14 August 2020

News Flash

विचित्र निर्मिती : दस्तावेज

एखादा विषय किंवा कथानक माझ्या मनात आलं, की त्या विषयाचा, त्या कथानकाचा शक्य तेवढा अभ्यास केल्याशिवाय मला चैन पडत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

सुमित्रा भावे

दस्तावेज म्हणजे नुसती कागदपत्रं नाहीत तर जीवनाला व्यापणारी सर्व संस्कृती हा दस्तावेजच! त्याचं तपशीलवार चित्र म्हणजे चित्रपटाचं समाजशास्त्र. त्यातून आपल्याला आपला समाज- नातेसंबंध-संस्कृती आणि आपण स्वत: अधिक उमजतो. ते समाजशास्त्र सांगणारे चित्रपटातले तपशील म्हणूनच अचूक असावेत यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतो. ‘दोघी’मधली काटवट असो की फणेरपेटी, ‘वास्तुपुरुष’साठी जुनं तांब्याचं मोदकपात्र, ‘दिठी’साठी  हवे असलेले ‘सांगली घाटा’चे तांबे मिळाल्यानंतर धनलाभ झाल्यासारखा आनंद होतो तो यासाठी.

एखादा विषय किंवा कथानक माझ्या मनात आलं, की त्या विषयाचा, त्या कथानकाचा शक्य तेवढा अभ्यास केल्याशिवाय मला चैन पडत नाही. मला सुचलेल्या माणसांचा स्वभाव कसा आहे? त्यांची आपसात नाती कशी आहेत? आणि मुख्य म्हणजे त्यांच्या त्या तशा असण्याचे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दृश्य व श्राव्य पुरावे-खुणा कोणत्या आहेत, यांचा अभ्यास.

त्यात ते बोलत असलेली भाषा येते, त्यांची देहबोली येते, जीवनशैली येते आणि त्यांच्या सभोवतीचं वास्तू, वस्तू, कपडेलत्ते, देवदेवता, खाणेपिणे या सगळ्यांचं विश्व येतं. या सगळ्या अवकाशाचा अभ्यास करायचा प्रयत्न करायचा. मूर्ती करण्यासाठी मूर्तीहून मोठा मातीचा गोळा किंवा दगड हातात घेतल्यासारखा. मग शिल्पकारासारखं त्या मूर्तीच्या भोवतालचं कवच काढून टाकत टाकत नेमकी मूर्ती करायचा प्रयत्न करायचा. नेमक्या वस्तू ठेवायच्या, नेमकी भाषा-बोली जमवायची, नेमके कपडे निवडायचे, नेमके खाण्या-पिण्याचे ताजे पदार्थ बनवायचे आणि या सगळ्यातून तपशिलात चित्र उभं करायचं. तपशील तर हवेत पण त्यांची अनावश्यक रेलचेलही नको. (नाही तर सध्या नको त्या फ्लेक्सनं आपलं शहर रया गेलेलं दिसतं, तसा चित्रपट दिसायचा.) ‘दस्तावेज’ म्हणजे ती जुनी कागदपत्रं नाहीत तर जीवनाला व्यापणारी सर्व संस्कृती हा दस्तावेजच!

हे तपशीलवार चित्र म्हणजे चित्रपटाचं समाजशास्त्र. त्यातून आपल्याला आपला समाज- नातेसंबंध-संस्कृती आणि आपण स्वत: अधिक उमजतो. म्हणून हे चित्रपटातले तपशील हा आपला मोलाचा दस्तावेज आहे. या तपशीलांकडे अभ्यासपूर्ण रितीने लक्ष न देणं, म्हणजे आपण आपला इतिहास नकळत खोटा तयार करणं आहे. त्यामुळे चित्रपटीय स्वातंत्र्य (सिनेमॅटिक लिबर्टी) अभ्यासानंतर डोळसपणे घ्यावं. नाही तर ती समाजाच्या जीवनशैलीशी आणि मूल्यव्यवस्थेशी प्रतारणा होईल. मग चित्रपट ही कला निर्मिकाला आणि प्रेक्षकाला समृद्ध करण्याऐवजी (निर्मिकाच्या कृपणतेनं) कंगाल करेल. कारण आपल्या पूर्वजांनी केलेल्या संस्कृतीला, आपण फार सोप्यात विसरून जाऊ.

आमच्या ‘कासव’ चित्रपटात दत्ताभाऊ हे कासवांचं संरक्षण, संवर्धन करणारे कार्यकत्रे आणि विचारवंत आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी जानकी कोकणातल्या समुद्राकाठाच्या गावी आली आहे. ती त्यांना एकदा सहज जेवायला बोलावते. दत्ताभाऊ (डॉ. मोहन आगाशे) हे किती साक्षेपी आहेत, हे माहीत असल्यामुळे जानकी (इरावती हर्षे) त्यांच्यासाठी नेमके आणि खास शाकाहारी पदार्थ बनवते. टेबलावर कलात्मक पध्दतीने नीट मांडते. दत्ताभाऊंना टेबल पाहून समाधान होतं. ते तिला म्हणतात, ‘‘जानकी, तू इतक्या निगुतीनं हे सगळं केलेलं आहेस की मला एक वाक्प्रचार आठवतोय. असं म्हणतात की, ईश्वर तपशीलात म्हणजे छोटय़ाछोटय़ा गोष्टीत वस्ती करून असतो. (गॉड लिव्हज् इन स्मॉल थिंग्ज),’’ मी लिहिलं होतं, की,‘‘जानकी, तू हे टेबल इतक्या नेटकेपणाने मांडलं आहेस की..’’ आगाशेंनी ‘नेटकेपणाने’ हा शब्द बदलून तिथे ‘निगुतीने’ हा शब्द घातला. ‘नेटकेपणा’पेक्षाही नेमका आणि खास मराठी शब्द. ‘निगुतीनं’ हा शब्द आणि टेबलावरची फणसाची भाजी, सुरणाचे काप असे पदार्थ, २०१७ मधली भाषा आणि जीवनशैली यांची नोंद करून ठेवणार. आता या नोंदीला आधारभूत अशा इतरही गोष्टी सभोताली विचारपूर्वक रचलेल्या आहेत किंवा निवडलेल्या आहेत. अगदी त्या घराच्या आर्किटेक्चरपासून ते इरावतीच्या पोशाखापर्यंत, टेबलावर मांडलेल्या भांडय़ापासून ते संपूर्ण रंगसंगतीपर्यंत.

चित्रपटामध्ये दिग्दर्शकाला, माणूस आणि समाज यांच्या सुख-दु:खाचं दर्शन घडवायचं असतं. ते दर्शन समग्र, सखोल (त्या-त्या गोष्टीनुरूप) असण्यासाठी माणूस जसा जगतो, तसा तो उमटल्याने घटनेचा जो परिणाम साधायचा आहे, तो नेमकेपणाने साधला जाणार. अनेकदा हा परिणाम सुप्त असतो – संगीतासारखा. म्हणून तर हा परिसर तयार करणाऱ्या माणसाला ‘कलादिग्दर्शक’ म्हटलं जातं.

‘दोघी’ चित्रपटात, मराठा शेतकरी कुटुंबाला भाकरी थापायला, तांब्याची किंवा पितळी कल्हई केलेली परात असण्यापेक्षा काटवट (एक प्रकारची लाकडी परात) असणं आवश्यक होतं. मग आम्ही आसपासच्या खेडय़ातले आठवडय़ाचे बाजार पालथे घातले आणि काटवट मिळवली. ‘वास्तुपुरुष’च्या वेळी देशपांडय़ांच्या वतनदारी कुटुंबाच्या स्वयंपाकघरात तांब्याचं मोदकपात्र आवश्यक होतं. त्यातही, चांगल्या घाटाचं मोदकपात्र मिळणं आवश्यकच. तसं ते मिळेना. कुणी तरी सांगितलं, नाशिकला मोडीचा आणि जुन्या भांडय़ाचा मोठा बाजार आहे. मी उठून नाशिकला गेले. बाजार पाहून अगदी हरखून गेले. जुनं तांब्याचं मोदकपात्र, ताकाला गंज, भाताला टोप, अशी भांडी घेऊन आले. विशिष्ट कामाला विशिष्ट नावं. किती समृद्ध भाषा आपली.. तांब्या वेगळा आणि तपेली वेगळी. ओघराळं वेगळं आणि पळी वेगळी. उलथणं वेगळं आणि झारा वेगळा. ‘दिठी’मध्ये मला गोल घाटाचे तांबे हवे होते. सध्या बहुतेक ठिकाणी चंबूसारखे दिसणारे तांबे असतात. तांब्याचा मूळ घाट तसा नाही. एका मोडीच्या जाणकार दुकानदाराने सांगितलं, की तुम्ही ‘सांगली घाटा’चा तांब्या मागा म्हणजे तुम्हाला हवा तसा गोल तांब्या मिळेल. ‘दोघी’मध्ये दोन्ही बहिणींना वेणीफणी करण्यासाठी भिंतीला लावलेला आरसा चालला नसता. म्हणजे तो घरात आहेच. पण ‘वेणीफणी’ करायला ‘फणेरपेटी’च हवी. त्या पेटीत कंगवा, फणी, तेलाची छोटी बुधली, कुंकवाचा छोटा करंडा किंवा गंधाची बाटली आणि देवापुढच्या समईवर वाटी धरून, घरी केलेल्या काजळाची डबी- इतकं सगळं हवं. अशी फणेरपेटी सजली.

‘संहिता’ चित्रपटामध्ये त्या काळी (१९४०च्या आसपास) संस्थानिक राजेरजवाडे, काही बाबतीत ब्रिटिश जीवनशैलीची नक्कल करत. त्यामुळे राजांना जेवायला टेबलखुर्ची आहे; पण टेबलावरचं चांदीचं ताट भारतीय ‘कोस्रेस’नुसार लावलेलं आहे. ताटात उजवी बाजू, डावी बाजू, कोणता पदार्थ कुठे वाढायचा, याची एक पारंपरिक शिस्त असे, त्यानुसार ताट वाढले आहे. पानात गरम वरण-भात वाढून त्याच्यावर, राणीसाहेब, चांदीच्या तामल्यातून तूप वाढणार. मी, कुठला पदार्थ कसा दिसायला पाहिजे, तो कुठे वाढायचा, त्याचा रंग, सगळेच तपशील सहकाऱ्यांना सांगितले होते. माझ्या सहकाऱ्यांनी नगाला नग म्हणून वरणाच्या ऐवजी ‘दालफ्राय’ आणला होता, अर्थातच मी चित्रीकरण थांबवलं. नव्यानं तुरीच्या डाळीचं व्यवस्थित हळद घालून वरण शिजवण्यात आलं. आणि मग तो शॉट घेतला. असंचं घडलं

‘घो मला असला हवा’मध्ये. तिथे नायिका (राधिका आपटे) आपल्या मित्राला (ओंकार गोवर्धन)खास माशांचं कालवण आणि भात करून खायला घालते, असा प्रसंग होता. सहकारी, कोळंबीची पातळ आमटी घेऊन आला. झालं, मी चित्रीकरण थांबवलं. कालवण सुरमईचंच पाहिजे होतं. मग सुरमई आणून कालवण, अगदी नारळाचं वाटणघाटण घालून, तयार केलं आणि मग तो प्रसंग चित्रित झाला.

आता एखाद्याला वाटेल इतका काय तो फस्स्? पानात काय आहे, याकडे किती प्रेक्षक बघणार? तर माझ्या चित्रपटाची पहिली प्रेक्षक मीच असते ना? मी सगळ्या तपशिलासह स्वत:चा आणि दुसऱ्या कुठल्याही दिग्दर्शकाचा आदर करून त्याचाही चित्रपट तसाच बघते. इथे प्रश्न येतो तो स्वत:शी प्रामाणिक असण्याचा. म्हणून मग ‘हा भारत माझा’मध्ये स्वयंपाकाची कामं करून उदरनिर्वाह करणारी ताई (रेणुका दफ्तरदार) दूध तापायला ठेवल्यावर, अस्सल मध्यमवर्गीय बाईप्रमाणे दुधाची पिशवी भिंतीला चिकटवते. ‘अस्तु’ मधील इरा (इरावती), धाकटी बहीण (देविका दफ्तरदार) मुंबईहून आल्यावर ‘‘चटकन उकड करून देऊ का?’’ असं विचारते. ‘संहिता’ मधली सुशिक्षित, इंग्रजी रोमँटिक वाङ्मयाचं प्रेम असणारी राणी (देविका दफ्तरदार) शेक्सपियरची ‘सॉनेट्स’ वाचत असते आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या ब्रिटनमध्ये चाललेल्या स्त्रीवादी चळवळीने आणि जेन ऑस्टिनने भारलेली असते. ‘नितळ’मधले, महाराष्ट्रात विचारवंत म्हणून गाजणारे आजोबा (विजय तेंडुलकर) यांना, त्यांच्याकडे आलेली पाहुणी डॉ. नीरजा कौशिक (देविका दफ्तरदार) गॅब्रियल गार्सयिा माक्र्युजचं ‘लिविंग टु टेल द टेल’ हे आत्मचरित्र भेट देते. ‘बाधा’मध्ये सनिकाच्या घरातल्या पेटीवर ‘फ्रॉम बारामुल्ला टु न्यू दिल्ली’ असं लिहिलेलं आहे. कुणीही सहज ओळखू शकेल, की ही सरहद्दीवरून येणाऱ्या सनिकाची ट्रंक आहे.

