त्यानंतर त्या मुलाला ठार मारले नाही तर गावाला त्रास सहन करावा लागेल अशी आवई उठवली जाते.. तेव्हा पोटच्या मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या आईलाच शर्थ करावी लागते..
स्वत:वर बेतलेला हा प्रसंग त्या  मुलाच्या आईला अस्वस्थ करून गेला. अनेक प्रश्न तिच्या भोवती फेर धरू लागले. आत्तापर्यंतचे चेटकीण मानले गेलेले लोक, त्यांचे केले गेलेले हाल तिला आठवू लागले. आणि तिचा वैदू या प्रकारावरील विश्वासच उडाला. आता त्याविरोधात लढणं हेच त्या आईचं जीवित कर्तव्य ठरून गेलं, त्या आईचं नाव आहे, बिरुबाला राभा.
‘‘गावात दैवी शक्तींना मान फार, पण तो मान दैवी शक्ती असलेल्या पुरुषांना! दैवी शक्ती जर स्त्रीमध्ये असल्याचं चुकून जरी दिसलं तर अशा स्त्रीला ‘चेटकीण’ ठरवून समाज मोकळा होतो. इतकंच नाही तर, अशा महिलांचा शारीरिक, मानसिक छळ केला जातो, त्यांना प्रसंगी ठारही मारलं जातं.  समाजात विज्ञानाबद्दल जागृती झालेली नाही, त्यामुळं अशा समजाला समाजात सहज स्थान मिळतं.’’ बिरुबाला आपले मत नोंदवतात.
पण अशी परिस्थिती ओढवण्यामागचं कारण काय? या प्रश्नावर बिरुबाला सांगतात, ‘‘अजूनही ‘काळ्या विद्येनं’ बरं करणाऱ्यांवर समाजाची श्रद्धा आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव हे अशा ‘वैदूं’चे कुरण ठरू लागले आहे. कितीही चरा.. गावेच्या गावे आपली श्रद्धा अशा भोंदूंच्या चरणी वाहतात, त्यामुळे त्यांचं चांगलच फावतं. शिवाय एखाद्याला जर दुसऱ्याची मालमत्ता हडप करायची असेल तर, जोपर्यंत (मालमत्तेचा मालक असलेली) ही व्यक्ती मरत नाही तोपर्यंत गावातील लोकांना नानाविध संकटांचा सामना करावा लागेल, अशी अफवा उठवायला या भोंदूंची मदत होते. म्हणूनच लोकांना शास्त्रीय उपचारांपेक्षा हे उपचार आणि ते करणारे बरे वाटतात. याविरुद्धच मी लढायचं ठरविलं. आणि माझ्या गाठीला माझ्या मुलाचा जीवघेणा अनुभव होताच,’’ बिरुबाला सांगत होत्या.  
‘‘अगदी लहानपणापासून आजपर्यंत मी अनेक महिलांना गावातून बहिष्कृत केलेलं, चेटकीण ठरवून हाकलून दिलेलं पाहात आले आहे. अशा महिलांच्या कुटुंबीयांनीसुद्धा तिच्यामागं खंबीरपणे उभं राहण्याऐवजी तिला वाळीत टाकणंच पसंत केलं आहे. म्हणूनच  हा ‘चेटकीण’ प्रकार मला कायमच अस्वस्थ करीत आला आहे. अशा पीडितांना वाचविणं हे माझ्या आयुष्याचे ध्येयच होऊन बसलं. माझ्याच मतिमंद मुलाला ‘चेटकिणीने धरलेला’ ठरवून त्याचे हातपाय बांधणाऱ्या गावकऱ्यांना माझा मुलगा मतिमंद असून त्याच्यावर वैद्यकीय उपचारांची गरज आहे, त्याला मारू नका’ हे समजाविताना मला प्रचंड कष्ट पडले. त्यामुळे ही लढाई सोपी नाही हेही माझ्या लक्षात आलं होतं. पण जिद्द होती. आसाम-मेघालय राज्यांच्या सीमेवरील गोलपारा या माझ्या राहत्या जिल्ह्य़ात मी काम सुरू केलं. या कामातला आणखी एक अडथळा म्हणजे आसामात आदिवासी वस्ती बऱ्यापकी आहे. आणि त्यांना परंपरेच्या जोखडातून मुक्त करणं, हे वाटतं तितकं  सोपं काम नाही. शिवाय त्यांच्यावर असलेलं भीतीचं गारूड उतरविणं हेसुद्धा आव्हानात्मक काम आहे. मलाही सुरुवातीला भरपूर त्रास झाला. या लढय़ामुळे मला गावातून हाकललं गेलं नसलं तरीही सामाजिकदृष्टय़ा तीन वर्षे बहिष्कृत केलं गेलं.
