आपण एक नकारात्मक विचार करतो, पण त्यामुळे घरातील संपूर्ण वातावरणावर त्या नकारात्मकतेचा प्रभाव पडतो. मग उगाचच मुलांवर ओरडणं, मुलांनीही त्यावर आपली प्रतिक्रिया देणं, त्यामुळे आपण आधिकच संतापणं. कामं करतोय पण चिडून. वर आपणच म्हणतो, ‘आजचा सगळा दिवस खूपच वाईट गेला. त्यापेक्षा थांबा आणि पाच मिनिटं काढा स्वत:साठी..
आ पण अनेक भावनांमध्येच जगत असतो. कधी ही भावना आनंदाची तर कधी दु:खाची, कधी चिंतेची, कधी ईष्र्येची तर कधी ताणाची. हे सर्व भाव आपल्या चेहऱ्यावर दिसतात. त्याला कारणीभूत असतात आपण त्या त्या वेळी करीत असलेले विचार! आपण बागेमध्ये फिरत आहोत आणि आपली नजर एका सुंदर फुलावर पडते. त्या फुलाला पाहताक्षणीच आपला चेहरा एकदम खुलतो, टवटवीत होतो, अगदी त्या फुलासारखा! कारण त्या फुलाला पाहताक्षणीच आपल्या मनात विचार आला की, खरंच हे फूल किती सुंदर आहे. त्याचा रंग व सुगंधदेखील आपल्याला मोहून टाकतो. आपण फुलाच्या अधिक जवळ जाऊन त्याकडे बारकाईने बघतो व मनोमन हे ठरवून टाकतो की कुणी भेटलं तर जरूर सांगायचं की या बागेतील फुलं किती छान आहेत ते!
  त्याच बागेत आपल्याप्रमाणे इतरही अनेक जण फिरत असतात. पण त्यातले काही जण आपल्याच विवंचनेत त्या फुलाकडे बघत असतील तर त्यांच्या मनात फुलाबद्दल कोणत्याच भावना निर्माण होणार नाही. पण त्याच फुलाला पाहून तिथल्या एखाद्या पत्नीला काहीतरी आठवेल, ज्याने तिचे डोळे पाणावतील, लग्नानंतर आपला नवरा न चुकता रोज आपणासाठी ही फुलं आणायचा, पण आता मात्र प्रापंचिक जबाबदारीमुळे व कामाच्या व्यापापायी तो हे आणणं विसरलाय. पाहा, फूल तेच, पण जसा विचार तशी भावनादेखील बदलली.
चारचौघांत आपण गप्पा मारीत बसलो आहोत. एखाद्याने म्हटलं, अमुक एक व्यक्ती खूपच प्रामाणिक व अत्यंत उदार आहे, हे ऐकून आपल्या मनात कसे भाव उत्पन्न होतील? खूपच आदर वाटेल आपल्याला त्याच्याबद्दल! पण नेमकं असं म्हटलं की, अमुक एक व्यक्ती हलक्या वृत्तीची आहे, तर लगेच आपल्या मनातील भावनेचं स्वरूप काय असेल? म्हणजेच भावनेची निर्मिती कशावर आधारित असते, तर विचारांवर!
  दिवसाची आपली सुरुवात कशी होते? आपण रोज रात्री झोपताना घडय़ाळावर किंवा मोबाइलवर अलार्म लावतो. फोन स्नूझवर ठेवूनही कधी कधी जाग येत नाही. आपण नेमके उशिरा उठतो. झालं, उठल्याबरोबर आधी घडय़ाळाकडे लक्ष जातं आणि विचार येतो, ‘अरे बाप रे, केवढा उशीर झाला. आता सगळं कसं आवरून होईल? आज व्यायामालादेखील दांडी मारावी लागेल. सगळी गडबड! असं म्हणत हातातली कामं चालू होतात व मनात विचारचक्रही! मुलांना उठवायचं, त्यांची तयारी करायचीच, त्यांचा आणि आपला डबा बनवायचाच. नवरादेखील म्हणेल, ‘तुला अजिबात शिस्तच नाही.’ आपल्या डोक्यात विचार, ‘आता दिवसभराची ठरवलेली सगळी कामं होतील ना?’आणि पुन्हा म्हणतो, ‘न जाणो, आज सकाळी सकाळी कोणाचा चेहरा बघितला?’
आपण एक नकारात्मक विचार करतो, पण त्यामुळे घरातील संपूर्ण वातावरणावर त्या नकारात्मकतेचा प्रभाव पडतो. मग उगाचच मुलांवर ओरडणं, मुलांनीही त्यावर आपली प्रतिक्रिया देणं, त्यामुळे आपण आधिकच संतापणं. कामं करतोय पण चिडून. मग हाच चिडलेला चेहरा घेऊन ऑफिसात जाणं. तिथंही काही कारणावरून एखाद्याशी बिनसणं व पुन्हा आपणच म्हणतो, ‘आजचा सगळा दिवस खूपच वाईट गेला.’