एक ना दोन! प्रत्येक चित्रपटाचे असे असंख्य तपशील.. माझ्या तपशीलवार केलेल्या याद्या ही काही वेळा सहकाऱ्यांची डोकेदुखीच असते. ‘वास्तुपुरुष’मध्ये जुनी, लाकडी पेटी हवी होती आणि त्यात जुनी मोडी लिपीतली कागदपत्रं. भरपूर वणवण करून ती मिळवली. अचानक अंगणात पुरलेला, खूप जुना सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडल्यावर त्या घरच्या मालक-मालकीणबाईंना जो आनंद होईल, तेवढा आनंद मला अशी एखादी, नेमकी मनात धरलेली वस्तू मिळाली की होतो. देशावरली विळी वेगळी आणि कोकणातली विळी वेगळी. देशावर रुंद लोखंडी पातं, बसायला रुंद लाकडी पाट. तर कोकणात बारीक पातं आणि अरुंद पाट – मासे चिरण्याच्या सोयीसाठी.

आम्ही, ज्ञानपीठ मिळालेले कानडी लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांची ‘सूर्यन कुद्रे’ (सूर्याचा घोडा), ही कथा करणार होतो. त्यातला नायक खेडय़ात राहणारा, लोकांना तेलाचं मालीश करून अभ्यंगस्नान घालण्यात कुशल म्हणून प्रसिद्ध असतो. तो आपल्या शहरी संस्कृतीत राहून राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या मित्राला (डॉ. शेखर कुलकर्णी) अभ्यंगस्नान घालून वेगळाच पारलौकिक आनंद देतो, असं कथानकात दाखवलं आहे. असं अभ्यंगस्नान घालण्यासाठी न्हाणीघर आकाराने मोठं, मोठं चुल्हाण असलेलं, चुल्हाण्यासाठीच्या लाकूडफाटय़ासाठी पुरेशी जागा असलेलं, न्हाणीच्या दगडाबरोबरच विसाणाच्या पाण्यासाठी दगडी हौद असलेलं, असं हवं होतं. आम्ही कर्नाटकात तसे परकेच. ज्या भौगोलिक भागातली जीवनसंस्कृती डोळ्यासमोर ठेवून अनंतमूर्तीनी कथा लिहिली, तो भाग आम्ही पालथा घातला पण असं जुनं न्हाणीघर मिळेना. मात्र ते मिळेस्तोवर शांत बसायचं नाही, असा माझा निश्चय. बाकी कथानकाचं चित्रीकरण तीर्थहळ्ळीत करणार होतो. कारण ते गाव गृहीत धरूनच अनंतमूर्तीनी कथा लिहिली आहे. अनेकांशी बोलून मोऱ्या शोधत हिंडलो. लोकांकडे जाऊन म्हणायचं की, ‘‘जरा तुमची मोरी किंवा न्हाणीघर दाखवता का?’’ हे त्या घरमालकांना आणि आम्हालाही संकोचाचं होतं. पण केलं. कुणीतरी असंच सांगितलं म्हणून अगुंबे घाटात गेलो. (हा घाट ‘ब्लॅक कोब्रा’साठी प्रसिद्ध आहे) पावसाळी वातावरण. ओला गारठा. तरी गेलो आणि जाण्याचं सार्थक झालं. अगदी जुन्या पद्धतीचं न्हाणीघर मिळालं. तिथे डॉ. शेखर कुलकर्णीना अंघोळ घालून उरलेल्या चित्रीकरणासाठी तीर्थहळ्ळीला परत आलो.

तर जिवाचा इतका आटापिटा का करायचा? चित्रपट तर ‘केवळ करमणुकीसाठी’ असतो. शिवाय ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ (चित्रपटीय स्वातंत्र्य) हे शब्द अलीकडे आपल्या चांगलेच ओळखीचे झाले आहेत. मग का सगळी तकतक? माझ्यापुरतं मी या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे. ‘वास्तुपुरुष’मध्ये सोपाना कांबळेच्या तोंडी जे वाक्य आहे की, ‘‘भास्कर, तुझ्या घरी आल्यावर वेगळ्या कपातून चहा मिळाला की इंगळ्या डसल्यासारख्या होतात.’’ तो वेगळा फुटका कप आर्ट डिपार्टमेंट आणून ठेवतं आणि अन्याय्य विषमतेवर भाष्य तयार होतं. हे ते चित्रपटाचं समाजशास्त्र.

या समाजशास्त्राचा अभ्यास हा माझा छंद आहे आणि वास्तवाचा शोध आणि त्याची दृश्य मांडणी हा माझा ध्यास आहे. त्याला मी मोलाचा दस्तावेज मानते.

sumitrabhavefilms@gmail

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 4:10 am

Web Title: film documentation vichitra nirmiti article sumitra bhave abn 97
Next Stories
1 ‘मी’ची गोष्ट : मला काहीच व्हायचं नाहीये..
2 सृजनाच्या नव्या वाटा : निसर्गातली शाळा : मरुदम फार्म स्कूल
3 आव्हान पालकत्वाचे : लैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज
Just Now!
X