07 March 2021

News Flash

आर्थिक सहजीवन

व्यावहारिक दृष्टिकोन बाळगून वेळीच काही गोष्टी आवर्जून केल्या तर तुमचे आर्थिक सहजीवन सुखकारक होईल. त्या गोष्टींविषयी..

दु:खात आर्थिक बाबींविषयी काहीच माहिती नसल्यामुळे ओढवलेला प्रसंग बाकाच.

वंदना धर्माधिकारी – vandana10d@yahoo.co.in

कितीही वर्षे संसार झालेला असो, आपले आपल्या जोडीदारावर कितीही प्रेम असो, विश्वास असो, जोडीदाराच्या आणि कुटुंबाच्या अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती आपल्याला असते का? किती जणांना त्यांच्या जोडीदारांकडून ही माहिती सांगितली जाते? किंवा किती जणांनी ती व्यवस्थितपणे लिहून ठेवलेली असते?  या प्रश्नांची उत्तरे फारशी सकारात्मक नाहीतच. अशा वेळी एखादी दु:खद घटना घडली तर? जीवघेणा अपघात, गंभीर आजार किंवा  निधन?  कल्पनाही करवत नाही ना? अशा वेळच्या दु:खात आर्थिक बाबींविषयी काहीच माहिती नसल्यामुळे ओढवलेला प्रसंग बाकाच. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून व्यावहारिक दृष्टिकोन बाळगून वेळीच काही गोष्टी आवर्जून केल्या तर तुमचे आर्थिक सहजीवन सुखकारक होईल. त्या गोष्टींविषयी..

काल  दुपारी नीताचा, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा फोन आला.. हॅलो म्हटलं,

अन् हुंदका कानी घुमला!

तिच्या बाबतीत जे घडले होते ते अचानकच. माझ्या मैत्रिणीकडून थोडेफार कळले होतेच. तिनेच नीताला मला फोन करायला सांगितले होते. ध्यानीमनी नसताना तिच्या नवऱ्याला ‘करोना’ झाल्याचे निदान झाले.  लगेच रुग्णालयात ‘क्वारंटाइन’ व्हावे लागले. भेटीगाठी, बोलणे, भेटणे सगळे बंद. आणि एक दिवस फोनवरून सांगितले गेले की सगळे ‘संपले’. चालत्या संसाराचे एक चाक अचानक निखळून पडले होते..

काही दिवस गेल्यावर थोडं भानावर आल्यावर नीताने मला फोन के ला. त्याचे मुख्य कारण होते पैशांची चणचण. नवऱ्याने कुठे, किती, कसे पैसे ठेवलेले आहेत याची तिला काहीच माहिती नव्हती. आयत्या वेळची गरज म्हणून रुग्णालयाचे बिल, नंतरचा खर्च, सगळं काही तिच्या वडिलांनी आणि इतर नातेवाईकांनी केले होते. एका सुशिक्षित घरातली नीता, अशी कशी सगळ्या व्यवहारांपासून अनभिज्ञ राहिली होती? तिच्या एकू ण बोलण्याचा गोषवारा असा होता, की मी कफल्लक नाही, माझ्याकडे माझी स्वत:ची अशी थोडी रक्कम आहे पण ती पुरेशी नाही. मात्र नवऱ्याचे आर्थिक व्यवहार माहीत नसल्याने आता ताबडतोब मोठी रक्कम काढता येत नाहीए. तातडीच्या वेळी इतरांपुढे हात पसरला. मदतीला सगळे उभे राहिले, पण त्यांचे पैसे लवकर परत केले पाहिजेत ना? आत्तापर्यंत घर व्यवस्थित चालत होते, तशी अडचण नव्हती. त्यामुळे लक्ष घातले नव्हते, पण आता पुढे काय? नीतापुढे मोठा यक्षप्रश्न उभा राहिला होता.