आता बारकाईने पाहा की, ही सगळी प्रक्रिया कशी होते. विचार-मानसिक अवस्था-भावना-स्वभाव-कर्म-स्मृती. तथागत गौतम बुद्धांचे एक उदाहरण आठवतं. एकदा एक मनुष्य त्यांच्यासोबत वाद घालत होता. त्यांना सर्व जण एवढे महत्त्व का देतात, यावरून. नंतर नंतर तो चक्क शिवीगाळ करू लागला. तरीही तथागत शांत. त्याचं सगळं बोलून झाल्यावर तथागत म्हणाले, आपण एखाद्याला काही वस्तू देऊ करतो, पण समजा, समोरील व्यक्तीने त्याचा स्वीकारच केला नाही तर ती वस्तू कोणाकडे राहील? तर मनुष्य म्हणाला, ‘अर्थात देणाऱ्या व्यक्तीकडे.’ तेव्हा तथागत म्हणाले, ‘तूसुद्धा मघापासून मला जे काही दिलंस त्याचा मी स्वीकार केलेला नाही.’ त्या दिवसापासून तो मनुष्य त्यांचा शिष्य झाला. एखाद्या परिस्थितीत समोरील व्यक्ती आपल्याला खूप काही देईल, पण   आपण काय घ्यावं, हे आपल्यावर अवलंबून आहे! सकाळी उठताना उशीर झाला, ही अचानक आलेली परिस्थिती! तरीही या परिस्थितीमुळे तुम्ही तुमच्या मनाच्या स्थितीला स्थिर ठेऊ शकता. सकाळी उशीर झाला तरी पाच मिनिटं स्वत:साठी द्यावीत. पाच-दोन मिनिटं शांत, स्वस्थ बसावं. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करावी. कारण हाच मूड घेऊन आपण दिवसभर वावरणार असतो. तेव्हा शांतपणे आपल्याला कुठल्या विचारांनी दिवसाचा प्रारंभ करायचा हे ठरवावं, याच्यामुळे एक तर ही जाणीव येते की, मी माझे विचार स्वत: निर्माण करू शकते. (आय एम द क्रियेटर) व आपला आत्मविश्वासदेखील वाढू लागतो. तुम्ही उशिरा उठला असला तरी या सकारात्मक विचारांची सवय जर का लावून घेतलीत तर याने तुमचा सगळा दिवस पाहा किती आनंदात जाईल! पण आपण म्हणतो, आमच्याकडे पाच मिनिटंदेखील वेळ नाही. मग होतं काय, की आपण तीच कामं करणार, पण तणाव घेऊन करणार. त्यामुळे चिडचिड वाढणार व काम करण्यासाठी वेळदेखील जास्त लावणार. त्यात चुका होतील ही आणखी एक वेगळी गोष्ट! समजा, पाच मिनिटं नाहीत. पण एक मिनिट तरी काढू शकता? एका मिनिटासाठी हा विचार करा, ठीक आहे, मला उशीर झालाय. पण याचा प्रभाव माझ्या पुढच्या कुठल्याही गोष्टीवर पडणार नाही. आता परिस्थिती माझ्या नियंत्रणात असेल. माझ्या मनावर माझा ताबा असेल. आता मी स्थिर व शांत राहून आपल्या दिवसाची सुरुवात करीन. मग कामाबाबतचे निर्णय घेणं सोपं होऊन जातं.
 आपल्या मनात सतत काही ना काही विचार चालू असतात. अनेकदा ते इतके सहजपणे मनात येतात की लक्षातही येत नाही. ‘हे खूप वाईट लोक आहेत. यांनी असं करायला नको होतं.’ ‘हे लोक खूप चांगले आहेत, यांच्याकडे जे आहे ते माझ्यापाशी नाही? हे असं काय काय चाललेलं असतं आपल्या आत? आपला आंतरिक वार्तालाप सतत चालू असतो. आपण पूर्ण दिवसभर आपल्या मनाशीच तर बोलत असतो ना!
  रामायणकालीन एक गोष्ट आठवते. सीतेच्या शोधार्थ वानर समुदाय एकत्र आलेला असतो व त्यांना हे कळते की, सीतामाता रावणाच्या लंकेत आहे. लंकेत जाण्यासाठी समुद्र ओलांडावा लागणार असतो. आता एवढा मोठा समुद्र कसा बरे पार करायचा? सगळे जण या विचारात असतात. हनुमानदेखील चिंतित अवस्थेत बसलेले असतात. तेव्हा जांबुवंत म्हणतात, ‘हनुमान, आपण महाबलशाली पवनसुत आहात. लहानपणी सूर्याला गिळण्याचा तुम्ही केलेला प्रयत्न आठवा. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास जागवा. तुमच्यात असलेल्या असामान्य शक्तीला ओळखा. जा, तुम्ही लंकेत जाऊन विजयी होऊन या. या ठिकाणी जांबुवंत हनुमानात सकारात्मक वैचारिक ऊर्जा भरतो. थोडक्यात, शक्तिशाली विचार प्रदर्शित करतो आणि हे ऐकून अर्थातच हनुमानाला आपल्यात असलेल्या शक्तीची जाणीव होते व तो समुद्र उल्लंघन करण्यास सज्ज होतो. या ठिकाणी काय घडले, जांबुवंताने केलेला सकारात्मक विचार (बिकट परिस्थिती समोर असूनही) त्याने हनुमानाच्या मानसिक स्थितीचे परिवर्तन होते, त्यातून शक्तिशाली भावनेचा उगम होतो आणि हनुमानातील ‘महावीर’ जागृत होतो. त्याच्या हातून लोकोत्तर कार्य घडलं व आजही आपण त्या महानतेची स्मृतिसुमनं गातो. म्हणूनच मनाला सतत सकारात्मकतेकडे न्या. वाईट विचार, दृष्ट विचार टाळा. सगळं चांगलंच होईल.    ल्ल

( प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ‘ओम शांती मीडिया’ या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा हा मराठी अनुवाद)

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा