cn22‘‘सांगली-दिल्ली-मुंबई परत पुणे-महाराष्ट्र पाच दशकांहून अधिक काळ कलेच्या वाटेवरून चाललेय. प्रतिष्ठेनं.. नेकीनं.. आत्मसन्मान जपून.. नाटक, सिनेमा, मालिका आणि गाणं.. चारही क्षेत्रं आपली मानली.. अभ्यासली.. अनेक लोकांत वावरले.. कलेच्या क्षेत्रातल्या आणि बाहेरच्याही शिकत गेले. शिकवत गेले आणि अद्यापही तो वसा चालूच आहे.. साठा उत्तराची सुफळ कहाणी अशीच चालू राहाणार आहे..

काळाच्या प्रदीर्घ टप्प्यानं अनेक वाटा-वळणे घेतली, तरी माझी पहिली आठवण दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली या तेव्हाच्या छोटय़ा नगरीत जाऊन पोहोचते. माझा जन्मच सांगलीचा. माझे वडील सांगलीजवळच्या कुरुंदवाड संस्थानात कार्यरत होते. तो काळ स्वातंत्र्यपूर्व आणि संस्थानांचा. संस्थानातलं वातावरणही सुसंस्कृत.. आमचं ‘बावकर’ कुटुंब, म्हणजे एकत्रित कुटुंब, सांगलीच्या प्रसिद्ध राममंदिराजवळच्या गल्लीमधल्या आपटे बंगल्यात राहात होतं. आई आणि वडील दोघांनाही कलेची आवड.. स्वभावात रसिकता.. त्यांनी अनुभवलेली बालगंधर्वाची संगीत नाटकं.. मराठी संगीत नाटकांची परंपरा.. त्यांच्याबद्दल होणाऱ्या चर्चा. लहानपणाच्या सांगलीतल्या आठवणीत, मी जात असलेली राममंदिरासमोरची मिशनरी शाळा आणि मी केलेला नाताळातल्या कार्यक्रमातला ‘परफॉर्मन्स’ही आहेच. माझे मामा, आत्या, आजी, आई-बाबा, भावंडं असा छान गोतावळा आणि कलेची आवड जोपासणारा परिसर. आईनंसुद्धा त्या काळात ‘संशयकल्लोळ’मध्ये काम केलं होतं.
अर्थात तो काळ मुलांचे जाणीवपूर्वक पालकत्व, अ‍ॅटिटय़ूड टेस्ट अशा तऱ्हेचा नव्हता. आम्ही मुलंही पालक सांगतील त्या रीतीवरून चालणारी. आताच्या मुलांसारखी चिकित्सक किंवा इन्फॉम्र्ड नव्हतो. पण ‘मला गाणं आवडतं’! एवढं माझ्या छोटय़ा जाणिवेला पक्कं  समजलं होतं.    लता मंगेशकरांचा तो सुवर्णकाळ. सदैव रेडिओवरून गुंजन करणारा तो मधुर आवाज ऐकायची मला फार आवड. ती गाणी गाऊन पाहायची आणि नंतर घरी गाऊन दाखवायची फार हौस. घरच्यांनाही माझी ही आवड माहीत होती. गाणं, ही माझी पहिली आणि आवडती कला. पुढेही मी संगीतविशारद झाले. शास्त्रीय संगीताच्या परीक्षा दिल्या. संस्कृत संगीत नाटकांतून भूमिका केल्या.
 मात्र मराठी रंगभूमीवर संगीत अभिनेत्री म्हणून मी कधी काम केलं नाही. असं का? तर माझ्या बालपणानं घेतलेलं एक भौगोलिक वळण. काहीसे अपेक्षितच. भारतात स्वातंत्र्य आलं आणि संस्थानं हिंदुस्थानात विलीन झाली आणि माझ्या वडिलांचं संस्थानातलं काम संपलं आणि वडिलांनी थेट दिल्लीत, भारताच्या राजधानीत नोकरी स्वीकारली. आणि सांगली, पर्यायानं महाराष्ट्राचा मराठी मुलुख सुटला. त्यानंतर काळाच्या मोठय़ा टप्प्यानंतर मी प्रथम मुंबईला आणि नंतर पुण्यात आले. तो मधला मोठा माझ्या कर्तृत्वाचा बहरकाळ महाराष्ट्राबाहेर मराठी कलाक्षेत्रांच्या वर्तुळाबाहेर गेला. तेव्हा ‘मीडिया’ फारसा प्रभावी नव्हता. म्हणून महाराष्ट्राला माझी ओळख खूप उशिरा म्हणजे मी           सुमित्रा भावेंच्या – ‘दोघी’, ‘उत्तरायण’सारख्या मराठी चित्रपटांतून काम करायला लागले, अभिनयाचे पुरस्कार मिळाले, तेव्हा झाली. ‘उडान’, ‘तमस’, ‘कोरा कागज’ या हिंदी मालिका खूप गाजल्या. ‘जस्सी जैसी कोई नहीं!’ हा मी केलेला डेलीसोपही गाजला. पण तेव्हाही मी मराठी आहे हे प्रॉडक्शन हाऊसेस मध्येच नाही, तर प्रेक्षकांनाही माहीत नव्हतं. मी शूटिंगमध्ये असताना, घरून फोन आला की मी मराठी बोलायची. ‘उत्तराजी, आप मराठी बोल सकती है?’ असा प्रश्न हमखास विचारला जाई. मला त्याचं आश्चर्य नाही वाटायचं कारण हिंदी बोलताना माझा भाषिक लेहेजा थेट उत्तर हिंदुस्थानी आहे, कारण मी वाढलेच दिल्लीत. हिंदी भाषिकांच्या सान्निध्यात. मात्र मराठी बोलताना कुठेही हिंदी-इंग्रजी शब्द मध्ये डोकावत नाही, की उच्चारणातला बदल जाणवत नाही याचे श्रेय माझ्या आईवडिलांना. आम्ही दिल्लीत आलो आणि तिथल्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक मराठी शिक्षण घेतलं. नंतर तिथं मराठी शिक्षणाची सोय नव्हतीच. पुढचं सगळं, अगदी ‘एनएसडी’ (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)पर्यंतचं शिक्षण हिंदी, इंग्रजीत, ‘घरी फक्त मराठीत बोलायचं’ हा नियम पाळता पाळता मराठी पुस्तकांची पु.लं.च्या लेखनाची गोडीही लागली. सुट्टीत पुण्याला पुरोहितांच्या मामाच्या घरी डेक्कन जिमखान्यावर राहायचो. तेव्हा टेकडीवर फिरायचो, झाडा-फुलांत फिरायचो. निसर्गाची आवड लागली. तेव्हाचं निसर्गरम्य पुणं आणि आता मी राहते, ते औंध-बाणेर ही पुण्याची उपनगरं आवडतात मला. पुण्यात माझे ‘एनएसडी’मधले काही विद्यार्थी आहेत. मुंबईला कामाला जाणं सोईचं, पण राहायला तुलनेनं सोपं आहे पुणे. विशिष्ट कारण काहीही नाही, मात्र ‘एफटीआयआय’सारख्या संस्थांकडून सहकार्य मागितलं गेलं. पण काळ, काम, वेगाची चुकामूक होऊन हा योग आला नाही, एवढे खरे. पुण्याच्या ललित कला केंद्रातही अद्याप इच्छा असूनही सहभाग नाही घेतला गेला. पण मुक्काम पुणे, हे माझ्या जीवनवाटेवरचं महत्त्वाचं वळण आहे. आता आणि तेव्हाही.
तेव्हा? म्हणजे केव्हा? तर किशोरवयात पुण्यात आजोळी येत होतो तेव्हा. दिल्लीत मराठी वाचायला मिळायचं नाही. तो काळ जलद दळणवळणाचा नव्हता, इंटरनेटचा नव्हता, संपर्क माध्यमांचा आवाका बेताचाच होता. पुण्यात येऊन मराठी पुस्तके घ्यायची, मुख्य म्हणजे रॅकॉर्ड लायब्ररीत जाऊन मनसोक्त मराठी गाणी ऐकायची. ‘माणिक वर्माची गाणी’ हे तर मर्मस्थान! तसंच गायचं, तशीच गायिका व्हायचं, आतापर्यंत ‘गाणं करणं’ एवढं नक्की ठरलं. घरच्यांनी त्याला उत्तेजन दिलं. गाण्याची समज-उमज-गाता गळा होता. तरी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हे सूत्र महत्त्वाचं होतं. भातखंडे पद्धतीनं संगीत शिक्षण घेता घेता एकीकडे रूढ शिक्षण चाललं होतंच. पण आवड, निवड आणि सवड होती ती गाण्याची.
दिल्लीच्या वास्तव्यानं माझी कलेची जाण समृद्ध केली. कदाचित महाराष्ट्रातल्या छोटय़ा गावी कायम वास्तव्यानं, हे गाण्याचं मोठं वळण माझ्या कलेच्या वाटेत आलंच नसतं. काय सांगावं? दिल्लीत राष्ट्रीय पातळीवर गाजलेले सर्व प्रांतीय कलाकार कला सादर करायचे. कुमार गंधर्व-भीमसेनजी.. स्वर आणि सूर कानांत साठवत किशोरवय गानलुब्ध झाले. अनेक कार्यक्रमात गाण्याला बोलावणं आलं. अनेक स्पर्धा जिंकल्या. आतासारखा टी.व्ही. नव्हता. मीडिया नव्हती. त्यामुळे आजच्या जमान्यातली प्रसिद्धी कोणालाच नव्हती. अर्थात तक्रार काहीच नाही. कला क्षेत्र कायम परिवर्तनशीलच असतं आणि असावं. परंतु या वाटेवर नाटक कुठंच नव्हतं. दिल्लीत ‘दूरदर्शन’ नुकतंच कुठं पाऊल टाकू लागलं होतं. चित्रपटसृष्टी मुंबईत. मग ही, पहिल्यांदा नाटक, नंतर मालिका, पुढे चित्रपट, ही वाट उलगडली कशी?
ही वाट उलगडायला कारण ठरली एक भाषा.. देववाणी.. संस्कृत! नशीब म्हणतात ते एका भाषेच्या अध्ययनातून समोर येऊन ठाकलं. संस्कृत हा विषय आवडीचा. तेव्हा दिल्लीत वेळणकर हे मराठी गृहस्थ. पोस्ट खात्यात उच्चाधिकारी होते. ते संस्कृतज्ञ होते आणि संस्कृत नाटके ‘देववाणी’ या कार्यक्रमांतर्गत नभोवाणी दिल्लीवर सादर करत. त्यात गायन आणि वाणी या दोन्ही माध्यमांच्या जाणकारीनं मी त्या नाटकांतून भाग घेऊ लागले. नाटक श्राव्य रूपात माझ्या वाटेवर आले.
 या वाटेत मुख्य वळण आलं, ते एनएसडी आणि गुरुवर्य अल्काझी.. एनएसडी! नाटय़माध्यमाचे शास्त्रशुद्ध आणि संपूर्ण शिक्षण तेही दिल्लीत, १९६५ साली भारताला अपरिचित अशा तेव्हाच्या एनएसडीमध्ये मी प्रवेश घेतला आणि वाटच बदलली. जीवनाची.. कलेची.. ज्ञानाची.. आता मी एनएसडीच्या निवड समितीवर आहे. देशभराचे विद्यार्थी चाचणीला येतात. प्रशिक्षण घेतात. अनुपम खेर, रोहिणी-जयदेव, सुरेखा सिक्री, नदिरा बब्बर, राज बब्बर, पंकज कपूर, सविता प्रभुणे, ज्योती सुभाष -अमृता.. किती किती नावं एनएसडीतून कला क्षेत्रात आली. पण ते पुढे. पहिल्या बॅचला फक्त आम्ही सात मुली, तीन मुलगे. एनएसडी आणि अल्काझी या दोन विद्यापीठांनी मला घडवलं ते कलाकार आणि व्यक्ती म्हणून. अल्काझींबद्दल खूप सारं सांगायचं आहे. शब्दांत मावता येणार नाही, इतकं  सारं..
 पण त्या आधी माझ्या घरच्यांबद्दल! त्यांनी माझ्यावर लग्न कर.. वेळेवर संसारी हो.. असा कुठलाही दबाव आणला नाही. मला कलेच्या प्रांतात जायला मोकळीक दिली. त्यामुळे माझ्या कलेचं ‘वळण’ कधी ‘आडवळण’ नाही झालं. कलेचा रस्ता खाचखळग्यांनी भरला नाही.
 संस्कृत नभोनाटय़ ते वर्तमानकाळातली माझी करिअर, या मध्ये एनएसडीमधलं अध्ययन आणि नंतर अध्यापन. रेपर्टरी कंपनी म्हणजे, एनएसडीची उपशाखा यांच्यामार्फत केलेली ‘अंधायुग’सारखी अनेक नाटके असा मोठासा पल्ला आहे. पण तो महाराष्ट्राबाहेरचा आहे. एनएसडी म्हणजे नाटकांचे परिपूर्ण शिक्षण. त्यात काय नाही? वेस्टर्न, क्लासिक, इंडियन ड्रामा, अ‍ॅक्टिंगची प्रॅक्टिकल्स, सेट डिझायनिंग, फॉच्र्युन डिझायनिंग, आवाज, संगीत, नाटकांसाठी फिटनेस ट्रेनिंग नाटय़ाशी निगडित कलांची जाण.. ज्ञानाचा सागरच आमच्यापुढे खुला होता. अल्काझींनी आम्हाला स्वतंत्र विचारांची सवय लावली.. जाण दिली.. आणि आम्हाला एक व्यक्ती म्हणूनही घडवलं. नाटकात माईक वापरायचा नाही आणि प्रॉम्प्टिंग तर नाहीच नाही. पात्राच्या भूमिकेचा स्वत:चा विचार. वाणीची शुद्धता. त्यासाठी प्राणायाम.
 आज मी विविध ठिकाणी वाणीशास्त्रावरती कार्यशाळा घेते. एनएसडीतही अध्यापन केलं. त्याची पायाभरणी एनएसडीनंच केली. एनएसडीमधला आमचा दिवस पूर्णवेळ थिअरी आणि प्रॅक्टिकल्स, पुढे प्रयोग यात इतका व्यग्रतेत जायचा की गाण्याचं वळण मात्र आपोआप मागं गेलं. आजकाल कलेचं प्रशिक्षण आवश्यक आहे की नाही, हा चर्चेचा विषय होतो. पण माझं मत प्रशिक्षणाच्या बाजूनंच होतं आणि आहे. प्रशिक्षणानं यांत्रिकता नाही येत.. उलट कलेची परिपूर्ण जाण मिळते.
 अशी जाण सोबत घेऊनच मी रेपर्टरी कंपनी, ही उपशाखा निवडली. आता प्रत्यक्ष प्रयोग. अनेक हिंदी नाटकं केली. जनमानसात नाटय़ अभिरुची निर्माण करायची म्हणून अनेक प्रदेशांतली रंगभूमी गाजवली. आज नावारूपाला आलेले नसिरसारखे कलाकार (आजही नसिरुद्दीन शहा, नादिरा, अनुपम खेर नाटय़प्रयोग करतातच.) रंगमंचावर आले. आम्ही लोककलांचा वापर केला. ती वाट भारलेली होती. मंतरलेली होती. झोकून देणं म्हणजे काय अल्काझींनी शिकवलं आणि आम्ही ते उचललं. अलीकडे २००९ साली एनएसडीनं ‘लाइफ टाइम अचिव्हमेंट’ पुरस्कार दिला. भरून पावले! कला ही कायम प्रवाही असते आणि कलाकारांचे जीवन बदलत असते. काळाप्रमाणे वाटा बदलाव्या लागतात. तशी मीही बदलले पण कलेची वाट नाही सोडली!
त्याचं झालं कसं? आमच्यापैकी बरेच कलाकार ‘गांधी’ चित्रपटात काम करत होते. त्यामुळे एक मोठा, सर्वार्थानेच मोठा कॅनव्हास त्यांना मिळाला. नाटकांपेक्षा किती तरी मोठा! त्याच वेळी दूरदर्शन माध्यम प्रभावशाली होत होतं. त्यामुळे अनेक कलाकार दूरदर्शन-चित्रपट माध्यमाकडे वळले. तशी मीही.. परंतु एकीकडे नाटक चालू होतेच. कदाचित मी महाराष्ट्रात येऊन कमर्शिअल मराठी नाटक करूही शकले असते. हिंदीमध्ये मी पन्नासहून अधिक नाटकं केली. तेव्हा तंत्रज्ञान विकसित नसल्यानं आज ती ‘यूटय़ूब! किंवा डीव्हीडी’वर उपलब्ध नाहीत. दिल्ली नभोनाटय़मधल्या ‘अभिजात शाकुंतलम्’मधली प्रियंवदा इथपासून ‘कोरा कागज’मधली नकारात्मक भूमिका, या दरम्यान मी तीनही कलामाध्यमातून अनेक भूमिका केल्या. अनेक सहकलाकारांचे अभिनय पाहिले. १९८४ साली संगीत नाटक अ‍ॅकॅडमी, अ‍ॅवार्ड मिळाले. ‘एक दिन अचानक’मधल्या साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९९० साली दिल्ली अ‍ॅवार्ड फॉर अ‍ॅक्टिंगचा बहुमान मिळाला.
