19 February 2020

News Flash

विचित्र निर्मिती : एकतानता

अनेकदा काही भावनिक प्रसंगात अभिनेते, कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट आणि दिग्दर्शक यांना मिळून असा एकतानतेचा अनुभव येतो.

(संग्रहित छायाचित्र)

सुमित्रा भावे

चित्रपटकलेला वाङ्मय, संगीत, चित्रकला यांच्यासारखाच अभिजात कलेचा दर्जा द्यायला हवा, कारण ही सामूहिक कला असली तरी वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून जगण्याचा सखोल आणि एकसंध तरी अनेकपदरी अनुभव देण्याची क्षमता या कलेत आहे. देवराईत आम्ही घेतलेला अनुभव या दर्जाचा होता. जणू सगळ्यांचं मन त्या काही काळापुरतं एक झालं होतं आणि सर्वाना मिळून एक प्रसन्न, गूढ अनुभव आला होता. अनेकदा काही भावनिक प्रसंगात अभिनेते, कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट आणि दिग्दर्शक यांना मिळून असा एकतानतेचा अनुभव येतो.

आपले पूर्वज विज्ञानाच्या किंवा ‘बुद्धिवादा’च्या अहंकारानं कोरडे झाले नव्हते. तेव्हा ते साप, उंदीर, कासव, डुक्कर, मगर, माकड, वाघ, हत्ती, घोडा, बदक, झाडं-झुडपं, अगदी शेवाळं, गवत, दगड, माती, पाणी, सूर्य, चंद्र, तारे, ढग, पाऊस सगळ्याच वस्तुमात्राला देव मानत असत. ‘मासा’ नावाची मी एक गमतीशीर संहिता (स्क्रिप्ट) लिहिली होती. चित्रपट करायचा ठरला आणि कोकणात इकडे-तिकडे लोकेशन शोधत आम्ही हिंडायला लागलो.

कोकणात एकाने सांगितलं की, इथे जवळच एक देवराई आहे. ती तुम्ही बघा. सुंदर ठिकाण आहे. म्हणजे म्हटलं तर बघण्याजोगं काय, तर शेकडो वर्षांचे जुने, काही अगदी महाकाय वृक्ष आणि मध्ये देवीचं देऊळ. अगदी साधं- त्याला गाभारा असा नाहीच. बाहेरच्या सभामंडपातच दगडी, जेमतेम कोरलेले देवींचे पुतळे. या जंगलात जाता येतं, फिरून येता येतं; पण तिथलं एकही झाड तोडायचं नसतं. एखाद्यानं मोहाने ते तोडलं तर, गावकऱ्यांचा विश्वास होता, की त्याच्यावर काही तरी अरिष्ट कोसळतं. म्हणजे आपल्या शहाण्या, सहृदय पूर्वजांनी हिरवाई जपण्यासाठी तयार केलेला हा नियम. श्रद्धेपोटी म्हणा, भीतीपोटी म्हणा, अजूनही लोक तो पाळतात. अशी ही असलदे गावाची रम्य, गर्द देवराई, माझ्या मनात घट्ट कोरली गेली.

‘मासा’ चित्रपट बारगळला (पुढे काही वर्षांनी ‘घो मला असला हवा’ या नावाने ती कथा सांगितली.), पण ‘देवराई’ मी विसरले नाही. मला वाटत राहिलं, या देवराईत काही गूढ अनुभव आहे. इथली झाडं एकेकटी, सुटीसुटी उभी नाहीत. सगळी झाडं, त्यांची मुळं असतील, फांद्या असतील, वेलींचे नाजूक देठ असतील, फळं-फुलं, जमिनीवर शुष्क होऊन पडलेला पालापाचोळा असेल, सगळी एकमेकांत गुंतलेली आहेत. या वृक्ष-वेली एकमेकाला जपत-जपत स्वत: वाढत आहेत.

दरम्यान, ‘स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन’ची विनंती आली की, स्किझोफ्रेनिया या विषयावर चित्रपट करायला आवडेल का? तर टाटा इन्स्टिटय़ूटमध्ये मी थोडासा ‘अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजी’चा अभ्यास केला होता. मन, मनाचे व्यापार, त्यातली गुंतागुंत, त्यातल्या दृश्य आणि श्राव्य प्रतिमा याबद्दल मला कुतूहल होतंच. स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार मेंदूत काही रासायनिक बदल घडल्याने होतो. या रासायनिक बदलामुळे मनात तयार होणाऱ्या दृक्श्राव्य परिणामांची सरमिसळ होऊन जाते. मग भोवतालच्या वास्तवाचा अनुभवच बदलून जातो. तो एकसंध न राहता, तडा गेलेला, फाटलेला आणि वेगवेगळ्या प्रतिमांच्या सरमिसळीतून वेगळंच जग तयार करणारा होतो.

स्किझोफ्रेनियाचा विचार करताना मला ही असलदेची देवराई आठवली. देवराईचं प्रतीक, मानवी नात्यांची सकारात्मक परस्परावलंबिता समजण्यासाठीही दिसायला लागलं आणि आजारी मनाचा अवास्तवात जिवंत अनुभव म्हणूनही दिसायला लागलं. मग मला पर्यावरणावर प्रेम करणारा ‘देवराई’चा, तिथल्या वृक्षवेलींचा वनस्पतीशास्त्राच्या बाजूने अभ्यास करणारा उच्चशिक्षित विद्यार्थी सुचला. एकाच वेळी त्याला या वृक्षवेलींच्या परस्पर नात्याचे कौतुक वाटत होतं आणि त्यातून माणसांनी शिकण्याजोगं खूप आहे, असं वाटत होतं. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या मेंदूत रासायनिक बदल होऊन, तो स्किझोफ्रेनिया या आजाराला बळी पडला. त्यामुळे देवराईतली झाडे, तिथली आदिम वृक्षवेलींना जपणारी, त्यांचं संगोपन करणारी देवी, ही खरी, त्याला भेटणारी जिवंत स्त्री वाटू लागली. सगळंच खूप गुंतागुंतीचं आणि अस्वस्थ करणारं.

माझी संहिता लिहून पूर्ण झाली होती. आता चित्रीकरण सुरू करायचं, तर हे निसर्गाचं प्रतीक साकार करण्यासाठी देवराया शोधायला निघालो. पुण्याच्या आसपासच्या देवराया बघून आलो. पण असलदेची, कोकणातली देवराई मनात कोरली गेली होती. तेव्हा आमचा कॅमेरामन, देबू देवधर होता. तो, आमचा संगीत दिग्दर्शक श्रीरंग उमराणी, आम्ही दोघे दिग्दर्शक मी आणि सुनील सुकथनकर, मला वाटतं, आमच्याबरोबर आमचा ए.डी. (असिस्टंट डायरेक्टर) मोहीत टाकळकरही होता. ठरलं होतं असं, की देवराईत जाऊ. संहिता बरोबर असेलच. तिथे बसून ते मोठय़ाने वाचू. सगळ्यांनाच त्या वातावरणात वेगवेगळ्या, वैशिष्टय़पूर्ण प्रतिमा सूचत जातील. संहिता अधिक उलगडत जाईल. तिथे पोचलो. दुपारची वेळ होती. त्या मंदिरात गेलो. झाडं सगळी शांत, जणू आमच्याकडे कुतूहलाने बघणारी. सगळेच गप्प झालो. नुसतेच त्या मंदिरात एकेका खांबाशी भोवतालच्या गर्द, गूढ हिरवाईकडे बघत बसलो. हळूहळू एकेक जण निवांत होत होत, तिथेच देवळात दगडी जमिनीवर आडवा झाला. इतकी असीम शांतता आणि सुखद हवा, की कळलंच नाही, सगळ्यांनाच केव्हा अगदी गाढ, शांत झोप लागली. बऱ्याच वेळाने समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलली. झाडं हलकेच डोलायला, सळसळायला लागली. पानापानांमधून संगीताच्या सुरावटींसारखे सूक्ष्म झंकार यायला लागले आणि आम्ही हलके-हलके जागे झालो. कुणीच स्क्रिप्ट वाचनाचा किंवा इथे कोणते सीन्स करावेत, कॅमेरा अँगल्स काय असावेत, असल्या कुठल्याच विचाराच्या स्थितीत नव्हतो. सगळे नुसतेच शांत, निवांत आणि प्रसन्न झालेले. थोडय़ा वेळाने म्हटलं, ‘‘चला, निघू या.’’ न बोलता तिथून निघून आलो.

पुढे हा अनुभव ‘देवराई’मध्ये छोटय़ा स्वरूपात आलेला आहे. शेष (अतुल कुलकर्णी) त्याची मामेबहीण कल्याणी (देविका दफ्तरदार), जिच्यावर त्याचे निस्सीम प्रेम आहे आणि आपल्या भावविश्वात तिला सामावून घेण्याची ओढ त्याला लागली आहे. शेष कल्याणीला सांगतो, ‘‘या इथल्या वृक्षवेलींसारखे आपण सगळेच एकमेकांशी, एकमेकांच्या ओढीने बांधले गेलेलो असतो.’’ आणि बोलता बोलता अचानक तो थांबतो. समुद्रावरून आलेल्या वाऱ्यांवर डोलत या देवराईतल्या वृक्षवेलींनी संगीत सुरू केलेलं असतं. तो कल्याणीला सांगतो, ‘‘नि:शब्द होऊन फक्त हे संगीत ऐक.’’

मी जेव्हा म्हणते, चित्रपटकलेला वाङ्मय, संगीत, चित्रकला यांच्यासारखाच अभिजात कलेचा दर्जा द्यायला हवा, कारण ही सामूहिक कला असली तरी वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून जगण्याचा सखोल आणि एकसंध तरी अनेकपदरी अनुभव देण्याची क्षमता या कलेत आहे. देवराईत आम्ही घेतलेला अनुभव हा, या दर्जाचा होता. जणू सगळ्यांचं मन त्या काही काळापुरतं एक झालं होतं आणि सर्वाना मिळून एक प्रसन्न, गूढ अनुभव आला होता. अनेकदा काही भावनिक प्रसंगात अभिनेते, कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट आणि दिग्दर्शक यांना मिळून असा एकतानतेचा अनुभव येतो.

‘दोघी’मधला दोघी बहिणींच्या भेटीचा अनुभव किंवा शेवटी दु:खाने होरपळलेल्या आई आणि थोरली बहीण यांच्या भेटीचा प्रसंग, हे या जातीतले प्रसंग होते. पहिल्या प्रसंगात नि:शब्दतेतून सोनाली कुलकर्णी आणि रेणुका दफ्तरदार या अगदी तरलतेनं एकमेकींशी (आणि प्रेक्षकांशी) जे बोलल्या आहेत, त्यातली एकतानता या जातीची होती. तसा शेवटचा, आई आणि थोरल्या बहिणीच्या भेटीचा प्रसंग! अन्याय, लोभ, अगतिकता, शरीराच्या आणि मनाच्या अनेक जखमा घेऊन, हे दु:ख एकमेकींच्या स्पर्शात या दोघी मोकळे करणार म्हणून सेटवर संपूर्ण युनिटनं अलगद विशेष तयारी केली होती. सेटवर अंधार केला होता. आई (उत्तरा बावकर) आणि थोरली (रेणुका दफ्तरदार) या दोघी कोपऱ्यात डोळे मिटून शांत बसलेल्या. सेटवर आपोआपच सगळ्यांनीच शांतता पाळली होती. हळूहळू त्या आई-मुलीच्या दु:खाच्या स्फोटाचे ‘पवित्र’ शांततेत रूपांतर झाले. सेटवरचे आम्ही सगळेच ‘कट’ झाल्यावरही बराच वेळ काही बोलूच शकलो नाही.

हाच एकतानतेचा अनुभव ‘दिठी’मध्ये किशोर कदम गाईचे बाळंतपण करताना, गाईशी जे बोलतो ते ऐकताना आला. गाईचे बाळंतपण सुखरूप झाल्यावर, पोथी सुरू केल्यावर, त्याला  गेलेल्या मुलाची आठवण येते. सुख-दु:खाच्या सरमिसळतेची अगतिकता जाणून त्याला हंबरडा फोडून रडू येतं, तेव्हा तो एकतानतेचा अनुभव आम्हा सगळ्यांनाच आला. सेटवर सगळेच शांत आणि गप्प झाले. किशोरच्या डोळ्यातल्या धारा थांबेनात. मी त्याच्या शेजारी जाऊन थांबले. त्याच्या पाठीवर हात ठेवला. शब्द सुचलेच नाहीत. त्यांची आवश्यकताही नव्हती.

हे लिहिताना आणखी दोन प्रसंग माझ्या मनात चमकून गेले. एक प्रसंग होता ‘हा भारत माझा’ मधला. सगळं कुटुंबच, ‘आपल्या मुलाला चांगला अभ्यास करून, खूप मार्क मिळवूनही जर हव्या त्या कोर्सला प्रवेश मिळत नसेल तर काय उपयोग या कष्टांचा?’ असं वाटून अस्वस्थ झालेलं. स्वत:साठी नाही पण दुसऱ्यासाठी अयोग्य वाटेल असा निर्णय घ्यावा की काय या विचारानं सगळेच कानकोंडे झालेले. ‘योग्य काय आणि अयोग्य काय? चूक काय आणि बरोबर काय?’ या संभ्रमात माणूस अडकला, की त्याची शांती गेलीच. ती शांती मिळवण्यासाठी अनेकदा माणूस अयोग्य उत्तराचं समर्थन करायला लागतो. मग संभ्रम आणखीनच वाढतो. पण एकदा का तो स्वत:च्या अंतर्यामीत जपलेल्या अक्षत शुभ्रतेशी संवाद करायला लागला की त्यातून योग्य उत्तर जन्म घेतं आणि संभ्रमित मनुष्याला शांतीचा अनुभव येतो.

‘हा भारत माझा’ मधली आई, माणसाचं कर्तव्य काय आणि आईचं कर्तव्य काय, यात भेद करून स्वत:च्या अयोग्य निर्णयाचं समर्थन करू बघते पण तिच्या अंतर्यामीची ऊर्जा तिला ते करू देत नाही. योग्य अयोग्याचा ताण न सोसून आई आजारी पडते तेव्हा आण्णा (विक्रम गोखले) आईशी (उत्तरा बावकर) जे बोलतात त्या प्रसंगात तिथे हजर असलेल्या सर्वानाच हा ‘एकतानतेचा’ अनुभव दिला. रात्रीची वेळ आहे. सगळे झोपलेले आहेत आणि अण्णा आईला सांगतात, की तुझ्या लक्षात येतंय का? चुकीच्या अपेक्षांमुळे तूच कृत्रिम दु:ख स्वत:वर ओढवून घेतलंयस. मग ते आईला आपल्या आजोबांची गोष्ट सांगतात. आजोबांच्या अंगणासमोर एक मोठा पिंपळ होता. त्या पिंपळाच्या पारावर सर्व गावकरी एकमेकांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी करायला जमत असत. दुसऱ्याचं दु:ख ते आपलंच असं सगळे मानायचे. अचानक एक दिवस तो पिंपळ सुकायला लागतो. सगळा गाव चिंतेत पडतो. आजोबा म्हणतात, ‘‘माझ्या हातून काही चूक झाली का ते शोधायला हवं. मग सगळेच गावकरी आपली काही चूक झाली का हे शोधायला लागतात. आणि काय आश्चर्य? पिंपळाला पुन्हा लालसर नाजूक पालवी फुटायला लागते. विक्रम गोखल्यांनी भरून आलेल्या गळ्याने अगदी सौम्य आवाजात ही कथा सांगितली आणि आईच्या डोळ्यात समजूत चमकली. मुलं आण्णांचा असा ओला गहिरा आवाज ऐकून हलकेच तिथे आले आहेत. ज्या मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी हा आटापिटा चालला आहे त्याचेही डोळे डोळ्यातल्या पाण्यानं लख्ख होतायत असा हा प्रसंग. आम्ही सगळेच युनिटचे लोक शांत झालो. या चित्रपटासाठी सर्वानीच एक ‘पै’ही न घेता विशेष कष्ट केले होते. त्याचे सार्थक सापडले असं सर्वानाच वाटलं.