अशा आणखी काही घटना कानावर आल्याच होत्या. त्यांचेही प्रश्न जवळपास नीतासारखेच होते. अशा वेळी एकाकी पडणे म्हणजे काय याची जाणीव तीव्रतेने झाली.  खरं तर नवरा- बायकोपैकी एकाचे अचानक निधन होणे म्हणजे दुसऱ्याची परीक्षाच असते. चहुबाजूंनी वेढणारे आर्थिक संकट आणि घरातील पैशांच्या गोष्टींचे आपल्याला काहीच ज्ञान नाही याची होणारी जाणीव म्हणजे जखमेवर मीठ लावल्यासारख्या वेदनाच.  ही वेळ येऊ नये म्हणून नवरा-बायकोने काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात.  प्रत्येक घरात, प्रत्येक जोडप्यामध्ये पुढील गोष्टींचा खुलासा केलेला असल्यास मागे राहणाऱ्यास आर्थिक बाजू सांभाळताना त्रास होणार नाही. हल्ली, अनेकांना अशी सवय झाली आहे, की जे काही नमूद करायचे ते आपल्या संगणकावर ‘सॉफ्ट कॉपी’ स्वरूपात टाकायचे. अगदी ‘प्रायव्हेट’ आणि ‘कॉन्फिडेन्शल’ असलेलेदेखील. ते जरूर असू देत तिथे. पण त्याशिवाय, महत्त्वाच्या नोंदी एखाद्या वहीत, डायरीत लिहून अत्यावश्यक पावत्या, कागदपत्रे, सारे काही एकत्रितरीत्या एखाद्या पिशवीत, फाइलमध्ये, कपाटातील खणात व्यवस्थित ठेवणे यथोचित आहे. जाणूनबुजून नव्हे, तरीही अशी कामे बऱ्याच घरांत मागे पडतात. करू.., ठेवू.., लिहायचा कंटाळा, काय होणार आहे मला.., वेळ येईल तेव्हा सांगेन.. इत्यादी कारणांनी ते लांबणीवर पडते. आणि इथला मुक्कामच अचानक संपला, तर नीतासारखी वेळ येते.

आता ‘करोना’ आटोक्यात येत असला, अगदी भविष्यात लसही मिळाली, तरीही कोणाची कशामुळे आणि कधी पटकन ‘एक्झिट’ होईल, सांगता येत नाही. त्याशिवाय अचानक गंभीर आजार, जीवघेणा अपघात घडला तर आयत्या वेळी पैशांची सोय आपली आपल्यालाच करता आली पाहिजे. त्यासाठी थोडेसे गंभीरतेने याकडे बघून, नंतर अंगावर पडणाऱ्या आवश्यक क्लिष्ट कामांतून आपल्याच माणसाला थोडासा दिलासा देता आला, तर त्याची सोय करणे गरजेचे आहे. पुढील गोष्टी करताना आवश्यक असलेल्यांची, पती-पत्नींची  मानसिकता आणि तब्येत ठीक असावी, हे मुद्दाम सांगते. दोघांनीही हे एकमेकांसाठी, मुलांसाठीही करायलाच हवे –

(१) स्थावर मालमत्ता- प्रत्यक्ष पैशांची गुंतवणूक- यामध्ये लवचीकपणा अधिक असतो. थोडय़ा कालावधीत ही गुंतवणूक मोडून पैसा उभा करता येतो. त्याला संलग्न नोंदी, किमान सर्वप्रकारची जुजबी माहिती असणे अनिवार्य आहे. प्रत्येक गोष्टीसाठी नामांकन(नॉमिनेशन) हवे. मृत्युपत्र वा इच्छापत्र अधिक सोयीचे.

आपल्या घरात येणारा पैसा कुठून येतो? म्हणजे- नोकरी, व्यवसाय, पगार, उत्पन्न, कमिशन वा याव्यतिरिक्तचे, अशा उत्पन्नाच्या सर्व मार्गाची कल्पना दिलेली हवी किं वा लिहून ठेवायला हवे.

नोकरी- आपली नोकरी कुठे आहे? तेथील पद, पगार, वैद्यकीय सुविधांसह इतर सुविधा- म्हणजे निवृत्तिवेतन, फंड, ग्रॅच्युइटी, सोसायटी वा अन्य माध्यमांतून काही रक्कम मिळणार असेल तर ती. त्यातील खाचाखोचा, संपर्क, प्रक्रिया, कागदपत्रे यांची माहिती द्यायला हवी.

भिशी- नातेवाईक, मित्रमैत्रिणी, सोने वा दागिने, अन्य प्रकारची भिशी- यातला हप्ता कितीचा, भिशी किती जणांची आहे, रक्कम, एकत्र जमणे कधी, भिशीसंबंधीचे बारकावे.

सर्व प्रकारच्या बँका,  ‘पोस्ट’मधील  विविध प्रकारची खाती, गुंतवणुकीची रक्कम, त्यांचे नंबर्स, चेकबुक, पावत्या, डिपॉझिट मॅच्युरिटीच्या तारखा.

सरकारी बाँड्स- आरबीआय/ रेल्वे/ डेव्हलपमेंट, विविध पेन्शन योजना, ‘एनएसएस’ (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिके ट) वा इतर.

म्युच्युअल फंड- फंड्सची नावे, कधी, किती पैसे ठेवले, स्वरूप काय, प्रकार, कुठून दिले, ब्रोकरची माहिती, ई-मेल्स.

शेअर बाजारामधील गुंतवणूक- ‘डीमॅट’, संलग्न खाते, डिपॉझिटरी, स्लिप्स, कोणामार्फत व्यवहार, ब्रोकर,अ‍ॅग्रीमेंटबद्दलचे बारकावे.

विमा गुंतवणूक- योजना, कुठला विमा, कितीचा, प्रीमियम काय, परतावा, एजंट कोण, त्यांचा संपर्क  क्रमांक.

मेडिक्लेम (वैद्यकीय विमा)- नसेल तर घेणे, कंपनी कोणती, विमा एकाचा की कु टुंबाचा, प्रीमियम काय. तो भरायची तारीख.

लवचीकता अधिक असलेल्यामध्ये- सोने, चांदी, हिरेमाणके, दागदागिने, घरातल्या वस्तू- अगदी पेनापासून टीव्ही, फर्निचर, मोबाइलसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत, वाहने, भांडीकुंडी. काहीही, जे मोडता येईल आणि पैसे उभे करता येईल, असे सारे काही. त्यांच्या पावत्या, विमा, कागदपत्रे आदी.

बँकेतील लॉकर आणि ‘सेफ कस्टडी’संबंधी- कोणाकोणाच्या नावे आहे, वापरायच्या सूचना. काय काय ठेवले त्याची यादी, मधूनमधून तपासणी आवश्यक, त्या व्यक्तीच्या पश्चात कोण वापरू शकते याची नोंद, त्याच्या किल्ल्यांची माहिती.

पतीपत्नीचे एक तरी संलग्न खाते असावे.

(२) जंगम मालमत्ता- कमी लवचीकता असलेल्या गोष्टी. एका जागी स्थिर असलेल्या मालमत्तेचा यात समावेश होतो. त्याबद्दलचे बारकावे ठाऊक असलेच पाहिजेत. इथेदेखील नामांकन अत्यावश्यक आणि मृत्युपत्र वा इच्छापत्र अधिक उत्तम.

राहते घर- नोंदणी के लेले ‘अ‍ॅग्रीमेंट’ (घराचा करार),पावत्या, सोसायटीच्या नोंदी, घराच्या महापालिका, ग्रामपंचायतीतील नोंदी, कर/ मेंटेनन्सच्या पावत्या- किमान मागील काही पावत्या तरी असाव्यात. वादातील काही मुद्दे असतील तर त्यांची माहिती, आवश्यक तिथे योग्य व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या केलेली सर्व कागदपत्रे.

इतरत्र असलेली घरे. एकाच गावात वा इतरत्र गुंतवणूक म्हणून आणखीनही काही घरे घेतलेली असतात. या सदनिका रिकाम्या असतात किं वा भाडय़ाने दिलेल्या असतात. त्याचीही सर्व कागदपत्रे माहितीसाठी उपलब्ध असायला हवीत.

गावी काही वडिलोपार्जित जमीनजुमला आहे का? वाडा, शेती, विहीर, डोंगर असेल तर त्याची माहिती, दस्तावेज परिपूर्ण आहेत का?, कागदपत्रांवर नाव नीट लागले आहे का? तिथे कोण राहते?, त्यांच्याशी आपले नातेसंबंध आहेत का?, विकायची वेळ आली तर आपली भूमिका काय आणि किती पैसे मिळतील?, फायदातोटय़ाचा आढावा, कोण लक्ष घालणार?, कौटुंबिक वातावरण, विविध शक्यता हे लिखित असावे. निदान ढोबळपणे सारे काही, संबंधितांची नावे, संपर्क क्रमांक लिहून ठेवावेत.

फार्म हाऊस- माहिती, कागदपत्रे, तिथे काही व्यवसाय असेल तर त्याचेही सारे बारकावे. संपर्क क्रमांक, इत्यादी.

(३) व्यवसायात गुंतवणूक असेल तर –

व्यवसायाचे स्वरूप, कुठला व्यवसाय?, नोंदणी कोणाच्या नावाने?

व्यवसाय एकाचा (प्रोप्रायटरी), भागीदारीत (पार्टनरशिप फर्म), नोंदणीकृत कंपनी वा अन्य? प्रत्येकाचा सहभाग किती टक्के ? त्यासाठीचा करार (अग्रीमेंट), एकूण उलाढाल, टक्केवारी, इतर बारीकसारीक गोष्टी.

उद्योग व्यवसायाची बँकेतील खाती, वापराचे अधिकार, त्यांच्या मर्यादा, कर्ज, गहाण काय, वैयक्तिक गुंतवणूक इत्यादी.

आर्थिक व्यवहार करताना अधिक प्रमाणात इंटरनेट बँकिंग, ऑनलाइन बँकिंगचा, व्यवहारांचा वापर असल्यास त्यांचे किमान मार्गदर्शन जोडीदाराला करावे. एका झटक्यात आकलन झाले, तरी त्याचा सराव असायला हवा. तेव्हा शिकून घेणे हिताचे. काही बाबतीत संपूर्णत: एकाच व्यक्तीस अधिकार असतो, त्या गोष्टी मृत्यूनंतर बाद होतात. उदाहरणार्थ- सर्व प्रकारची कार्ड्स- डेबिट, क्रेडिट, एटीएम कार्ड, प्रवासी, इंटरनॅशनल ट्रॅव्हल कार्ड्स इत्यादी. भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानुसार कुठलाही पासवर्ड, पिन नंबर, ‘ओटीपी’, कार्ड्सवरील तीन आकडी ‘सीव्हीव्ही’ नंबर, ट्रॅन्झ्ॉक्शन पासवर्ड कोणीही कोणाला सांगायचे नसतात, मात्र ती घरातच तुमच्या खासगी वहीत नोंदवून ठेवू शकता.

(४) अतिशय महत्त्वाचे- घेतलेली विविध प्रकारची कर्जे

गृहकर्ज- घरासाठीचे कर्ज किती?, फेडले/ उरले किती?, एकाच्या/ दोघांच्या नावावर, गृहकर्ज खाते बंद झाल्यावर घराची मूळ कागदपत्रे आणावीत. बऱ्याचदा हे राहून जाते.

कर्जासाठी तारण- वरील स्थावर-जंगम मालमत्ता गहाण टाकून कर्ज घेतात. त्यापैकी काय काय गहाण आहे?, कुठे?, कशासाठी?, ते कर्ज फेडले किती?, बाकी किती?  घर गहाण टाकून कर्ज घेतलेले असेल तर त्याची माहिती वेगळी लिहून ठेवावी.

बँकेतील मुदत ठेवी. पावत्या, पोस्टातील सर्टिफिकेट्स, शेअर्स (समभाग), गहाण कर्ज. बऱ्याचदा अधिक सुरक्षेसाठी (कोलॅटरल सिक्युरिटी) म्हणून देतात त्याच्या हव्यात.

बँका ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या घरावर ‘रिव्हर्स मॉर्गेज’ कर्ज देतात. ते फेडायचे नसते, तर मृत्यूनंतर कर्ज वजा करून ती मालमत्ता योग्य व्यक्तीस दिली जाते.

सर्वात महत्त्वाचे –

(५) इच्छापत्र- मृत्यूनंतर सर्व स्थावर, जंगम मालमत्तेच्या वाटणीचा आलेख लिहिलेला, सही केलेला दस्तावेज म्हणजे मृत्युपत्र/ इच्छापत्र होय. व्यक्तीचे इच्छापत्र रजिस्टर (नोंदणीकृत) करायलाच पाहिजे असे नाही. तरीही भविष्यात वादावादी होऊन त्रास होण्याची शक्यता जाणवत असेल, तर रजिस्टर करावे. नॉमिनेशन केले, तरी मृत्युपत्र  महत्त्वाचे असते. ‘नॉमिनी’स फक्त ताबा घेता येतो, त्यास मालकी हक्क मिळत नाही. वारस त्यावर आपला हक्क दाखवून न्यायालयात जाऊ शकतो.

आपल्या जोडिदारास कळायला हवी अशी सगळी माहिती एका वहीत पूर्णपणे व्यवस्थित नोंदवून आवश्यक तेव्हा तुमच्या जोडीदाराला मिळेल अशा प्रकारेही तुम्ही ठेऊ शकता. त्यामुळे तुमचे खासगीपणही जपले जाईल आणि काही वाईट घडलेच तर आपल्याच प्रिय व्यक्तीवर मनस्तापाची वेळ येणार नाही.

ही यादी सर्वागीणदृष्टय़ा परिपूर्ण म्हणता येणार नाही. ती कितीही वाढू शकते. याव्यतिरिक्त आणखीही काही असू शकते. प्रत्येकाने जबाबदारीने त्यावर भाष्य करणे, लिखित स्वरूपात ठेवणे हे योग्य ठरेल. सर्व नोंदींचे महत्त्व इथे अधोरेखित झाले आहे. आई-वडिलांच्या संपत्तीत मुलींचाही बरोबरीचा हिस्सा असतो. तेव्हा जे आहे त्याची माहिती पती-पत्नी दोघांनी सर्व मुलांना/ मुलींनादेखील दिली पाहिजे. किमान महत्त्वाच्या बाबींची जाणीव देणे अनिवार्य समजावे. त्यामुळे मुलांचे आणि पुढच्या पिढय़ांमध्ये नातेसंबंध जिव्हाळ्याचे राहून गैरसमज होणार नाहीत. एवढे केले तरीदेखील ऐनवेळी त्यावर शोधाशोध/ जुळवणी करताना त्रास, धावपळ होणार. सगळ्याला मूर्त स्वरूप देताना हेलपाटे मारणे, खबरदारी घेणे, कामांना लागणारा वेळ, संयम, हे आलेच. परंतु हे वेळच्या वेळी के ले आणि नियमितपणे पुढचे व्यवहार नोंदवले गेले तर तुमच्यानंतरच कशाला तुम्हालाही सगळे एका जागी एका वेळी पाहता येईल.

अगदी शेवटी मोलाचे,तसेच घातक ठरू शके ल अशी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. नातेसंबंध किती विश्वासाचे, प्रेमाचे यावरही वरील खुलासा देणे अवलंबून आहे. व्यक्ती किती जबाबदार, समजूतदार आहे, तेही ज्याचे त्याने जोखणे आलेच. गुंतागुंतीच्या परिस्थितीत वकिली सल्ला जरूर घ्यावा.अन्यथा कुटुंब स्वास्थ जपण्यासाठी आपले उत्पन्न जोडिदाराला माहीत असायला हरकत नसावी.

(लेखिका बँकिं गविषयक अभ्यासक असून बँकिं गविषयीची त्यांची पुस्तके  प्रसिद्ध झाली आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 2:00 am

Web Title: financial togetherness in family dd70
Next Stories
1 गर्जा मराठीचा जयजयकार : बहुभाषिकत्वाची गरज?
2 हेल्पलाइनच्या अंतरंगात : समंजस संवाद
3 चित्रकर्ती : जपणूक पटचित्रांची!
Just Now!
X