 परंतु महाराष्ट्रात मी खऱ्या अर्थानं ओळखली जाण्याचं श्रेय सुमित्रा भावेंना. ज्योती सुभाष यांच्यातर्फे माझी-त्यांची ओळख. मला मराठी बोलण्याचं दडपण नव्हतंच. पण ग्रामीण बोलीचं मात्र थोडंसं होतं. पण ‘दोघी’मधल्या भूमिकेनं, त्याला मिळालेल्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारामुळं, मी मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पुढे ‘वास्तुपुरुष’ चित्रपटासाठी अल्फा मराठीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पुढे ‘उत्तरायण’, ‘संहिता’ असे अनेक चित्रपट केले. सुमित्रा भावेंच्या चित्रपटांशी माझी संगती जुळली ती जुळलीच.
मुंबईच्या कमर्शिअल सेटअपमध्ये मी वावरले. ‘तमस’, ‘उडान’पासून, ‘कोरा कागज’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’पर्यंत उत्तम भूमिका मिळाल्या. नकारात्मक भूमिकेचा विचार मी माझ्या ‘एनएसडी’ पद्धतीने केला आणि आशाजींनी तो अवसर दिला. परंतु आता मात्र मी डेलीसोप स्वीकारत नाही. त्या ‘सेटअप’मध्ये माझ्यातला प्रशिक्षित कलाकार काहीसा मागे पडतो. मला नव्या सिस्टीमबद्दल काही म्हणायचे नाही. टीकाही नाही. ‘आमच्या वेळीऽऽ’’ असे सूरही काढायचे नाहीत. प्रत्येक काळाची गरज वेगळी असते. माझ्या समतोल विचारसरणीमुळे आश्वासक वृत्तीमुळे आणि कौटुंबिक पाठिंब्यामुळे आणि माझ्या आताच्या तुलनेत मर्यादित गरजा भागतील अशा आर्थिक स्थैर्यामुळे माझी जगण्याची आणि कलेची वाट कधी ‘बिकट वाट’ झाली नाही. ‘युवर नेचर इज युवर डेस्टिनी!’, नाटककार शेक्सपिअर म्हणालाच आहे!
 सांगली-दिल्ली-मुंबई परत पुणे-महाराष्ट्र पाच दशकांहून अधिक काळ कलेच्या वाटेवरून चाललेय. प्रतिष्ठेने. नेकीने.. आत्मसन्मान जपून.. नाटक, सिनेमा, मालिका आणि गाणे.. चारही क्षेत्रं आपली मानली.. अभ्यासली.. अनेक लोकांत वावरले.. कलेच्या क्षेत्रातल्या आणि बाहेरच्याही शिकत गेले. शिकवत गेले आणि अद्यापही तो वसा चालूच आहे. वाणीशास्त्र या दुर्लक्षित कलांगाचा विकास करायचा मनापासून प्रयत्न चालू आहे. अद्यापही सिनेमा करीत आहे. करणार आहे. मालिकाही करायच्या आहेतच. पण दैनंदिन मालिका नकोत. मराठी व्यावसायिक नाटकं करण्याबद्दल मात्र मी साशंक आहे. पुरस्कारांनी मला सन्मान दिला, तितकाच प्रेक्षकांनी आदर केला.
कलाकारांच्या जगण्याबद्दल समाजाला एक कुतूहल असते. मलाही ते जाणवते. अनेक प्रश्न असतात, जे मुलाखतीत उलगडत नाहीत. माझ्याजवळ कला क्षेत्रातले खूप संचित आहे. त्यात अल्काझीसारखे ‘लीजंड’ आहेत.. सहकलाकार आहेत.. नाटककार, निर्माते नाटय़संस्था, एनएसडी, अनुभव, त्यावर माझी अनुमानं, खूप सारं! हे संचित ‘साठा उत्तराची कहाणी’ अशा स्वरूपात शब्दबद्ध करायचं आहे. पाहू पुढे काय घडेल तसे..
पण मराठी रसिकांशी शब्दांच्या वळणवाटांवरूनच ही भेट घडते आहे. हे समाधान पुरेसं आहे.   
उत्तरा बावकर   
शब्दांकन- डॉ. सुवर्णा दिवेकर
drsuvarnadivekar@gmail.com