‘‘पण एकदा मी आसाम महिला समता सोसायटीच्या (एएमएसएस) ग्रामीण महिला समितीत सामील झाले. तेव्हा याच मुद्दय़ावरील एका चच्रेत सहभागी झाले होते. चेटकीण ठरवून छळ झालेल्या मला माहीत असलेल्या पाच महिला तिथं हजर होत्या. पण जेव्हा एएमएसएसच्या कार्यकर्त्यांनी ‘चेटकीण ठरविणं’ या प्रकाराबद्दल कोणाला काही माहिती आहे का असं स्पष्टपणे विचारलं तरी कोणीही काहीही बोललं नाही. अगदी त्या पाच जणीही नाहीत. अस्वस्थतेतून मी बोलायला उभी राहिले आणि तिथून माझी लढाई सुरू झाली..’’
‘‘ आजवर अशा गरसमजातून चेटकीण ठरविल्या गेलेल्या किंवा चेटकिणीनं  पछाडलेला आहे असे म्हटल्या जाणाऱ्या ३६ जणांचे जीव मी वाचवू शकले आहे. कोणत्याही गावातून चेटकीण ठरविण्यात आलेल्या मुलीची बातमी मला कळवली जात असे. ‘एएमएसएसची’ सचिव या नात्यानं मला हा बहुमान मिळत गेला. मग कित्येक मल पायपीट करून मी त्या गावात जात असे आणि त्या मुलीची सुटका करीत असे. प्रत्येक व्यक्तीपरत्वे वेगळा अनुभव असायचा, पण मी तिला सोडवून आणायची हेच समाधान होतं, पण अनेकदा मला वाटत आले आहे की, मी स्त्रीसाठी-स्त्रीत्वासाठी लढत होतेच, पण त्याहीपेक्षा मी पितृसत्ताक पद्धतीविरुद्ध लढत होते. कधी कधी तर मी स्वत:शीच झुंजत होते. पण माझ्याशी संपर्क साधणाऱ्या महिला, आसाम प्रशासन आणि मुख्य म्हणजे आसामचे पोलीस यांचे माझ्यामागे प्रचंड पाठबळ होते, त्यामुळेच इथवर पोहोचता आलं, पण मनुष्यबळाअभावी तसेच अपुऱ्या आíथक पाठबळामुळे माझ्या कामावर आजही मर्यादा येत आहेत,’’ बिरुबाला यांनी आपली खंत व्यक्त केली.
  पण ग्रामस्थांकडूनच काही वेगळाच, सकारात्मक अनुभव? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की शासकीय अधिकाऱ्याच्या निकट पोहोचता आल्याने गावात पक्की सडक बांधता आली. गावातील निरपराध मुलांना गरसमजातून जेव्हा बंडखोर ठरविले गेले तेव्हा सरकारदरबारी माझी ओळख वापरून त्यांची सुटका करता आली. अशा प्रसंगांमुळे माझ्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला. त्यातूनच काही युवक माझ्यामागे उभे राहिले.’’
आज समाजाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘‘समाजात रुळलेल्या अपप्रवृत्तींविरोधात शक्य तितक्या ताकदीनं  उभं राहणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं ज्यांना माझ्या ‘मिशन बिरुबाला’मध्ये कार्यकर्ता म्हणून यायचं असेल त्यांचं स्वागतच आहे. शिवाय अशा लढय़ासाठी आíथक पाठबळही हवे असते, समाजातून ते उभे राहिले तर त्याचेही स्वागत आहे. पण या सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, माझ्या आयुष्यात मी विवेकबुद्धी वापरेन, निव्वळ परंपरा आहे म्हणून ती पाळणार नाही, ही वृत्ती अंगी बाळगली तर ते मला आवडेल.’’
एखाद्या महिलेकडून जेव्हा समाजाला, विशेषत: पुरुषप्रधान संस्कृती रुजलेल्या समाजाला पराभव पत्करावा लागतो तेव्हा तो समाजाच्या अधिक जिव्हारी लागतो. मग समाज सर्व ताकदीनिशी तुमच्यावर तुटून पडतो, हे आजही सत्य आहे. मलासुद्धा याचा सामना करावा लागला. पण समाजात वाईट शक्तींइतकीच तुमच्या सदिच्छांना पाठबळ देणारी ताकद असतेच, ती अशा वेळी तुमच्या मागे उभी राहते. आणि त्यातूनच आपल्याला बळ मिळत जातं. तेव्हा, अशा अडचणींनी गोंधळून जायचे काहीच कारण नाही, असं मला स्पष्टपणे वाटतं,’’ बिरुबाला आपलं म्हणणं ठामपणे मांडते.  
ताठ बाण्याची वीरबाला आपल्याशी बोलत असताना लक्षात येतं की डॉ. नरेंद्र दाभोलकर आज जरी आपल्यात नसले तरी विवेकाची कास धरत अंधश्रद्धेविरोधात लढणारे जागोजागी पसरलेले ‘हे’ असे दाभोलकर अजूनही आहेत. आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृतींविरोधात उभारलेल्या लढाईची हीच खरी ताकद आहे.    
swrup.pandit@expressindia.com