दुसरा अनुभव ‘संहिता’ चित्रपटाच्या शेवटचा आहे. ज्योती सुभाष (ही या चित्रपटात एक पारशी गायिका आहे.) आणि डॉ. शरद भुताडिया (या गायिकेचा पती आणि एकेकाळचे गाजलेले निर्माते) या दोघांमधला हा प्रसंग. पतीला बरं वाटावं म्हणून ती स्वत: निर्माती बनून चित्रपट करण्याचा घाट घालते. चित्रपटाची संहिता नुकतीच पुरी झाली आहे. आता चित्रीकरण सुरू होईल पण त्याच वेळी तिचा पती या जगाचा निरोप घेतो. नवऱ्याचा निष्प्राण हात हातात घेऊन ज्योती म्हणते, ‘‘दिस इज नॉट फेअर’’ मग थांबून म्हणते, ‘‘गॉड इज अ बॅड स्क्रिप्ट रायटर.’’ पुन्हा थांबून म्हणते, ‘‘पण आता मला चित्रपट बनवण्यातला आनंद कळतोय. कथेतली पात्र आणि त्यांना जिवंत करणारे भोवतालचे सगळे कलावंत ज्या तऱ्हेने त्या कथेतल्या माणसांच्या सुख-दु:खाशी समरस होतात त्यातूनच जगणं समजतं. आणि हा अनुभव मी घ्यावा म्हणून तुम्ही मला जे प्रोत्साहन दिलं याबद्दल आभार.’’ आम्ही सगळे, चित्रपट बनवणारे दिग्दर्शक, कॅमेरामन, लाइट बॉइज, साऊंड रेकॉर्डिस्ट, बूम मॅन, रंगभूषाकार, कपडेवाले सगळ्यांनाच ज्योतीच्या अभिव्यक्तीतून तिचा आवाज, तिचे डोळे, तिचा नवऱ्याच्या हातावर ठेवलेला हात, यातून ‘फिल्म मेकिंग’ पुन्हा कळलं

अशा एकतानतेच्या दृश्यांचे एकाच वेळी अनेक ‘टेक्स’ घेता येत नाहीत. ही अनुभवाची आणि भावनेची तीव्रता एकाच ‘टेक’मध्ये टिपावी लागते.

sumitrabhavefilms@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on October 5, 2019 12:15 am

Web Title: film collective art vichitra nirmiti article sumitra bhave abn 97
Next Stories
1 ‘मी’ची गोष्ट : खडुतून दुग्ध स्रवताना..
2 सृजनाच्या नव्या वाटा : मुलींसाठीची पहिली शेतीशाळा ‘दि गुड हार्वेस्ट स्कूल’
3 आव्हान पालकत्वाचे : एक ‘गलेलठ्ठ’ समस्या
Just Now!
X